पिरकोनमधील वीरगळ (भाग-1)
‘शैव’ आणि ‘वैष्णव’ अशा दोन्ही परंपरांचे एकत्रिकरण या मंदिरात आहे.सिमेंटीकरणाच्या काळातही आपला नैसर्गिकपणा टिकवलेल्या शांत परिसरात हे मंदिर उभे आहे.
मंदिराच्या समोरील बाजूस झीज झालेल्या रुपातील दोन दगडी नंदी आहेत. या मंदिराच्या चौथऱ्याखाली उतरल्यावर दोन शिळा आधाराने ठेवलेल्या दिसतात.
तशीच एक भग्न शिळा समोरील बोडणीच्या(छोटा तलाव) कडेला ठेवल्याचे आढळते. गेली कित्येक वर्षे उन-पाऊस झेलत या शिळा मंदिराबाहेर पडून आहेत. नाही म्हणायला कधी कधी त्यांच्यावर एखादा शेंदूरतिलक अथवा चुना फासून या दुर्लक्षित शिळांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ते तेवढ्यापुरतेच.
पण या दुर्लक्षित शिळांकडे इतके लक्ष वेधण्याची गरजच काय?
काय वैशिष्ट्य आहे या दगडांचे?

चला महत्त्व जाणून घेऊया, पिरकोन मधील या ऐतिहासिक पाऊलखुणांचे...
शिवमंदिरासमोर असणाऱ्या या शिळा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘वीरगळ’ आहेत.
महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात वेशीजवळ किंवा शंकराच्या देवळाजवळ गेल्यावर वीरगळ दिसून येतात. हे वीरगळ प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे बोलके पुरावे आहेत. वीरगळ म्हणजे काय ते आधी समजून घेऊ या. “एखाद्या शूरवीरास कोणत्या कारणास्तव वीरगती प्राप्त झाली आहे त्याचे चित्रण ज्या शिळेवर कोरले जाते तीला ‘वीरगळ’(Hero Stone) म्हणतात.” वीरगळांचा काळ दुसरे शतक ते अठरावे शतक असा गणला जातो. युद्धात कामी आलेल्या योद्ध्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा वीरगळ उभारल्या गेल्या आहेत. स्तंभरूपी वीरगळावर चौकटींमध्ये वीराच्या आयुष्यातील प्रसंग कोरलेले असतात. साधारणत: खालच्या चौकटीत मरून पडलेला वीर तर मधल्या खणात अप्सरा ह्या वीराला सन्मानाने घेऊन जाताना दिसतात. त्याच्या वरच्या कप्प्यात नंदी, शिवलिंग, पूजा विधी सांगणारा ब्राम्हण व शिवलिंगाची पूजा करणारा वीर, तर सर्वात वरच्या खणात कलश म्हणजे वीराचे कैलाश गमन दाखवलेले असते. कलशाच्या दोन्ही बाजूस चंद्र-सूर्य कोरलेले असून याचा अर्थ जो पर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत तो पर्यंत ह्या वीराची किर्ती कायम राहील हे यातून सांगायचे असते.
शिवमंदिराच्या चौथऱ्यासमोर ज्या दोन वीरगळ ठेवलेल्या आहेत, त्यातील आकाराने मोठ्या वीरगळीकडे पाहूया.
![]() |
विरगळ क्र. 1 |
आकाराने मोठ्या वीरगळाच्या बाजूला त्रिकोणी माथा असलेला दुसरी लहान वीरगळ आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही वीरगळ तीन चौकटींमध्ये बनलेली असल्याचे दिसून येते.
![]() |
वीरगळ क्र.2 (सतीशिळा) |
याच वीरगळांसमोरील भागात आणखी एक वीरगळ भग्न अवस्थेत पडून आहे.
![]() |
वीरगळ क्र. 3 |
![]() |
शिवमंदिराच्या मागील बाजूचे शिल्प |
![]() |
वेताळदेव परिसरातील वीरगळ |
चौकोनी स्तंभरूपातील या वीरगळीवर केवळ एकच मानवी आकृती कोरलेली आहे. तळाचा भाग रूंद व वरील भाग निमुळता, तसेच त्यावर शिवलिंगाप्रमाणे गोलाकार भाग अशी रचना या वीरगळीची आहे. अशाच स्वरूपाची रचना असणारे आणखी दोन वीरगळ याच मार्गाने पुढे गेल्यास पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकाजवळ आढळतात. पाणदिवे स्मारकाजवळील एका वीरगळीवर वीराची मोठी प्रतिमा कोरण्यात आली आहे.
![]() |
पाणदिवे येथील वीरगळ |
![]() |
मारूती मंदिरासमोरील लिखित विरगळ |
गेल्या कित्येक शतकांपासून इतिहासाचे हे मूक साक्षीदार उपेक्षित अवस्थेत पडून आहेत. यापूर्वी पिरकोन व आवरे या शेजारील दोन गावांचा उल्लेख ठाणे येथे सापडलेल्या ताम्रपटात आढळला होता. आता प्रत्यक्षात पिरकोन परिसराचा समृद्ध वारसा या वीरगळांच्या निमित्ताने समोर आला आहे. आता गरज आहे ती या ऐतिहासिक वारशाच्या जतनाची. या अनाम वीरांनी दाखवलेल्या शौर्याची जाणीव ठेवून समाजाप्रती आपली बांधिलकी ठेवून असेच समाजकार्य पुढे चालू ठेवण्याची. हे दगड यापुढेही आपल्याला प्रेरणा देतील, समाजविघातक प्रवृत्तींविरूद्ध लढण्याची.
चला सर्वांनी मिळून या ऐतिहासिक आणि समृद्ध वारशाला जपूया... आपल्या भूमीसाठी, आपल्या लोकांसाठी वीरमरण पत्करलेल्या या अनाम वीरांना आठवणीत ठेवूया...
- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)
संदर्भ: महाराष्ट्रातील वीरगळ- सदाशिव टेटविलकर, इतिहासाचे मूक साक्षीदार- आषुतोष बापट, विकीपीडीया - https://en.m.wikipedia.org/wiki/Hero_stone
(पिरकोनमधील वीरगळ भाग-2 लवकरच येत आहे...)
Comments
आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद!