Search This Blog

Monday, May 21, 2018

चिरनेर : झाकलेला आणि राखलेला इतिहास


चिरनेर : झाकलेला आणि राखलेला इतिहास

       गाभाऱ्याच्या पायऱ्यांचा थंडगार स्पर्श, दगडी दिव्याचा मंद प्रकाश आणि वर्तुळाकार घुमटाखाली पितळी सापाने वेढलेले कोरीव शिवलींग. गळ्यात नक्षीदार पट्टे असलेल्या कलात्मक नंदीला नमस्कार करून गेल्यावर दिसणारे हे दृश्य. हे दृश्य आहे ‘महागणपती’ तिर्थक्षेत्र म्हणून नावारुपाला येत असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील शीव मंदिराचे.


मंदिराच्या शेजारील तलाव
   सुंदर अशा तलावाशेजारील या परिसरात पेशवेकालीन महागणपती मंदिर, मारूती मंदिर, पुरातन शीव मंदिर, भैरवनाथाचे मंदिर आणि जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्मारक असे बरेच काही आहे. त्याचबरोबर गावाबाहेरच्या डोंगरावरील अलिकडच्या काळात निर्माण झालेले ‘इंद्रायणी’ देवस्थानही प्रसिद्ध आहे. संकष्ट चतुर्थी आणि सुट्टयांच्या दिवशी या गावाचे रुपांतर पर्यटनस्थळात  होते.

चिरनेर म्हणजे महागणपती...
चिरनेर म्हणजे जंगल सत्याग्रह...
चिरनेर म्हणजे इंद्रायणी देवस्थान...

     पण चिरनेर म्हणजे केवळ इतकेच नाही, आणखी काहीतरी या परिसरात आहे, जे या परिसराच्या इतिहासाला शेकडो वर्षे मागे नेऊ शकते.
अशी आणखी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे चिरनेरची नोंद इतिहासात नव्याने घेतली जावी?
पुरातन शीव मंदिर
      ज्या शीव मंदिराचा आपण सुरूवातीला उल्लेख केलाय, त्यापासूनच सुरूवात करू. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना प्राचिन दगडी भिंतींना बाहेरून आधुनिक टाईल्स बसवल्या गेल्या.
मंदिराचा समोरील भाग
(आपल्याकडे पुरातन वास्तूंचा जीर्णोद्धार करताना बऱ्याचवेळेस मूळ वास्तूच्या सौंदर्याचा फारसा विचार होत नाही)  एक सभामंडपही बांधला गेला.दगडी मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली. सुदैवाने मंदिराचा आतील भाग जुन्या काळातील कला-कौशल्य मिरवत उभा आहे. काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास या मंदिराचे वेगळेपण लक्षात येते. मंदिरात आकर्षक शीवलिंगासह एक चतुर्भूज सहमूर्ती आहे(बहुधा विष्णू लक्ष्मी). 
चतुर्भूज मूर्ती
   तसेच बाहेरच्या भागातही दोन कोरीव शिवलिंग आहेत. मजबूत दगडी बांधकाम असलेले हे मूळ मंदिर कमीत कमी आठशे वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज आहे. या मंदिराबाहेरही एक झीज झालेला नंदी अर्धा जमिनीत गाडला गेलेला आहे.
गाडला गेलेला नंदी
तळ्याच्या पूर्वेला एका झाडाखाली एक वीरगळ स्तंभ देखिल आहे.
विरगळ स्तंभ

    पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिराच्या तळ्याकडील दिशेला एक आणि भैरवनाथाच्या(बहिरीदेवाच्या) मंदिरात एक पूर्ण आणि एक भग्न अशा एकूण तीन शिळा आहेत. इष्टिकाचिती आकाराच्या या शिळांच्या एकाच बाजूने कोरीव काम केले आहे. वरील बाजूस चंद्र-सूर्य, मधल्या भागात लेखन आणि तळाच्या बाजूला ‘गाढव आणि स्त्रीचा संकर’(!) अशी रचना आहे. सुमारे आठशे वर्षांपासून या शिळा येथे उभ्या आहेत.

गद्धेगाळ-शिलालेख

 अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या शिळा आहेत तरी काय?

   या वरकरणी असभ्य वाटणाऱ्या शिळांचे प्रयोजन काय?

चिरनेरच्या इतिहासात मोलाची भर घालू शकणाऱ्या या शिळा आहेत  ‘गद्धेगाळ’ किंवा ‘गधेगाळ’.
मंदिरातील गद्धेगाळ
    आता थोडंसं गद्धेगाळ संकल्पनेबद्दल जाणून घेऊया.
अपरान्त म्हणजेच उत्तर कोकणात राज्य करणाऱ्या शिलाहार राजांच्या काळात गद्धेगाळ कोरायला सुरुवात झाली असे मानले जाते. पुढे त्यांचे राज्य संपुष्टात आणणाऱ्या यादवकाळात सुध्दा ही पद्धत अस्तित्वात होती. रायगड जिल्ह्यातील अक्षी(अलिबाग) येथे सापडलेला गद्धेगाळ-शिलालेख, चाणजे-रानवड(उरण) येथील तीन गद्धेगाळ-शिलालेख शिलाहारकालीनच आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला गद्धेगाळींना शिलाहारकालीनच समजले जाते. परंतु जोपर्यंत त्याच्यावर असलेल्या शिलालेखाचे वाचन होत नाही, तोपर्यंत आपण त्यांचा काळ नेमकेपणाने ठरवू शकत नाही.
   गद्धेगाळींची रचना पाहिल्यास त्यांच्या वरच्या भागात चंद्र व सूर्य कोरलेले असतात.(हाच प्रकार वीरगळींच्या बाबतीतही आढळतो.) ‘आचंद्रदिवाकरौ’ म्हणजेच ‘जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत’ हे दान अबाधित राहील असा चंद्रसूर्य कोरण्यामागे हेतू असतो. चंद्रसूर्य यांच्यामध्ये मांगल्याचे प्रतिक म्हणून कलश कोरलेला असतो. मधल्या भागात शिलालेख आणि सर्वात खालच्या भागात गाढव व स्त्री यांचे संकर शिल्प अशी गद्धेगाळींची सर्वसाधारणपणे रचना असते. गाढव व स्त्री यांचे संकर शिल्प ही गद्धेगाळ ओळखायची खूण. कधी-कधी हत्ती आणि स्त्रीचा संकरही दाखवला जातो, अशा शिळांना हत्तीगाळ म्हणतात. सामान्यत: गद्धेगाळींवर असलेल्या लेखाच्या सुरुवातीला सन (शक), नंतर कोणत्या राजाने दान दिले त्याचे नाव, त्याच्या बिरुदावली व त्याची वंशावळ, दरबारातील अधिकारी, कोणाला काय दान दिले आणि सर्वात शेवटी शापवाणी अशी गद्धेगाळ असलेल्या मांडणी असते.गद्धेगाळी ह्या एकप्रकारे दानपत्रच असतात, फक्त हे दानपत्र दगडावर कोरलेले असते आणि त्याच्यावर शापवाणी असते. ही शापवाणी दिलेले दान हस्ते परहस्ते किंवा जबरदस्तीने घेऊ नये म्हणून कोरलेली असते.
      चिरनेर येथील गद्धेगाळसुद्धा शिलाहारकालीन असण्याची शक्यता आहे.(अजूनतरी शक्यताच!)  उरण तालुक्यातील चाणजे आणि रानवड परिसरात सापडलेले तीन शिलालेख सुद्धा गद्धेगाळच होते. संस्कृत-मराठी अशा मिश्र भाषांतील हे गद्धेगाळ शिलाहारकालीन आहेत. सध्या ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात असून त्यांचे वाचन झाले आहे. उरणच्या या शिलालेखांची नोंद कुलाबा गॅझेटिअर मध्ये आहे, परंतु चिरनेरच्या शिलालेखांची नोंद करण्याचा प्रयत्न मात्र झालेला नाही.
अस्पष्ट शिलालेख (दानपत्र)
 शीव मंदिराच्या बाहेर असलेल्या गद्धेगाळीवर शिलालेख असल्याचे दिसून येते परंतु ही शिळा शेंदूर विलेपित असल्याने तसेच दगडाची झीज झाल्याने त्याचे वाचन करणे कठीण आहे.
भग्न गद्धेगाळ
भैरवनाथ मंदिरामधील एका गद्धेगाळीचा केवळ तळाचा भाग शिल्लक आहे, त्यामुळे त्याचा संदर्भ मिळणे जवळपास अशक्य आहे. तर दुसऱ्या गद्धेगाळीवरील शिलालेखही दिसून येत नाही. शेंदूर विलेपनामुळे हे शिलालेख वाचता येत नसले तरी या शेंदूरामुळेच आज या शिळा व्यवस्थितपणे उभ्या आहेत. अन्यथा काही ठिकाणी या दानपत्रांची नासधूसही केली गेल्याची उदाहरणे आहेत. अक्षी-अलिबाग येथील शिलालेख तर गटारातून बाहेर काढला गेलाय. कर्नाटकातील गद्धेगाळ जमिनीत पुरले गेले, नष्ट केले. या दैवतीकरणामुळे गद्धेगाळींचा इतिहास झाकला गेला असला तरी त्या सुरक्षित राहून त्यांचा इतिहास काही प्रमाणात राखण्यासही मदत झाली आहे. चिरनेरच्या शिलालेखांचे वाचन झाल्यास काही ऐतिहासिक माहिती नव्याने समोर येण्याची शक्यता आहे. बंदी, प्रतिबंध आणि शुल्क या चक्रात अडकलेल्या पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक ठेव्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिक वर्तमानपत्रे आणि त्यांच्या पत्रकारांनीही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून या शिलालेखांना प्रकाशात आणण्याचे काम केले तर एक महत्त्वपूर्ण ठेवा जगासमोर आणण्यास मदत होईल. त्याचबरोबर आमच्यासारख्या सामान्यांनीसुद्धा अशा बाबींकडे डोळसपणे पहायला हरकत नसावी.
तूर्तास थांबतो...
    या गावातील नागरिक इतिहासाचे जतन करण्यात अग्रेसर आहेत. विविध सण, उत्सवांच्या माध्यमांतून ते आपली सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत. त्यामुळे समोर येत असलेल्या नविन ठेव्याचेही योग्य प्रकारे जतन करतील यात शंकाच नाही.
लवकरात लवकर या शिलालेखांचे वाचन होवो ही बुद्धीदेवता गणपती चरणी प्रार्थना!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: रायगड गॅझेटिअर (updated), शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख- वा.वि.मिराशी, महाराष्ट्रातील विरगळ- सदाशिव टेटविलकर, ब्लॉग-महाराष्ट्र देशा- पंकज समेळ

#चिरनेर #गद्धेगाळ #तुषारकी #chirner #gaddhegal #tusharki

5 comments:

Hemangi said...

छान लिहिलंय

Tushar Mhatre said...

धन्यवाद

Unknown said...

superb yaar...Puraatan kaalaatil mahiti jatan karun navin pidhila tyachi jaaniv karun mahatvv sangnaara lekh...aavdla

Tushar Mhatre said...

आभारी आहे, वाचत रहा!

Unknown said...

स्थानिक इतिहासाविषयी चांगली माहिती लिहिली आहे.

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...