Search This Blog

Wednesday, January 24, 2018

पिरकोनमधील वीरगळ (भाग-1)


नवी मुंबईलगतच्या उरण तालुक्यातील पिरकोन हे एक सामान्य गाव. पिरकोनच्या दक्षिणेला लोकवस्तीपासून दूर पण लोकांची ये-जा असलेले ‘शिव मंदिर’ आहे. काही दशकांपूर्वी जीर्णोद्धार केलेल्या या नेटक्या मंदिराचे ‘शंकर-विष्णू देवस्थान’ म्हणून नामकरणही झाले आहे.
शैव’ आणि ‘वैष्णव’ अशा दोन्ही परंपरांचे एकत्रिकरण या मंदिरात आहे.सिमेंटीकरणाच्या काळातही आपला नैसर्गिकपणा टिकवलेल्या शांत परिसरात हे मंदिर उभे आहे.
मंदिराच्या समोरील बाजूस झीज झालेल्या रुपातील दोन दगडी नंदी आहेत. या मंदिराच्या चौथऱ्याखाली उतरल्यावर दोन शिळा आधाराने ठेवलेल्या दिसतात.
तशीच एक भग्न शिळा समोरील बोडणीच्या(छोटा तलाव) कडेला ठेवल्याचे आढळते. गेली कित्येक वर्षे उन-पाऊस झेलत या शिळा मंदिराबाहेर पडून आहेत. नाही म्हणायला कधी कधी त्यांच्यावर एखादा शेंदूरतिलक अथवा चुना फासून या दुर्लक्षित शिळांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ते तेवढ्यापुरतेच.
पण या दुर्लक्षित शिळांकडे इतके लक्ष वेधण्याची गरजच काय?
काय वैशिष्ट्य आहे या दगडांचे?




चला महत्त्व जाणून घेऊया, पिरकोन मधील या ऐतिहासिक पाऊलखुणांचे...



       शिवमंदिरासमोर असणाऱ्या या शिळा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘वीरगळ’ आहेत.
महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात वेशीजवळ किंवा शंकराच्या देवळाजवळ गेल्यावर वीरगळ दिसून येतात. हे वीरगळ प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे बोलके पुरावे आहेत. वीरगळ म्हणजे काय ते आधी समजून घेऊ या. “एखाद्या शूरवीरास कोणत्या कारणास्तव वीरगती प्राप्त झाली आहे त्याचे चित्रण ज्या शिळेवर कोरले जाते तीला ‘वीरगळ’(Hero Stone) म्हणतात.” वीरगळांचा काळ दुसरे शतक ते अठरावे शतक असा गणला जातो. युद्धात कामी आलेल्या योद्ध्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा वीरगळ उभारल्या गेल्या आहेत. स्तंभरूपी वीरगळावर चौकटींमध्ये वीराच्या आयुष्यातील प्रसंग कोरलेले असतात. साधारणत: खालच्या चौकटीत मरून पडलेला वीर तर मधल्या खणात अप्सरा ह्या वीराला सन्मानाने घेऊन जाताना दिसतात. त्याच्या वरच्या कप्प्यात नंदी, शिवलिंग, पूजा विधी सांगणारा ब्राम्हण व शिवलिंगाची पूजा करणारा वीर, तर सर्वात वरच्या खणात कलश म्हणजे वीराचे कैलाश गमन दाखवलेले असते. कलशाच्या दोन्ही बाजूस चंद्र-सूर्य कोरलेले असून याचा अर्थ जो पर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत तो पर्यंत ह्या वीराची किर्ती कायम राहील हे यातून सांगायचे असते.
      शिवमंदिराच्या चौथऱ्यासमोर ज्या दोन वीरगळ ठेवलेल्या आहेत, त्यातील आकाराने मोठ्या वीरगळीकडे पाहूया.
विरगळ क्र. 1
यातील वीरगळीचा तळाचा भाग गाडला गेला आहे. त्यामुळे सर्वात खालच्या चौकटीतील मृत वीर स्पष्टपणे दिसत नाही. मधल्या खणात मात्र लढाईचा प्रसंग स्पष्टपणे दिसतो. दोन लढवय्ये एकमेकांशी झुंजत असून त्यातील एकाच्या हातात ढाल तलवार दिसत आहे. याचा अर्थ ज्या वीराच्या स्मरणार्थ हे स्मारक आहे, त्याचा मृत्यू जमिनीवरील युद्धात झाला आहे. त्याच्या वरच्या चौकटीतील कोरलेल्या प्रसंगाची झीज झाल्याने सुरूवातीस काहीच अंदाज बांधता येत नाही, परंतु इतर विरगळांशी तुलना केल्यावर या चौकटीतील शिवलिंग व त्याची पूजा करणारा वीर असल्याचे लक्षात येते.
      आकाराने मोठ्या वीरगळाच्या बाजूला त्रिकोणी माथा असलेला दुसरी लहान वीरगळ आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही  वीरगळ तीन चौकटींमध्ये बनलेली असल्याचे दिसून येते.
वीरगळ क्र.2 (सतीशिळा)
यातील तळाची चौकट गाडली गेल्याने मृत वीराचा भाग स्पष्ट दिसत नाही. मधल्या कप्प्यात घोडेस्वार लढताना दाखवला आहे. यातील घोड्यावर बसलेला वीर स्पष्टपणे दिसत आहे. हे बहुधा एखाद्या शूर सरदाराचे स्मारक असावे. त्यावरील भागातील माहिती या युद्धप्रसंगाला आणि पर्यायाने पिरकोनच्या इतिहासाला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवते. या भागात दोन मानवी आकृत्या असून या सर्व आकृत्यांपेक्षा मोठा असणारा आणि ही चौकट व्यापणारा एक हात दिसत आहे. हा हात कोपऱ्यात दुमडलेला असून हाताचा पंजा कोरलेला आहे. हातामध्ये चूडा भरलेला आहे. अशा प्रकारच्या वीरगळाला ‘सतीशिळा’ किंवा ‘सतिचा दगड’ म्हणतात.  सतीशिळा किंवा सतीचे दगड यावर एकच चित्र कोरलेले असते, त्रिकोणी माथा असलेल्या सपाट दगडावर काटकोनात दुमडलेला हाताचा कोपरा आणि हाताचा पंजा दाखवलेला असतो. दंडावर नक्षीदार चोळी, मनगटापर्यंत चूडा भरलेला हात आणि बाजूला दोन मानवी आकृत्या असतात. या शिळेचा अर्थ असा की ज्या घोडेस्वाराने युद्धात वीरमरण पत्करले आहे त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी त्याच्यासोबत सती गेलेली आहे. एका वीरपत्नीचे हे स्मारक आहे. वीरांच्या इतिहासाला ‘सतीपरंपरेची’ एक काळी किनार यानिमित्ताने दिसून येत आहे.
     याच वीरगळांसमोरील भागात आणखी एक वीरगळ भग्न अवस्थेत पडून आहे.
वीरगळ क्र. 3
दगडाची झीज अधिक प्रमाणात झाल्याने यावरील कोरलेले प्रसंग ओळखू येत नाहीत. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शेताच्या पलिकडे एका उंच भागावर आणखी दोन कोरीव शिल्पे पडून आहेत. या शिल्पांमध्ये ध्यानस्थ स्थितीतील मानवी आकृतीभोवती दोन आकर्षक आणि कलापूर्ण हत्ती कोरलेले आहेत.
शिवमंदिराच्या मागील बाजूचे शिल्प
 परंतु त्या शिळा विरगळ असल्याचे वाटत नाही. त्याबरोबरच आणखी पुढे गेल्यास एका जांभळाच्या झाडाखाली एक भग्न शिवलिंगही आहे.  सध्यातरी केवळ तीनच वीरगळ शंकर मंदिरासमोर आढळल्या आहेत. कदाचित आणखी शोध घेतल्यास या परिसरातील नवा ऐतिहासिक ठेवा समोर शकेल. वरील माहिती वाचून मंदिर भागातील या तीन वीरगळींव्यतिरिक्त उर्वरीत पिरकोन परिसरात काही असू शकेल का? असा प्रश्न जर तुम्हाला जर पडला असेल तर त्याचे उत्तर "होय” असेच आहे. आता उर्वरीत परिसरातील स्मृतीचिन्हांकडे वळू या. सध्या ‘धोंडूकाका मैदान’  म्हणून नावारुपाला आलेल्या मैदानाजवळील ‘यताल देव’ म्हणजे ‘वेताळ देव’ मंदिराबाहेर एक वेगळ्या शैलीतील  ‘वीरगळ’ आहे.
वेताळदेव परिसरातील वीरगळ

चौकोनी स्तंभरूपातील या वीरगळीवर केवळ एकच मानवी आकृती कोरलेली आहे. तळाचा भाग रूंद व वरील भाग निमुळता, तसेच त्यावर शिवलिंगाप्रमाणे गोलाकार भाग अशी रचना या वीरगळीची आहे. अशाच स्वरूपाची रचना असणारे आणखी दोन वीरगळ याच मार्गाने पुढे गेल्यास पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकाजवळ आढळतात. पाणदिवे स्मारकाजवळील एका वीरगळीवर वीराची मोठी प्रतिमा कोरण्यात आली आहे.
पाणदिवे येथील वीरगळ
तर दुसरी वीरगळ झीज झाल्याने अस्पष्ट दिसत आहे. तरीही त्या शिळेवर एक मानवी आकृती ध्यानमुद्रेत बसलेली आढळते, तर तिच्याच बाजूला एक लहान मानवी आकृती असल्याचे जाणवते. कदाचित ही दुसरी वीरगळ एखाद्या साधु किंवा तशा व्यक्तिमत्वाच्या वीराची असू शकेल. या मार्गातील तिन्ही वीरस्मारकांवर ‘कमळपुष्प’ कोरलेले आहे. कमळपुष्प हे चिन्ह समृद्धीचे प्रतिक मानले जाते. कदाचित हे सर्व वीर एक समृद्ध वारसा असणाऱ्या राज्यातील आहेत, असेच या स्मारकांच्या निर्मात्यांना सुचवायचे असेल.भारतातील बहुतांशी वीरगळांवर लेखन आढळत नाही, परंतु पिरकोन गावातील मारुती मंदिराच्या समोरील एका शिळेवर मात्र देवनागरी लिपीतील अक्षरे कोरलेली आहेत. हे लिखाण थोडे अलिकडच्या काळातील वाटते.
मारूती मंदिरासमोरील लिखित विरगळ
वीरगळ जुने आणि त्यावरील लेखन नवे असेही असू शकेल. या शिळेवर एखाद्या व्यक्तीचे नाव कोरल्यासारखे वाटते. या वीरगळावरील अक्षरांचा अर्थ लागल्यास या इतिहासात मोलाची भर पडू शकेल.
गेल्या कित्येक शतकांपासून इतिहासाचे हे मूक साक्षीदार उपेक्षित अवस्थेत पडून आहेत. यापूर्वी पिरकोन व आवरे या शेजारील दोन गावांचा उल्लेख ठाणे येथे सापडलेल्या ताम्रपटात आढळला होता. आता प्रत्यक्षात पिरकोन परिसराचा समृद्ध वारसा या वीरगळांच्या निमित्ताने समोर आला आहे. आता गरज आहे ती या ऐतिहासिक वारशाच्या जतनाची. या अनाम वीरांनी दाखवलेल्या शौर्याची जाणीव ठेवून समाजाप्रती आपली बांधिलकी ठेवून असेच समाजकार्य पुढे चालू ठेवण्याची. हे दगड यापुढेही आपल्याला प्रेरणा देतील, समाजविघातक प्रवृत्तींविरूद्ध लढण्याची.
चला सर्वांनी मिळून या ऐतिहासिक आणि समृद्ध वारशाला जपूया... आपल्या भूमीसाठी, आपल्या लोकांसाठी वीरमरण पत्करलेल्या या अनाम वीरांना आठवणीत ठेवूया...

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ:  महाराष्ट्रातील वीरगळ- सदाशिव टेटविलकर, इतिहासाचे मूक साक्षीदार- आषुतोष बापट, विकीपीडीया - https://en.m.wikipedia.org/wiki/Hero_stone

(पिरकोनमधील वीरगळ भाग-2 लवकरच येत आहे...)

Saturday, January 20, 2018

जीप आणि जिप्सी

                                      ‘जीप आणि जिप्सी’
                           (धम्माल प्रवासाचे कम्माल अनुभव)

जुलै महिन्याचा पावसाळी दिवस. पाठीवर सामानाची जड बॅग, झोप अपुरी झाल्याने तितकेच जड झालेले डोळे आणि दूर बदली झाल्याने डोक्यात आलेले त्याहूनही जड विचार अशा ‘भारा’वलेल्या आणि भांबावलेल्या अवस्थेत जव्हार स्थानकात उतरलो. गुगल मॅपच्या साह्याने अजून किती अंतर जायचे आहे याचा अंदाज बांधला. डेपोत उभ्या असलेल्या बसच्या अनोळखी फलकांकडे एक नजर टाकली, इतक्यात बाहेरच्या बाजूला ‘चला मोखाडा-मोखाडा’ असा आवाज ऐकला. डोळ्यांतला आणि डोक्यातला जडपणा उडवून बाहेर उभ्या असलेल्या जीपच्या दिशेने निघालो.एका जुन्या रंग दिलेल्या अर्माडा जीपमध्ये हातात पिशवी असलेला पंधरा-सोळा वर्षाचा मुलगा ड्रायव्हरच्या सीटवर बसला होता. त्याच्याकडे शंकास्पद नजरेने  पहात, बॅग सांभाळत शेजारील जागेत बसलो. अजूनही बाहेर ‘चला मोखाडा-मोखाडा’ आवाज येतच होता. जीपमधील सर्वांनाच हातपाय हलवता येणे अशक्य झाल्यावर गाडी सुटण्याचे संकेत मिळाले. बाहेर ओरडणारी उंच व्यक्ती जीपमध्ये घुसण्याचे शर्थीचे प्रयत्न करू लागली. समोरच्या जागेत आधीच चारजण बसले होते, पाचव्याला कशी जागा होणार हा प्रश्न डोक्यात असतानाच ही धडपडणारी व्यक्तीच ड्रायव्हर असल्याचा साक्षात्कार झाला. म्हणजे मघापासून ड्रायव्हर सीटवर बसलेला लहान मुलगा माझ्यासारखाच कोंबलेला प्रवाशी होता. तो ड्रायव्हर नाही हे लक्षात आल्याने हायसे वाटले. ड्रायव्हरने गाडीत प्रवेश केल्यानंतर दरवाजा लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर ड्रायव्हरच्या जिद्दीपुढे दरवाजाने हार मानली व तो सुद्धा आमच्याप्रमाणे निमुुुटपणे गाडीला चिकटून राहीला. जीप जव्हारच्या अरूंद रस्त्यांतील गच्च बाजरपेठेतून मार्गक्रमण करत निघाली. रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्याला नमस्कार-चमत्कार करत मोखाड्याच्या मुख्य रस्त्याला लागलो. गाडीने वेग घेतल्यावर ड्रायव्हर माझ्याकडे पाहून म्हणाला, “सर, दार धरून ठेवा; कधी कधी अचानक उघडतंय!”मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहीले.
“तसा रोज नाय, पन दोन दिवस लॉक खराब झालाय.” त्याने वाक्य पूर्ण केले. मी त्याचा आदेश पाळला. एक हात दरवाजाला एक समोर असा अवघडलेला प्रवास पुढे चालू राहीला. थोड्याच वेळात पावसाला सुरूवात झाली.  सुरूवातीला हलका असणारा पाऊस जोर पकडू लागला. सगळ्यांनी खिडकीच्या काचा वर सरकवून बंद केल्या. मला त्या जीपच्या काचा काही वर करता येईनात. माझा गोंधळ ड्रायव्हर ने टिपला. त्याने विचारले, “सर काच सरकवायची आहे काय?”. मी होकार देताच समोरच्या ड्रॉवरमधून एक हँडल माझ्या हातात दिले. ते काचेखालील लोखंडी नटाला लावून फिरवल्यावर काच बंद झाली. काच बंद झाल्यावर ते हँडल पुन्हा ड्रॉवरबंद झाले.
हँडल सारखा पडतंय, यात नाय ठेवला तर परत गावाचा नाय.” ड्रायव्हरने अतिरिक्त माहिती पुरवली.
झिगझॅग वळणांच्या रस्त्याने जीप सुसाट निघाली. प्रवासी चढत  उतरत होते. गाडीच्या मागील हौदातील (मागच्या भागातील) दरवाजा बहिर्मुखी होता, फक्त बाहेरून उघडता येणारा. प्रवाशांना उतरायचे असल्यास ड्रायव्हर गाडीतून उतरून दरवाजा उघडून द्यायचा. मध्येच एखादा प्रवासी उतरून थोडी जागा मोकळी व्हायची, पण पुढच्याच थांब्यावर त्याची जागा दोघेजण घ्यायचे. या अदलाबदलीत मी टाईपरायटरच्या वरच्या भागाप्रमाणे ड्रायव्हरकडे सरकत गेलो व  नविन प्रवासी गाडीच्या दरवाजाचे रक्षक होऊ लागले. या दरम्यान एका वळणावर गाडीचे दार अचानकपणे  उघडले, नशिबाने तिथे बसलेल्या महिलेने अनुभवाने किंवा सवयीने घट्ट हात पकडलेले असल्याने पुढील अनर्थ टळला. गाडी मोखाड्याच्या ‘बस डेपो’ म्हटल्या जाणाऱ्या एका नाक्यावर थांबली.(या जागेला डेपो म्हणने म्हणजे सरपंचाला पंतप्रधान म्हणण्यासारखं!) अवघडलेल्या पायाला मुंग्या आल्या होत्या. पैसे देऊन (गाडीवाल्याला!) हजर व्हायच्या शाळेच्या शोधात निघालो.
 ‘टेंपल रन’गेमसारखा धडकी भरवणारा जीपचा हा पहिलाच अनुभव घेतल्याने पुन्हा या भानगडीत न पडण्याचा निश्चय केला.
हा निश्चय दोनच आठवड्यात मोडून पडला. ‘पालघर ते मोखाडा’ या मार्गावर आपल्या राज्य परिवहन महामंडळाची चांगली सेवा आहे. परंतु मोखाड्याला जाण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ‘कसारा-खोडाळा-मोखाडा’. या मार्गावर मात्र महामंडळाची कृपादृष्टी अजूनही झालेली नाही. सहकाऱ्यांसह ठाण्यातून सकाळी 7.35ची कसारा पकडली आणि एका नविन अनुभवाच्या दिशेने निघालो. सोबतीला या मार्गाने दोन ‘पावसाळी दिवस’ जास्त पाहिलेला महेश होता. तासा-दिड तासाने ही लोकल उंचावरील, निसर्गरम्य अशा कसारा स्टेशनला पोचली. मी शांतपणे पाठीवरची सॅक सांभाळत उतरत असताना महेशचा आवाज आला, “तुषार धाव!” मी त्या आवाजाचा अर्थ लावण्यापूर्वीच सर्व प्रवासी स्टेशनच्या पूर्वेकडील जुन्या रेल्वे ट्रॅकवरून उताराकडे उड्या मारत पळत सुटले होते. मी सुद्धा त्यांच्यात सहभागी झालो. जुन्या ट्रॅकलगतच्या वरच्या भागाकडे काही जण “चला शंभर रुपये” म्हणून ओरडत होते, थोडं खाली उतरल्यावर ‘ऐंशी रुपये, ऐंशी रुपये’ ओरडणारे दिसले. संपूर्ण उतार संपल्यावर ‘चला साठ रुपयात नाशिक’ वाले. उतार संपला म्हणून बरे झाले, नाहीतर फुकटात नाशकात सोडून वर चहापाण्यासाठी दहा-विस देणारे सापडले असते.
या सर्व आरडा-ओरडीकडे दुर्लक्ष करत मी महेशचा मार्ग धरला. एका कच्च्या रस्त्याकडे तोंड करून तीन-चार जुन्या जीप उभ्या होत्या. त्यात पोल्ट्री फार्ममधून बाहेर पडलेल्या कोंबड्यांप्रमाणे चेहरा केलेल्या प्रवाशांना ‘खोडाळा काय?’ असा प्रश्न विचारून फार्ममध्ये सहभागी झालो. मला मागच्या वेळेप्रमाणेच पुढची सीट मिळाली. महेशने स्वत:ला मागच्या हौदात कोंबून घेतले. जीपमध्ये अजून काही प्रवासी कोंबायचे बाकी होते. समोरच्या भागात सुवासिक अगरबत्ती लावली होती. त्या भागात माझ्यासह चार प्रवासी दाटीवाटीने बसल्यानंतर उर्वरीत भागात अगरबत्तीचा धूर पसरू लागला. देवभक्ती अंगावर येऊ लागली होती. तेवढ्यात एका नास्तिक प्रवाशाने ती अगरबत्ती विझवून पुढच्या फेरीसाठी समोर ठेवून दिली.  आता जागा शिल्लक नसल्याची खात्री झाल्यानंतर ड्रायव्हर गाडीत प्रवेश करण्यासाठी झटापट करू लागला, लवकरच त्याला यश मिळाले. कच्च्या रस्त्यावरून खुळखुळत गाडी निघाली. थोड्याच वेळाने जीप मुंबई-नाशिक महामार्गाला लागली. रुंद आणि गुळगुळीत रस्ता पाहून हायसे वाटले.पण हा आनंद असतानाच जीपने डाव्या बाजूकडील वळणावर मार्ग बदलला. हिरव्यागार मॉसने रंगलेल्या लहानशा बोगद्याखालून जात जीपने ‘सुसह्य’ प्रवासाची साथ सोडली. बाहेर 
‘...खाडा-49 वम...’(मोखाडा-49 किमी) असे लिहलेल्या सिमेंटने बनलेल्या मैलाच्या दगडाकडे(!) नजर केली. अजून सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास बाकी होता. अरूंद रस्त्यावरची बेधुंद वळणे पाहून आज ‘खाडा’ होईलच असे वाटू लागले.या वैतागवाण्या प्रवासात सुखद धक्का देणारे चित्र अचानक समोर आलो.  वैतरणाच्या विशाल जलाशयावरील पुलावरून जीप निघाली. पण लगेचच पुन्हा एकदा खुळखुळाट सुरू झाला. याच परिसरात शाहरूखच्या ‘अशोका’ चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेला आणि तसेच नामकरण झालेला ‘ अशोका धबधबा’ही ओझरता पहायला मिळाला. पावसामुळे हिरवाई  पांघरलेला परिसर आणि त्यातून मार्गक्रमण करणारी जीप जंगल सफारीचा आनंद देत होती, पण आतील बाहेरचं जंगल अनुभवायला आतील गर्दीची दंगल खोडा घालत होती. एकेरी मार्गाइतकाच रूंद असलेल्या रस्त्यावरून समोरून एखादे वाहन वेगाने यायचे. अशावेळी एक कोणीतरी कमीपणा घेऊन वाहन कडेला थांबवून दुसऱ्याला सहकार्य करायचा. मला हा प्रसंग पाहून प्राथमिक शाळेत वाचलेली अरूंद पुलावरून जाणाऱ्या दोन बोकडांच्या गोष्टीची आठवण झाली. आमचा ड्रायव्हर शहाण्या बोकडासारखा होता म्हणून नशिब, नाहीतर एका बाजूची अंदाजे 70-80 फूट खोल दरीत पडून आमचाच बळी गेला असता. पावसामुळे मध्येच खचलेला रस्ता आणि गर्द झाडीतून मार्गक्रमण चालू होते. एका चढणीवरती मागच्या हौदातून “गाडी थांबवा, गाडी थांबवा” असा आवाज आला. गाडी थांबली.वळणावळणांच्या प्रवासामुळे आवाज देणाऱ्या व्यक्तीच्या भावना उचंबळून आल्या होत्या, त्या उलटीच्या रुपाने बाहेर पडू इच्छित होत्या. त्यामुळे तो मनुष्य घाईघाईने पाठीमागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. “दरवाजा लॉक झालाय, बाहेरून उघडावा लागेल!” कोणीतरी अनुभवलेली माहिती पुरवली. गाडी बंद करून पुन्हा वेळेत स्टार्ट होईल याची खात्री नव्हती आणि हँडब्रेक नावाचा प्रकार गाडीला माहित नसल्याने ड्रायव्हरने ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या प्रवाशाला ब्रेकवर पाय ठेवायला सांगीतले आणि उतरून पाठीमागच्या हौदाचा दरवाजा उघडला. बाहेर पडल्या पडल्या आतील माणसाने रोखून ठेवलेल्या भावनांचा रस्त्यावरच उद्रेक केला. उद्रेकाचा आवाज थांबल्यावर पुन्हा प्रवासाला सुरूवात झाली. गाडी एकदाची खोडाळ्याला पोचली. गरगरणारे डोके सावरत उतरलो. टेंपल रनची दुसरी लेव्हल पार केल्याचा फील येत होता. पहाटे साडे पाचला घर सोडून आता पाच तास उलटले होते. सपाटून भूक लागली होती. समोरच गरमागरम कांदाभजीचा वास सुटला होता. महेशकडे वळून पाहीले, त्याने हसून होकार दिला. दोघांनी तीन प्लेट कांदाभजी विथ एक्स्ट्रा पाव फस्त केली. केवळ बत्तीस रुपये बील. लेव्हल 2 पार केल्याचे बक्षिस मिळाले. 
आता ‘टेंपल रन लेव्हल 3 साठी तयार झालो. समोर मोखाड्याला जाण्यासाठी दोन जीप उभ्या होत्या. महेशने पुढे जाऊन चौकशी केली. माझ्याकडे पाहून मान हलवत म्हणाला, “आयाया वाट लागली!” मी प्रश्नार्थक चेहरा केल्यावर पुढे म्हणाला, “ कमांडर लागलीय!”
हे ‘कमांडर जीप’ म्हणजे वेगळे प्रकरण आहे. टाटा सुमो आणि अर्माडा जीप मध्ये कोंबता येणाऱ्या प्रवाशांइतकेच प्रवासी या कमी जागेत बसवले जातात.(म्हणजे फक्त सोळा प्रवासी!) त्यात भर म्हणून या जुनाट जीप अत्यंत आवाज करणाऱ्या आणि हळू चालणाऱ्या असतात. मी पुन्हा एकदा फ्रंट केबिन सीट पकडली, यावेळेस महेशचेही प्रमोशन झाले. या जीपचा एक फायदा होता तो म्हणजे दरवाजा लावायची किंवा पकडून ठेवायची गरज नव्हती. सर्वच व्यवहार पारदर्शक. मी एक पाय बाहेर एक आणि एक आत असा खुल्या जंगल सफारीच्या तयारीने बसलो. थोड्याच वेळात कोरम पूर्ण झाला. वीसेक वर्षाचा तरूण ड्रायव्हिंग सीटवर बसण्याचा आणि तिथे टिकण्याचा प्रयत्न करत होता. कमांडर मोखाड्याच्या दिशेने निघाली. ड्रायव्हरचे निम्मे शरीर जीपबाहेर होते. पुढे जे काही पाहीलं ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. केवळ स्टेअरींग पकडणारे हात आणि निम्मे ढुंगण आतमध्ये ठेवून ड्रायव्हरने उर्वरीत शरीर आणि मान जीपच्या बाहेर काढून गाडी चालवायला सुरूवात केली. मला ऐंशीच्या दशकातल्या
‘द गॉडस् मस्ट बी क्रेझी’ (The Gods must be crazy) या इंग्रजी चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटाच्या एका भागात आफ्रीकेतील जंगलातील जीपचा गंमतीदार प्रवास चितारला आहे. या चित्रपटाचे दोन भाग येऊन गेलेत, तिसऱ्या भागासाठी खोडाळा- मोखाडा परिसर निवडायला हरकत नाही. समोरून येणाऱ्या वाहनांना हुलकावण्या देत, अरूंद पुलांवरून आणि खचलेल्या रस्त्यांवरून ही जंगल सफारी चालू होती. रस्त्याला मध्येच एखादा बस थांबा लागायचा, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बस थांब्याजवळ लोकवस्ती असल्याचे आढळले नाही. याचा अर्थ, या थांब्यांपासून आणखी दूर स्थानिकांच्या वाड्या-वस्त्या असाव्यात. उताराच्या शेतातील बांधांवरून जात असलेली विविध प्रकारच्या गणवेशातील मुले दिसत होती. एका थांब्यावर दोन तरूणांनी गच्च भरलेल्या जीपला हात केला. ड्रायव्हरने गाडी थांबवून “लटकीतो काय?” असा प्रश्न विचारला. त्या दोघांनी नकार दिला. मी महेशकडे पाहीले व हा काय प्रकार आहे असे विचारले. जीपमधील कोरम पूर्ण झाला तरी अतिरिक्त सदस्यांना गाडीला लटकवून त्यांचे समावेशन करता येते, ही नविन माहिती त्याने दिली. जीपला बाहेरून लटकून पंधरा-वीस किलोमीटरचा प्रवास करता येतो या माहितीची माझ्या असामान्य ज्ञानात भर पडली. थोड्याच वेळात समोरून येणाऱ्या जीपला दोन लटकणारे प्रवासी पाहिले आणि माझ्या माहितीचे दृढीकरण झाले. मध्येच काही प्रवासी उतरल्याने थोडी रिकामी जागा झाली. बरे वाटले. मोखाड्याच्या डेपोत गाडी थांबली. लेव्हल 3 कंप्लिटेड! सुटकेचा निश्वास टाकला. सुखरूपपणे पोचलो, खाडा टळला.
हे अखेरचेच असे म्हणत जीपचा जीवघेणा प्रवास टाळत राहीलो. पण कधी वेळ वाचवण्यासाठी, तर कधी पर्याय उपलब्ध नसल्याने या ‘टेंपल रन’चा अनुभव घ्यावाच लागला.पुढे वर्षभराने त्याचे काहीच वाटेनासे झाले. नोकरीच्या निमित्ताने कराव्या लागणाऱ्या भटकंतीमुळे एकप्रकारचा जिप्सीपणा अंगात मुरला होता. हाच जिप्सीपणा या प्रवासात उपयोगी आला. आता मुंबईची लोकल ट्रेनची गर्दी असो की ऑटोरिक्षावाल्याच्या मांडीवर बसून करावा लागणारा प्रवास असो, काहीच वाटत नाही. एस्सेल वर्ल्ड किंवा इमॅजिकातील थरारक अनुभवाला कंटाळला असाल आणि खऱ्याखुऱ्या ‘मौत का कुऑ’ ला अनुभवायचं असेल तर...
“चलो मोखाडा...मोखाडा!”

-तुषार म्हात्रे, पिरकोन उरण

Saturday, January 13, 2018

मदतीचा हात


वेस्टर्न रेल्वेवरील नायगाव स्टेशन,वेळ दुपारी सव्वा दोनची...
चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या फास्ट ट्रेनमधून 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उतरलो. स्टेशनच्या पूर्वेला जाण्यासाठी मागे वळलो. ट्रेनने जेमतेम वेग घेतला असेल तेवढ्यात 40-45 वयाचा दिसणारा एक माणूस चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडला. त्याचे पाय प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील मोकळ्या जागेत होते. ट्रेनच्या वेगामुळे तो ट्रेनखाली खेचला जात होता. माझ्या पुढे असलेल्या एकाने त्या अडकलेल्या व्यक्तीच्या हातांना धरून ठेवले. त्याच्या मागून मी लगेच हातातले सामान टाकून त्याला प्लॅटफॉर्मवर खेचले. आम्ही दोघांनी त्याला उचलून एका बाकड्याच्या आधाराने बसवले. ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मध्ये पाय सापडल्याने एका पायाला जबर दुखापत झाली होती. पाईपलाईन फुटल्यानंतर जसे पाणी निघते तसे रक्त बाहेर पडत होते. मी पलिकडील 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीसांना आवाज दिला. दोन रेल्वे पोलीस त्या प्लॅटफॉर्मवरील बाकांवर बसून ड्युटी(!) करत होते. ते तिथूनच क्या हुवा? क्या हुवा? करत होते. अखेर मी जिन्यावरून धावत जाऊन त्या पोलीसांपासून 5 पावलांवर असलेल्या मदत केंद्रात धावत जाऊन माहिती दिली. माहिती ऐकल्यानंतर प्रथमोपचार करणारा कर्मचारी तातडीने त्या अपघातग्रस्ताकडे रवाना झाला. मात्र पोलीस “सिर्फ पैर को ही लगा है ना?” हेच विचारत होते.
एकीकडे ट्रेनमधून पडल्याबरोबर मदतीचा हात देणारा तो अनाम मुंबईकर आणि दुसरीकडे ही ‘तो क्या हुवा?’ प्रवृत्ती!
आपल्या आजूबाजूला अशा सर्वच प्रवृत्तीची माणसे अाढळतात. मात्र या सर्वांमधून उठून दिसणारी प्रवृत्ती म्हणजे ‘मदत करणारी’!
मला सध्या त्या हात देणाऱ्या व्यक्तीचा चेहराही आठवत नाही, पण त्या व्यक्तीला घट्ट धरून ठेवणारे हात पक्के लक्षात राहिले आहेत.
देव असे ‘हात’ सर्वांनाच देवो.
-तुषार म्हात्रे

Saturday, January 6, 2018

ये लाल रंग...!


अंगणात तुळशीवृंदावन, दारात पायरीजवळ वेलकमसदृश काहीतरी  लिहलेले एखादे पायपुसणे आणि कुंपण वगैरे असलेच तर त्यावर नावाची पाटी असे काहीसे वर्णन आपल्या घरांचे करता येईल. फ्लॅटसंस्कृती येऊनदेखील यात फारसा बदल झाला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपासून दारासमोरील घटकांमध्ये आणखी एका वस्तूची भर पडली आहे. सजावटीचा, संस्कृतीचा भाग नसूनही या वस्तूने घरासमोरील मानाचे स्थान पटकावले आहे. ही नविन गोष्ट म्हणजे ‘लाल रंगाची बाटली’! साध्या कौलारू घरांपासूून ते बहुमजली इमारतींपर्यंत, शेतकरी कष्टकऱ्याच्या दारापासून ते उच्चशिक्षित आणि धनाढ्यांच्या बंगल्यांपर्यंत या लाल बाटलीने स्थान मिळवलेय.
असे काय विशेष आहे या बाटलीत? कशासाठी या घरासमोर ठेवल्या जातात?
या ‘लाल बाटल्या’ ठेवण्यामागचं कारण एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. भटक्या कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी, घरापासून दूर हाकलण्यासाठी या बाटल्या ठेवल्या जाताहेत. या लाल रंगाच्या बाटल्या बघून कुत्रे त्या परिसरात फिरकत नाहीत असा दावाही केला जातोय. जेव्हा एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणावर केली जाते तेव्हा त्यावरील विश्वास वाढत जातो. अशा विश्वासातूनच सगळीकडे हा प्रकार वाढत गेला. लाल सिग्नल पाहील्यानंतर भली मोठी रेल्वेही थांबते मग कुत्र्याची काय बिशाद? या लाल रंगाचा धसका कुत्र्यांनी का घेतला असावा?
आपल्या मनातील सर्व शंका-कुशंकांची शास्त्रीय अंगाने चर्चा केल्यावर काय हाती लागते ते पाहू.

आपल्याला हे माहीत आहे की, रंगांचा जन्मच मुळी प्रकाशातून होतो. काचेच्या लोलकाप्रमाणे असणाऱ्या पावसाच्या थेंबातून सूर्याचा पांढरा प्रकाश जेव्हा जातो; तेव्हा पाऊस आणि उन्हं एकाच वेळी आलीत की सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं. एखादी वस्तू पाहिल्यानंतर तिची प्रतिमा, तिचे रंग याबाबतची माहिती मेंदूकडे पाठवण्याकरिता आपल्या डोळ्यात दोन प्रकारच्या पेशी असतात. कोन सेल्स अर्थात ‘शंकू पेशी’ आणि रॉड सेल्स अर्थात ‘दंडगोल पेशी’. दंडगोल पेशींमुळे आपल्याला कमी प्रकाशातही दिसू शकतं, पण या पेशींमार्फत आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा किंवा रंग दिसू शकत नाहीत. शंकू पेशींमुळे आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा किंवा रंगांचं ज्ञान होतं. पण त्या पेशी केवळ जास्त प्रकाशातच त्यांचं प्रतिमाज्ञान करवून द्यायचं काम करू शकतात. शंकू पेशी या तीन प्रकारच्या असतात- तांबडय़ा, हिरव्या आणि निळ्या रंगांचं ज्ञान करवून देणाऱ्या या पेशींमुळेच आपल्याला रंगज्ञान होत असतं. हे होतं मानवाच्या बाबतीत पण कुत्र्याच्या डोळ्यांमध्ये मात्र पिवळ्या आणि निळ्या रंगाच्याच कोन पेशी असतात. लाल रंग ओळखू येण्यासाठी आवश्यक लाल रंग संवेदन कोनपेशी कुत्र्याच्या डोळ्यांत नसतात.

याचा अर्थ असा नाही की कुत्र्याला लाल रंगाच्या वस्तू दिसत नाहीत, तर तो अशा वस्तू पाहू शकतो परंतु लाल-हिरव्या रंगातील फरक त्याला कळत नाही. म्हणजे एक प्रकारे ‘रंगाधळेपणाच!’ असे असले तरी रंगाच्या प्रकाश तीव्रतेच्या आधारे तो दोन रंगांतील फरक ओळखू शकतो.  थोडक्यात काय तर ‘कुत्र्यांना लाल रंग ओळखता येत नाही.’ असेच काहीसे लाल रंग दिसल्यास बैल किंवा वळू हल्ला करतो या बाबतीतही होते. हे प्राणीसुद्धा लाल रंग ओळखू शकत नाहीत.
डिस्ने पिक्चर्सच्या ‘प्लुटो’ नावाच्या कार्टूनवर एक मस्त एपिसोड आहे. या भागाची सुरूवातच “कुत्ता अपने नाक से देखता है!”  या वाक्याने सुरू होते. यात वासाच्या साह्याने शोध घेणारा प्लुटो आणि त्याची फजिती करणारी खार यांचे गंमतीदार प्रसंग आहेत. यातील गंमतीचा आणि अतिशयोक्तोची भाग सोडला तर खरोखरच कुत्रा या प्राण्याची वास घेण्याची क्षमता उच्च असते. त्यात भर म्हणून कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांना कमी वारंवारतेचे ध्वनी ऐकण्याची क्षमता प्राप्त आहे. त्यामुळे कुत्र्याच्या दृष्टीपेक्षाही अधिक ज्ञान त्याला इतर इंद्रियांपासून मिळते.
वरील माहीतीचा विचार केल्यास लाल रंगाच्या बाटलीमुळे कुत्रे दूर जातात ही एक आधुनिक अंधश्रद्धा असल्याचे लक्षात येईल. ‘लाल रंग आणि कुत्रा’ या दोघांचा संबंध सर्वप्रथम जोडणारे असामान्य संशोधक आणि अतिशय वेगाने त्याची अंमलबजावणी करणारी सामान्य जनता अशा दोघांच्या संयोगाने हा अ(ति)सामान्य उपाय वापरला गेला. मात्र लाल बाटल्या घरासमोर ठेवल्यानंतर काहींना कोणताच परिणाम न जाणवल्याने आता हळू हळू या नविन सजावटीने आपले स्थान गमावले आहे.
‘कुत्रा आणि लाल रंगाची बाटली’ हे नविन युगातल्या अंधश्रद्धांचा केवळ एक नमुना उदाहरण आहे. शास्त्रीयदृष्ट्या पडताळणी न करता अशा अनेक अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम आपण इमानेइतबारे करत आहोत. समाजमाध्यमांनी ग्रासलेल्या सध्याच्या काळात तर या थोतांडांना अधिक बळ मिळत आहे.  सुरूवातीला निरर्थक आणि निर्धोक वाटणाऱ्या या नविन अंधश्रद्धा कधी मोठे रुप धारण करतात हे कळत देखील नाही. या अशा अंध विचारांना थांबवण्यासाठी गरज आहे ती सारासार विवेकबुद्धीची आणि शास्त्रीय दृष्टीकोनाची.  विज्ञानाच्या चोख दृष्टीतून पाहील्यास या अंधश्रद्धांच्या पलीकडील सत्य सापडून  ज्ञानाचा प्रकाश पसरू शकेल. इतरांचं जाऊद्या, ही सकारात्मक सुरूवात आपल्यापासूनच करूया.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...