Search This Blog

Thursday, February 15, 2024

देवाचे मासे: वाळणकोंड

रांजणकुंडामुळे जीवदान!

      नदीपात्रातील रांजणकुंडांमुळे तयार झालेला डोह. जवळपास तीस मीटर लांब आणि दहा मीटर रुंदीचा हा डोह. डोहाच्या कडा इतक्या ताशीव की त्यात अडकलेल्या व्यक्तीला दोराशिवाय चढणे अशक्य व्हावे. डोहाची खोलीही तशीच अथांग. उन्हाळ्याच्या दिवसांतही न आटणारा हा जलकुंड. रोज अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहावरील  झुलत्या पुलावरून  हा डोह पाहण्यासाठी येतात. यातील काहीजणांच्या हातात तांदळाच्या लाह्या म्हणजेच मुरमुरे  असतात. डोहाच्या कडेला सुरक्षित जागा शोधून हे पर्यटक निळ्याशार डोहामध्ये मुरमुरे टाकतात. निळ्या रंगावर हे पांढरे कण तरंगत असतानाच अचानक पाण्याखाली थोडी हालचाल जाणवते. जलाचा पृष्ठभाग काळ्या-पांढऱ्या रंगांनी चमकू लागतो. क्षणार्धात शेकडो मासे या पृष्ठभागावर तरंगताना दिसतात. माशांसाठी टाकलेल्या खाऊमध्ये जसजशी वाढ होते, तसतशी त्यांची गर्दीही वाढत जाते. मोकळ्या आणि नैसर्गिक ठिकाणी एकाच जागेत इतक्या मोठ्या प्रमाणावर मासे आढळणे ही गोष्ट तशी दुर्मिळच म्हणावे लागेल. माशांनी भरलेला हा आश्चर्यकारक डोह पहायचा असेल तर तुम्हाला रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ परीसराकडे यावे लागेल. सुुप्रसिद्ध शिवथर घळीपासून काही किलोमीटर अंतरावर असणारा हा सुंदर परिसर म्हणजे ‘वाळणकोंड’. या डोहाला ‘वाळणकुंड’ किंवा ‘वाळणकोंडी’ असेही म्हटले जाते.
     भारताला पर्यावरण संवर्धनाची समृद्ध परंपरा आहे.  पश्चिम घाटात सामान्य जनतेने परंपरेने व स्वयंप्रेरणेने संरक्षित केलेल्या परिसरांची काही उदाहरणे पहायला मिळतात. या प्रकाराला ‘कम्युनिटी कंझर्वड एरिया(CCA)’ असे संबोधले जाते. विविध प्रकारच्या देवराई, गावकीची राखलेली जंगले ही संरक्षित अधिवासाची काही उदाहरणे. परंतु अगदी ब्रिटीश काळापासून ते आजतागायत सत्ताधाऱ्यांकडून या संरक्षित क्षेत्रांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आला आहे.
      रायगडमधील महाड तालुक्यातील वाळणकोंड हे ठिकाण अशाच एका ‘CCA’ चे उदाहरण आहे. वाळणकुंड म्हणजे एक प्रकारचे ‘मस्त्य अभयारण्य’च! सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उगम पावणारी काळ नदी डोंगरातून वेगाने वाहत येत वाळण गावालगत सपाटीला लागते. या नदीपात्राच्या खडकात पाण्याच्या प्रवाहामुळे एक मोठा डोह तयार झाला आहे,तोच  वाळणकुंड अथवा वाळणकोंडी. यातले पाणी कधीही आटत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत या डोहांतील मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत. या नदीवरील झुलत्या पुलावर उभे राहून डोहातील  मासे पाहता येतात. डोहात मुरमुरे, तांदूळ किंवा इतर खाण्याचे पदार्थ टाकले की प्रथम लहान, नंतर त्याहून मोठे मासे वर येत राहतात. स्थानिकांच्या मते माश्यांचे एकूण सात आहेत. या थरांतील मासे हळूहळू खालून वर येत राहतात. यापैकी सर्वात खाली चार ते पाच वर्षाच्या मुलाइतके मोठे मासे असल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे या अथांग डोहात एक मंदिर असून त्यात लग्नकार्यासाठी लागणारी भांडीकुंडी असून पूर्वीच्या काळी माशांना अन्न दिल्यानंतर ही भांडी वर येत असत असेही सांगीतले जाते.  यातील थोडा अतिशयोक्तीचा भाग वगळला तरी इथे आढळणारे मासे सामान्य नदीपात्राच्या तुलनेत आकाराने मोठेच आहेत. डोहात आढळणाऱ्या माशांमध्ये शिवडे, खउल, शिंगटी या लहान माशांसह खडस अर्थात महासीर (Deccan Mahseer) जातीचे भले मोठे मासे आहेत. यापैकी डोहात आढळणारी खडस माशाची जात धोक्यात असलेल्या प्रजातींपैकी एक आहे. त्यामुळे या माशांना अभय मिळणे हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
या माशांच्या विविध रंगछटा या डोहाला अधिकच आकर्षक बनवतात.  ‘देवाचे मासे’ अशी या डोहातील माशांची ओळख असल्याने, ते कधीच पकडले जात नाहीत. नदीकाठीच वरदायिनी मातेचे मंदिर आहे. रायगड परिसरातील स्थळदेवतांमध्ये वाळणकोंडीच्या देवीचा समावेश होतो. सुमारे साडेतिनशे वर्षांपासून हे देवस्थान प्रसिद्ध असल्याचा दावा संबंधितांकडून केला जातो. इसवी सन १७७४ मध्ये इथून जवळच्या लिंगाणा किल्ल्यावर झालेला उपद्रव शमवण्यासाठी तिथल्या कारभाऱ्यांनी वाळणकोंडीच्या देवीची यात्रा केल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर सन १८६४ मध्येही या देवीचा उत्सव झाल्याची नोंद आहे.  भक्तांच्या दृष्टीने हे देवस्थान फार कडक मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालण्याची प्रथा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या रस्त्याने जाताना वाहनचालक वाहन चालवतानाही आपली चप्पल काही काळ बाजूला काढून ठेवतात.
     निसर्गाकडून सर्व काही ओरबाडून घेण्याचा हा काळ. या काळात निसर्गाचे रक्षण होत असल्याची दुर्मिळ बाब पहावयास मिळणे आनंददायी आहे. देवावरच्या श्रद्धेने असो किंवा परंपरांचे पालन करण्याच्या रिवाजामुळे असो, इथले सामान्यजन जाणते-अजाणतेपणी जैवविविधता जपत आहेत. काळ नदीच्या प्रवाहासारखा वेग असलेला निसर्गाचा ऱ्हास, वाळणकोंडी सारख्या डोहांमुळे मंदावतोय. रायगडचा हा अनमोल वारसा संपूर्ण महाराष्ट्राने चालवायला हवा. याबाबतीत ती ‘वरदायिनी’ माता सर्वांनाच सुबुद्धी देवो ही अपेक्षा!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...