Search This Blog

Wednesday, September 27, 2017

घड(व)लेले पदार्थ

माझं नाव तुषार म्हात्रे, पेशाने आणि पैशानेही शिक्षकच! गेली दहा वर्षे नोकरीच्या निमित्ताने भटकंती करतो आहे. मुंबईला जवळ असूनही अस्सल ग्रामीणपणा टिकवलेल्या पिरकोन गावचा कधीकधी रहिवासी. म्हणजे एकप्रकारे अनिवासी पिरकोनकरच. पाककलेचा फारसा अधिकृत पूर्वेइतिहास नसलेल्या कुटूंबातला आणि एकेकाळचा शुद्ध(!) मांसाहारी मनुष्य. एकेकाळचा म्हणण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत शुद्ध मांसाहारी ते शुद्ध शाकाहारी असा कठीण प्रवास झाल्यानंतर सध्या मिश्रहारी हे बिरूद मिरवत आहे. चहा हे आमच्या संपूर्ण कुटुंबाचं राष्ट्रीय पेय. पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये ज्याप्रमाणे एखाद्या घटकाचे विश्लेषण करून मिळते त्याप्रमाणे आमच्या घरातील व्यक्ती चहा पिऊन झाल्यानंतर त्यातील चहापत्तीचे प्रमाण, साखर, दूधाचा प्रकार इ. सहज सांगू शकतात. (खोटे वाटत असेल तर माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच भाईला चहाला बोलवून पहा.)
असो, आता नमनालाच घडाभर चहा झाल्यानंतर मी मूळ मुद्द्याकडे येतो.मी पदार्थ (बि)घडवायला कधी लागलो? नेमकं आठवत नाही पण, माझ्या पाककलेची सुरूवात माझ्या आवडी-निवडीमुळेच झाली. ज्या वेळी ताटात माझ्या आवडीचे जेवण नसेल त्यावेळी मी स्वत: उठून एखादी चटणी किंवा ‘इन्स्टंट’ पूरक पदार्थ तयार करून खात असे. बऱ्याचवेळा हा पदार्थ उपलब्ध साहित्य आणि वेळ या गोष्टींवर अवलंबून असायचा. हा पदार्थ मी एकट्यापुरताच करत असे. या पदार्थाची पाककृती माझी स्वत:ची असल्याने मी ते आवडीने खायचो पण यातील शिल्लक पदार्थ घरातल्यांना मिळाल्यास (चुकून) ते देखील चवीने खायचे. बटाटा आणि अंडे या दोन गोष्टींवर मी आतापर्यंत इतके प्रयोग केले आहेत की ते लिहून ठेवले असतेे तर एखादे पाककृतींचे पुस्तकच तयार झाले असते. कैरी, कच्ची करवंदे यांचे इन्स्टंट लोणचे ही माझी खासियत. मी या पदार्थाचे पेटंटही घ्यायला हरकत नसावी.या पदार्थाने मला आतापर्यंत खूपवेळा मदतीचा हात दिलाय. तिखट मसाल्याला वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने फोडणी दिल्यानंतर कोमट तेलात कैऱ्यांच्या फोडी टाकून तयार केलेले लोणचे घरातील सर्वचजण आवडीने खातात.आमच्या घरातल्यांपैकी  खाण्याच्या पदार्थांवर विविध प्रयोग करण्यात आमची ‘बारकी आत्या’ माहिर आहे. तिने घडवलेले-बिघडवलेले पदार्थ मी खूप वेळा खाल्ले आहेत. मात्र तीने देखिल माझ्या कडून या इन्स्टंट लोणच्याची कृती विचारून घेतली आहे. (हे म्हणजे सचिन तेंडुलकरने आशिष नेहराकडून फलंदाजीच्या टिप्स घेतल्यासारखे झाले.) अर्थात त्या बदल्यात मी देखील बरेचसे पदार्थ तिच्याकडून शिकून घेतले.नोकरीची सुरूवात घरापासून दूर महाडजवळील पोलादपूर तालुक्यात झाल्यामुळे पोटापाण्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला होता. एका अविवाहित पुरुषाला ‘परपोषी’पणाकडून ‘स्वयंपोषी’पणाकडे जाण्याची हीच खरी संधी होती, परंतु रुमपार्टनर्सच्या आग्रहाखातर खानावळवाले,डब्बेवाले, हॉटेलचालक, ढाबेवाले या सर्वांना व्यवसाय करण्याची आम्ही वारंवार संधी दिली. या परोपकार करण्याच्या काळातही माझे ‘इन्स्टंट’ प्रयोग चालूच होते. या जोडीला पोलादपूरमधील सुमारे पाच वर्षाच्या काळात मी आमचे ‘राष्ट्रीय पेय’ चहा बनवण्यात तरबेज झालो. खोलीवर कोणीही पाहुणे आले तरी चहा मीच बनवायचा हे अलिखितच होते.
चहाच्या संदर्भातील तेथिल एक आठवण आहे. आमच्या एका शिक्षक मित्राचे नुकतेच लग्न झाले होते. त्याने आम्हाला जेवणासाठी आमंत्रण दिले होते. पोलादपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शाळेत तो काम करत होता. राहण्याचे ठिकाणही तेच गाव. अमित आणि विश्वंभर हे माझे दोन रूमपार्टनर तसेच आमच्याहून वयाने ज्येष्ठ असलेले म्हात्रे गुरूजी असे चारजण संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. सुरुवातीला पाणी वगैरे देऊन झाल्यानंतर त्या शिक्षक मित्राने मला किचनमध्ये बोलावले आणि सर्वांसाठी चहा करण्यास सांगीतले. त्याला माझ्या हातचा चहा आवडत होता. चहा बनवल्यानंतर त्याने तो चहा त्याच्या पत्नीलाही दिला व असाच चहा बनवायला शिकूून घे असा सल्लाही दिला. माझे नशिब इतकेच की मी भांडीदेखिल चांगली घासतो हे त्याला आठवले नाही, नाहीतर अजूनच पंचाईत झाली असती.
कालांतराने माझी बदली उरण तालुक्यात झाली, त्यानंतर लग्नही झाले त्यामुळे माझी स्वयंपाकघरातील लुडबूडही कमी झाली. आता माझ्यातील स्वयंपाकातील कला लुप्त होणार की काय अशी भिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा आमचे व्यवस्थापन मदतीला धावले. अवघ्या 4 वर्षानंतर 2016 साली  माझी बदली पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात झाली. नोकरदार पत्नी आणि दीड वर्षाच्या रियानला सोडून 200 किमी लांबच्या शाळेत रुजू झालो. तालुक्याचे ठिकाण असूनही केवळ एकच खानावळ, लहानशी बाजारपेठ यांमुळे माझेही कुपोषण होण्याची शक्यता निर्माण झाली. माझ्या सुदैवाने व माझ्या मित्राच्या म्हणजेच महेशच्या दुर्दैवाने त्याचीही बदली मोखाडा येथेच झाली. माझे सुदैव असे म्हणण्याचे कारण म्हणजे तो एक चांगला स्वयंपाकी आहे. त्याच्या सोबत राहून मी सुद्धा आता बऱ्यापैकी जेवण तयार करू शकतो. ‘इन्स्टंट’ प्रकारापुरती मर्यादित असलेली माझ्या पाककलेच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. इतरांच्या घरात जसे स्वयंपाकघर असते तसे आमच्या खोलीत ‘स्वयंपाक प्रयोगशाळा’ आहे. अनुभवातून चुकतो आहे पण शिकतो आहे. विविध प्रकारचे पदार्थ तयार केलेत, परंतु उत्कृष्ट चहा बनवणारा अशीच माझ्या मित्रांमध्ये ख्याती आहे. मात्र अजूनही मी केलेला चहा आमच्या भाईला फारसा रुचलेला नाही. जेव्हा मी केलेल्या चहाला भाई पसंती देईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मी चहा बनवण्यात वाकबगार झालो असे म्हणता येईल.

- तुषार म्हात्रे,  पिरकोन (उरण)

(वरील लेख लोकसत्तातील ‘चतुरंग’ पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

Tuesday, September 19, 2017

पावसाळी स्पर्धांचे चिखल

सध्या संपूर्ण राज्यात फुटबॉल फीव्हर चालू अाहे. आपल्या ‘सवासो करोड’ लोकसंख्येच्या देशाला या सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या खेळात केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागलीय हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. सदस्य देशांची संख्या सर्वात जास्त असलेल्या या वेगवान खेळामध्ये आपण पहिल्या शंभरात देखील नाही आहोत. सध्याचे मिशन फुटबॉलचे सामने पहात असताना मला काही वर्षांपूर्वी झालेल्या शालेय स्तरावरील 'पावसाळी क्रीडा स्पर्धे'ची आठवण झाली. मी त्यावेळेस रायगड जिल्ह्यातील पोलादपूर सारख्या दुर्गम अशा परिसरात शिक्षक म्हणून कार्यरत होतो.
  शिकविण्याचे विषय विज्ञान व गणित असल्याकारणाणे खेळाशी फारसा संबंध येत नव्हता. परंतु क्रीडा स्पर्धांच्या वेळेस तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थी घेऊन जाण्याचे काम मी ब-याच वेळेस केले. त्या वर्षी पहिल्यांदाच केवळ जिल्हास्तरावर होणारी फुटबॉल स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात आली. फुटबॉलचा समावेश झाल्याने त्या खेळाचा सराव करणे गरजेचे होते. आमच्या विद्यार्थ्यांचा जोरदार सराव मैदानावर सुरू झाला. ऑफ तासाच्या वेळेस सहज लक्ष गेले असता, सर्व मुले फुटबॉलच्या मागे धावताना दिसली. जो आपल्या
मनाला येईल त्या दिशेला चेंडू मारत होते. मी आमच्या खेळाच्या शिक्षकांना गोलकीपर आणि गोल करण्याची जागा कुठे आहे, असे विचारले असता ते गोंधळून गेले. 'मैदानाच्या दोन्ही बाजूला दोन गोलपोस्ट असतात व त्यात चेंडू मारून
गोल करायचा असतो, तसेच गोलकीपरने गोल होण्यापासून अडवायचे असते'; इतकी नविन(!) माहिती सांगीतल्याने संघाचा सराव करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. तीन दिवस अर्धा तास खडतर(?) सराव करून मुला-मुलींचे दोन संघ स्पर्धेला घेऊन गेलो असता तिथे वेगळेच चित्र पहायला मिळाले. तालुक्यातून मुलींचे केवळ दोन तर मुलांचे तीन संघ सहभागी झाले होते. त्यात कळस म्हणजे फुटबॉल खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने 'फ्री कीक' द्वारे 'निक्काल' लावण्यात आला.चप्पल घालून खेळणा-या आमच्या शाळेच्या मुलींनी  प्रथम, तर मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव ऊंचावले. मी यशस्वी प्रशिक्षक ठरल्याने माझाही भाव वाढला. जिल्हास्तरावरील फुटबॉल तालुका
स्तरावर आल्याने खेळाचा दर्जाही ऊंचावला असावा. मात्र फुटबॉलचे सामने पाहताना आजही मला फुटबॉल या खेळाचे चिखल करणारी ती पावसाळी स्पर्धा आठवते.

-तुषार म्हात्रे, पिरकोन(उरण)

Wednesday, September 13, 2017

सामान्यांचे असामान्य टॉकीज

(‘विलक्षण अनुभवांचे लिखित क्षण’- तुषार म्हात्रे)

       अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा या आमच्यासारख्या सामान्य भारतीयाच्या मूलभूत गरजा. पहिल्या तीन गरजांपैकी एखादी अपूर्ण राहिली तरी चालेल पण ‘सिनेमा’ ही गरज पूर्ण व्हायलाच हवी हे नक्की. खोटं वाटत असेल तर खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये तल्लीन होऊन मोबाईलवर पायरेटेड सिनेमे पाहणाऱ्यांना विचारा. इतर प्रवासी दोन पायांवर सरळ उभे राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना भक्तीभावाने सिनेमे पाहणाऱ्यांना आठवा. पोटात भूक, कपडे विस्कटलेले आणि उभे राहण्यासाठीही जागा नसताना चित्रपटाचा आनंद घेतला जाणे ही बाब चित्रपटाला मूलभूत गरजांमध्येच नेऊन ठेवते. संपूर्ण जग या सिनेमांच्या प्रेमात पडला असताना मी सुद्धा त्याला कसा अपवाद असेन?

टी.व्ही, लॅपटॉप, मोबाईल, टॉकीज; शक्य होईल त्या मार्गाने मी माझी चित्रपट पाहण्याची हौस भागवत आलो आहे. माझ्या सिनेमॅटीक आठवणींमध्ये महाडच्या एका टॉकीजचे नाव चोवीस कॅरेट सुवर्णाक्षरांनी लिहलं जाईल. मी नोकरीच्या सुरूवातीच्या काळात पोलादपूर येथे वास्तव्यास होतो. रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पोलादपूर तालुक्यात एकही चित्रपटगृह नसल्याने माझ्यासारख्या अनेक सामान्य जनतेची गैरसोय होत होती. त्यामुळे माझी रुपेरी हौस भागवण्यासाठी जवळील महाड शहराकडे जावे लागले. महाडमधील या ‘असामान्य’ टॉकीजला पहिल्यांदा पाहिलं ते शाहिदच्या ‘कमिने’ चित्रपटाच्या निमित्ताने. रिकामा  रविवार पाहून अनिकेत दरेकर आणि सुमित असे दोन दरेकर बंधू चित्रपटाच्या नावासारखेच सोबती घेऊन महाडकडे कूच केली. दुपारी बाराच्या खेळाच्या अंदाजाने साडे अकराच्या सुमारास महाडात दाखल झालो. सुप्रसिद्ध शिवाजी चौकातून चालत जाऊन टॉकीजपर्यंत पोचलो. तिकीट टपरीपाशी (त्या प्रकाराला तिकीट खिडकी म्हणता येणार नाही.)धोनी सारखे लांब केस असणारा व्यक्ती हातात झाडू घेऊन उभा होता. चौकशी केली असता प्रेक्षक संख्येअभावी दुपारचा खेळ रद्द झाल्याचे कळले. थोडा निराश झालो पण सुमितने लगेचच दुसरीकडे फिरायला जाण्याचा बेत आखला आणि त्याच्या बाईकवर ट्रिपलसीट बसून प्लॅन बी ठरवला आणि ‘शिवथर घळ’ परीसराकडे रवाना झालो.

   पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्याने पुढच्या वेळेस चित्रपट पाहण्यासाठी अधिक काळजीपूर्वक नियोजन करण्याचे ठरले. अनिकेत महाडजवळील कॉलेजमध्ये बी.एस.सी.आय.टी.ला होता. त्यामुळे त्याचे महाडला नेहमी येणे जाणे होते. वेळ मिळाल्यावर कधी कधी तो कॉलेजलाही जात असे. त्याला पुढील चित्रपटाची चौकशी करण्यास सांगीतले. एका शनिवारी त्याने ‘दिल बोले हडीप्पा’ या चित्रपटाचा दुपारी  अडीचचा शो असल्याचे सांगीतले. चित्रपटाविषयी फारशी उत्सुकता नव्हतीच, पण शाहिद कपूर आणि राणी मुखर्जी ही नावे पाहून पुन्हा थिएटरवर चालून गेलो. यावेळेस फक्त अनिकेत आणि मी असे दोघेच होतो. दुपारी दोनच्या सुमारास टॉकीजजवळ पोचलो. तिकीट टपरीवर जाऊन दोन तिकीटे मागीतली. पाकीटातल्या आतील कप्प्यात घडी घालून लपवलेली पाचशेची नोट काढली.

_“चाळीस रूपये सुट्टे द्या!”_ धोनीसारखे लांब केस असणाऱ्या व्यक्तीने तिकीट-टपरीच्या आतून आवाज दिला.

चाळीस रूपये प्रत्येकी म्हणजे दोघांचे ऐंशी रुपये या हिशेबाने मी शंभर रुपये दिले. आतून साठ रुपये परत आले. मी पैसे हातात घेऊन आश्चर्याने पहात असताना आतून पुन्हा आवाज आला, _“बराबर झाले, वीस रुपये तिकीट आहे.”_
 मला आश्चर्याचा पण आनंददायी धक्का बसला.

टपरीतला आवाज ऐकून अनिकेत पुढे येऊन म्हणाला , _“वीस रुपये? मागच्या महिन्यात तर पंधरा रुपये होते!”_
 हा दुसरा धक्का.
 ही सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि इतक्या कमी दरात चित्रपट दाखवणारे दुसरे कोणतेही टॉकीज मला तरी माहित नाही. तिकीटे खिशात घालून गेट उघडण्याची वाट पहात उभा राहिलो. आधीचा शो संपायला पाच एक मिनीटे बाकी होती. आतल्या चित्रपटाचे संवाद स्पष्टपणे बाहेर एेकू येत होते. थिएटर बाहेर येणारा आवाज ऐकून मला लहाणपणी गावाकडे शेतातील ओपन थिएटरमध्ये लावल्या जाणाऱ्या पडद्यावरील चित्रपटांची आठवण झाली. त्या काळी पडद्यावरील चित्रपट पाहण्यासाठी गेल्यावर लांबूनच आवाज ऐकून उत्सुकता वाढायची, तशीच काहीशी अवस्था झाली होती. आधीचा शो संपला, मोजकेच प्रेक्षक बाहेर पडले. नव्याने रंगकाम केलेला जुना लोखंडी गेट उघडला गेला. उघड्या मोठ्या लाकडी दाराला लागून असलेला एक सरकवता येणारा जाड काळा पडदा बाजूला सारून आम्ही थिएटरमध्ये शिरलो. आतील अर्धवट प्रकाशात मी तिकीटावरील सीट क्रमांक पाहू लागलो. मला अनिकेतने थांबवलं आणि आपण इतरांच्या आधी आत आलो आहोत त्यामुळे पाहिजे त्या सीटवर बसता येईल असा नियम सांगीतला. लाकडाचे मजबूत बांधकाम असलेल्या या थिएटरमध्ये पंखा आणि स्वच्छ खुर्ची पाहून बसलो. बाहेरच्या वातावरणापेक्षा आतमध्ये थंड वाटत होतं. आम्ही ज्या रांगेत बसलो होतो त्या रांगेत आणखी काही प्रेक्षक बसले, परंतु आमच्या पुढच्या आणि पाठीमागच्या रांगेत कोणीच बसत नव्हतं. बाल्कनीची सुविधा असलेलं जुन्या काळातलं हे टॉकीज बऱ्यापैकी मेंटेन केलेलं वाटत होतं. इथल्या बाल्कनीचं तिकीट महाग होतं. (तब्बल पंचवीस रुपये! ) त्यामुळे आम्ही स्टॉलचंच तिकीट घेतलं होतं.  मी  संपूर्ण थिएटर न्याहाळत असताना तिकीट टपरीवरच्या धोनीनं धावत येऊन दरवाजाचा काळा पडदा सरकवून अंधार केला आणि राष्ट्रगीत सुरू झालं. चित्रपटाला सुरूवात झाली. चित्रपट अपेक्षेप्रमाणेच कंटाळवाणा होता. पण पडद्यावरील चित्रपट पाहताना बाजूच्या परिस्थितीचा विसर पडला. पिक्चर क्वालिटी चांगलीच होती. साऊंड सिस्टीमबद्दल वेगळे बोलायची गरज नाही, गेटवर असतानाचा बाहेर आवाज येण्याचा प्रसंग वर उल्लेखलेलाच आहे. थोड्या वेळाने अनिकेतने मला आजूबाजूला बघायला सांगितले. आमच्या पुढे मागे कोणीच का बसले नाही या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. प्रेक्षकांमधील प्रत्येकजण ‘दिवार’मधील अमिताभ सारखे पुढच्या सीटवर पाय ठेऊन रेलून बसले होते. मी पण त्यांचाच कित्ता गिरवला. क्रिकेटवर आधारीत चित्रपट असल्याने आणि पैसे भरलेले असल्याने चित्रपट मन लावून पाहू लागलो. इंटर्व्हलला एक-दोन मिनीटे बाकी असताना धोनीने दरवाजासमोरील काळा पडदा सरकवला आणि पळत निघून गेला. अचानक उजेड आल्याने सर्वजण वैतागले, पण इंटर्व्हल झाल्याचे कळल्याने शांत झाले. मोकळे होण्यासाठी बाहेर आलो. खूप मोठ्या पिंपळाच्या वृक्षाच्या छायेत असलेल्या, दरवाजे व छप्पर नसलेल्या खुल्या मुतारीमध्ये जाऊन आलो. समोर पाहतोय तो लांब केसांचा धोनी एका टेबलवर पॉपकॉर्न,शेंगदाणे विकायला बसलेला!

‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी’ तोच!

अनिकेतने शेंगदाणे घेतले. दोन रुपयांना एक पुडी.

_“सर, हा धोनीच बहुतेक टॉकीजचा मालक असावा!”_ अनिकेत शेंगदाणे खात म्हणाला. _“मलाही तसंच वाटतंय”_, मी मान हलवून सहमती दर्शवली. मी मनातल्या मनात विधात्याचे आणि थिएटर मालकाचे आभार मानले ज्याच्या  कृपेने या महागाईच्या दिवसांत अशी स्वस्ताई पहायला मिळत होती.

धोनीने टेबलवरील सामान आवरून पुन्हा काळा पडदा सरकवला आणि चित्रपट सुरू झाला. शाहिद-राणी नसलेल्या कथानकामध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्ही दोघे एकेका प्रेक्षकाचे निरीक्षण करत चित्रपटगृह एंजॉय करत होतो. अखेर ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला.चित्रपट संपला (एकदाचा!). संध्याकाळी रूमवर आलो आणि टॉकीजचे एकेक किस्से आठवून खूप हसलो. अनिकेतने विचारलं, _“सर पुन्हा जायचं का?”_ मी हसून होकार दिला.

पुन्हा जायचा योग दोन महिन्यांनी आला. माझ्या आवडत्या रणबीर कपूरचा ‘अजब प्रेम की गज़ब कहानी’ लागला होता. मागच्या अनुभवातून धडा घेत चाैकशी करुन टॉकीज गाठले. थिएटरमधील ‘अवतारी पुरूष’ स्वागताला हजर होताच. तिकीट काढून पंखा आणि स्वच्छ खुर्चीच्या शोधात निघालो. तेवढ्यात धोनीचा बाहेरून आवाज आला, _“तिकीटावरच्या नंबरवरच बसायचा!”_

    ह्या सीट नंबरचा नियम पाळण्याच्या आदेशाचे कारण आधीच्या महिन्यात दडले होते. महिन्याभरापूर्वी सलमान खानचा ‘वाँटेड’ रिलीज झाला होता. सलमानच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या या चित्रपटाने महाडमधील गरीबांच्या टॉकीजलाही तारले. दिवसाला एक शो व्हायची मुसिबत असणाऱ्या थिएटरमध्ये ‘वाँटेड’ चे शो ‘मोस्ट वॉंटेड’ ठरले. दिवसाला चार-चार शो होऊ लागले; ते ही हाऊसफुल्ल! या चित्रपटाने टॉकीजमध्ये महिनाभर धुमाकूळ घातला. हातावर पोट असणाऱ्यांना दोन घटका करमणूकीसाठी अॅक्शन पॅक्ड सलमान खान नेहमीच हवा असतो. या चित्रपटामुळे बऱ्याचशा प्रेक्षकांचे पाय चित्रपटगृहाकडे वळले. त्याचाच परिणाम होऊन टॉकीजमध्ये पुन्हा शिस्तीचे वारे वाहू लागले.

     आम्ही धोनीच्या आदेशाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आणि पुन्हा पंखा आणि स्वच्छ खुर्ची असा दुर्मिळ संयोग शोधून आसनस्थ झालो. चित्रपट खूपच मनोरंजक होता. चित्रपटाच्या जोडीला आमचे प्रेक्षक निरीक्षण चालूच होते. चित्रपट सुरू होऊन अर्धा तास झाला असतानाच बाहेरचं वास्तव आणि आतील स्वप्नं यांना विलग करणारा काळा पडदा उघडला गेला. इंटर्व्हलशिवाय सहसा न सरकणारा पडदा सरकल्याने सर्वांचे लक्ष दरवाजाकडे गेले. धोनीने दोन नविन प्रेक्षकांना आमच्यात सामील केले. एखाद्या बांधकाम कामगारांप्रमाणे वेश असणारे दोघे अंधारात चाचपडत पहिल्यांदा जमिनीवरच बसले. नंतर एकाने त्यांना मोबाईल फोनच्या प्रकाशात रिकामी खुर्ची दाखवली. त्या आधारे ते आमच्या रांगेत येऊन बसले.  आमच्या जवळच्या खुर्चीत बसल्याने त्यांच्या हातातल्या कोल्ड्रींकच्या काचेच्या(!) बाटल्या मला स्पष्टपणे दिसल्या. मी अनिकेतला बाटल्यांकडे पाहण्यास सांगीतले. त्यात शीतपेयच असावे, पण आश्चर्याची बाब म्हणजे या टॉकीजच्या जवळपास एकही दुकान, हॉटेल किंवा टपरी नव्हती. त्यामुळे या दोघांनी आणलेल्या बाटल्या दहा ते पंधरा मिनीटे चालत जावे लागेल इतक्या लांबून आणलेल्या असणार हे नक्की. इतक्या लांबून झाकण उघडलेल्या काचेच्या बाटल्या घेऊन चित्रपट पाहण्यास येणे हे खरे कौशल्याचेच काम आहे.

 चित्रपट पैसा वसूल होताच त्यातच मनोरंजनाचा अतिरीक्त डोस थिएटर मधील गंमतीदार प्रसंगांद्वारे वेगऴ्याच पद्धतीने मिळत होता.

अशा अनेक गंमती-जंमती या टॉकीजमध्ये पहायला मिळायच्या. ‘कुर्बान’ चित्रपटाच्या वेळेस तर पाठीमागच्या रांगेत बसलेल्या एका टोळक्याने चित्रपटाला कंटाळून मोबाईलवर व्हिडीओ पाहण्यास सुरूवात केली होती. या व्हिडीओला मूळ चित्रपटापेक्षा अधिक हिट्स मिळाले असतील. खरं तर टॉकीज मालकांनी आमच्याकडून या अतिरिक्त मनोरंजनाचे शुल्क घ्यायला हरकत नव्हती.

     तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीचे पण महागाईच्या काळात परवडणाऱ्या या असामान्य टॉकीजला आम्ही नेहमीच ‘एंजॉय’ केलंय. एका ‘शो’ साठी  प्रतिव्यक्ती पाचशेच्या घरात जाणाऱ्या मल्टीफ्लेक्समध्ये गेल्यावर पन्नास रुपयांत दोघांचा खर्च भागवणाऱ्या या थिएटरच्या आठवणीने गदगदून येते. कष्टकऱ्यांच्या रक्त आटवणाऱ्या जीवनात, पैशाच्या पाठीमागे धावताना अगदी कमी पैशामध्ये मनाला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणाऱ्या या टॉकीजची भूमिका कमी महत्त्वाची नाही.

 “नसतील या टॉकीजमध्ये सोयीसुविधा, नसेल एअरकंडीशनरचा खोटा थंडावा... नसेल चटपटीत पॉपकॉर्नची चव, नसेल कोल्ड्रिंगची सर...

पण या टॉकीजला माणसं यावीशी वाटताहेत... टाईमपास वाटणाऱ्या फसव्या स्वप्नांमध्ये इथला कष्टकरी आनंदी होतोय... आपले दु:ख विसरतोय... काहीही म्हणा तुम्ही आम्हाला...

पण सर्वसामान्यांना इथे आजही आनंद वाटतोय...

उद्याही वाटेल...

वाटेल ना?”

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Monday, September 11, 2017

मातीतून भरारी घेणारा फिनीक्स

नदाल पुन्हा जिंकला. यावेळेस हार्डकोर्टवर त्याने बाजी मारली. एखाद्या अव्वल मानांकीत खेळाडूने अमेरिकन ओपनसारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे ही काही विशेष बाब नाही. पण ही कामगिरी जेव्हा ‘राफा’ करतो तेव्हा माझ्यासारख्या चाहत्यांसाठी ती विशेष बाबच ठरते. या विजयासह 31 वर्षीय नदालने आपल्या कारकिर्दीतले 16वे ग्रँडस्लॅम पदक मिळवले.
राफेल नदाल परेरा म्हणजेच राफा हा क्रीडासंस्कृती जोपासलेल्या स्पेन या लहानशा देशाचा टेनिसपट्टू, पण त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खेळामुळे संपूर्ण जगभर त्याचा चाहतावर्ग अाहे. 2005 साली एका वृत्तवाहिनीवर उपांत्य सामन्यात रॉजर फेडररला  हरवून पुढे फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या नदालची बातमी पाहिली. मानेवर रूळणारे लांब केस, उंच आणि शीडशीडीत शरीरयष्टीचा एक किशोरवयीन मुलगा रॅकेट उंचावून आनंद व्यक्त करत होता.  तेव्हापासून आजतागायत याच पद्धतीने दोन्ही हात उंचावून आनंद व्यक्त करताना त्याला पाहतोय. 
काय आहे राफामध्ये ज्यामुळे त्याचे चाहते कामधंदे सोडून खेळ पाहण्यासाठी टी.व्ही. समोर बसतो?
इतकं काय विशेष आहे त्याच्या खेळात?
टेनिस खेळण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली ‘सर्व्हीस’ नदालच्या बाबतीत ‘सुमार’ म्हणता येईल इतपत वाईट होती. फेडररसारखी नजाकत त्याच्या खेळात नाही. बँकहँड वापरताना खालून मारता येणारे (Down the line) फटके त्याला जमत नाहीत. समोरून येणाऱ्या जमिनीलगतच्या चेंडूंचे (Grassy Forehand साठी) काय करावे हे त्याला बऱ्याचवेळा कळत नाही. इतक्या सर्व कमकुवत बाजू असतानाही महान म्हणता येईल अशी जबरदस्त कामगिरी तो कसा काय करू शकतो?
याचे कारण म्हणजे या ‘सुमार’ कौशल्याच्या बदल्यात त्याच्याकडे असलेली ‘बेसुमार’ ताकद! घोडा, बैल आणि उंट यांच्यातील ताकदीचा काही अंश घेऊन त्यात चित्त्याची चपळता मिसळली तर जे रसायन तयार होईल ते म्हणजे राफा. एखाद्याकडे नुसती दैवी गुणवत्ता असून चालत नाही, तर त्याचा योग्य वापरही व्हावा लागतो. आपल्याकडील ‘कांबळी’ आणि ‘कुंबळे’चा विचार केला तर निसर्गदत्त गुणवत्ता लाभलेला विनोद कांबळी एक महान फलंदाज व्हावा इतक्या उच्च दर्जाचा होता, परंतु अंगभूत कौशल्याचा विवेकाने वापर न केल्याने स्वत:च्या गुणवत्तेला त्याला न्याय देता आला नाही. याऊलट अनिल कुंबळेचं म्हणता येईल. रूढार्थाने ना तो मध्यमगती गोलंदाज-ना लेगस्पिनर, पण आपल्यातील वैशिष्ट्यपूर्ण शैलीला बुद्धीची जोड देऊन यशस्वी ठरला.रवी शास्त्री, अजय जडेजा यांसारखे स्वत:चे सामर्थ्य (Strong Points) ओळखून यशस्वी झालेल्या अनेक खेळाडूंची नावे सांगता येतील. नदालने नेमके हेच केले. आपल्यातील ताकदीचा व डावखुऱ्या शैलीचा त्याने पुरेपूर वापर केला. एखादे मांजर ज्याप्रमाणे उंदराला खेळवत-खेळवत मारते, त्याप्रमाणे नदालही प्रतिस्पर्ध्याला खेळवत-खेळवत हरवतो.बातमी देणाऱ्यांना राफेल नदालचा सामना पाचव्या सेटमध्ये गेलाय इतकीच माहिती पुरेशी असते. इतका वेळ सामना चालल्यानंतर तोच जिंकणार हे नक्की.  फोरहँडच्या फटक्यांना टॉपस्पिनची जोड देत प्रतिस्पर्ध्याला चुका (forced errors)  करण्यास भाग पाडणे हे त्याचे आणखी एक कौशल्य. बेसलाईनवरून दोन्ही हातांनी बॅकहँडचे क्रॉस कोर्ट फटके मारणे हे त्याच्या भात्यातील ब्रम्हास्त्र. असे फटके पाहणे हा नेत्रसुखद अनुभवच. राफा यशस्वी का होतो याचे आणखी एक कारण म्हणजे ‘ताकद राखून ठेवण्याची’ पद्धत. कोर्टच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे चपळाईने स्लाईड करत चेंडू परतवून लावण्याचे कौशल्य अद्वितीय आहे. पण हे कौशल्य तो नेहमीच वापरत नाही. एखादा गेम पॉईंट हातातून निसटत असताना फारसे प्रयत्न न करता तो प्रतिस्पर्ध्याला सहजपणे गुण बहाल करतो. पण गरज असताना तो जे काही प्रयत्न करतो त्यामुळे समोरच्या खेळाडूच्या आणि प्रेक्षकांच्याही तोंडाचा एक अख्खा टेनिसचा चेंडू मावू शकेल इतका मोठ्ठा ‘आ’ वासला जातो. मातीचे मैदान (Clay Court) म्हणजे त्याच्यासाठी विजयाची रेड कार्पेट. ‘रोलँड’ गॅरोसला भविष्यात ‘राफेल’ गॅरोस म्हटले जावे इतका तो फ्रेंच ओपनमध्ये यशस्वी ठरलाय.
शारिरीक तंदुरूस्तीच्या बळावर भल्याभल्यांना मात देणाऱ्या या खेळाडूलाही दुखापतींचे ग्रहण लागले. टेनिस म्हणजे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल अशी ओळख असताना दोघांचीही कामगिरी खालावली. इतके दिवस विजेतेपदाच्या जवळ येऊनही यश न मिळालेले खेळाडू ग्रँडस्लॅम गाजवू लागले. नोवाक जोकोविच, अँडी मरे यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. जवळपास तीन वर्षांच्या निराशाजनक कालावधीनंतर रॉजर आणि राफा दोघांनीही अविश्वसनीय कामगिरी केली. रॉजरने विम्बल्डनचे तर राफेलने फ्रेंच पाठोपाठ अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनीक्स पक्षाची कथा नेहमी ऐकवली जाते. ही कथा खरी की काल्पनिक माहीत नाही. माझ्यासाठी तरी ‘राफेल नदाल’ हाच फिनीक्स आहे, मातीतून भरारी घेणारा.

-तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Sunday, September 10, 2017

दैवी अनुभूती


    संध्याकाळच्या 4.53 च्या वसई-पनवेल पॅसेंजरने प्रवास करत होतो. बसायला सीट न मिळाल्याने एका कोपऱ्यात आधाराला टेकून उभा राहिलो. संध्याकाळचे 5 वाजले तरी वातावरण तापलेलेच होते. मोबाईल आणि मी दोघांचीही बॅटरी उतरू लागली होती. डिसचार्ज होण्याच्या भितीने मोबाईल वापरता येत नसल्याने ऑक्सिजनचा साठा संपत आल्याचा फील येत होता. हातातील घड्याळाकडे वैतागाने पहात घरी वेळेत पोचण्याचे गणित आजमावत होतो.
इतक्यात
‘चढता सुरज...’ या सुरेख कव्वालीचे सुंदर संगित कानी पडले.एका दुसऱ्या डब्ब्यातून व्हायोलीनचा मधुर आवाज येऊ लागला. मी उत्सुकतेने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक 20 ते 22 वर्षाचा मुलगा हातात व्हायोलीन पकडून या अप्रतिम कव्वालीचे अत्यंत कठीण पण सुरेख स्वर लीलया काढत होता. मी त्याला या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच पहात होतो. सुमारे 7 मिनीटांची ही कव्वाली त्याने जशीच्या-तशी वाजवली. या दरम्यान मला सीट न मिळाल्याचे दु:ख मी विसरून गेलो. एक गाणं संपल्यानंतर त्याने प्रवाशांकडे पैशांसाठी हात पसरला, एक-दोन रूपये, पाच रूपये असे पैसे लोक देऊ लागले. माझ्या हातून पैसे फार कमी वेळा सुटतात, तरीही मी स्व:खुशीने दहा रूपयांचे नाणे दिले. त्याने सलाम ठोकला आणि ट्रेनमध्ये गाणाऱ्यांचे फेव्हरेट गाणे ‘परदेसी परदेसी जाना नही...’ वाजवत पुढे निघाला. छान वाजवले, मला या गाण्याचे मात्र अप्रूप वाटले नाही. आता मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा भरलेल्या सीट्स कडे आशेने पाहिले. एकाही व्यक्तीची उतरण्यासाठीची हालचाल दिसत नव्हती. मनातल्या मनात त्यांना चार-दोन संस्कारीत शिव्या घातल्या आणि माझ्या बॅटरी संपत आलेल्या मोबाईलकडे पुन्हा एकवार निराशेने पाहिले. 13%! म्हणजे घरी पोहोचेपर्यंत नक्कीच फोनची विकेट पडणार ही चिंता आणि त्यात पुन्हा दुसऱ्या दिवशी  पहाटे अलिबागला परीक्षेला जायचे होते त्याचे टेन्शन!
आता माझे डोके गरगरू लागले. तेवढ्यात पुन्हा एकदा तोच व्हायोलीनचा मधुर स्वर कानी पडला. तो मुलगा पुढच्या डब्यातून पुन्हा आमच्याच डब्यात परत आला. पैसे गोळा करत त्याने नविन धून छेडली.
     “और इस दिलमें क्या रखा है...” या गाण्याची सुरूवात केली आणि सगळ्यांचे डोळे-कान टवकारले गेले. त्याच्या वाद्यातून दैवी संगीत बाहेर पडत होते. या सुरांनी माझ्या अंगावर काटे उभे राहीले(हो, हे लिहत असताना सुद्धा!) हे कोणाच्या आठवणीबद्दल नव्हते की, त्या मुलाविषयीची दया दाखवणारे नव्हते किंवा रिअॅलिटी शोज मधल्या जज लोकांसारखे फिल्मी नव्हते. मी त्याच्या स्वरांनी इतका भारावून गेलो की आपोपाप माझे डोळे पाण्यांनी भरले. मनापासून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आनंद घेतो तेव्हा ही भारावलेपणाची स्थिती निर्माण होते.
मी एका ठिकाणी वाचले होते की
“भुखा पेट से गाता है,
कलाकार गले से गाता है
और सच्चा कलाकार दिल से गाता है..”
पण हा भुखा कलाकार दिल से गात होता हे नक्की!
या क्षणी तो पैसे गोळा करतोय, तो गरीब आहे ही गोष्ट बाजूला राहिली पण त्याने निर्माण केलेले ‘दैवी संगीत’ एक निखळ आनंद देत होते. आपले सर्व दु:ख, विचार विसरून आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत तल्लीन होतो त्यालाच दैवी अनुभूती म्हणत असावेत. या 15 ते 20 मिनीटांच्या कालावधीत मी ही अविस्मरणीय दैवी अनुभूती घेतली.

-तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Wednesday, September 6, 2017

मी आणि माझे गुरूजी

मी आणि माझे गुरूजी

आयुष्यातला शाळेत जाण्याचा पहिलाच प्रसंग. हातात दगडी पाटी, पेन्सिलला मोडून शर्टाच्या खिशात ठेवलेले दोन तुकडे अशा तुटपुंज्या साहित्यासह पहिलीच्या वर्गात दाखल झालो. ज्या हॉलमध्ये दोन वर्ग बसवले होते त्याच वर्गात तोंडं एका दिशेला फिरवून प्रार्थना सुरू झाली. राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञेसाठी हात पुढे करण्याची सूचना मिळाली. इतरांकडे पाहून हात पुढे केला. ‘भारत माझा देश आहे’ अशी सुरूवात झाली आणि का कुणास ठाऊक मला नाव नोंदणीसाठी शाळेत आल्याचा दिवस आठवला. नाव नोंदणीच्या दिवशी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा नाही हे ओळखण्यासाठी तिथल्या गुरूजींनी मला उजवा हात डोक्यावरून घेऊन डाव्या कानावर पोहोचवण्यास सांगीतले होते. या कृतीची मला आठवण झाली आणि मी प्रतिज्ञेला पुढे केलेला हात डोक्यावरून डाव्या कानाला लावला. माझा हात कानावर पोचतो न पोचतो तोच पाठीमागून लाकडी रूळाचा हलकासा फटका माझ्या पाठीवर बसला. मागे वळून पाहीले तर राष्ट्रगीताच्या वेळेस पेटी वाजवणारे लाल डोळ्यांचे शीडशिडीत गुरूजी डोळे वासून माझ्याकडे पहात होते. पहिल्याच दिवसाचे असे जोरदार स्वागत पाहून माझ्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. तेवढ्यात आकाशी रंगाचा शर्ट आणि राखाडी पँट परिधान केलेली एक विरळ केसांची व्यक्ती मला बाजूला घेऊन गेली.प्रेमाने विचारपूस केली. रडू नको म्हणून सांगीतले. थोड्या वेळाने मी सर्व काही विसरून त्याच वर्गात तोंड फिरवून बसलो.
      आता पुढे काय? अशा प्रश्नार्थक चेहऱ्याने सर्वजण बसले होते. दारातून पुन्हा एकदा आकाशी शर्टवाल्या व्यक्तीने वर्गात प्रवेश केला. काही वेळापूर्वी प्रेमाने विचारपूस करणाऱ्या व्यक्तीने मी तुमचा ‘गुरूजी’ अशी ओळख करून दिली आणि हायसे वाटले. ‘रामचंद्र नारायण म्हात्रे’ म्हणजेच ‘रा.ना.म्हात्रे’ असे नाव सांगणारे हे गुरूजी पुढील चार वर्षे आमच्या अतरंगी वर्गाचे वर्गशिक्षक राहीले.  वर्गशिक्षक हाच सर्व विषयांचा विषयशिक्षक असणाऱ्या प्राथमिक शाळेत आम्हाला असे गुरूजी लाभले हे आमचे भाग्यच होते.
फारसं काही न कळण्याच्या वयातसुद्धा म्हात्रे गुरूजींचे वेगळेपण लक्षात येत होते. शाळा भरण्यास तासभर वेळ असतानाच आम्ही शाळेत जाऊन शाळा उघडण्याची वाट पहायचो. त्यावेळी  गुरूजी आणि त्यांच्या सौभाग्यवती ‘चंद्रभागा बाई’ लांबून येताना दिसल्या की खूप आनंद व्हायचा. शाळेत सर्वात आधी येऊन वर्ग उघडण्याचे काम नेहमी तेच करायचे. पहिली ते चौथीच्या वर्गातील काही ठळक आठवणी आहेत आणि या सर्वच आठवणी गुरूजींच्या संदर्भातील आहेत. माझ्या दृष्टीने शाळा म्हणजेच म्हात्रे गुरूजी असा काहीसा प्रकार होता. ते नेहमी सर्व विद्यार्थ्यांचा चेष्टामस्करी करत असत. फावल्या वेळात ते आमच्यासोबत जमिनीवर येऊन बसायचे त्यामुळे त्यांची भिती कधी वाटलीच नाही. वर्गात भांडणं झाली तर मारामारी होईपर्यंत ते कधिही मध्यस्ती करायचे नाही, स्वत: बाजूला बसून लहान मुलांच्या भांडणाचा आनंद(!) घ्यायचे. भांडण जास्तच वाढले तर मात्र दोन्ही पार्टीला जबरदस्त दम देऊन मिटवून टाकायचे. पण कधीकधी भांडणाचा आवाज ऐकून चंद्रभागा बाई वर्गात यायच्या आणि गुरूजींचा त्यातला सहभाग बघून ओरडायच्या. अशा वेळी मात्र गुरूजी साळसूदपणे आपल्या खुर्चीत जाऊन बसायचे आणि डोळे मिचकावत खोटा दम देऊन भांडण सोडवायचे. बालमानसशास्त्राचा फारसा बाऊ नसतानाच्या काळातही ते या शास्त्राचा प्रत्यक्ष वापर करत होते. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे त्यांच्या टेबलभोवती नेहमी विद्यार्थ्यांचा गराडा पडलेला असायचा. कोणालाही  प्रश्न विचारण्याचे धाडसही त्यांनीच निर्माण केले. त्यामुळेच  भीड चेपलेला आमचा चौथीचा अतरंगी वर्ग पाठ घेणाऱ्या डी.एड.च्या विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरायचा. व्यक्तिमत्व विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात राबवल्या जात होत्या.
                काही वाक्प्रचार गुरूजींनी वारंवार वापरून प्रसिद्ध केलेत. एखाद्या विद्यार्थ्याने जर एका विषयाच्या वहीत दुसऱ्या विषयाचे लिहले तर गुरूजी म्हणायचे, “कासवान सुकटीची भेल” केलीस. एखाद्याने जर दिलेला अभ्यास पूर्ण करताना थोडक्यात चुका केल्या तर म्हणायचे, “सव्वा खंडीच्या वरणान मुतलास!”. ही दोन वाक्ये गुरूजींनी त्यांच्या विशिष्ट शैलीत उच्चारली की आम्ही हसून लोळायचो. ‘गणित’ म्हणजे गुरुजींचा आत्माच. माझ्यात गणिताची आवड त्यांनीच निर्माण केली. पुन्हा पुन्हा सराव आणि स्व:अभ्यास या दोन पद्धतींनी गुरूजींनी गणित अध्यापनात स्वत:चे नाव सर्वमुखी केले. पिरकोन शाळेत गुरूजींच्या येण्यापूर्वी स्कॉलरशिप परीक्षेबाबत उदासिनता होती. ही उदासिनता दूर करण्यासाठी त्यांनी आमच्याच वर्गाची निवड केली. झेरॉक्स, प्रिंटर उपलब्ध नसताना त्यांनी स्व:लिखित-स्व:निर्मित प्रश्नपत्रिंकाद्वारे गणिताचा सराव घेतला. संपूर्ण वर्षभर मेहनत घेतल्यानंतर अखेर परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाले, मी गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालो. हे शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. निकाल लागला तेव्हा मी शेजारच्याच कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत होतो. गुरूजींनी शाळेत येऊन मला उचलून घेतलं. या यशामुळे ‘कोप्रोली’ येथील केंद्रात माझा सत्कार आयोजित करण्यात आला होता. तिथे जाऊन मी काय बोलावं यासाठी प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकांनी मला एक भाषण लिहून दिलं होतं. या भाषणात मला त्या मुख्याध्यापकांनीच मार्गदर्शन केल्याचा उल्लेख होता. हा कागद  मी आप्पांना म्हणजेच माझ्या वडलांना दाखवला. त्यांनी तुला वाटतं ते जाऊन बोल असा सल्ला दिला. मी नवी कोरी स्लीपर घालून कोप्रोली केंद्रात गटसंमेलनाच्या दिवशी गेलो. तिथे आमच्याच पाचवी मराठीच्या पुस्तकाचे विश्लेषण चालू होते. बरेचसे शिक्षक नाश्त्याला मिळालेल्या वड्याचे रसग्रहण करण्यात दंग होते. चर्चा संपल्यानंतर मला एक ग्लास आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. पिरकोनच्या मुख्याध्यापकांनी, तसेच केंद्रप्रमुखांनी माझ्याबद्दल गौरवोद्गार काढले. मला दोन शब्द बोलण्यास सांगीतले. मी लिहून दिल्याप्रमाणे औपचारीक सुरूवात केली आणि थांबून गुरूजींकडे बोट दाखवून “रा.ना.म्हात्रे गुरूजींमुलेच मला कॉलरशीप मिलाली!” असे उत्साहाने सांगीतले. गुरूजींचा चेहरा अभिमानाने फुलला. भाषण संपल्यावर त्यांनी मला मिठी मारली. भारावलेल्या अवस्थेत  बाहेर पडलो. नाश्त्याचे वडे ग्लासात टाकून घरी आलो. मात्र नवी कोरी पॅरागॉन कंपनीची स्लीपर आणि माझं मन कोप्रोलीलाच राहीलं होतं.
        शिष्यवृत्ती मिळवणारा मी त्यांचा पहिला विद्यार्थी. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. उरण तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा परीस अशी ओळख गुरूजींनी मिळवली.
गणिताबरोबरच जीवन जगण्याची कलाही त्यांनीच शिकवली. त्यांच्या शिकवणुकीमुळे अजूनही वहीचे पान फाडण्याची माझी हिंमत होत नाही. वस्तूंचा काटकसरीने  वापरही त्यांनीच शिकवला.  मराठी शाळेची सहल प्रतिवर्षी गावाबाहेरील ‘मारखल विहीर’ याच ठिकाणी जायची. चौथीला असताना काही मित्रांनी मिळून या वनभोजनासाठी खाऊला पैसे जमा करण्याचे ठरले. गुळ व शेंगदाणे असा मेनू ठरला. या जादाच्या खाऊला पैसे कुठून आणायचे, म्हणून सुनिल नावाच्या मित्राने वह्या रद्दीत विकण्याची आयडीया काढली. मी चालू वर्षाच्या वह्या पन्नास पैसे प्रतिवही दराने विकून सहल साजरी केली. गुरूजींनी विचारल्यावर सरळ रद्दीत विकल्याचे सांगीतले. त्यावेळी पहिल्यांदाच मी गुरूजींना रागावलेले पाहिले. छडीचे वळ पायावर उठले. घरी गेल्यावर मी मार खाल्ल्याचा वृत्तांत आधीच कळला होता. आप्पांनी गुरूजींच्या प्रकाराचे रिपीट टेलीकास्ट केले. लिहून भरलेल्या वह्या विकल्याने काय चुकले हे मला शेवटपर्यंत कळले नाही. पण गुरूजींचा रूद्रावतार पाहून पुन्हा सुनिलच्या नादाला न लागण्याचा निश्चय केला.
पुढे हायस्कूलला गेल्यापासून मात्र गुरूजींशी असलेला संपर्क तुटला. त्यांची बदलीही दुसऱ्या ठिकाणी झाली. अधे-मध्ये आप्पांना भेटून ते माझी विचारपूस करायचे. त्यानंतर मी बी.एड.ला असताना एका लग्नात वरचेवर भेटले. थोडे अधिक थकल्यासारखे वाटत होते. डोक्यावरच्या विरळ केसांनी साथ सोडली होती. पण चेहऱ्यावरचे विलक्षण हास्य तसेच होते. मधल्या काळात त्यांची बायपास सर्जरी झाल्याच कळलं. प्रत्यक्ष भेट होत नव्हती.
गुरूजी त्यानंतर भेटले ते थेट पिरकोनच्या प्राथमिक शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात. या निमित्ताने शाळेत काम केलेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार आयोजित केला होता. या सोहळ्यास गुरूजी बाईंसह हजर होते. मी सत्कारासाठी आवश्यक शाली, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ यांची व्यवस्था करण्यात गुंतलो असताना मंडपातील एका खुर्चीत गुरूजींना बसलेले पाहिले. तडक जाऊन नमस्कार केला. माझी ओळख सांगीतली. गुरूजींनी ओळखले. गुरूजींचा सत्कार झाला. गुरूजी भाषणासाठी उभे राहीले. पुन्हा तोच तडाखेबंद आवाज, पुन्हा तोच उत्साह. शाळेतले काही प्रसंग सांगीतले, माझा उल्लेख असलेले .(काही प्रसंग मलाही आठवत नसलेले). गुरूजी बोलत होते, मी आठवत होतो. पुन्हा जुने दिवस उभे राहीले, नव्याने!
   - तुषार म्हात्रे,  पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...