Search This Blog

Friday, October 19, 2018

शिलाखंडांचे ताम्रपट

शिलाखंडांचे ताम्रपट!

दोन दशकांपूर्वीची गोष्ट. लक्षवेधी मुंबईला जवळ असूनही काहीसे दुर्लक्षित असणाऱ्या पिरकोन गावाकडे काही संशोधकांची नजर वळली. आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या गावात इतिहास संशोधक कोण्या ‘ब्राम्हण’ कुटूंबियांची चौकशी करत होते. हा शोध पाहून सुरूवातीस सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांचा शोध ‘जोशी’ आडनावाच्या एका कुटूंबाकडे येऊन थांबला, परंतु गावातील जोशीसुद्धा आगरीच असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आपला मोर्चा लगतच्या आवरे गावाकडे वळवला. तिथेही तीच गत झाली. मुख्यत: आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या या दोन्ही गावांत ‘ब्राम्हण’ कुटूंबीय शोधण्याची धडपड हे इतिहास संशोधक का करत आहेत असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या संशोधकांद्वारे हा सर्व शोध घेण्याचे कारण होते-  ठाणे येथील उत्खननात सापडलेला एक ताम्रपट!

हा ताम्रपट स्वच्छ झाल्याबरोबर यातील उल्लेखाने पिरकोन आणि आवरे ही दोन गावे ऐतिहासिक दृष्ट्या चमकू लागली. अनेक नविन संदर्भांचा उलगडा करणारा हा ताम्रपट संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
संशोधकांसाठी महत्त्वाचा दुवा असणारा ‘ताम्रपट’ म्हणजे काय आणि असतो तरी कसा?

    ताम्रपटालाच ताम्रशासन असेही म्हटले जाते. प्राचीन काळात नोंदींसाठी शिलालेखांचा वापर होत असे. या शिळांवर लेखन करणे हे कौशल्याचे आणि कष्टप्रद होते. शिळांवरील लेखनाकरता ब्राह्मी लिपी तुलनेने सोपी होती. (कार्ले लेण्यांतील शिलालेख ब्राम्ही लिपीतच आहेत.)पण कालांतराने देवनागरीसारख्या इतर वळणदार लिप्यांचा वापर वाढल्याने  अक्षरे कोरणे कठीण झाले. तसेच या लेखांचे भले मोठ्ठे दगड अचल असल्याने त्यांची हलवाहलव करणे आणखिनच कठीण. त्यामुळे राज्यकर्त्यांनी आपली दानपत्रे धातूच्या पत्र्यांवर कोरण्यास सुरूवात केली. हे धातूचे पत्रे तांबे, चांदी किंवा सोन्याचेही असायचे. दगडापेक्षा धातूच्या पत्र्यावर लिहिणे तुलनेने सोपे झाले. तसेच ते टिकाऊ, वजनाने हलके असल्याने इकडून तिकडे सहज नेता येऊ लागले. ताम्रपटात सामान्यत: एकात एक ओवलेले तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची पहिली बाजू व शेवटच्या पत्र्याची मागची बाजू कोरीच असते. ही कोरी बाजू म्हणजे सोप्या भाषेत कव्हर पेज. पहिल्या पत्राची मागची बाजू, दुसर्‍या पत्र्याच्या दोन्ही बाजू व तिसर्‍या पत्र्याची पहिली बाजू यावर लेख लिहिले जात. म्हणजे एकूण चार पृष्ठे लेखन असायचे. तिन्ही पत्र्याच्या कडा उंच व मधला भाग खोलगट असल्यामुळे अक्षरांचे घर्षण टाळून ती सुरक्षित राहत. तीनही पत्र्यांच्या कडेला छिद्र पाडून त्यात धातूची तार ओवली जाई व तिची टोके एकत्र करून त्यावर राजमुद्रा अंकित करून  दानपत्र दिले जाई. थोडक्यात ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले कायदेशीर दस्तऐवज.

     पिरकोन-आवरेचा ताम्रपटही अशाच स्वरूपाचा असून जवळपास सात किलो वजनाचा आहे. एकशे एक ओव्यांमध्ये या दानपत्रातील मजकूर दिला आहे. अपरान्त म्हणजेच उत्तर कोकणच्या शिलाहार राजांनी वेदअध्ययन करणाऱ्या पंधरा ब्राम्हण व्यक्तींना या ताम्रपटाद्वारे दान केले आहे. इतिहास संशोधकांद्वारे गावात ब्राम्हण कुटूंबियांचा शोध घेण्याचे कारणही हेच होते. या ताम्रपटाने पिरकोन परिसरातील शिलाहार राजवटीला अधोरेखित तर केलेच, पण त्याचबरोबर फारशी नोंद नसलेला अल्पायुषी ‘महाकुमार केशिदेव’लाही  इतिहासात अमरत्व दिले. महाकुमार म्हणजे राजकुमार. शिलाहार राजा अपरादित्यचा हा ज्येष्ठ पुत्र आणि विक्रमादित्याचा भाऊ. गत शक संवतातील आश्विन अमावस्येला आलेल्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने परुकुने (पिरकोन) आणि अऊरे (आवरे) या गावांचे उत्पन्न पंधरा ब्राम्हणांना समप्रमाणात वाटून देण्यात आले. सध्याच्या कालगणनेनुसार ही तारीख होती 24 ऑक्टोबर 1120. दोन हजार वीस साली या ताम्रपटास नऊशे वर्षे पूर्ण होत आहेत. पिरकोन-आवरेचा इतिहास कमित कमी नऊशे वर्षांचा आहे, हेच यातून सिद्ध होते. इतकेच नव्हे तर प्राचिन काळाच्या खुणा जागोजागी या परिसरात दिसून येतात. केशिदेवाने आधी शिवाचे पुजन करून फुले वाहीली, सूर्यदेवास नमस्कार करून ‘राम’क्षेत्रातील ‘शिल’तिर्थाच्या खाऱ्या पाण्याद्वारे हा दानसंकल्प पूर्ण केला असे वर्णन या पटात आहे. नऊशे वर्षापूर्वीची ही स्थळे अजूनही त्याच नावाने ओळखली जात आहेत. पिरकोन गावाच्या समुद्राकडील दिशेला ‘शिल’ नावाने ओळखला जाणारा खाऱ्या पाण्याचा जलाशय असून त्याला जोडूनच ‘राम’ आगर नावाचे एक क्षेत्र आहे. म्हणजे केशिदेवाने ज्या शिलांतील पाण्याने संकल्प पूर्ण केला, तो परिसर पवित्र मानला जाऊन धार्मिक कार्यासाठी वापरला जात असल्याची शक्यता आहे. या दानपत्रात गावांचे उत्पन्न वाटून दिले असले तरी आश्चर्याची बाब म्हणजे यातून गावांच्या हद्दीतील मिठागरातून मिळणारा कर वगळण्यात आला आहे. तसेच या दोन गावांच्या सीमाही स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. महसूली हद्द निश्चित करताना पिरकोन गावाच्या दक्षिणेस आणि आवरे गावाच्या उत्तरेस ‘डोंगरी पुंजी पाणीलोटा’ असा उल्लेख आहे. हा भाग म्हणजे सध्याचा पाले, आवरेचा ‘खप’ आणि कोमनादेवी डोंगर नावाने ओळखला जाणारा परिसर असावा. तसेच आवरेच्या दक्षिणेस, पश्चिमेस आणि पिरकोनच्या पश्चिमेस ‘खारा नदी’ची हद्द मानली गेली आहे. हा अर्थातच खाडीचा भाग आहे. पिरकोनच्या पूर्वेस पुन्हा एकदा ‘डोंगरी पाणीलोटा’ सीमा आहे. थोडक्यात ‘डोंगरी पाणीलोटा’ म्हणजे डोंगरात उगम पावणारा ओढा असावा. पिरकोनच्या उत्तरेस ‘तलईका' असल्याचाही उल्लेख आहे. हा भाग म्हणजे कदाचित सध्याचा ‘तळबंदखार’ असावा. अनेक स्थित्यंतरानंतरही येथील नावांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
या दानाबाबतची ताम्रपटातील शहाऐंशीवी ओवी पहा-
“वहनार्थम स्व परीवारा पोषणार्थमा च प्रणोत्पाला विषय अमिताहपती अऊरेग्रामह तथा परूकुने ग्रामह गृह द्रम्म दुदमे”

   ही दोन्ही गावे ‘प्रणोत्पल’ नावाच्या प्रदेशात असल्याचाही उल्लेख आहे. या ताम्रपटाचा अन्वयार्थ लावणारो डॉ.शशिकांत धोपटे यांच्या मते हे प्रणोत्पल म्हणजे सध्याचे ‘पनवेल’ असावे. हे पटण्यासारखेही आहे. उत्तर कोकणातील या परिसरात सुरूवातीस राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून काम करणाऱ्या शांतताप्रिय आणि शिवभक्त शिलाहारांनी सुमारे साडे चारशे वर्षे राज्य केले. त्यांच्या राजवटीत उभारल्या गेलेल्या वास्तूंवरून त्या काळातील समृद्धता लक्षात येते. पुढे यादवांच्या आक्रमणात हे राज्य मुळापासून उखडले गेले. मुस्लिम राजवटीत त्यांच्या पाऊलखुणाही पुसल्या गेल्या. पुढे ब्रिटीशांच्या हाती सत्ता गेल्यानंतर येथील इतिहास दुर्लक्षिला गेला. पण अजूनही इथल्या मातीत महामंडलेश्वर शिलाहारांचा इतिहास जिवंत आहे. इथल्या वस्तूंमधून-वास्तूंमधून, कथांमधून-गीतांमधून, नावांमधून-गावांमधून तो जिवंत इतिहास आपल्याला सापडतो. आपल्या सभोवतालच्या या ऐतिहासिक पाऊलखुणांचे महत्त्व ओळखून त्याच्या जतनासाठी प्रयत्न करुया. इतिहासाचा शोध घेऊया आणि त्यातून वर्तमानकाळासाठी बोध घेऊया!
- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ : Studies in Indian Epigraphy (Vol-26)

विशेष आभार: छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय-मुंबई, डॉ.शशिकांत धोपटे, डॉ.रुपाली मोकाशी, पंकज समेळ, सोनाली बगाडे, 

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...