Search This Blog

Wednesday, March 28, 2018

स्टीव्ह-टीवचा खेळ

         2001 सालातल्या नोव्हेंबर महिनातला एक नाट्यमय प्रसंग. स्थळ होते दक्षिण आफ्रिकेतील ‘पोर्ट एलिझाबेथ’ मैदान. कसोटीच्या चौथ्या दिवशी सचिन गोलंदाजीला आला. त्याने चार-पाचच षटके टाकली असतील आणि टी.व्ही. कॅमेरा त्याच्या हातावर रोखला गेला. वेगवेगळ्या कोनांतून, झूम करून सचिनच्या हालचाली टिपल्या गेल्या. सामनाधिकारी माईक डेनिस यांनी तातडीने सामन्याचे रेकॉर्डींग तपासणीसाठी मागवले. 
      काहीतरी वाईट घडतंय हे सर्वांना कळत होते. संध्याकाळी माईक डेनिस यांनी कर्णधार गांगुलीसह सर्व खेळाडूंची मिटींग घेऊन सचिन तेंडुलकरने चेंडू कुरतडल्याचे सांगून त्याला एक वर्षाच्या सामनाबंदीची शिक्षा होऊ शकते असे जाहीर केले. यानंतर सचिनला बाजू मांडण्याची संधी मिळाली. चर्चेअंती एक सामन्याची बंदी आणि 75% मानधनात कपात अशी शिक्षा सुनावण्यात आली.
       दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचे मथळे नेहमीप्रमाणे सचिननेच भरलेले होते, पण यावेळेस त्याच्या महानतेवर, नैतिकतेवर शंका घेणारे. बऱ्याचशा उथळ माध्यमांनी त्याला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. हे ‘महाभारत’ घडत असताना सचिनचा एकेकाळच्या साथिदार पण समालोचक झाल्याने ‘दूरदृष्टी’ लाभलेल्या माजी खेळाडूने टीका करण्याची संधी दवडली नाही. भारतीय क्रिकेट बोर्ड मात्र सचिनच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. प्रकरण आय.सी.सी. कडे गेले. भारतीय क्रिकेट बोर्डाने  पाठींबा देताच, खेळ भावनेचा नेहमीच फुटबॉल करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह वॉ म्हणाला,
कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही! सचिनवर कारवाई व्हायला हवी.”
   यानंतरही विविध माध्यमांतून स्टीव्हची टीव-टीव चालूच राहीली.

 प्रत्यक्षात काय घडलं होतं मैदानावर?
           सचिन गोलंदाजी करत असताना मैदान ओलसर होते. चेंडू वारंवार ओला व्हायचा. हा ओला चेंडू सचिन आपल्या रुमालाने पुसायचा. ओल्या मैदानातील चिखल चेंडूच्या शिवणीच्या जागेत लागले होते. गोलंदाज चेंडू फेकण्यापूर्वी तो आपल्या हातात व्यवस्थित धरण्याचा प्रयत्न करतो. चिखल आणि ओलसरपणामुळे चेंडूची पकड योग्य रितीने करता यावी म्हणून सचिनने सर्वांसमक्ष चेंडूच्या शिवणीवर बोट फिरवून ‘चिखल’ बाहेर काढले, त्यात अडकलेल्या दोन गवताच्या काड्या बाहेर टाकल्या आणि आपल्या रुमालाने चेंडू पुसला.
     ज्यांना क्रिकेटमधलं काहीही कळत नाही, थोडंफार कळतं, सर्वकाही कळतं अशा सर्वांनीच पुढे तो प्रसंग स्पष्टपणे पाहीला. यात कुठेही चेंडूचा आकार बदलणे, कुरतडणे किंवा छेडछाड करणे असे काहीही नव्हते. आय.सी.सी. लवादानेही हे मान्य केले. अखेर मैदानावरील पंचांच्या  परवानगीशिवाय ‘चिखल’ काढण्याच्या गुन्ह्याबद्दल(?) सचिनला सामन्याच्या पन्नास टक्के मानधन कपातीची शिक्षा झाली. चेंडू कुरडण्याच्या आरोपातून क्लीन चीट मिळाल्याने सचिनच्या खिलाडूवृत्तीवर ‘चिखल’ उडवणाऱ्यांच्या हाती यावेळेसही चिखल’च लागले.
      हे सर्व आता आठवण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील चेंडू कुरतडण्याची घटना.

बॅनक्राफ्टने अंमलात आणलेली संघाची अनैतिक रणनिती कॅमेऱ्यांसमोर उघडी पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जुनाच अखिलाडू चेहरा नव्याने समोर आला.  या प्रकरणात कर्णधार स्टीव स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या कारवाईत आजीवन बंदीच्या शिक्षेचाही विचार सुरू आहे. एका क्षुल्लक प्रसंगावरून सचिनवर कारवाईची मागणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व स्लेजिंगचा एक सेनापती स्टीव्ह वॉ याने मात्र दोषींना शिक्षा देताना या संपूर्ण प्रकरणाचा “समतोल’ विचार करण्याची मागणी केली आहे. “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणामुळे आपण कमालीचे दुखावलो असल्याची पुस्ती जोडतानाच दोषी खेळाडूंकडे सूडबुद्धीने नव्हे, तर समतोल विचारबुद्धीने पाहण्याची गरज असल्याचे स्टीव्ह वॉने म्हटले आहे. आता कोणीतरी स्टीव्ह वॉला त्याच्याच मागील वाक्याची आठवण करून देणे गरजेचे आहे-
“कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही!”

      केवळ जिंकणे याच इर्षेने खेळणाऱ्या आणि त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणाऱ्या कांगारूंसाठी सध्याचा काळ कठीण जाईल हे नक्की. पण यापेक्षाही मोठ्या घटनांमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मोठी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे स्टीव्ह म्हणतो त्याप्रमाणे या प्रकरणाचा ‘समतोल(!)’ विचार होऊन महत्त्वाच्या खेळाडूंना अभय मिळेल असेच वाटते.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

सचिन_तेंडुलकर
#स्टीव्ह_वॉ
#तुषारकी
#Sachin_Tendulkar
#Steve_waugh
#Balltampering
#Tusharki

Sunday, March 11, 2018

गजांतलक्ष्मी आणि मंदिराचा शोध


      काही गोष्टी नित्यनेमाने आपण पहात असतो, परंतु त्यांचे महत्त्व लक्षात न आल्याने दुर्लक्ष करतो. बऱ्याचशा ऐतिहासिक, पुरातन वस्तू आणि वास्तूंचेही असेच होते. उरण तालुक्यातील ‘पिरकोन’ या गावातही असेच काहीसे घडत आले आहे. ‘वीरगळीं’मुळे थोड्याफार प्रकाशात आलेल्या ऐतिहासिक ठेव्याकडे लोकांचे लक्ष गेले. शिवमंदिर परिसरात असलेल्या वीरगळींचा शोध घेत असताना मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका टेपावरील (शेतजमिनीला लागून असलेला उंच सपाट भाग) दोन कोरीव शिल्पांचाही विचार केला गेला. पण त्यांची रचना वेगळी असल्याकारणाने त्या वीरगळी आहेत किंवा नाहीत हे ठरवता आले नव्हते. या शिल्पांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू होता. एकसमान रचना असणारी ही दोन्ही शिल्पे ‘वीरगळ’ नसल्याचे निश्चित झाल्यानंतर नव्याने त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.
मांडी दुमडून ध्यानस्थ असलेली आकृती आणि दोन्ही बाजूंनी दोन आकर्षक कोरीव हत्ती अशा स्वरूपातील हे शिल्प आहे.
 या शिल्पापैंकी एका शिल्पातील आकृती ‘चतुर्भूज’ असल्याचे वाटत होते परंतु शिल्पाची झीज झाल्याने नेमका अंदाज बांधणे कठीण होते. या मूर्तीविषयी अभ्यास चालू असतानाच, एके दिवशी ‘जागर इतिहासाचा’ या फेसबुक पानावर एका सदस्याने अशाच स्वरूपाच्या भोर, पुणे येथील शेंदूर विलेपित शिल्पाचा फोटो पोस्ट केला. पिरकोन येथील शिल्पांप्रमाणेच पुणे येथे एक शिल्प असल्याचे पाहून उत्सुकता वाढली. याच फेसबुक पानावर शिल्पविषयक चर्चा झाल्यानंतर सदरची शिल्पे ‘गजलक्ष्मी’ म्हणजेच ‘गजांतलक्ष्मी’ची असल्याचे निश्चित झाले. गजांतलक्ष्मी शिल्पे जुन्नर तालुक्यात सर्वत्र आढळतात.
निमगिरी किल्ल-शिल्प
 पूर्वेला बोरी शिरोली, पश्चिमेला नाणेघाट, उत्तरेला निमगिरी तर दक्षिणेला घंगाळधरे या ठिकाणी अशी एकूण सहा शिल्पे आढळतात. हा लेख लिहत असताना चिरनेर जवळील रानसई (त.उरण) येथेही असेच शिल्प आढळले.
रानसई वाडी-शिल्प
दुर्मिळ स्वरूपाची अशी दोन शिल्पे  ‘पिरकोन’ गावात आढळणे ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे.

   काय आहे हे ‘गजांतलक्ष्मी’ शिल्प?

“या शिल्पात चतुर्भुज लक्ष्मी पद्मासनात विराजमान असून दोन्ही बाजूंनी दोन गज म्हणजे हत्ती जलकुंभातून वर्षाव करत असल्याचे दिसते.”
   
     गजांतलक्ष्मीचे शिल्पे पुरातन मंदिरे तसेच किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांवर कोरलेली अथवा ठेवलेली असतात. जसे काही मंदिरांबाहेर ‘गणेशपट्टी;’ किंवा गणेशमूर्ती असते तसाच काहीसा हा प्रकार.
      गजांतलक्ष्मी हे द्वारशिल्प असल्याने त्याचा पूजनासाठी वापर होत नसावा असे वाटते. धन-धान्य आणि समृद्धीदर्शक शुभचिन्ह म्हणून गजांतलक्ष्मीचे शिल्प ठेवले जाते.

काही अभ्यासकांच्या मते जेथे धनसंपत्तीचा ढिग(!) असेल अशाच ठिकाणी या शिल्पांचा वापर त्यावेळी प्रवेशाद्वाराला केला जात असे.

या शिल्पाचा आणखी एक अर्थ मांडला जातो तो असा की-
 “लक्ष्मी ही पृथ्वीचे प्रतिक असून तिला मेघरूपी हत्ती जलवर्षाव करत आहेत, ज्यामुळे पृथ्वीवर अन्नधान्यसंपत्ती निर्माण करता येऊ शकेल.”

    आता थोडा पुराणांकडे वळूया.
    गजांतलक्ष्मी ही पौराणिक शक्तीदेवता देवता मानली जाते. वेदकाळानंतर पुराणांच्या रचनांचा काळ सुरू झाला. यज्ञ यागाबरोबर देवतांची मंदिरे निर्माण होऊ लागली. मंदिरांमधून मूर्तीपूजा होऊ लागल्या, त्यांची  पुराणे निर्माण झाली. अशा विविध पुराणांतून काही शक्तीदेवतांचा उल्लेख येतो. या शक्तीदेवता पुढीलप्रमाणे-
1. श्रीदेवी, 2. अंबिका, 3. अभ्यंबा, 4. अलक्ष्मी, 5. आनंदनायकी, 6. उनाई, 7. उमा, 8. काळरात्री, 9.कुंडिका, 10.कुलकुल्या, 11.कौशिकी, 12.कंकाळी 13.गजांतलक्ष्मी, 14.गौरी, 15.चंद्रवदनी, 16.चंद्रघन्टा, 17.कुष्माडिनी, 18.ब्रम्हाचारिणी, 19.महागौरी, 20.सिद्धीदात्री, 21.स्कंदमाता, 22.शैल्यपुत्री, 23.चक्रपदी, 24.जगदात्री, 25.दुर्गा, 26.निलसरस्वती, 27.पद्मावती, 28.प्रांत्यगीरा, 29.पार्वती, 30.चंपावती, 31.बगलामुखी, 32.बळातिबळा, 33.भुवनेश्वरी, 34.महिषासूरमर्दिनी, 35.महाकाली, 36.महासरस्वती, 37.माखानदेवी, 38.मुकांबिका, 39.योगेश्वरी, 40.रासईदेवी, 41.वृंदा, 42.विद्यादेवी, 43.वैष्णवी, 44.शताक्षी, 45.वत्स्तलादेवी, 46.शिवदूती, 47.सहस्रकाळमाया, 48.संज्ञा, 49.हुंकारेश्वरी
   गजांतलक्ष्मी यांतीलच एक. अर्थात हा झाला पौराणिक भाग, त्याचा अर्थ काहीही असो पण दोन आकर्षक शिल्पे आढळणे ही बाब  ‘पिरकोनच्या पुरातन संस्कृतीला’ अधोरेखित करणारी आहे. 

इतकी चांगली कलाकृती जेथे द्वारशिल्प म्हणून असेल तेथील मूळ मंदिर कसे असेल?
     सध्या जे शीवमंदिर प्रसिद्ध आहे त्या वास्तूची उभारणी 1989 ते 1993 या कालावधित झाली, म्हणजे जवळपास पंचविस वर्षापूर्वी. जीर्णोद्धारापूर्वीच्या मंदिराचा शोध घेण्यासाठी हे मंदिर पाहिलंय अथवा प्रत्यक्षात त्या वास्तूचा अनुभव घेतला आहे अशा व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली. या माहितीनुसार आधीच्या शिवमंदिराची स्थापना 1918 च्या दरम्यान म्हणजे सुमारे 100 वर्षापूर्वी दुकल्या धर्मा पाटील(नाखवा) यांनी केली. हे शिवमंदिर लाकडी खांबावर उभारलेलं कौलारू आणि अर्धवट दगडी भिंतींचे असल्याचे सांगण्यात येते. जुन्या मंदिराच्या जागेवर सध्याच्या मंदिराची उभारणी करताना मंदिरासमोरील भग्न शिवलिंग, दगडी नंदी आणि वीरगळी यांची फारशी हलवाहलव झाली नाही. त्या आहे त्याच जागेवर ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या ‘गजलक्ष्मीच्या शिल्पाबद्दल’ चर्चा केली, ते शिल्प या आधीच्या मंदिरासमोर नव्हते.

 आता संपूर्ण परिसराचा विचार केल्यास काही शिल्पविषयक निरीक्षणे मांडता येतील ती पुढीलप्रमाणे...

1. मंदिरासमोर वीरगळी आहेत, ज्यांचा कालावधी कमीतकमी 200 वर्षे ते 800 वर्षे  आधीचा आहे.
2. जुन्या मंदिराबाहेर पूर्वीपासूनच एक शिवलिंग होते, जे अजूनही आहे.
3. मंदिराच्या मागच्या बाजूस दोन ‘गजांतलक्ष्मी’ची शिल्पे आहेत.
4.उर्वरित परिसरात आणखी दोन भग्न  शिवलिंग आणि एक दगडी नंदी आहे.

5. मंदिर परिसरात जुन्या काळी वापरले जाणाऱ्या बांधकामाच्या इष्टिकाचिती शिळा आहेत.
6.सध्याच्या मंदिरातही द्वारपालांच्या दोन जुन्या लाकडी मूर्त्या आहेत.
7. मंदिराला लागून असेल्या शेतीच्या परिसराला ‘ देवशेत’ म्हणून ओळखले जाते.
8. सध्याचे मंदिर ज्या टेकडीच्या परिसरात आहे तिचे नाव ‘काशे डोंगरी’(काशी डोंगरी?) असून, गावातील जुनी मंडळी मंदिर परिसराचा उल्लेख ‘काशी’ तिर्थ म्हणून करतात.

वरील निरीक्षणांचा विचार करता, पुढील निष्कर्ष मांडू शकतो.

      “सध्याचे मंदिर व जुने ज्ञात मंदिर याआधीही पिरकोनच्या या परिसरात एक मंदिर होते. हे मंदिर शिवमंदिरच होते.  ते मंदिर आकर्षक कोरीव काम असलेले आणि भव्य रचना असलेले होते. या मंदिरासमोर गजांतलक्ष्मिची दोन द्वारशिल्पे होती. कमीत कमी दोनशे वर्षे आधी सर्वार्थाने समृद्ध असे शिवमंदिर पिरकोन परिसरात होते आणि त्याकाळी हा परिसर एखाद्या तिर्थक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध होता असे मानायला हरकत नसावी!”

      वरील विश्लेषण आणि निष्कर्ष मान्य केले तर एकच प्रश्न उरतो तो म्हणजे जर हे मंदिर भव्य आणि प्रसिद्ध होते तर ते कुठे गेले?
याचे उत्तर कदाचित काळच देऊ शकेल. पण आपल्यासाठी तरी
मंदिर कुठेही गेले नाही. मंदिराचे अवशेष दुर्लक्षित अवस्थेत आजूबाजूला विखुरलेले आढळतात. काही अवशेष मंदिर बांधताना त्याखाली गाडले गेले असल्याची शक्यता आहेच. काळाने थोडीे कूस बदलली की आणखी काही अज्ञात गोष्टी समोर येतील. तोपर्यंत आपली दृष्टी आणि दृष्टीकोन शोधक ठेवूया. इतिहासाचे आणि आपल्या समृद्ध परंपरेचे भान ठेवून या ‘पिरकोन गावातील अमूल्य ठेव्याकडे’ पाहूया...
   तूर्तास तुमच्या कुटूंबावर आणि गावावर ‘गजांतलक्ष्मीचा’ वरदहस्त राहो, म्हणजेच अन्नधान्य उत्पन्नात वाढ होवो हीच सदिच्छा!

-तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: जागर इतिहासाचा, www.jejuri.netnisargaramyajunnar.in, आम्ही पिरकोनकर-महाशिवरात्री माहिती, महाराष्ट्रातील वीरगळ

आभार: जागर इतिहासाचा(फेसबुक पान), श्रमदानी आणि सहकारी, पिरकोन शिक्षक संघ आणि पिरकोनमधील सहकारी

#गजांतलक्ष्मी #गजलक्ष्मी #पिरकोन #तुषारकी #Gajantlaxmi #Gajlaxmi #Pirkon #Tusharki

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...