Search This Blog

Saturday, October 26, 2019

दिन दिन दिवाळी!

दिवाळीवर प्रभाव कृषी संस्कृतीचा!
(मुंबई सकाळ, रायगड टुडे 26 ऑक्टोबर 2019)

       आपल्या संस्कृतीला ‘सण-कृती’ म्हणावे लागेल इतक्या मोठ्या संख्येने विविध प्रकारचे सण, उत्सव शहरी आणि ग्रामीण भागात सातत्याने साजरे होत असतात. कधी आवड आहे म्हणून, तर कधी सवड आहे म्हणून आपला समाज रोजची चाकोरी सोडून या सणांमध्ये सहभागी होत असतो. दिवाळी देखील या सणांपैकीच एक. सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणावर रायगडच्या ग्रामीण भागात मात्र इथल्या कृषिसंस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतो. मुलांच्या  हातात फुलबाजी आली की ती गोलगोल फिरवत ‘दिन दिन दिवाळी’ हे गाणे आपसूकच तोंडावर येते.

“दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी...”

 परंपरेने चालत आलेले हे गाणे ग्रामीण कृषीसंस्कृतीतील आहे. रायगड जिल्ह्यात पूर्वी गावाकडे घराघरातले गोवारी म्हणजेच गुराखी आपापली गुरे-ढोरे घेऊन रानात जायचे. तिथे त्या गुरांना वाघ, बिबटे यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे गुराखी हातात संरक्षक काठी बाळगायचे. गुराख्यांच्या या सामान्य दिनचर्येतूनच हे लोकगीत निर्माण झाले. सध्या शहरात दिवाळी दिव्यांचा सण, प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरी करतात. त्याचबरोबर वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा (बळीप्रतिपदा), भाऊबीज अशी उत्सव माळच असते. ग्रामीण संस्कृती ते शहरी संस्कृती असे उत्सवाचे परिवर्तन होतानाही काही पूर्वपरंपरा कायम राहतात, त्याचेच एक प्रतिक  म्हणजे- आजही म्हटले जाणारे 'दिन दिन दिवाळी' हे गाणं!
जिल्ह्याच्या आदिवासीबहुल भागात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपापल्या पाड्यातील हिरव्यादेव, कनसरीमाता, वाघदेव या निसर्गस्वरूपातील देवतांची पूजा केली जाते. त्यासाठी रानातल्याच काकडी व इतर पदार्थांपासून बनवलेला नैवेद्य दाखवतात. जनावरांच्या गळ्यांत गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. निवडुंगाचे काप करून त्यापासून दिवे तयार केले जातात. जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण या भागातही पूर्वी असे दिवे तयार केले जायचे.  ग्रामीण भागात बळी प्रतिपदेचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी काही आदिवासी बांधव आपले गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात. गावाबाहेरच्या आखाड्यात गवत पेटवून ते धूर करतात आणि त्या धुरातून गायी, बकऱ्यांना नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. याला ते 'ढोर उठवणे' असे म्हणतात.
        पाळीव प्राण्यांचे शेण कधीच टाकाऊ मानलेले नाही. उलट त्याला पवित्रच मानले जाते. इथे शेणाने घर सारवण्याची पद्धत आहे. ठाणे-रायगड-कोकण प्रांतातील आगरी समाजातील घरात डोकावलात, तर दिवाळीच्या दिवसांत तिथे शेणाचे गोळे मांडलेले दिसतात. आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते.
बलिप्रतिपदा शहरी भागात जरी वामनाने बळीराजाला पाताळात धाडले म्हणून साजरी केली जात असली, तरी ग्रामीण भागात हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. कारण हा बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. म्हणूनच या दिवशी आगरी समाजात दारासमोर तांदळाच्या पिठापासून रांगोळ्यांचे कणे भरले जातात.
या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणाचे गोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला गोंड्याचे फूल वाहिले जाते. या जागेपासून घराच्या आतील भागापर्यंत चुन्याने बळीची पावले रेखिली जातात.
बळीराजाची कृपा आपल्या घरादारावर कायम राहण्यासाठी ही पूजा पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. हा काळ शेतीच्या कामांचा असल्याने इथला शेतकरी एकीकडे कामाने थकलेला वाटला तरी शेतातील धन घरात येण्याचा हा काळ असल्याने तो उत्साही वाटतो. बळीप्रतिपदेप्रमाणे भाऊबीज हा सण देखील तो मनापासून साजरा करतो. या दिवशी भाऊ बहीणीला भेटायला जातो. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
        एकूणात  दिवाळी हा परंपरेने चालत आलेला ग्रामीण संस्कृतीतील कृषिउत्सवच आहे. दिव्यांचा-प्रकाशाचा उत्सव तो नंतर झाला असण्याची शक्यता आहे. अलिकडे उंच इमारतींच्या गॅलरीतील एल.ई.डी.च्या आकर्षक दिव्यांचा झगमगाट, उत्तुंग आकाशात जाऊन रंग उधळणारे फटाके, महागडे उंची कपडे आणि समाज माध्यमांवर ओसंडून वाहणारा उत्साह अशी एक ‘उच्चभ्रू’ पातळी दिवाळी या सणाने गाठली आहे . सध्याचा हा उत्साह डोळे दिपवणारा असला तरी या सणाच्या जुन्या आठवणी विविध रुपाने डोकावत  असतात. या आठवणींच्या बाबतीत कुसुमग्रजांच्या ओळी खूप काही सांगून जातात...

“नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !”

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...