Search This Blog

Tuesday, October 30, 2018

टायगर जिंदा है!

टायगर जिंदा है!
            बॉलीवूडच्या भाईजानचे दोन धम्माल सिनेमे आले ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है.’ नेहमीप्रमाणे अॅक्शनपॅक्ड कथानक आणि सलमानचा पडद्यावरील आकर्षक वावर या दोन्हींमुळे त्याच्या चाहत्यांना एक चांगली मेजवानी या चित्रपटांद्वारे मिळाली. आपल्या भाईबंदांपेक्षा तुलनेने तगडी शरीरयष्टी असणारा आणि नावातही ‘टायगर’ असणारा असाच एक जीव आपल्या सागर किनारी आढळतो. भाईजानच्या पोटावर ‘सिक्स पॅक अॅब्स’,  तर या टायगरच्या पोटावरही ‘फाईव्ह पॅक अॅब्स’ अाहेत.

        एशियन टायगर श्रिम्प (Asian Tiger Shrimp) किंवा टायगर प्रॉन (Tiger Prawn) या नावाने परिचित असलेल्या या कोळंबीचे स्थानिक नाव आहे ‘करपाल’. या प्राण्याला करपाल हे नाव त्याच्या काळसर रंगामुळे प्राप्त झाले असावे. अपृष्ठवंशीय प्राणी वर्गातील आणि बाह्यकवच असणाऱ्या करपालीचे शास्त्रीय नाव आहे ‘पीनीयस मोनोडॉनंड (Penaes monodonand)’. काळपट रंगावरील पांढरे, पिवळे, तपकीरी आणि लाल रंगांचे पट्टे करपालीला अधिक लक्षवेधी बनवतात.

करपालीच्या तोंडाकडील भाग हा बाहुबलीच्या मुकूटासारखाच भासतो. त्यावरच रत्न जडवल्यासारखे दोन डोळे असतात. हे रत्नासारखे डोळे अंधारातही चमकतात. करपालीला दोन लांबलचक मिशा म्हणजेच अँटेना असतात. त्यांना आपण ‘मिश-अँटेना’ म्हणूयात.  यातील एका  मिश-अँटेनाच्या साह्याने सभोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो, तर दुसऱ्या अँटेनाच्या साह्याने भक्ष्याचा अंदाज घेतला जातो. तोंडाच्या जवळच हातासारख्या अवयवांच्या तीन जोड्या असतात. आपले भक्ष्य पकडण्यासाठी ते हात वापरले जातात. कात्री वेगाने चालवल्यानंतर जसा आवाज निर्माण होतो तसाच आवाज हे प्राणी आपल्या हातांची वेगाने हालचाल करून निर्माण करतात.(थोडक्यात कोळंबीच्या जगात एका हातानेही टाळी वाजू शकते.) या आवाजाचा वापर ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात असे मानले जाते. आतून शांत वाटणाऱ्या समुद्रात आपल्या हस्तकलेने मोठा ध्वनी निर्माण करण्याची ही कला अनोखीच म्हणावी लागेल.  या हातांना लागूनच शेपटाकडील दिशेला पायांच्या पाच जोड्या असतात. पाण्यातील तसेच चिखलावरील हालचालींसाठी त्यांचा वापर होतो. असे असले तरी पोटावरचे ‘फाईव्ह पॅक’ स्नायू आणि शेपूट यांच्या साह्याने झटका देऊन हालचाल करणे हे या जीवांचे खरे वैशिष्ट्य. याच झटक्याचा वापर करून त्यांना पाण्यातील अंतर वेगाने कापता येते.

    खाडीकिनाऱ्याचा दलदलयुक्त भाग, कांदळवने, सागर किनारे आणि खारजमिनीवरील शेतांमध्येही करपाल आढळते. सामान्यत: कोळंबी प्रजातीतील जीव समूहाने राहतात, परंतु नैसर्गिक क्षेत्रांतील करपालींची संख्या कमी असल्याने इथे हा समूह काहीसा लहान असू शकतो. पाण्याची योग्य क्षारता आणि वाढीसाठी आवश्यक तापमान असलेल्या या जागा त्यांना पोषक ठरतात. मिश्रहारी असलेला हा जीव सभोवताली उपलब्ध असेलेले सूक्ष्म वनस्पतीजन्य-प्राणीजन्य पदार्थ सेवन करतो. त्याच्यापेक्षा लहान सजीवांना तो आपले अन्न बनवू शकतो आणि मोठ्या भक्षकांचे अन्नही बनू शकतो.

       पुनरूत्पादन प्रक्रीयेत मिलनानंतर मादी करपाल आपली अंडी किनाऱ्यापासून जवळच्या भागांतच सोडते. या अंड्यांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल पाच ते दहा लाखापर्यंत असू शकते. ही प्रक्रीया मिलनानंतर अतिशय वेगाने म्हणजे केवळ बारा ते पंधरा तासांत घडते. किनारी भागातील जैवसृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाही या जीवाच्या बाबतीत मात्र ‘टायगर जिंदा है’ असे म्हणता येते ही समाधानाची बाब आहे.

   करपालींचे काही भाईबंद तर आपल्या परिसंस्थेत स्वच्छता अभियान चालवत असल्यासारखे काम करतात. या प्रजातीतील कोळंबीसुद्धा समूहाने राहतात. विशिष्ट मासे हे स्वच्छता केंद्र शोधत येतात. केंद्राजवळ येऊन शांतपणे पहुडतात. लगेचच सफाईकामगार कोळंब्या त्या माशाच्या तोंडातील अन्नकण, सूक्ष्मजीव यांचा फडशा पाडतात. या समन्वयातून कोळंबीला अन्न मिळते, तर माशांच्या तोंडाची स्वच्छता होते.

           शरीरांतर्गत हाडे (काटे) नसलेल्या या जीवाचे मत्स्य व्यवसायामध्ये सध्या सर्वाधिक उत्पादन होत आहे. (पहा, बिनकण्याने आणि कायम वाकून राहील्याचे फायदे!). अन्न म्हणून विचार केल्यास करपाल जातीच्या कोळंबीमध्ये खूप कमी उष्मांक असतात. याऊलट प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर या प्रजातींमध्ये सेलेनियम आणि काही अँटीऑक्सिडंटस् असतात, ज्यामुळे कर्करोगाच्या निर्मितीस कारणीभूत असणाऱ्या मुक्त कणांपासून बचावही होतो. या अलिकडच्या ज्ञात कारणांमुळेच थाटात राहणारा हा प्राणी खवय्यांच्या ताटात जाऊन पोहोचलाय.जीभेचे चोचले पुरवत स्वत:ची ‘फिगर’ जपणारे खवय्ये या प्राण्याची पृथ्वीवरील ‘फिगर’ कमी करत सुटलेत. असे असूनही सुदैवाने कोळंबी प्रजातींची संख्या (अजूनतरी) लक्षणीय आहे. परंतु ही संख्या मानवाच्या फायद्यासाठी कृत्रिमरित्या वाढवलेल्या टायगर प्रॉन्सची आहे.(खरंतर ह्या कोळंब्या म्हणजे एकप्रकारच्या समुद्रातील ब्रॉयलर कोंबड्याच!) पण  खाण्यासाठी का होईना हा ‘टायगर’ अजूनतरी ‘जिंदा है!’. पण समुद्रातील मानवी हस्तक्षेप असाच कायम राहीला तर मात्र करपालीच्या बाबतीत ‘एक था टायगर’ असेच म्हणण्याची वेळ येईल रे नक्की. तूर्तास ‘टायगर जिंदा’ राहो हीच अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

#कोळंबी
#करपाल
#Tigerprawn
#Asiantigershrimp

Tuesday, October 23, 2018

बादशाही शिंपल्याची ‘खुबी’

बादशाही शिंपल्याची ‘खुबी’


बॉलीवूडचा बादशाह मानल्या जाणाऱ्या शाहरूख खानचा एक सुंदर चित्रपट आहे. यात त्याने नासामध्ये काम करणारा एक शास्त्रज्ञ साकारला आहे. अमेरिकेसारख्या विकसित आणि सुखसोईयुक्त देशातून भारतात, म्हणजेच ‘स्वदेस’ मध्ये आल्यावर तो आपल्या गावी जातो. गावात त्याला सोयीचं आणि सवयीचं वातावरण मिळणे कठीण असल्याची पूर्वकल्पना असल्याने तो आपल्या सोबत एक कॅराव्हॅन (Caravan) घेऊन जातो. ही गाडी त्याला आवश्यक असणाऱ्या सुविधांनी भरलेली असते. ही गाडी म्हणजे त्याचे एक प्रकारचे फिरते घरच!


       या ‘स्वदेस’ नावाच्या चित्रपटातील नायकाप्रमाणेच बाहेरील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत स्वत:साठी स्वत:चेच एक सुरक्षित विश्व तयार करणाऱ्या कित्येक प्रजाती आपल्या सभोवताली आढळतात. बॉलीवूडच्या बादशहाप्रमाणेच  स्वत:चे घर सोबत घेऊन चालणारा एक बादशहा आपल्या किनारी ‘देस’ मध्येही पहायला मिळतो.  डोक्यावर शंकू आकाराचा मुकूट असणारा हा किनाऱ्यावरचा बादशहा म्हणजे  ‘शंक्वाकार शिंपला’. मुंबई आणि रायगडच्या किनारी भागात आढळणाऱ्या जवळपास सर्वच शिंपल्यांना ‘खुबा’ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे या शिंपल्याला ‘अकली खुबा’ असे एक स्थानिक नाव आहे. दर मैलागणिक बदलत जाणाऱ्या भाषेनुसार अनेक चित्र-विचित्र स्थानिक नावांनी हा शिंपला ओळखला जातो. टोकदार शिंगासारख्या रचनेमुळे त्याला इंग्रजीमध्ये त्याला हॉर्न स्नेल (Horn Snail) म्हटले जाते. तर काहीठिकाणी त्याचा उल्लेख कोन शेल (Cone Shell) असाही होतो. मृदूकाय आणि कवचधारी वर्गातील हा प्राणी शास्त्रीयदृष्ट्या टेलीस्कोपियम टेलीस्कोपियम (Telescopium telescopium) या नावाने ओळखला जातो.

       एखाद्या सुंदर कळसाप्रमाणे रचना असलेला आणि लाल, काळ्या रंगांचे वेटोळे असलेल्या रेषांनी नटलेला हा प्राणी कायम किनाऱ्यावरील मातीतच राहील्याने त्याच्या सौंदर्याची शब्दश: माती होते. मखमली काळा आणि लालसर तपकिरी रंगाचा हा शिंपला दलदलीत राहील्याने नव्याने पाहणाऱ्याला त्याचे मूळ स्वरूप दिसत नाही. किनाऱ्यावर पडलेला एक सामान्य जीव इतपतच त्याची ओळख राहते. त्याच्या शरीररचनेमध्ये आणखी एक वैशिष्ट्य दडलेले आहे. या शिंपल्याच्या कवचावरील वेटोळ्यांची रचना फी (Phi) या दैवी गुणोत्तर (The golden ratio) मानल्या जाणाऱ्या गणितातील संकल्पनेप्रमाणे आहे. शंकू शिंपल्यांमध्ये लागोपाठच्या वेटोळ्यांमध्ये हे गुणोत्तर दिसून येते. 

       भरती ओहोटीमुळे कायम दलदलयुक्त असणाऱ्या भागात या खुब्यांचे वास्तव्य असते.शंकू शिंपल्याचा आकार एखाद्या शंक्वाकृती मुकूटाप्रमाणे असला, तरी चालताना मात्र हा मुकूटरूपी कवच आडवं होतं. आपले घर अंगावर घेतल्यासारखं हा जीव ओल्या चिखलातून सरपटत अतिशय संथपणे मार्गक्रमण करत राहतो. या वेळेस त्याच्या तोंडाकडील बाजूने गोगलगायीप्रमाणे असलेली शुंडके बाहेर येतात. या शुंडकांवरच डोळ्यांची रचना असल्याने एक नावापुरती ‘दूरदृष्टी’ त्याला लाभते. दोन्ही शुंडकांची स्वतंत्रपणे हालचाल करता येत असल्याने एकाच वेळेस अधिक बाबी त्याला पाहता येतात. अंतराच्या बाबतीत लाभलेली ही दूरदृष्टी या प्राण्याच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची ठरते, कारण मूळात या खुब्याला खूपच अंधुक आणि कमी दिसते. पर्यायाने  लांब शुंडकांवरील डोळ्यांनी थोडं दूरपर्यंतच पाहता येतं. अकली खुब्याच्या डोळ्यांमध्ये रंगपेशी नसल्याने त्याला रंग ओळखता येत नाहीत. (थोडक्यात जगातला कुठलाही पुरूष आणि हा जीव साड्यांच्या दुकानात फारसा उपयोगाचा नाहीच.) आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, या शिंपल्याच्या कवचाखालील जागेत ‘तिसरा डोळा’ही असतो. हा तिसरा डोळाही खुब्याच्या दैनंदिन हालचालींसाठी मदत करतो.

       खारफुटीने वेढलेल्या चिखलात शैवाल आणि इतर सेंद्रीय पदार्थांवर ते आपली गुजराण करतात.  समुद्राला भरती असताना या जीवांच्या अन्न मिळवण्याच्या प्रक्रीयेला मात्र ओहोटी लागते. कालांतराने पाण्याने व्यापलेली जागा रिकामी होताच, या बादशहाला भरपूर अन्न उपलब्ध होते. समुद्र किनाऱ्यावरील जीवनाला अनुकूल शरीररचना आणि जीवनशैली  असल्याने प्रतिकूल परिस्थिततही हे खुबे तग धरतात. पाण्याबाहेर असतानाही कित्येक काळ ते जीवंत राहू शकतात. तर अन्नाची उपलब्धता कमी असताना संथपणे एका जागी पडून राहून ते उर्जेची बचत करतात. यावेळेस आपल्या शरीरात साठवलेल्या उर्जेचा वापर ते करू शकतात. 
        या खुब्यांप्रमाणेच अन्नाच्या शोधात कायम भटकणारा एक जीव या समुद्रकिनाऱ्यांच्या आसपास आढळतो.  तो अन्न म्हणून या  शिंपल्यांचा वापर करतो. प्रथिनांचा समृद्ध स्रोत म्हणून त्यांचा अन्नात समावेशही करतो. पण त्याची भूक थोडी मोठी असल्याने तो जीव आपल्या पोटापुरतं मर्यादीत न राहता आपल्या पुढील पिढ्यांची सोय म्हणून सातत्याने प्रयत्न करतो. आपल्या विकासासाठी समृद्ध अशा समुद्रकिनाऱ्यांना भकासही करतो. या मानव नावाच्या जीवाची हव्यास अंमळ जास्तच असल्याने त्याच्या रस्त्यात येणाऱ्या ‘अकली खुब्यांसारख्या’ सामान्य जीवांची त्याला पर्वा असणे शक्यच नाही. परंतु याच सामान्य जीवाची आणखी एक ‘खुबी’ समोर येत आहे. . कर्करोग किंवा काही जनुकीय आजारांच्या उपचारांसाठी ‘जैविक दृष्ट्या क्रीयाशील’ पदार्थांची (Bioactive Compounds) आवश्यकता असते. अशा प्रकारचे जैवक्रीयाशील पदार्थ या खुब्याच्या शुक्राणूपिशवीपासून (Spermatheca) मिळवण्यावर संशोधन झाले असून वैद्यकीय क्षेत्रात त्याचा वापरही होत अाहे. शंक्वाकृती शिंपल्याचे हे उपयोग पाहता किमान आपल्या आरोग्यासाठी, आयुष्यासाठी तरी या जीवांचा जीव वाचवायलाच हवा!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Friday, October 19, 2018

शिलाखंडांचे ताम्रपट

शिलाखंडांचे ताम्रपट!

दोन दशकांपूर्वीची गोष्ट. लक्षवेधी मुंबईला जवळ असूनही काहीसे दुर्लक्षित असणाऱ्या पिरकोन गावाकडे काही संशोधकांची नजर वळली. आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या गावात इतिहास संशोधक कोण्या ‘ब्राम्हण’ कुटूंबियांची चौकशी करत होते. हा शोध पाहून सुरूवातीस सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांचा शोध ‘जोशी’ आडनावाच्या एका कुटूंबाकडे येऊन थांबला, परंतु गावातील जोशीसुद्धा आगरीच असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आपला मोर्चा लगतच्या आवरे गावाकडे वळवला. तिथेही तीच गत झाली. मुख्यत: आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या दोन्ही गावांत ‘ब्राम्हण’ कुटूंबीय शोधण्याची धडपड हे इतिहास संशोधक का करत आहेत असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या संशोधकांद्वारे हा सर्व शोध घेण्याचे कारण होते-  ठाणे येथील उत्खननात सापडलेला एक ताम्रपट!

हा ताम्रपट स्वच्छ झाल्याबरोबर यातील उल्लेखाने पिरकोन आणि आवरे ही दोन गावे ऐतिहासिक दृष्ट्या चमकू लागली. अनेक नविन संदर्भांचा उलगडा करणारा हा ताम्रपट संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
संशोधकांसाठी महत्त्वाचा दुवा असणारा ‘ताम्रपट’ म्हणजे काय आणि असतो तरी कसा?

    ताम्रपटालाच ताम्रशासन असेही म्हटले जाते. प्राचीन काळात नोंदींसाठी शिलालेखांचा वापर होत असे. या शिळांवर लेखन करणे हे कौशल्याचे आणि कष्टप्रद होते. शिळांवरील लेखनाकरता ब्राह्मी लिपी तुलनेने सोपी होती. (कार्ले लेण्यांतील शिलालेख ब्राम्ही लिपीतच आहेत.)पण कालांतराने देवनागरीसारख्या इतर वळणदार लिप्यांचा वापर वाढल्याने  अक्षरे कोरणे कठीण झाले. तसेच या लेखांचे भले मोठ्ठे दगड अचल असल्याने त्यांची हलवाहलव करणे आणखिनच कठीण. त्यामुळे राज्यकर्त्यांनी आपली दानपत्रे धातूच्या पत्र्यांवर कोरण्यास सुरूवात केली. हे धातूचे पत्रे तांबे, चांदी किंवा सोन्याचेही असायचे. दगडापेक्षा धातूच्या पत्र्यावर लिहिणे तुलनेने सोपे झाले. तसेच ते टिकाऊ, वजनाने हलके असल्याने इकडून तिकडे सहज नेता येऊ लागले. ताम्रपटात सामान्यत: एकात एक ओवलेले तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची पहिली बाजू व शेवटच्या पत्र्याची मागची बाजू कोरीच असते. ही कोरी बाजू म्हणजे सोप्या भाषेत कव्हर पेज. पहिल्या पत्राची मागची बाजू, दुसर्‍या पत्र्याच्या दोन्ही बाजू व तिसर्‍या पत्र्याची पहिली बाजू यावर लेख लिहिले जात. म्हणजे एकूण चार पृष्ठे लेखन असायचे. तिन्ही पत्र्याच्या कडा उंच व मधला भाग खोलगट असल्यामुळे अक्षरांचे घर्षण टाळून ती सुरक्षित राहत. तीनही पत्र्यांच्या कडेला छिद्र पाडून त्यात धातूची तार ओवली जाई व तिची टोके एकत्र करून त्यावर राजमुद्रा अंकित करून  दानपत्र दिले जाई. थोडक्यात ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले कायदेशीर दस्तऐवज.

     पिरकोन-आवरेचा ताम्रपटही अशाच स्वरूपाचा असून जवळपास सात किलो वजनाचा आहे. एकशे एक ओव्यांमध्ये या दानपत्रातील मजकूर दिला आहे. अपरान्त म्हणजेच उत्तर कोकणच्या शिलाहार राजांनी वेदअध्ययन करणाऱ्या पंधरा ब्राम्हण व्यक्तींना या ताम्रपटाद्वारे दान केले आहे. इतिहास संशोधकांद्वारे गावात ब्राम्हण कुटूंबियांचा शोध घेण्याचे कारणही हेच होते. या ताम्रपटाने पिरकोन परिसरातील शिलाहार राजवटीला अधोरेखित तर केलेच, पण त्याचबरोबर फारशी नोंद नसलेला अल्पायुषी ‘महाकुमार केशिदेव’लाही  इतिहासात अमरत्व दिले. महाकुमार म्हणजे राजकुमार. शिलाहार राजा अपरादित्यचा हा ज्येष्ठ पुत्र आणि विक्रमादित्याचा भाऊ. गत शक संवतातील आश्विन अमावस्येला आलेल्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने परुकुने (पिरकोन) आणि अऊरे (आवरे) या गावांचे उत्पन्न पंधरा ब्राम्हणांना समप्रमाणात वाटून देण्यात आले. सध्याच्या कालगणनेनुसार ही तारीख होती 24 ऑक्टोबर 1120. दोन हजार वीस साली या ताम्रपटास नऊशे वर्षे पूर्ण होत आहेत. पिरकोन-आवरेचा इतिहास कमित कमी नऊशे वर्षांचा आहे, हेच यातून सिद्ध होते. इतकेच नव्हे तर प्राचिन काळाच्या खुणा जागोजागी या परिसरात दिसून येतात. केशिदेवाने आधी शिवाचे पुजन करून फुले वाहीली, सूर्यदेवास नमस्कार करून ‘राम’क्षेत्रातील ‘शिल’तिर्थाच्या खाऱ्या पाण्याद्वारे हा दानसंकल्प पूर्ण केला असे वर्णन या पटात आहे. नऊशे वर्षापूर्वीची ही स्थळे अजूनही त्याच नावाने ओळखली जात आहेत. पिरकोन गावाच्या समुद्राकडील दिशेला ‘शिल’ नावाने ओळखला जाणारा खाऱ्या पाण्याचा जलाशय असून त्याला जोडूनच ‘राम’ आगर नावाचे एक क्षेत्र आहे. म्हणजे केशिदेवाने ज्या शिलांतील पाण्याने संकल्प पूर्ण केला, तो परिसर पवित्र मानला जाऊन धार्मिक कार्यासाठी वापरला जात असल्याची शक्यता आहे. या दानपत्रात गावांचे उत्पन्न वाटून दिले असले तरी आश्चर्याची बाब म्हणजे यातून गावांच्या हद्दीतील मिठागरातून मिळणारा कर वगळण्यात आला आहे. तसेच या दोन गावांच्या सीमाही स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. महसूली हद्द निश्चित करताना पिरकोन गावाच्या दक्षिणेस आणि आवरे गावाच्या उत्तरेस ‘डोंगरी पुंजी पाणीलोटा’ असा उल्लेख आहे. हा भाग म्हणजे सध्याचा पाले, आवरेचा ‘खप’ आणि कोमनादेवी डोंगर नावाने ओळखला जाणारा परिसर असावा. तसेच आवरेच्या दक्षिणेस, पश्चिमेस आणि पिरकोनच्या पश्चिमेस ‘खारा नदी’ची हद्द मानली गेली आहे. हा अर्थातच खाडीचा भाग आहे. पिरकोनच्या पूर्वेस पुन्हा एकदा ‘डोंगरी पाणीलोटा’ सीमा आहे. थोडक्यात ‘डोंगरी पाणीलोटा’ म्हणजे डोंगरात उगम पावणारा ओढा असावा. पिरकोनच्या उत्तरेस ‘तलईका' असल्याचाही उल्लेख आहे. हा भाग म्हणजे कदाचित सध्याचा ‘तळबंदखार’ असावा. अनेक स्थित्यंतरानंतरही येथील नावांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
या दानाबाबतची ताम्रपटातील शहाऐंशीवी ओवी पहा-
“वहनार्थम स्व परीवारा पोषणार्थमा च प्रणोत्पाला विषय अमिताहपती अऊरेग्रामह तथा परूकुने ग्रामह गृह द्रम्म दुदमे”

   ही दोन्ही गावे ‘प्रणोत्पल’ नावाच्या प्रदेशात असल्याचाही उल्लेख आहे. या ताम्रपटाचा अन्वयार्थ लावणारो डॉ.शशिकांत धोपटे यांच्या मते हे प्रणोत्पल म्हणजे सध्याचे ‘पनवेल’ असावे. हे पटण्यासारखेही आहे. उत्तर कोकणातील या परिसरात सुरूवातीस राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून काम करणाऱ्या शांतताप्रिय आणि शिवभक्त शिलाहारांनी सुमारे साडे चारशे वर्षे राज्य केले. त्यांच्या राजवटीत उभारल्या गेलेल्या वास्तूंवरून त्या काळातील समृद्धता लक्षात येते. पुढे यादवांच्या आक्रमणात हे राज्य मुळापासून उखडले गेले. मुस्लिम राजवटीत त्यांच्या पाऊलखुणाही पुसल्या गेल्या. पुढे ब्रिटीशांच्या हाती सत्ता गेल्यानंतर येथील इतिहास दुर्लक्षिला गेला. पण अजूनही इथल्या मातीत महामंडलेश्वर शिलाहारांचा इतिहास जिवंत आहे. इथल्या वस्तूंमधून-वास्तूंमधून, कथांमधून-गीतांमधून, नावांमधून-गावांमधून तो जिवंत इतिहास आपल्याला सापडतो. आपल्या सभोवतालच्या या ऐतिहासिक पाऊलखुणांचे महत्त्व ओळखून त्याच्या जतनासाठी प्रयत्न करुया. इतिहासाचा शोध घेऊया आणि त्यातून वर्तमानकाळासाठी बोध घेऊया!
- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ : Studies in Indian Epigraphy (Vol-26)

विशेष आभार: छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय-मुंबई, डॉ.शशिकांत धोपटे, डॉ.रुपाली मोकाशी, पंकज समेळ, सोनाली बगाडे, 

Friday, October 12, 2018

दल-दलपरी हू मै!

दल-दल परी हू मै!
(सकाळ, मुंबई आवृत्ती 12 ऑक्टोबर 2018)

       “ना ना मुझे छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं
        मुझे ना छूना..हां परी हूँ मै!”
    सुनिता रावच्या सुंदर आवाजातलं हे गाणं आठवत असेलच. नसेल आठवत तर ‘रास-दांडीया’ आठवून पहा, तिथे या गाण्याशिवाय कोणाचेही ‘पाय’ हलत नाहीत. मुंबई सारख्या उत्सवप्रेमी शहरामध्ये एखाद्या कार्यक्रमात जेव्हा हे गाणं सुरू होतं तेव्हा त्याच्या तालावर थिरकणाऱ्यांची एक वेगळीच रंगीबेरंगी दुनिया निर्माण होते. या दुनियेत ‘बरी हू मै’ वाले सुद्धा परी असल्याच्या थाटात अभिनय करताना दिसतात. याच मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर एक अशीच अनोखी दुनिया वसलेली आहे. या दुनियेत कित्येक रंगीबेरंगी जीव थिरकत असतात. फाल्गुनी पाठकच्या ‘परी हूँ मै’ या गाण्याची आठवण करून देणारी एक मासोळी इथे आहे. दिसायला ती सुद्धा ‘बरी हू मै’ अशीच असली, तरी ‘ना ना मुझे छूूना दूर ही रहना’ करत जलपरी असल्याच्या थाटातच ती वावरत असते.


         ‘पेरिओथॅल्मस’ कुटूंबातील ही परी म्हणजे ‘निवटा’ या माशाची चुलत बहीण. स्थानिक नाव ‘भाडुळकी’. मड स्किपर (Mud Skipper) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निवटे या प्रजातीशी पूर्णत: साधर्म्य असूनही स्वत:चे वेगळेपण जपणारी ही भाडुळकी. आपल्या भाईबंदांप्रमाणेच किनारपट्ट्यांवरील रेतीयुक्त व दलदलीच्या भागात, तिवरांच्या वनात आणि उथळ पाण्याच्या डबक्यात हे प्राणी आढळतात. या परीसरात स्वत: खणलेल्या बिळांमध्ये राहतात. या प्राण्यांची बिळेही फसवी आणि एकापेक्षा अधिक तोंडांची असतात. इंग्रजीतल्या व्ही, यू आणि जे अक्षरांसारखी रचना त्यांच्या बिळांची असते. काही बिळांचे एक तोंड जमिनीवर उघडणारे तर दुसरे पाण्यात अशी वेगळी रचनाही इथे पहायला मिळते. या बिळांमुळे त्यातील जीवांना स्वत:चे तापमान  नियंत्रित ठेवण्यास मदत होते. भाडुळकीची जीवनशैली उभयचर प्राण्यांशी मिळतीजुळती असते. त्यामुळे ‘मछली जल की रानी है’ प्रमाणे ‘बाहर निकालो तो मर जाएगी’ असं काही या जीवाच्या बाबतीत घडत नाही. याऊलट हा मासा जास्त काळ पाण्यात राहीला तर मरून जाईल अशी अवस्था.  खरंतर हवा खाण्यासाठी हा जीव बऱ्याचदा पाण्याबाहेर ये जा करत असतो. सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन मिळवण्याचे विविध मार्ग या माशाला उपलब्ध होतात. पाण्यात असताना कल्ल्यांद्वारे आणि जमिनीवर त्वचा व तोंडातील स्रावाच्या साह्याने ते ऑक्सिजन मिळवतात. तोंडातील स्रावाने त्वचा ओलसर ठेवण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळेच पाण्याबाहेरही ते कित्येक काळ तग धरू शकतात. समुद्रकिनाऱ्यावरील भरती-ओहोटी क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सजीवांना अशाच वैशिष्ट्यांची गरज असते. पेरिओथॅल्मस कुळातील प्रजातींना पाण्यात पोहणे, चिखलावर सरपटणे, दगडावर चढणे, झाडावर चढणे आणि हवेत उडी मारता येणे अशी विविधांगी कामे जमतात. पण इंग्रजीतील “Jack of all, Master of None!”  म्हणींसारखं हे सगळंच थोडं थोडं जमतं. आपल्या आवडीच्या विषयात भरमसाठ गुण मिळवणारा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास व्हावा आणि सर्व विषयात काठावर पास होणाऱ्याचा पहीला क्रमांक यावा अशी परिस्थिती या माशाची आहे.

          निवटे आणि भाडुळकी यांच्यातील महत्त्वपूर्ण फरक म्हणजे त्यांचा आकार आणि पाण्यातला संचार. भाडुळकीची रचना निवट्यासारखीच असली तरी आकार लहान असतो. खाडीच्या अरूंद प्रवाहातील वाहत्या पाण्यातून मार्गक्रमण करताना भाडुळकी ज्या वेगाने पोहते त्याला तोड नाही. गरजेच्या वेळी अगदी प्रवाहाच्या विरूद्धही पोहू शकते. पोहताना पाण्याला स्पर्शही न करता हवेतून गेल्यासारखा भास होतो. आपल्या पोटाजवळील आणि छातीजवळील परांचा सुयोग्य वापर करून ‘छूना ना मुझे’ म्हणत ही जलपरी आपल्या समोरून नाहीशी होते. हीच चपळता दलदलीतही कायम राहते. गुळगुळीत ती अंगामुळे भक्षकाच्या तावडीतून सहजपणे निसटू शकते. आपल्या कुळातील इतर प्राण्यांसारखेच डोक्याच्या पुढच्या भागात बटबटीत डोळे भाडुळकीला असतात. चौफेर नजर असणे ही बाब शब्दश: या जीवाला लागू पडते. दोन्ही नेत्रगोल एकाच वेळेस वेगवेगळ्या दिशांना फिरू शकत असल्याने एक व्यापक दृष्टीकोन या प्राण्यांना मिळतो. पाण्यातून संचार करताना पाण्याच्या पृष्ठभागाखालचे दृश्य एका डोळ्याने तर पृष्ठभागावरील दृश्य एका डोळ्याने पाहण्यामुळे भाडुळकी सहसा हाती लागत नाही.

           वेगवान, चपळ, चलाख असणारे हे प्राणी दलदलीचे राजे आहेत. या दलदलीच्या राज्यात भाडुळकी म्हणजे दल-दलपरी. परंतु संपूर्ण निसर्गावर आमचाच हक्क आहे असे मानणारा एक वसाहतवादी प्राणी आपल्या वसाहतींसाठी भराव टाकून हे दलदलीचे राज्य खालसा करत सुटला आहे. यातून आतापर्यंत बऱ्यापैकी टिकाव धरणाऱ्या पऱ्यांची गणना दुर्मिळ जीवांमध्ये होऊ लागली आहे. तिचा ‘ना ना मुझे छूना ना, दूर ही रहना!”चा मूक आवाज या ‘वसाहतवादी प्राण्यापर्यंत’ पोहोचत नाही, या लेखाच्या निमित्ताने तो पोहोचावा- हीच अपेक्षा!

-  तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

#सागरकिनारे #भाडुळकी #sagarkinare #mudskipper

Wednesday, October 3, 2018

पायरेटस् ऑफ ‘खारे’बियन

पायरेटस् ऑफ ‘खारे’बियन

‘पायरेटस् ऑफ द कॅरेबियन’ नावाचा एक धम्माल हॉलिवूडपट ठाऊक असेलच. डिस्ने पिक्चर्सची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे आतापर्यंत पाच भाग प्रदर्शित झालेत. या चित्रपटात पायरेटस् म्हणजेच समुद्री लुटारू आणि त्यांचा जॅक स्पॅरो नावाचा एक धूर्त स्वयंघोषित कप्तान अशी पात्रे आहेत. या लुटारु टोळ्यांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विविध कथानके या चित्रपटात  गुंफली आहेत. या कॅरेबियन चाच्यांच्या टोळीसारख्याच एका ‘खारे’बियन टोळीने आपल्या मुंबई, गोव्याच्या खारपट्टयांत देखिल  शिरकाव केला आहे. ते कसे आले ठाऊक नाही. पण पावसाळ्याच्या उत्तरार्धात त्यांचं दर्शन वारंवार होऊ लागलंय. त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे सर्व माध्यमांना त्यांची नोंद घ्यावी लागली. पाहुणे म्हणून मुंबईच्या किनारपट्टीवर आलेल्या या जीवांना समुद्री घुसखोरच म्हणावे लागेल इतकी त्यांची सध्या दहशत आहे. अवेळी आलेल्या या अतिथींना सध्यातरी ‘अतिथी तुम कब जाओगे?’ असे म्हणायची वेळ आलीय. मनुष्यप्राण्याने इंच न इंच जागा व्यापलेल्या मुंबईच्या दाट वस्तीमध्ये किनारपट्टीलगत घुसखोरी करणारे हे अतिथी कोण आहेत?
सध्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दहशत पसरवणारे हे समुद्री चाचे म्हणजे ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’. 

        पायरेटस् ऑफ कॅरेबियन या चित्रपटात समुद्री लुटारूंच्या टोळीचे व्यवस्थापन दाखवले आहे. यात जहाजाचे खलाशी, लढणारे चाचे, सफाई कामगार, वल्हे चालवणारे गुलाम, आचारी अशी कामाची विभागणी केलेली असते. या सर्वांच्या समन्वयातून टोळीचे काम चालते. आपण ज्या ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’बद्दल बोलतोय तो देखिल या टोळ्यांप्रमाणेच आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश हा जेलीफिशच नाही. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर (Portuguese man-of-war) या नावाने ओळखला जाणारा हा प्राणी एक सिफोनोफोर आहे. म्हणजे सोप्या भाषेत अनेक जीवांपासून बनलेला. हो तुम्ही वाचलंत ते बरोबर आहे. ब्ल्यू बॉटल जेलीफिश ‘हा’ प्राणी नसून ‘हे’ प्राणी आहेत. फायसेलिया फायसेलीस (Physalia physalis) असे शास्त्रीय नाव असणारी ही प्रजाती चार वेगळ्या जीवांनी मिळून बनलेली आहे. एखाद्या संघटीत टोळीप्रमाणे यातील चजीव आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. या प्राण्याची ओळख असणारा निळ्या जांभळ्या बाटलीसारखा आकार या टोळीतल्या पहील्या प्राण्यापासून बनलाय. हवेने भरलेला हाच बाटलीसारखा फुगीर आकार या जीवाला तरंगण्यास मदत करतो. याला निमॅटोफोर (pneumatophore) म्हणतात. हा पारदर्शक भाग जेलीफिशसारखा असल्यामुळेच या सजीवाच्या नावात जेलीफिश हे विशेषनाम जोडलं गेलं.

या टोळीतल्या दुसऱ्या प्राण्यापासून ऑक्टोपसच्या हातांसारखे भासणारी शुंडके (tentacles) बनली आहेत. त्यांना डॅक्टीलोझॉइडस् (dactylozooids) म्हणतात. ही शुंडके लांबलचक असतात. त्यांची लांबी एक फुटापासून ते शंभर फुटाहूनही अधिक असू शकते.  मासे आणि कोलंबी प्रजातीसारखे आपले भक्ष्य पकडण्यासाठी या शुंडकांचा उपयोग होतो. ही शुंडके म्हणजे या निळ्या घुसखोराच्या टोळीतील शस्त्रधारी सैनिकच. या शुंडकांनी दंश करू शकणाऱ्या पेशी धारण केलेल्या असतात. त्यात इमोबिलाईझ( immobilize) नावाचे विष असते. दंश केल्यानंतर हे विष वेगाने भक्ष्याच्या शरीरात पसरते, परिणामी ब्ल्यू बॉटलला आपले भक्ष्य मिळवणे सोपे होते. संरक्षण, आक्रमण आणि अन्न मिळवणे अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ही शुंडके पार पाडतात.  मनुष्य प्राणी हा काही या लहानशा जीवाचे अन्न नाही. परंतु जेलीफिशच्या संपर्कात येणाऱ्या प्राण्यांपासून स्वत:चा बचाव करताना या विषारी डंखाचा तडाखा मानवालाही कित्येक वेळा बसलाय. एखाद्या अपघाताने किंवा अन्य कारणाने तुटलेल्या स्वतंत्र शुंडकांना स्पर्श होऊन देखिल त्याचा विषारी दंश होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या समुद्रकिनारी गणेशविसर्जन सोहळ्यात असे दंश झाल्याच्या घटना घडल्यात. सामान्यत: ब्ल्यू बॉटल जेलीफिशचे विष माणसाला मारण्याइतपत घातक नसते, परंतु त्याचा डंख झालेल्या जागी भयंकर वेदना होऊन सूज येणे अशी लक्षणे दिसतात. काही घटनांमध्ये छातीत वेदना होणे, रक्तदाब वाढणे, थकवा येणे अशी जीवघेणी लक्षणेही आढळली आहेत.

    या टोळीतील तिसरा सदस्य आचाऱ्याचे काम करतो. या भागाला गॅस्ट्रोझॉइडस् (gastrozooids) म्हणून ओळखले जाते. तरंगत्या भागाच्या खालच्या बाजूला लागून असणारे हे प्राणी शुंडकांनी मिळवलेल्या अन्नाचे विशिष्ट संप्रेरकांच्या साह्याने पचन करतात. त्यानंतर मोठ्या अन्नकणांचे उपयुक्त अशा लहान कणांमध्ये रूपांतर करून त्याचे उर्वरीत सदस्यांना वाटप केले जाते. थोडक्यात संपूर्ण टोळीच्या पोषणाची जबाबदारी या सदस्याकडे असते.
        या टोळीतला शेवटचा सदस्य म्हणजे गोनोझॉइडस् (gonozooids). वंशवृद्धीचे काम या सदस्याचे. हा भाग द्विलिंगी म्हणजे नर आणि मादी दोन्ही प्रकारांचे एकत्रिकरण असलेला. या भागातूनच पुढे अलैंगिक पद्धतीने प्रजनन होऊन नविन टोळीची निर्मिती होते.

       दिसायला आकर्षक परंतु तितकेच धोकादायक असणाऱ्या या समुद्री घुसखोरांनी अनेकांना दंश केल्यामुळे त्यांचे अस्तित्व माध्यमांना जाणवले. त्यांनी लगेचच या समुद्री पायरेटसच्या कहाण्यांमध्ये याच समुद्राचंच मीठ मिसळून माध्यमांद्वारे अधिकच रंगवून सादर केल्या गेल्या. त्यामुळे या घुसखोरांकडे लोकांचं अधिकच लक्ष गेले. खरं तरं या पाहुण्यांचं घर आहे समुद्र आणि समुद्रात त्यांचं अस्तित्व आढळणे ही अतिशय सामान्य बाब आहे. त्यांनाही आपल्यासारखं गरम पाण्यात डुंबायला आवडतं, त्यामुळे पाण्यांच्या प्रवाहाबरोबर, बदलत्या तापमानाबरोबर त्यांच्याही जागा बदलत राहतात. या सर्वांच्या जोडीला आणखी एक मानव नावाचा प्राणी आहे, ज्याचं घर जमिनीवर आहे. त्याचं शरीर पाण्यातल्या जीवनासाठी अनुकूल नाही. पण तो प्राणी स्वत:ला सर्वशक्तिमान समजतो आणि समुद्रामध्ये स्वत: घुसखोरी करतो आणि या घुसखोरीदरम्यान मूळ समुद्रातल्याच जीवांनी त्याला काही अपाय केला तर असे कसे घडले म्हणून आकांडतांडव करतो. या पाहुण्यांना पिटाळून लावण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याचे ठरवतो. त्यांना दुसऱ्या प्रदेशातून आलेले म्हणून घुसखोर ठरवतो. पण ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’ खरंच घुसखोर आहेत का?
विचार करा आणि  ठरवा समुद्रातला खरा घुसखोर कोण?
‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’ ज्याचं घरंच समुद्र आहे तो की ‘मानव’ ज्याचं घर जमिनीवर असूनही समुद्रात मुक्तपणे संचार करण्याचा प्रयत्न करतो तो?

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...