Search This Blog

Wednesday, April 8, 2020

मिशीवाले मारूती

मिशीवाले मारूती

‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'

       पुराणकाळांत वर्णन केलेले हे सात चिरंजीव. हनुमंत अर्थात मारूतीराया यांपैकीच एक. यातील उर्वरीत चिरंजीवांचे ठाऊक नाही, पण हनुमंत मात्र मूर्तीरुपाने तरी चिरंजीवच झाल्यासारखा आहे. कारण भारतातील कित्येक गावांत मंदिरांमध्ये, गावाच्या वेशीवर अथवा एखाद्या पिंपळाखाली शेंदुर फासलेला, रंगरंगोटी केलेला मारुती आढळतो.


दास्यभक्ती करणाऱ्यांसाठी आचार्य, मल्लांसाठी उपास्य देव, तंत्रमार्गातील दैवत आणि भूत-प्रेत-पिशाच्च बाधेपासून सोडविणारा  अशा अनेक रूपात मारुती प्रसिद्ध आहे. सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी हनुमंत उपासनेला चांगलाच उजाळा दिला, त्याचप्रमाणे उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदास यांनीही मारुती भक्तीचा भरपूर प्रचार केला. पुराणांच्या मते मारुतीच्या पित्याचे नाव केशरी व आईचे अंजनी आहे. अकराव्या रुद्राने मारुतीच्या रूपात अंजनीच्या पोटी अवतार घेतल्याचे मानले जाते. काहीवेळेस तो ‘पवनपुत्र’ म्हणूनही ओळखला जातो.
पुढे हा प्रबल पराक्रमी आणि महा बुद्धिमान मुलगा सुग्रीवाचा मंत्री या नात्याने रामाला मिळाला व रामाकडेच राहिला. दुसऱ्या एका समजुतीप्रमाणे हनुमान हा मूळ यक्ष परंपरेतला आहे.  कालांतराने तो शैव-वैष्णव या दोन्ही संप्रदायात दाखल झाला असे संशोधक मानतात. हनुमंताचे महावीर असे एक नाव आहे. त्यालाच अद्भुत असेही म्हटले जाते. वीर व अवधूत ही खरेतर यक्षवाचक नावे. यक्ष संस्कृतीची लक्षणे स्पष्ट करणारे अनेक गुणविशेष हनुमंताच्या ठिकाणी दिसून येतात. शैव परंपरेत तो अकरावा रुद्र, रुद्रावतार व रुद्रपुत्रही म्हणून समोर येतो. वैष्णव परंपरेच्या कृष्णाश्रयी शाखेत श्रीमध्वाचार्यांना हनुमंताचे अवतार मानतात. रामाश्रयी शाखेत तो रामाचा एकनिष्ठ सेवक आहे. शक्ती व भक्ती या दोन्ही गुणांच्या प्रतीक रूपाने तो रामायणात दिसतो. 
             हनुमंताचा उल्लेख रामायणात विपुल रूपाने येत असला तरी त्याची उपासना फार जुनी असल्याची ग्वाही मूर्तीशास्त्र देत नाही. ज्याप्रमाणे गुप्तकाळात रामाच्या स्वतंत्र प्रतिमा मिळत नाहीत त्याचप्रमाणे मारुतीच्या मूर्तींचाही अभावच दिसतो. साधारणपणे मारुतीची प्रतिमा आठव्या-नवव्या शतकापासून मिळू लागते. उत्तर भारतात कलचुरी आणि चंदेल राजवंशाच्या नाण्यांवर हनुमान दिसतो.
नमुना नाणे
तर दक्षिणेत यादव, कदंब आणि होयसाळ यांचे हनुमान हे राजचिन्ह होते. पांड्या राजवंशाच्या नाण्यांवरहू तो आढळतो. विशेष म्हणजे अर्काटचा नवाब मोहम्मद अली वलजा यानेही हनुमान चिन्हाचा वापर केला असल्याचे संदर्भ आहेत. 
         एका हातात गदा व दुसऱ्या हातात द्रोणागिरी घेऊन उड्डाण करणारा, तर कधी डाव्या हाती गदा व उजवा हात चापट मारण्यासाठी उगारलेला वीरमारूती पहायला मिळतो.
दास मारुती
रामासमोर हात जोडून उभा असलेला दास मारुती, पंचमुखी मारुती अशा विविध प्रकारच्या प्रतिमा पाहायला मिळतात. दक्षिणेत राम, लक्ष्मण, सीतेसह हनुमान असतो. आंध्रप्रदेशात ‘पंचलोह’ संकल्पनेत या चौघांच्या जोडीला बसवप्पा(नंदी) येतो. भक्ती आणि शक्ती या दोन्ही गुणांच्या प्रतिकरुपाने तो सर्वत्र येत राहतो. 
     ‘वानर युथ मुख्यं’ अशी ओळख असणाऱ्या मारूतीची वानर रूपी चेहरा ही खरी ओळख. परंतु महाराष्ट्रात काही ठिकाणी  वैशिष्ट्यपूर्ण  आणि नेहमीपेक्षा वेगळ्या मूर्ती  आढळतात.  रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरापासून जवळच असलेल्या पळस्पे येथील शिव मंदिरात एक वैशिष्ट्यपूर्ण मारुती पाहायला मिळतो.
हनुनान मूर्ती- पळस्पे, पनवेल
लांबलचक शेपूट, डावा हात कमरेवर,  तर उजवा हात वर उचललेला, कमरेला सुरा, पायखाली जंबुमाळी राक्षस ही सर्व सामान्य लक्षणे या मूर्तीमध्ये आहेत. डोक्यावर शिरस्त्राणाप्रमाणे अर्धगोलाकार मुकूट असून मारुतीचा चेहरा मनुष्याप्रमाणे आहे. इतकेच नव्हे या हनुमंताला चक्क कोरीव मिश्या आहेत. हे मंदिर अत्यंत जुने असून मंदिर परिसरात अनेक जुन्या समाधी पाहायला मिळतात.
कासारपेठ, सुधागड
जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील धोंडसे गावातून जाताना कासारपेठ येथे देखील एक मिशीवाला  मारुती आहे. झाडाखाली असलेली एका वेगळ्याच आवेशातील ही मूर्ती आहे.
सुरगड, रोहा
रोहा तालुक्यातील सुरगडावर देखील एक दुर्लक्षीत अवस्थेतील मारूतीची मूर्ती आहे. इथेही बजरंग बलीला मिशी आहेच.  यांसह पालघर जिल्ह्यातील वसई किल्ल्यात देखील हनुमंताची अशीच एक मिश्या असलेली प्रतिमा पाहायला मिळते. ही प्रतिमा अतिशय आकर्षक असून मारुतीच्या चेहऱ्यावरील हास्य खूपच वेगळे आहे.
वसई किल्ला
  डोक्यावरील मुकूट लांबट असून सैनिकांच्या शिरस्त्राणाप्रमाणे असल्याचे भासते. याच तालुक्यातील नालासोपारा पश्चिमेकडील चक्रेश्वर महादेव मंदिर  येथील मारूती मूर्तीलाही मिश्या आढळतात.
चक्रेश्वर महादेव मंदिर, सोपारा
सोपाऱ्यातील या हनुमानाच्या उजव्या हातात मात्र गदा दिसते.  तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी एका मंदिरात देखिल मिशीवाले मारूतीराय पहायला मिळतात.
तुंग किल्ला, पायथ्याजवळचे मंदिर
त्याचा एक हात कमरेवर असून त्यात सुंदर कमळ धारण केले आहे. वर्सोवा किल्ल्यातील हनुमंताची मिशी असलेली एका दिशेकडे तोंड वळवलेली मूर्ती पहायला मिळते.
वर्सोवा किल्ला, मुंबई
     नेहमीच्या पाहण्यातील गोष्ट जेव्हा थोड्या वेगळ्या स्वरूपांत आपल्या समोर येते तेव्हा त्यामागे असलेला अर्थ उलगडणे गरजेचे असते. वरकरणी सामान्य भासणाऱ्या अशा गूढ प्रतिमा संशोधकांना नेहमीच खुणावत असतात. या प्रतिमांचा अभ्यासकांनी शोध घ्यावा व यातून एक नवे रहस्य उलगडावे हीच अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...