Search This Blog

Tuesday, April 16, 2019

‘वेस्टर्न’ मार्गातील देशी संस्कृती!



           विरारच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये  “पुढील स्टेशन...अगला स्टेशन... नेक्स्ट स्टेशन...” असा तिहेरी पुकारा झाल्यानंतर एक नवखा प्रवासी “प्लॅटफॉर्म कौनसे बाजू में आयेगा?” म्हणून विचारणा करतो. “इस साईड में आयेगा लेकीन उस साईड में खडे रहना” एकदा डाव्या बाजूकडे हात दाखवून उजव्या बाजूकडे पहात अनुभवी प्रवासी उत्तर देतो. आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आणत नवखा प्रवासी ज्या बाजूला उतरायचे असते त्याच्या विरूद्ध दारात उभा राहतो. अखेर ‘अगला स्टेशन’ येते, गाडीचा वेग कमी होऊन थांबण्याआधीच आणि आतील उतारू उतरण्यापूर्वीच काही चढारू (उतरणारे : उतारू : : चढणारे : चढारू) धसमुसळेपणाने चढत राहतात. जागा अडवण्यासाठी धडपड करतात. त्यांची चढाई संपून आता गाडी सुटण्याच्या मार्गावर असते. हा नवा अनुभव शिकलेले नवखे प्रवासी आणि या अनुभवात शेकलेले जुने प्रवासी शांतपणे ‘पायदान आणि फलाटामधील अंतर’ मोजत उतरतात. ज्या बाजूला उतरायचे असते त्याच्या विरूद्ध दिशेला उभे राहण्याचा धडा शिकवणारे हे स्टेशन म्हणजे ‘नालासोपारा’.
असे वैशिष्ट्य असणारे बहुधा जगातील एकमेव स्टेशन. रेल्वे खात्याने स्थापलेल्या विविध विभागांपैकी पश्चिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट या मार्गावरील वैशिष्ट्यपूर्ण ‘वेस्टर्न संस्कृती’चा हा केवळ एक लहानसा ट्रेलर. या मार्गावर धावणाऱ्या लोकल प्रवासाचा अख्खा चित्रपट ट्रेलरपेक्षाही अधिक मसालेदार आणि मनोरंजक आहे.
             16 एप्रिल 1853 रोजी ‘मुंबई ते ठाणे’ दरम्यान धावलेल्या पहील्या रेल्वेला आता दीड शतकाहून अधिक काळ लोटलाय. या प्रदीर्घ काळखंडात खूप बदल झालेत. रेल्वेच्या लोकल मार्गांवरील प्रवास आता अधिकच धोकादायक झालाय. पश्चिम रेल्वेवरील या थरारक प्रवासाची सुरूवात विरार स्थानकातूनच होते. भल्या पहाटे तीन-साडेतीनच्या दरम्यान उर्वरीत जग साखरझोपेत असताना सर्व जागा भरलेली लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना होत असते. त्यानंतर तासाभराने सुरू होणाऱ्या घाईगर्दीच्या वेळेत (Peak Hours) प्रत्येक डब्बा आपली कमाल मर्यादा गाठतो.
 सरासरी पाच-दहा मिनीटांच्या अंतराने लोकल धावत  असतानाही आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी मुंबईत आलेल्या लोकांच्या गर्दीने सर्व स्थानके भरून जातात. पावसाळी गवतासारखी जागोजागी माणसे उगवत असतात. सकाळी चर्चगेट ते विरार आणि सायंकाळी विरार ते चर्चगेट या दिशेने प्रवास करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळतो.  परंतु या उलट प्रवासाचा मार्ग असेल तर सतत सावध असावे लागते, नाहीतर इच्छित स्टेशनवर उतरण्याची संधी न मिळता ‘जाना था जापान, पहुँच गये चीन’ अशी अवस्था होते. रेल्वेच्या वेळापत्रकावर ‘विरार-चर्चगेट’ असे लिहलेले असले तरी खऱ्या अर्थाने हा प्रवास ‘नालासोपारा-विरार-चर्चगेट’ असा असतो कारण मूळ स्थानकात पोहोचायच्या आधीच नालासोपाराच्या ‘रिटर्न’ प्रवाशांनी ती भरलेली असते. त्यांनी मोक्याच्या जागा बळकावल्यानंतर उरलेल्या जागांसाठी पुन्हा संघर्ष होतो. यातील काही जागा आपल्या मित्रांसाठी राखण्याची खटपट होते.  इथे प्रवास करणाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक प्रवासी नेहमीचेच. त्यातूनच असे उपाय योजले जातात. बसण्याच्या जागेसाठीची ही धडपड केवळ पहील्या दोन स्थानकांवरच होते. पुढील मार्गात येणाऱ्या वसई, नायगांव या स्थानकांवरील प्रवाशांना एकवेळ लोकसभेची सीट सहज मिळेल परंतु ट्रेनमध्ये सीट मिळणे अवघड आहे.

त्यामुळे इथले प्रवासी सर्वसुखाचा त्याग केलेल्या सन्याशांप्रमाणे ‘सीट मिळण्याची’ अपेक्षा बाळगत नाहीत. त्यांच्या दृष्टीने ट्रेनमध्ये चढण्याची संधी मिळणे हाच सुखाचा परमोच्च क्षण असतो. एखाद्या सुट्टीच्या दिवशी दोन-चार माणसे सहज चढू शकतील अशी स्थिती असेल, तर “पुरा ट्रेन खाली है" म्हणत ते अत्यानंदाने स्वार होतात. ‘यश मिळवणे सोपे परंतु, टिकवणे अवघड!’ या उक्तीची प्रचिती आतील गर्दीत जिवंत राहण्याची धडपड करताना वारंवार येते.  या डब्याचे आणि आतील माणसांचे घनफळ काढले तर माणसांचे घनफळ कदाचित जास्त निघेल इतके लोक आत सामावलेले असतात. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी एका विशिष्ट ‘वेस्टर्न संस्कृती’च्या स्विकारामुळेच ही वेस्टर्न लोकल कित्येक लोकांना सामावणारे ग्लोबल स्वरूप निर्माण करू शकलीय. या लोकलच्या जगात टिकायचे असेल तर रेल्वेची ही वेस्टर्न संस्कृती आत्मसात करायला हवी.
काय आहे रेल्वेची ‘वेस्टर्न संस्कृती’?

     आपल्या गरजेप्रमाणे सभोवतालच्या परिस्थितीत बदल न घडल्यास माणूस परिस्थितीप्रमाणे स्वत:लाच बदलून घेतो. आधुनिक भाषेत त्याला ‘अॅडजस्टमेंट’ म्हणतात. पश्चिम रेल्वेच्या गर्दीच्या मार्गाने नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांद्वारे पाळल्या जाणाऱ्या अॅडजस्टमेंटच्या अलिखित नियमांमुळे प्रवासात थोडाफार सुसह्यपणा येतो. परंतु हे नियम ‘अलिखित’ असल्याने ‘कॉमर्सच्या विद्यार्थ्याला सायन्सचा पेपर’ आल्यासारखी नवख्या प्रवाशाची अवस्था होते. या अनोख्या वेस्टर्न संस्कृतीच्या नियमाप्रमाणे प्रवासात कोणत्या वस्तू सोबत असाव्यात (खरंतर नसाव्यात!) याचे संकेत अाहेत. गर्दीच्या वेळेत स्वत:सोबत शक्यतो बॅग असू नये. बॅग आणणे अपरिहार्य असल्यास शक्य तितक्या लहान आकाराची बॅग आणावी. ऑफीस बॅग किंवा सॅक असल्यास इंग्रजीतील  एस् (S) आकाराचा हुक सोबत आणल्यास फायदा होतो. हा हुक इतरांसोबत शेअर करण्याची मानसिकता ठेवावी लागते. रॅकजवळ उभ्या असणाऱ्या प्रवाशाला न कंटाळता सहप्रवाशांच्या बॅगा ठेवणे आणि काढून देणे ही कामे (जबरदस्तीने) करावी लागतात. या वस्तूंच्या संकेतासह बसण्यासाठीचा महत्त्वाचा आणि भांडण होण्यास कारणीभूत ठरणारा नियम म्हणजे, उभ्या असलेल्या प्रवाशाचा सीटवरील अधिकाराचा नियम. या नियमानुसार चार-चार प्रवासी बसलेल्या सीटवरून कोणीही उठले तरी पहील्याने उभ्या असलेल्या प्रवाशाला प्रथम प्राधान्य मिळते. बसमध्ये जसे विंडोसीटवाला प्रवासी उतरल्यानंतर शेजारचा खिडकीकडे सरकतो, तसे इथे होत नाही. उभ्या प्रवाशाला ती मौल्यवान सीट मिळते. या नियमातील एक उपकलम म्हणजे ‘बोरीवली करार’.
बोरीवली करारानुसार विरार किंवा चर्चगेट स्थानकातून सुरूवातीपासून बसलेल्या प्रवाशांनी निम्म्या अंतरावरील बोरीवली स्थानक आल्यानंतर आपली सीट दुसऱ्यांना देणे बंधनकारक असते. अर्थातच नवखे प्रवासी सीटवर असल्यास वादाचा प्रसंग संभवतो. जसे बसण्याचे नियम आहेत, तसे उभे राहण्याचेही नियम आहेत. दरवाज्यासमोरील मधल्या जागेत ‘लाईन में’ रहावे लागते. या रांगांमधील प्रवाशांची तोंडे पुढील स्टेशनच्या दिशेला असतात. रांग तोडणाऱ्याला उग्र बोलणी खावी लागतात. दरवाज्याला इथल्या भाषेत ‘गेट’ म्हणतात. गेटवर उभे राहणाऱ्यांचे वेगळे प्रकार आहेत. ही माणसे ‘खतरो के खिलाडी’ असतात. शत्रूला घाबरवण्यासाठी काही प्राणी स्वत:चा आकार फुगवून मोठा करतात, तसे दरवाजात व्यवस्थितपणे उभे राहणारे हे प्रवासी स्टेशन येताच बाहेरच्या बाजूला जास्तच लटकून गर्दी फुगवल्यासारखी दाखवतात. या चलाखीमुळे डब्यात नव्याने येणाऱ्या प्रवाशांची संभाव्यता कमी होते. अर्थात कधीकधी या शेरांना सव्वाशेर भेटतोच.
गेटवरील प्रवाशांकडे असलेले अद्वितीय कौशल्य म्हणजे लटकणाऱ्या प्रवाशांना आत घेणारे ‘घुम जाना’ कौशल्य. शब्दश: मुंगी शिरायलाही जागा शिल्लक नसलेली ट्रेन वेगाने धावत असताना दरवाजातील प्रवासी लटकत असतात. त्यांचे एका मर्यादेबाहेर लटकणे धोक्याचे  ठरू शकते.  अपघात होऊ शकतो. अशा वेळी हो बाहेरचे प्रवाशी दरवाजातील एखाद्या प्रवाशाला ‘भाई घुम जाव’ असा विनंतीवजा आदेश देतात. या प्रकारात पूर्णपणे ताकद लावून स्वत:चे शरीर डब्याच्या झाकणासारखे आतल्या बाजूने फिरवले म्हणजेच घुमवले जाते. या एका घुमण्यातून संपूर्ण लाईन आतल्या बाजूस ढकलली जाऊन लटकंती करणारे प्रवासी दरवाजात सुरक्षित उभे राहतात. हे सगळ्यांनाच जमत नाही, पण प्रत्येक डब्यात अशी घुमता येणारे चार-दोन माणसे असतातच. या संस्कृतीतल्या प्रवाशांना काही अतिंद्रीय शक्ती लाभलेल्या आहेत. ‘उडत्या पक्षाची पिसे मोजणे’ असा एक वाक्प्रचार आहे, पण विरार लोकल मधील प्रवासी केवळ गाडीच्या वेगावरून ती गाडी बोरीवलीच्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर  जाईल ते अचूकतेने सांगतात. सिग्नल्सकडे पाहून प्लॅटफॉर्म बदललेला ओळखतात. कोणत्या डब्यात कोणत्या दिवशी गर्दी असेल-नसेल हेही सुद्धा सांगू शकतात.

        मुंबईत घर न परवडणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा हा मार्ग अन्न मिळवून देणारा मार्ग आहे. खरे तर या अंग पिळवटून काढणाऱ्या गर्दीतून प्रवास करत आपले ठिकाण गाठणाऱ्यांना कामावर येण्याबद्दलच पगार मिळायला हवा. चरख्यातील उसाचे आणि विरार लोकलमधील प्रवाशाचे आत्मवृत्त लिहायचे ठरले तर मुखपृष्ठ बदलेल पण मजकूर जवळपास सारखाच असेल. असा पिळून काढणारा, घुसमट करणारा, जीवघेणा प्रवास असूनही हे प्रवासी आपली लोकलवारी आनंदात साजरी करतात. या गर्दीत दर्दी लोकांद्वारे राजकारण, क्रिकेट, चित्रपट ते अगदी खाजगी विषयांवर तावातावाने चर्चा होत राहतात. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अलिकडच्या काळात बरेचसे प्रवासी फोनला चिकटून असले तरी त्यातही ल्युडो सारखे खेळ समूहाने खेळले जातात. संघर्षाच्या प्रसंगात संघशक्तीवर विश्वास ठेवणारी, उभ्या ठाकलेल्या समस्येवर उपाय शोधणारी, दु:खाच्या प्रसंगातही आनंद शोधणारी, कर्मवादाला प्राधान्य देणारी रेल्वेची ही ‘वेस्टर्न’ नावाची अस्सल देशी ‘संस्कृती’ आपल्याला आयुष्य जगायला शिकवते. ही ‘वेस्टर्न संस्कृती’ अनुभवायची असेल तर आपला नेहमीचा मार्ग सोडून ‘भाई’ जरा इकडे “घुम जाव!”

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(सदर लेख दै.कर्नाळा 16 एप्रिल 2019 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.)

Sunday, April 7, 2019

प्रवास जलगंगेचा

प्रवास जलगंगेचा

         सर जेम्स लेईंग्! इंग्लंडमधील डरहॅम परगण्याचे शेरीफपद भूषवलेला माणूस. रिव्हर वेअर कमीशनर्स आणि सुएझ कॅनाल कंपनी या लोकप्रिय संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. डेप्टफोर्ड हाऊस, संडरलँड येथील सर जेम्स लेईंग् अँड सन्स (लिमिटेड) या जहाज बांधणी करणाऱ्या कंपनीचे ते संस्थापक. ब्रिटीश सरकारद्वारे नाईटहूड पारितोषकाने सन्मानित असणाऱ्या या अवलियाचे सन 1901 मध्ये निधन झाले.
     दुसरे व्यक्तीमत्त्व वालचंद हिराचंद दोशी! आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार तसेच वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक. भारताच्या किनाऱ्यावरून चालणारी ब्रिटिश जहाजकंपन्यांच्या अखत्यारीतील जहाजवाहतूक भारतीयांच्या हाती येण्याच्या दृष्टीने वालचंदांनी सरकारशी सतत वाटाघाटी केल्या. 
अखेर दादाभाई नौरोजी यांच्या प्रेरणेतून आणि नरोत्तम मोरारजी यांच्या सहकार्याने वालचंदांनी ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ ही भारतीय जहाजकंपनी स्थापन केली. आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचे ते दोन वर्षे उपाध्यक्ष, 'ओरिएंटल' या भारतीय विमा कंपनीचे संचालक, 'बँक ऑफ बडोदा'चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सन 1953 साली त्यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. 
         औद्योगिक व सामाजिक क्षेत्रामध्ये नाव कमावणारी ही दोन भिन्न प्रकृतींची व्यक्तीमत्त्वे. या दोन व्यक्तीमत्त्वांचा आणि मुंबईच्या दक्षिणेकडील ‘पिरकोन’ या लहानशा गावाचा दुरान्वयेही काही संबंध असण्याची शक्यता वाटत नाही. पण “जग खूप लहान आहे” या उक्तीचा परिचय घडवून देणाऱ्या गोष्टी नेहमीच घडत असतात. इथेही असेच काहीसे घडलेय. यापूर्वी पिरकोनमधील काही वास्तूंनी ऐतिहासीकदृष्ट्या प्रसिद्धी मिळवली होती, आता येथील एका ‘वस्तू’ने शब्दश: ‘आपला आवाज’ सातासमुद्रापार पोहोचवलाय.
     आपल्या डोक्यात प्रश्नांचे नादतरंग उमटवणारी ही वस्तू आहे तरी काय?
तिचा या मोठ्या व्यक्तींच्या कार्याशी काय संबंध?

        पिरकोन ग्रामपंचायतीची पश्चिम हद्द जिथे संपते तिथे पाले गावची लोकवस्ती सुरू होते. या वेशीवरच पिरकोनचे ग्रामदैवत वाघेश्वराचे मंदिर आहे. जुनी परंपरा असणाऱ्या या मंदिराचा अलीकडेच जिर्णोद्धार झाला आहे. आसपासच्या इतर गावांतील भाविकही या देवस्थानाला भेट देत असतात. आपल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपल्या श्रद्धास्थानांना विविध स्वरूपातींल वस्तूंचे दान करण्याची प्रथा पुरातन काळापासून चालू आहे. काही दशकांपूर्वी या वाघेश्वर मंदिराला पिरकोन आणि शेजारच्या गोवठणे गावातील ट्रॉलरद्वारे मासेमारी करणाऱ्या एका समूहाकडून दान स्वरूपात एक भेटवस्तू देण्यात आली. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन या सर्व धर्मांमध्ये विशेष महत्त्व असणारी ही वस्तू म्हणजे घंटा. 
सर्वसाधारणपणे देवालयाच्या प्रवेशद्वारांवर, सभामंडपात किंवा गाभाऱ्यात एक किंवा अधिक घंटा टांगलेल्या असतात. देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्ताने देवालयात प्रवेश करताना प्रथम घंटानाद करून देवाला आपल्या आगमनाची सूचना करावयाची असते, असा एक संकेत आहे. वाघेश्वराच्या मंदिरातही अशा एकाहून अधिक घंटा एकत्र टांगलेल्या स्थितीत आहेत. या सर्व घंटांपैकी आकाराने सर्वात मोठी असणारी घंटा या ट्रॉलर-मच्छिमार समूहाकडून मिळाली असल्याची माहीती समजते. नित्यनेमाने मंदिरात जाणारे भक्त ही वस्तू पाहतात, त्याला स्पर्श करतात. दूर अंतरावर जाणारा त्याचा आवाज अनुभवतात. पण, यावरून सर्वसामान्य वाटणाऱ्या या घंटेला विशेष महत्त्व द्यावे असे कोणालाही वाटणार नाही. या घंटेचे निरीक्षण केल्यानंतर त्यावर ठळक इंग्रजीत (रोमन लिपीत) काहीतरी लिहिले असल्याचे दिसते. या घंटेच्या विशेषत्वाचा हा पहिला पुरावा. त्याचे वाचन केल्यास त्यावर ‘JALAGANGA’ (जलगंगा) असे स्पष्टपणे कोरलेले दिसते. पूर्वीच्या काळी मोठ्या जहाजांवर वेळ दर्शवण्यासाठी, धोक्याचा इशारा देण्यासाठी, तसेच तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी धातूच्या घंटेचा वापर होत असे. या घंटेवर त्या जहाजाचे नाव कोरण्याचीही पद्धत आहे. वाघेश्वर मंदिराला ही घंटा भेट स्वरूपात दान दे‌णाऱ्यांकडून मुंबईतून ‘एका मोठ्या जहाजावरील घंटा’ आणल्याचे सांगीतले होते. प्रत्यक्ष दानकर्त्यांकडून मिळालेली माहीती घंटेवरील ‘JALAGANGA’ हे  नाव एखाद्या मोठ्या जहाजाचे असल्याचे संकेत देते. अर्थातच हे नाव भारतीय  धाटणीचे. जहाजबांधणी, जलवाहतूक  क्षेत्रातील जाणकारांकडून अधिक माहीती घेतल्यानंतर जगभरातील अधिकृत नौकांची आंतरराष्ट्रीय मेरिटाईम संघटनेकडून व्यवस्थितपणे नोंद होत असल्याचे समोर आले. नौकांविषयीच्या या नोंदी तपासल्यानंतर वाघेश्वर मंदिरातील घंटेवर ज्या जहाजाचे नाव कोरले आहे, ही घंटा ज्या जहाजावरील असण्याची शक्यता सर्वाधिक होती त्या ‘जलगंगा’ नावाचा शोध लागला. जलगंगा नावाचे आणखी दुसरे जहाज असण्याची शक्यता नाहीसे करणारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या नावातील अक्षरे. सामान्यत: ‘जलगंगा’ या शब्दाचे स्पेलिंग सर्वत्र ‘JALGANGA’ असे पहायला मिळते, परंतु जहाजाच्या नावाचे स्पेलिंग जादा ’A’ असलेले JALAGANGA’ असे थोडे वेगळे आहे. या नावाचा उपयोगही नेमके जहाज ठरवण्यात झाला.

        इंग्लंडमधील संडरलँडच्या सर जेम्स लेईंग् अँड सन्स (लिमिटेड) या कंपनीने 1958च्या सुमारास ही बोट बांधून पूर्ण केली. जहाजबांधणी क्षेत्रात स्वस्त आधुनिक तंत्रज्ञानाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या सर जेम्स लेईंग यांच्या कंपनीद्वारे या जहाजाची लंडनच्या बंदरात प्रथम नोंद करण्यात आली. त्यावेळचे तिचे नाव होते सिल्व्हरलेक (SILVERLAKE). सन 1963 साली ब्रिटनची ही चंदेरी लेक भारताच्या सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन या वालचंद हिराचंद संस्थापित कंपनीने विकत घेतली. सिंदिया स्टीम नेव्हीगेशन कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी महात्मा गांधी, पं.मोतीलाल नेहरू उपस्थित होते यावरून या कंपनीचे महत्त्व लक्षात येईल. मूळ इंग्लंडच्या या कन्येचे सिंदीया कंपनीद्वारे ‘जलगंगा’ असे बारसे झाले. म्हणजे उपरोक्त घंटा जहाज भारतात आल्यानंतर बसवण्यात आली असावी. जवळपास साडेचारशे फूट लांबी आणि साठ फूट रुंद असणारे हे जहाज जनरल कार्गो व्हेसल या प्रकारातील होते. आंतरराष्ट्रीय मेरिटाईम संघटनेद्वारे IMO-5328354 या नोंदणीद्वारे भारताची ही जलगंगा समुद्रामध्ये धावू लागली. सतरा वर्षाच्या  सागरी प्रवासानंतर 1980 साली हे जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जे.एम. इंडस्ट्रीज द्वारे पुढील प्रक्रीया उरकण्यात आली. लंडनच्या किनाऱ्यावरून सुरू झालेला हा प्रवास मुंबईच्या किनारी थांबला. जहाजाच्या काही भागांचा पुनर्वापर झाला तर काही निरूपयोगी भाग समुद्रात विसावले. पण या विघटनाच्या प्रक्रीयेत या जहाजावरील एक वस्तू मुंबईतल्या बाजारातून पिरकोन गावी पोहोचली. ज्या आवाजाने कधी काळी जहाजावरील कर्मचाऱ्यांना इशारा मिळत असे, तो आवाज आता वाघेश्वराच्या मंदिरात घुमतोय. आपल्या अंगावरील नाव मिरवत समुद्राच्या विशाल प्रवाहात मार्गक्रमण करत ज्या घंटेने प्रवास केला ,तीच घंटा आता समुद्राइतक्या विशाल हृदयाच्या मानल्या जाणाऱ्या वाघेश्वर महाराजांच्या सेवेत दाखल झालीय. यापुढे जेव्हा तुम्ही या घंटेला स्पर्श कराल तेव्हा सामान्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी झटलेल्या सर जेम्स आणि वालचंद हिराचंद यांच्या आठवणींनाही स्पर्श करा. या लेखाच्या निमित्ताने औद्योगिक इतिहासात घंटेवरील नावासारखेच ठळकपणे कोरलेले या अवलियांचे नाव घंटेच्या आवाजाप्रमाणे वारंवार घुमावे हीच सदिच्छा.

      -तुषार  म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ : www.vesseltracking.net, www.shipspotting.com,हिंदू मंदिरातील पोर्तुगीज घंटा- महेश तेंडुलकर

(सदर लेख दै.कर्नाळा 7 एप्रिल 2019 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
https://epaper.ekarnala.com/epaper/edition/1070/dainik-karnala/page/4 )

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...