Search This Blog

Saturday, October 26, 2019

दिन दिन दिवाळी!

दिवाळीवर प्रभाव कृषी संस्कृतीचा!
(मुंबई सकाळ, रायगड टुडे 26 ऑक्टोबर 2019)

       आपल्या संस्कृतीला ‘सण-कृती’ म्हणावे लागेल इतक्या मोठ्या संख्येने विविध प्रकारचे सण, उत्सव शहरी आणि ग्रामीण भागात सातत्याने साजरे होत असतात. कधी आवड आहे म्हणून, तर कधी सवड आहे म्हणून आपला समाज रोजची चाकोरी सोडून या सणांमध्ये सहभागी होत असतो. दिवाळी देखील या सणांपैकीच एक. सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणावर रायगडच्या ग्रामीण भागात मात्र इथल्या कृषिसंस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतो. मुलांच्या  हातात फुलबाजी आली की ती गोलगोल फिरवत ‘दिन दिन दिवाळी’ हे गाणे आपसूकच तोंडावर येते.

“दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी...”

 परंपरेने चालत आलेले हे गाणे ग्रामीण कृषीसंस्कृतीतील आहे. रायगड जिल्ह्यात पूर्वी गावाकडे घराघरातले गोवारी म्हणजेच गुराखी आपापली गुरे-ढोरे घेऊन रानात जायचे. तिथे त्या गुरांना वाघ, बिबटे यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे गुराखी हातात संरक्षक काठी बाळगायचे. गुराख्यांच्या या सामान्य दिनचर्येतूनच हे लोकगीत निर्माण झाले. सध्या शहरात दिवाळी दिव्यांचा सण, प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरी करतात. त्याचबरोबर वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा (बळीप्रतिपदा), भाऊबीज अशी उत्सव माळच असते. ग्रामीण संस्कृती ते शहरी संस्कृती असे उत्सवाचे परिवर्तन होतानाही काही पूर्वपरंपरा कायम राहतात, त्याचेच एक प्रतिक  म्हणजे- आजही म्हटले जाणारे 'दिन दिन दिवाळी' हे गाणं!
जिल्ह्याच्या आदिवासीबहुल भागात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपापल्या पाड्यातील हिरव्यादेव, कनसरीमाता, वाघदेव या निसर्गस्वरूपातील देवतांची पूजा केली जाते. त्यासाठी रानातल्याच काकडी व इतर पदार्थांपासून बनवलेला नैवेद्य दाखवतात. जनावरांच्या गळ्यांत गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. निवडुंगाचे काप करून त्यापासून दिवे तयार केले जातात. जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण या भागातही पूर्वी असे दिवे तयार केले जायचे.  ग्रामीण भागात बळी प्रतिपदेचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी काही आदिवासी बांधव आपले गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात. गावाबाहेरच्या आखाड्यात गवत पेटवून ते धूर करतात आणि त्या धुरातून गायी, बकऱ्यांना नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. याला ते 'ढोर उठवणे' असे म्हणतात.
        पाळीव प्राण्यांचे शेण कधीच टाकाऊ मानलेले नाही. उलट त्याला पवित्रच मानले जाते. इथे शेणाने घर सारवण्याची पद्धत आहे. ठाणे-रायगड-कोकण प्रांतातील आगरी समाजातील घरात डोकावलात, तर दिवाळीच्या दिवसांत तिथे शेणाचे गोळे मांडलेले दिसतात. आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते.
बलिप्रतिपदा शहरी भागात जरी वामनाने बळीराजाला पाताळात धाडले म्हणून साजरी केली जात असली, तरी ग्रामीण भागात हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. कारण हा बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. म्हणूनच या दिवशी आगरी समाजात दारासमोर तांदळाच्या पिठापासून रांगोळ्यांचे कणे भरले जातात.
या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणाचे गोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला गोंड्याचे फूल वाहिले जाते. या जागेपासून घराच्या आतील भागापर्यंत चुन्याने बळीची पावले रेखिली जातात.
बळीराजाची कृपा आपल्या घरादारावर कायम राहण्यासाठी ही पूजा पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. हा काळ शेतीच्या कामांचा असल्याने इथला शेतकरी एकीकडे कामाने थकलेला वाटला तरी शेतातील धन घरात येण्याचा हा काळ असल्याने तो उत्साही वाटतो. बळीप्रतिपदेप्रमाणे भाऊबीज हा सण देखील तो मनापासून साजरा करतो. या दिवशी भाऊ बहीणीला भेटायला जातो. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
        एकूणात  दिवाळी हा परंपरेने चालत आलेला ग्रामीण संस्कृतीतील कृषिउत्सवच आहे. दिव्यांचा-प्रकाशाचा उत्सव तो नंतर झाला असण्याची शक्यता आहे. अलिकडे उंच इमारतींच्या गॅलरीतील एल.ई.डी.च्या आकर्षक दिव्यांचा झगमगाट, उत्तुंग आकाशात जाऊन रंग उधळणारे फटाके, महागडे उंची कपडे आणि समाज माध्यमांवर ओसंडून वाहणारा उत्साह अशी एक ‘उच्चभ्रू’ पातळी दिवाळी या सणाने गाठली आहे . सध्याचा हा उत्साह डोळे दिपवणारा असला तरी या सणाच्या जुन्या आठवणी विविध रुपाने डोकावत  असतात. या आठवणींच्या बाबतीत कुसुमग्रजांच्या ओळी खूप काही सांगून जातात...

“नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !”

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Monday, October 14, 2019

विजयाची घंटा!

विजयाची घंटा!
(मुंबई सकाळ, रायगड टुडे 14 ऑक्टोबर 2019)
    रायगड जिल्ह्यातील सरसगडाच्या पायथ्याशी असलेले अष्टविनायकांपैकी एक देवस्थान म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर.  येथून जवळच्या सुधागडावरील एक श्रद्धास्थान भोराईदेवी.  अलिबागजवळील प्राचिन कनकेश्वर आणि श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर; रायगड जिल्ह्यातील ही सर्व सुप्रसिद्ध श्रीक्षेत्रे. यापैकी पाली, हरिहरेश्वर आणि कनकेश्वर ही क्षेत्रे तशी नेहमीच भक्तांनी गजबजलेली. गणेश, शिव, हरिहर आणि शक्ती यांसारखी उपास्य देवतांमध्ये विविधता असणाऱ्या ही स्थाने. या चार वेगवेगळ्या देवस्थानांची एकत्रितपणे चर्चा करण्यासारखे काय आहे?
अशी कोणती गोष्ट आहे, जी या मंदिरांना एका समान धाग्याने जोडते?
या सर्व क्षेत्रांतील समान गोष्ट म्हणजे या मंदिरांतील घंटा!
“आगमनार्थ तु देवानां, गमनार्थ तु राक्षसाम।
कुरू घंटे रवं तत्र देवताहा न लक्षणम।।”
अर्थात ‘हे घंटे, देवतांच्या आगमनासाठी आणि असुरांना पळवून लावण्यासाठी, तू देवतांना पुकारणारा नाद कर!’ असे घंटेच्या बाबतीत म्हटले जाते. घंटा ही हिंदू, जैन, ख्रिश्चन या धर्मात  विशेष महत्त्व असणारी वस्तू.  सर्वसाधारणपणे मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर, सभामंडपात किंवा गाभाऱ्यात घंटा टांगलेल्या असतात. देवदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताने देवालयात प्रवेश करताना प्रथम घंटानाद करून देवाला आपल्या आगमनाची जाणीव करून द्यायची असते.

  भारतातील प्रार्थनामंदिरात मुख्यत: पितळ व कांस्य धातूच्या घंटा आढळतात. युरोपियन लोकांनी बांधलेल्या प्रार्थनामंदिरात काशाच्या, प्रचंड आकाराच्या आणि काळपट पांढऱ्या रंगाच्या घंटा असतात. त्यातून निघणारा आवाज हा त्यात वापरलेल्या मिश्र धातूमुळे अधिक आकर्षक बनतो. अशा प्रकारच्या घंटा तयार करण्यात युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन यांसारखे अनेक देश अग्रेसर होते. पोर्तुगालही या देशांपैकीच एक. त्यांना अशा प्रकारच्या घंटा तयार करण्याची कला अवगत होती. गोवा, वसई आणि रायगड जिल्ह्यातील चौल याठिकाणी घंटा तयार करण्याचे कारखाने होते. या घंटा तयार होत असताना विशिष्ट धार्मिक विधी केला जात असे. त्या घंटेचे नामकरणही केले जायचे. बायबलमधील पवित्र वचने, सनावळी, धर्मचिन्हे उठावदार पद्धतीने उमटविली जात असत. रायगड जिल्ह्यातील या चार मंदिरांमध्ये इतरत्र असणाऱ्या घंटांपेक्षा  वेगळेपण सांगणाऱ्या घंटा आहेत.
यातील पहील्या बल्लाळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर उजव्या बाजूला मोठ्या आकाराची एक घंटा साखळीने टांगून ठेवलेली आहे. घंटेचा रंग लालसर अाहे. घंटेच्या आतील बाजूस लोलक नाही मात्र आरतीच्या वेळेस त्या जागी लोखंडी लोलक बसविण्यात येतो. या घंटेवर कोणत्याही प्रकारचे धर्मचिन्ह, लेख किंवा सन लिहलेले नाही, परंतु एकंदर रचनेवरून ही घंटा पोर्तुगीज बनावटीची असल्याचे लक्षात येते. चिमाजी आप्पांद्वारे वसई मोहिमेतून ही घंटा हस्तगत केल्याचे मानले जात असले तरी त्याला खात्रीशीर पुरावा नाही. तरीही उत्तर पेशवे काळात नाना फडणीस यांचा चुलतभाऊ मोरोबादादा फडणीस यांनी देवालयाचा जीर्णोद्धार करताना ही पोर्तुगीज घंटा अर्पण केली असल्याचे तज्ञांचे मत आहे.
दुसरे मंदिर भोराईदेवीचे. पाली गावाच्या पूर्वेस काही कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या रांगेत भोरप म्हणजेच सुधागड नावाचा दुर्ग आहे. गडाच्या माथ्यावर भोरच्या पंतसचिवांची कुलदेवता श्री भोराई देवीचे देवालय आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ रंग दिलेली एक पोर्तुगीज घंटा आहे. घंटा सुस्थितीत असून वापरात असलेली आहे. या घंटेच्याही आतील भागात लोलक नाही. बाजूला लटकवलेल्या लोखंडी पट्टीने घंटानाद केला जातो. या घंटेवरही कोणत्याही प्रकारचे चिन्ह अथवा लेख नाही.

तिसरे मंदिर म्हणजे दक्षिण काशी म्हणूनच प्रसिद्ध असलेले
 श्रीवर्धन तालुक्यातील श्री हरिहरेश्वर मंदिर . देवालयाच्या प्रवेशद्वाराजवळून सभामंडपात आल्यावर काही घंटा टांगलेल्या दिसतात. यापैकी एक मोठी घंटा पोर्तुगीज बनावटीची असल्याचे दिसते. श्रीवर्धन येथील पेशवे घराण्याचा या देवस्थानाशी असलेला संबंध पाहता, ही घंटा पेशव्यांकडूनच देवाला अर्पण केली असावी असे वाटते.
या सर्व घंटा चिमाजी आप्पांच्या वसई विजय मोहिमेतील असल्याचे मानले जाते. वसई मोहिमेत पोर्तुगीजांची अनेक प्रार्थनामंदिरे एखाद्या किल्ल्यासारखी लढली. परंतु मराठ्यांच्या पराक्रमापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. विजयप्राप्तीनंतर मराठ्यांनी या चर्चमधील मोठमोठ्या घंटा वसई मोहिमेची विजयचिन्ह म्हणून काढून नेल्या. या घंटांमधून येणारा नाद बराच काळ घुमत राहतो. या घंटांचे नादमाधुर्य व प्रचंड आकार यांमुळे मराठी सरदार व पदाधिकारी मंडळी या घंटा हस्तगत करून आपापल्या उपास्य देवतांच्या चरणी अर्पण करू लागले. पाली, सुधागड व हरिहरेश्वर येथील घंटा खात्रीने पोर्तुगीज असल्या तरी त्या वसई मोहिमेचे विजयचिन्ह असल्याचा पुरावा नाही. परंतु अलिबागच्या कनकेश्वराची घंटा थोडी अधिकची माहीती देते.
अलिबागच्या ईशान्येस एका उंच डोंगरावर श्री कनकेश्वराचे देवस्थान आहे. या कनकेश्वराच्या शिवालयातील भांडारगृहात एक पोर्तुगीज घंटा आहे. घंटा सुस्थितीत आहे परंतु वापरात नाही. वापर नसल्याने आतील बाजूस लोलकही नाही. या घंटेवर मात्र क्रॉसचे धर्मचिन्ह आहे. घंटेच्या तोंडापाशी जुन्या पोर्तुगीज भाषेत “DONA MARIANA DE MELLO FES NO ANNO- De 666” असे लिहिलेले आहे. यातील दोना हा शब्द सन्माननीय स्त्री या अर्थी वापरतात. ‘मारियान द मैलु’ हिने सदरची घंटा अर्पण केली असा याचा अर्थ होतो. या घंटेवरचे क्रॉस व लेख उठावदार पद्धतीने उमटवलेले आहेत. घंटेवरील १६६६ हे साल व लेखन पद्धती पाहता ही घंटा वसई मोहिमेचे विजयचिन्ह असल्याचे सांगता येते.
      खरेतर घंटा म्हणजे मंदिरांमध्ये प्रवेशणाऱ्या भक्तांच्या सहज दृष्टीस पडणारी, नित्यनेमाने नाद निर्माण करणारी. पण रायगड जिल्ह्यातील या  मंदिरांमधील घंटा केवळ नादच निर्माण करत नाहीत, तर आपल्या आवाजाने इतिहासही कथन करतात;  संघर्षाचा आणि स्थित्यंतराचा. हा आवाज तर ऐकूयाच ,पण शक्य झाल्यास त्यांचा इतिहासही शोधूया!

(संदर्भ: हिंदू देवालयांतील पोर्तुगीज घंटा- महेश तेंडुलकर)

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...