Search This Blog

Monday, January 25, 2021

दुपानी लता: अमर्याद सागराला मर्यादा

     

         दूरवर पसरलेल्या अथांग सागराच्या लाटा  किनाऱ्यावर निरंतर येऊन आदळत असतात. आपल्या फेसाळत्या लाटांनी तो भूमीवर सातत्याने आक्रमण करतच राहतो. ओहोटीच्या वेळेस पीछेहाट झाली तरी भरतीच्या वेळेस हे आक्रमण अधिकच विशाल होत जाते. लाटांच्या प्रत्येक हल्ल्यात किनाऱ्याची झीज होत राहते. कधीकधी समुद्राचे पाणी वेस ओलांडून लोकवस्त्यांमध्ये घुसते. मानवाच्या दृष्टीने या निरंकुश पाण्याला अंकुश लावणे गरजेचे असते. त्याला रोखण्यात मानवी प्रयत्न तोकडे पडत असताना, बऱ्याच वेळेस निसर्गच सहाय्य करतो. सागरकिनारी वसलेल्या सजीवसृष्टीतील काही वनस्पती या अमर्याद सागराला आपल्यापरीने मर्यादा घालण्याचे काम करतात; ‘मर्यादा वेल’ ही त्यातलीच एक.

       


‘मॉर्निंग ग्लोरी’ अशी ओळख असणाऱ्या आणि हजारो जाती असणाऱ्या वनस्पती प्रकारातील ही वेेेल. समुद्रकिनारी उगवते म्हणून ती ‘बीच मॉर्निंग ग्लोरी’. आयपोमोई पीस-कॅप्रे (Ipomoea pes-capraeहे तिचे शास्त्रीय नाव. यातील ‘आयपोमोई’ हा ग्रीक शब्द वेलीचे  ‘वळवळणाऱ्या किड्यांसारखे’ दिसण्याशी संबंधित आहे.  वेगाने उगवणाऱ्या आणि सदानकदा टवटवीत दिसणाऱ्या या वेलीचा समुद्रकिनाऱ्यावर एक सुंदर नक्षीदार गालीचाच तयार होतो. या वनस्पतीच्या खोडापासून निघणारी जाडजूड आणि लांब मुळे वाळूयुक्त जमिनीत खोलवर जातात. जवळपास तीन फूट लांबीची ही मुळे त्या जमिनीला घट्टपणा आणतात. साखळ्यांसारखी लांबलचक पसरलेली ही वेल आपल्या ‘सागरमेखला’ या संस्कृतनामाला जागत ‘वालुकाबंधन’ घडवून आणते. कधी कधी ही लांबी सलगपणे शंभर मीटर पर्यंत जाते. तिची लांब देठाची, मांसल व गुळगुळीत पाने आपट्याच्या पानांची आठवण करून देतात.

दोन भागात खोलपर्यंत विभागलेल्या या पानांमुळेच तिला मराठीत ‘दुपानी लता’, हिंदीमध्ये ‘दो पत्ती लता’  तर लॅटिनमध्ये ‘बायलोबा(Biloba)’ असेही संबोधले जाते. या पानांचा आकार कोणाला शेळीच्या खुराप्रमाणे भासतो तर एखाद्याला तो आकार सशाप्रमाणे वाटतो.  यामुळेच  मर्यादा वेलीला ‘गोटस् फूट(Goat's foot vine)’, हेअर लीफ अशी गंमतीशीर नावे लाभली आहेत.लॅटिन नावातील पीस-कॅप्रेचा अर्थदेखिल शेळीचे खूर असाच होतो.कधीकधी आपला नेहमीचा वाळुमार्ग सोडून ती जुन्या वापरात नसलेल्या लोहमार्गांच्या कडेलाही आढळते, त्यामुळे तीला ‘रेल रोड वाईन’ असेही म्हटले जाते. ह्या वेलीला साधारणपणे वर्षभर आकर्षक फुले येतात. गुलाबी जांभळ्या रंगाच्या फुलांचा आकार पाहून तुम्हाला ग्रामोफोनची आठवण होईल.

     


मर्यादावेलीचे उपयोग त्यांच्या प्रजातींसारखेच अमर्याद आहेत. अनेक जाती मानवाला आणि जनावरांनाही अन्न म्हणून उपयोगी आहेत. तिच्या पानांची भाजी केली जाते. मुळांची देखील भाजी होते. पण ही भाजी मुळातच रेचक(laxative) असल्याने रात्री खाणे उत्तम. अर्थात बद्धकोष्ठता सारख्या आजारांसाठी ती उपयुक्त ठरते. जलोदर तसेच काही मूत्रविकारांमध्ये पानांचा औषध म्हणून वापर होतो. पानांच्या रसातील जंतुरोधक व वेदनाशामक  गुणधर्मामुळे जखम, भाजणे, सूज येणे यांसारख्या त्रासांवर उपचार करता येतात. या वेलीच्या पानांचा लेप संधिवात, मस्तकशूळ इत्यादींवर लावतात. मलेशियामध्ये वेलीच्या पानांचे पोटीस गळवे, सूज, जखमा व काळपुळी यांवर लावतात. बिया पोटदुखीवर आणि पेटके आल्यास वापरतात. अलिकडच्या काळात काढ्याला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले असताना मर्यादावेलीचा वापर या राष्ट्रीय(!) पेयासाठी होऊ शकेल का, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचे उत्तर अर्थातच ‘हो’ आहे. खोकल्यासाठी या वेलीचा काढा उपयोगी ठरतो. त्याचबरोबर पानांचा चहा बनवून देवीच्या रोगात उपचार म्हणून वापरला जातो. समुद्राच्या कडेला राहून ही वनस्पती  या परिसरात वावर असणाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पावर प्रदान करते. जेलीफिश, स्टोनफिश सारख्या जलचरांनी दंश केल्यास मर्यादावेलीची ताजी पाने वापरून उपचार केला जातो. काही ठिकाणी स्थानिक लोक या वेलींपासून पारंपरिक पद्धतीने दोरखंडासारखे बंध तयार करतात. होड्या तयार करताना लाकडी जोडण्यांमधील फटी बुजवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने सुकवलेल्या पानांचा वापर होतो.

      


जमीन व समुद्र यांच्या सीमेवर वाढणाऱ्या या वेलीवर तीव्र उन, खारे वारे यांचा फारसा परिणाम होत नाही. या वनस्पतीचा बीजप्रसार सागरी मार्गानेसुद्धा व्यवस्थित होत असल्याने ‘आमच्या शाखा सर्वत्र आहेत’ असा फलक लावल्यासारखीच ती सर्वत्र आढळते. पण तिला रुजण्यासाठी आवश्यक असणारी ‘जमिन’ बळकावणाऱ्या मनुष्यापुढे तीने आपली पाने टेकलीत. भविष्यात लोकवस्त्यांमध्ये समुद्राला हात पाय पसरू द्यायचे नसेल तर मर्यादावेलींसारख्या जीवसृष्टीला पसरण्यास मदत करायला हवी. थोडक्यात... समुद्राचे आक्रमण रोखायचे असेल, तर आपल्यालाही किनारी जमिनींवरील अतिक्रमण रोखावे लागेल.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Sunday, January 17, 2021

गोड फळे, तिखट मुळे

    ‘अॅडम आणि इव्ह’ या जोडीची कथा आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल. ‘इव्ह’ला बागेतील सुप्रसिद्ध फळ खाण्याची इच्छा होते. अॅडम मात्र हे फळ खायचे की नाही, या द्वीधा मन:स्थितीत असतो. पुढे हे फळ त्यांच्याकडून खाल्ले जाऊन मनुष्यप्राण्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान वगैरे मिळते असे काहीसे हे कथानक. बऱ्यापैकी ज्ञान असलेला आधुनिक मनुष्य पृथ्वीवर येऊन आता जवळपास दोन-तीन लाख वर्षांचा कालावधी लोटला आहे.अॅडम-इव्हने खाल्लेल्या फळांसारखी कित्येक फळे आपल्या पूर्वजांकडून पचवून झाली आहेत. पण तरीही कधीकधी आपल्या आजूबाजूला आपल्याला ज्ञात नसलेल्या अशा काही वनस्पती दिसतात, तेव्हा मात्र आपले ज्ञान अजूनही अॅडम स्तरावरचे आहे याची मनोमन खात्री पटते.

  


महाराष्ट्राच्या किनारी भागात फेरफटका मारताना खारफुटींच्या जंगलात सुंदर अशा पांढऱ्या जांभळ्या रंगांच्या लहान लहान फळांनी लगडलेला एक झुडूपसदृश वृक्ष दिसतो. त्याच्या फळांचा आकर्षकपणा आपल्यातील ‘इव्हपणा’ जागा करीत असला तरी ते फळ बाजारात पहायला मिळत नसल्याने खावे की न खावे असा ‘अादिम’ प्रश्न काहीजणांना पडतो. खारेपाटातील स्थानिकांना पूर्वापार  परिचित पण नवख्यांना अपरिचित अशा या वनस्पतीचे नाव ‘मिरजोळी’. काही ठिकाणी तिला खाकण म्हणून ओळखले जाते, तर मुंबई, रायगडच्या स्थानिक भागांत ही फळे ‘सायरा’ या नावाने ओळखली जातात. सॅल्व्हॅडोरेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सॅल्व्हॅडोरा पर्सिका(Salvadora persica). आधुनिक काळात या वनस्पतीकडे दुर्लक्ष होत असले तरी पूर्वीच्या काळी मात्र मिरजोळीला खूप महत्त्व होते. अथर्वसंहिता, पाणिनींची अष्टाध्यायी, महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता यांसारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथांत तिचा ‘पीलू’ या नावाने उल्लेख झाला आहे.

या वनस्पतीची जितकी नामे आहेत,
तितकीच तिची कामे आहेत!


      लांबून पाहील्यास मिरजोळीच्या पांढरट रंगाच्या गुळगुळीत फांद्या वेलीसारख्या लोंबताना दिसतात. पण प्रत्यक्षात ती वेल नाही, हे जवळ जाताच लक्षात येईल. तिची पाने साधीच पण साधारण मांसल असतात. फांद्यांच्या टोकांकडे आकर्षक असा फुलोरा दिसतो. त्यावर नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हिरवट पिवळी व देठ असलेली लहान फुले येतात. त्यापासून सुंदर अशी लहान लहान फळे तयार होतात. चवीला गोड असणारी ही फळे मूत्रविकारांवर उपयुक्त असल्याचे उल्लेख आहेत. ‘गोड फळे आणि तिखट मुळे’ अशी या वनस्पतीची तऱ्हा आहे, कारण गोड फळांच्या या वनस्पतीची पाने व मुळे मात्र तिखट असतात. पानांचा काढा दमा व खोकला यावर उपाय म्हणून दिला जातो. उंटाचे खाद्य म्हणूनही या पानांचा वापर होतो. तर नामिबियामध्ये दुष्काळी भागातील जनावरांचा चारा म्हणूनही ही वनस्पती प्रसिद्ध आहे. या वनस्पतीच्या पानांचे गुणधर्म मोहरीच्या पानांप्रमाणे आहेत. पानांची मोहरीसारखी भाजीही केली जाते. त्यामुळेच या झाडाला ‘मस्टर्ड ट्री ऑफ स्क्रिप्चर्स’ म्हणतात. त्याच्या बियांचा वापर डिटर्जंट उद्योगात होतो.

     


या वनस्पतीच्या ‘मिसवाक’ आणि ‘टूथब्रश ट्री’ या दोन नावांवरून लगेचच त्याचा वापर लक्षात येईल. दात घासण्यासाठी त्याचा पूर्वापार वापर होत आहे. पांढऱ्या दातांना मजबूत करणाऱ्या या वनस्पतीचे लाकूड नरम व पांढरे असते. त्याला  रंधून व घासून त्याला चांगली झिलई प्राप्त होते. त्याला वाळवीचा उपद्रव होत नाही. या विशेष गुणांमुळे ईजिप्शियन लोक प्रेते ठेवण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या पेट्यांसाठी या वनस्पतीच्या लाकडाचा वापर करायचे.
        वनस्पतीच्या या सर्व गुणांचा वापर करत अवगुणी मनुष्य आणखी काही उद्योग करतो. मिरजोळीच्या फळांवर प्रक्रीया करून मादक पेय बनविता येते. तसेच तपकीर तयार करताना त्यात या झाडाच्या सालीचे चूर्ण घालतात.
           अतिपरिचय असणाऱ्या या वनस्पतीची वाटचाल अपरिचयाकडे होत चाललीय. खाडीकिनारी वसलेल्या उद्योगांसाठी, घरांंसाठी मिरजोळीसारख्या अनेक वृक्षांची कत्तल होत गेली. पण अजूनही ही वनस्पती माणसांंनी अनधिकृतपणे रचलेल्या भरावावर अधिकृतपणे उभी रहात आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली नजर तिकडे जाऊन तिला थोडा आधार मिळावा ही अपेक्षा.
- तुषार म्हात्रे

Monday, January 11, 2021

अतरंगी डावला

    विशाल...अथांग...गहन...गूढ... यांसारख्या अनेक विशेषणांसाठी डोळ्यांसमोर येणारा एक समर्पक शब्द म्हणजे ‘समुद्र’. त्याच्या किनाऱ्यावर पसरलेल्या रुपेरी वाळूत बसून त्याचे विशाल रुप न्याहाळताना सागराच्या न दिसणाऱ्या तळाशी काय दडलंय, याचे कुतूहल सर्वांनाच वाटत असते. हा नजरेआडचा विचार करता करता, आपल्या नजरेसमोरही अशाच काही गोष्टी समुद्र उपलब्ध करून देत असतो हे मात्र आपण विसरतो. सागरकिनाऱ्यावर सहज आढळून येणारी आणि तितक्याच सहजपणे दुर्लक्षिली जाणारी जीवसृष्टी पसरलेली असते. सागराचे अंतरंग शोधणारी नजर इकडे वळवली तर इथेही सजीवसृष्टीचे अनोखे रंग पहायला मिळतील.

      


मुंबई-कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर, खाडीलगतच्या दलदलयुक्त प्रदेशात एक ‘अतरंगी’ वनस्पती आढळते.  गुळगुळीत, मांसल आणि चमकदार लहान पानांची, जांभळ्या- गुलाबी फुलांची किनारी भागात विखुरलेली ही वनस्पती आपल्याला एखाद्या सामान्य तणाप्रमाणेच भासेल. तिच्या आडव्या पसरलेल्या रोपांची लांबी जेमतेम फुटभर भरते. बाहेरून फार लक्षवेधी नसणाऱ्या या वनस्पतीच्या अंगभूत वेगळ्या गुणधर्मामुळे तीला अतरंगीच म्हणावे लागेल.  बंगाली भाषेत ‘जादू पलंग’ असा उल्लेख असणारी ही वनस्पती म्हणजे ‘डावला’. काही भागांत तिला ‘घात’ असेही म्हटले जाते. या वनस्पतीला इंग्रजीमध्ये ‘सी पर्सलेन (Sea  Purslane)’ असे नाव आहे.  या आकाराने लहान वनस्पतीचे शास्त्रीय नाव मात्र ‘सेसुवियम पोर्तुलाकास्ट्रम (Sesuvium portulacastrum)’ असे तिच्या विस्तारासारखेच मोठे आहे. खुद्द कार्ल लिनियसने वर्गीकरण केलेल्या या वनस्पतीच्या नावातील सेसुवियम हा शब्द ‘सेसुवी’ या गॅलिक जमातीपासून घेतला आहे, तर पोर्तुलाका म्हणजेच पर्सलेन.  ‘घोळ’ प्रजातीशी साम्य असणारी ही वनस्पती.
(इथे ‘घोळ’ या पालेभाजीबाबत उल्लेख केलाय, पुन्हा ‘घोळ’ नावाच्या माशाशी संबंध जोडण्याचा घोळ करू नका.)
“तुझा नी माझा गडे, एकच वंश आहे,
माझिया अंगात थोडा खारेपणाचा अंश आहे!”
असे म्हणत डावला आपला वेगळेपणा जपते.

डावल्याच्या पानांची आणि देठांची भाजी करता येते. कच्च्या स्वरूपात ही वनस्पती खारट आणि कडवट चवीची असते. शिजवण्यापूर्वी चांगले रगडून अथवा शिजवताना एक दोन वेळा पाणी बदलून  हा कडवटपणा कमी करता येतो. स्वतंत्र भाजी करण्याबरोबरच इतर अन्नपदार्थांमध्येही त्याचा वापर होतो. अमेरिका, फिलापाईन्स यांसारख्या काही देशांत डावल्याच्या देठांचे लोणचे बनवले जाते. तसेच काही प्रदेशांत मुरांब्यासारखे पारंपरिक गोड लोणचे तयार होते. भारताच्या किनारी भागांत बारमाही आढळणारा डावला कधीकाळी इथल्या  लोकांच्या नेहमीच्या अन्नातील भाग होता. परंतु जबरीच्या विकासाने नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास केला आणि स्थानिकांच्या तोंडातला हा नेहमीचा घासही गेला.
       या वनस्पतीला ‘अतरंगी’ म्हणण्याचे कारण तिच्या  अंतरंगातील रसायनांमध्ये दडले आहे. डावला हा एक्डीस्टेरॉन (Ecdysterone) या स्टेरॉईडसचा समृद्ध स्रोत आहे. शास्त्रीय पद्धतीने या वनस्पतीपासून हे स्टेरॉईड मिळविले जाते. कात टाकणाऱ्या प्राण्यांना उपयुक्त असणारे हे रसायन मनुष्याच्या स्नायूंचेही मजबूतीकरण करते. त्यामुळे अॅथलेटिक्समधील खेळाडूंसाठी ते पोषक ठरू शकते. डावल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल अशी जंतुरोधक तत्वे आढळतात. भारतासह हैती, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका या देशांत मूत्रविकार, तापासाठी या वनस्पतीपासून तयार केलेली औषधे वापरतात. स्कर्व्ही रोगावरील उपचाराचा एक भाग म्हणून डावला उपयुक्त ठरतो.
      किनारी भागातील शेतीमध्ये समुद्राचे खारे पाणी घुसून जमिन नापिक होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. समुद्रकिनाऱ्यावरील या वनस्पतीच्या वैशिष्ट्यांमुळे हे नुकसान टाळण्यास मदत होते.वाऱ्यामुळे किनाऱ्यावरील वाळूचे कण  उडून जात असताना तिथे सर्वत्र पसरलेल्या  वनस्पतीमध्ये अडकून पडतात. कालांतराने तिथे वाळूचा लहानसा ढीग तयार होतो. तयार झालेला हा लहान टेकडीवजा भाग इतर वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक ठरतो. या सर्व कारणांमुळे समुद्राच्या पाण्याला जमिनीवर येताना नैसर्गिकरित्या अटकाव होतो. यातून जमिनीचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येते. आंध्रप्रदेशातील शेतकरी डावल्याकडे नैसर्गिक सूचक म्हणून पाहतात. आपल्या जमिनीत उगवलेल्या डावल्याची फुले ‘गडद गुलाबी’ आढळली तर त्याचा अर्थ जमिनीची क्षारता वाढली असा होतो. या फुलांकडून मिळालेला धोक्याचा ‘पिंक सिग्नल’ ओळखून शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना करता येते.
           

सर्वदूर पसरलेल्या विशाल जीवसृष्टीतील ही लहानशी वनस्पती आपले अस्तित्व टिकवत असताना इतर  जीवांनाही जगण्यास आधार देते. पण झटपट विकासाच्या मानवी प्रयत्नांत मोठी मोठी जंगले नाहीशी होतात, तिथे डावल्यासारख्या लहान वनस्पतींचा विचार कोण करणार? आपणसुद्धा या वनस्पतीप्रमाणेच निसर्गाशी हातमिळवणी करायला शिकलो तरच भविष्यात टिकलो, असे समजण्यास हरकत नाही.

- तुषार म्हात्रे

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...