Search This Blog

Thursday, March 26, 2020

जॅक स्पॅरो आणि ब्लॅक पर्ल

          तो कपटी आहे, ढोंगी आहे, स्वार्थी आहे, पैशाचा लालची आहे, दारूडा देखिल आहे. त्याचा अवतारही रांगडा आणि अस्वच्छच! एखाद्या खलनायकाला जितकी विशेषणे लावता येतील तितकी त्याला चपखलपणे बसतात. तो लढवय्या असला तरी पळपुटादेखिल आहे. तरीही पडद्यावरील त्याचा वावर हवाहवासा वाटतो. 2003 साली टेड इलियट आणि टेरी रॉस्सीयो या दोघांच्या कल्पनेतून साकारलेला हा अवलिया म्हणजे ‘जॅक स्पॅरो ... 
सॉरी! ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’!

‘पायरेटस् ऑफ दी कॅरेबियन’ या फँटसी प्रकारातील चित्रपटाचा हा आधारस्तंभ. ‘समुद्री चाचे आणि त्यांचा संघर्ष’ या जोडीला ‘अॅक्शन, थ्रीलर, रोमान्स, कॉमेडी’  अशा चविष्ट मसाल्याने भरलेले हे कथानक. दशकापूर्वी ‘पायरेटस ऑफ दी कॅरेबीयन: कर्स ऑफ ब्लॅक पर्ल’ने सुरू झालेल्या या मनोरंजक समुद्री प्रवासाने तब्बल पाच कथानकांची मेजवानी प्रेक्षकांना दिली.  
काळाप्रमाणे मनोरंजनाचे तंत्र बदलले, परंतु जॅकच्या करामतींचे तंत्र अजूनही जगभरातील प्रेक्षकांना आपल्यापर्यंत खेचत आहे.
चित्रपटाची कथा काहीही असो जॅकच्या भूमिकेतील जॉनी डेप  नेहमीच सर्वांना भावत आला आहे. त्याचे चालणे-बोलणे, त्याचा विक्षिप्तपणा पडद्यावर आनंदनिर्मिती करतो.   त्याच्या वाटेत येणारे इतर समुद्री चाचे (Pirates) आणि त्यांचा गंमतीदार संघर्ष पाहणे मनोरंजक असते. सर्वसामान्यपणे चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखेला तीच्यावर प्रेम करणारा किंवा आवडणारा जोडीदार नेमून देण्याची परंपरा जगभरात सर्वत्रच आहे. हा चित्रपट मात्र या परंपरेलाच छेद देतो. या कथेतील जॅक स्पॅरोला नायिका नाही, ब्लॅक पर्ल नावाचे जहाज हीच त्याची नायिका. पण ही नायिका नेहमीच त्याच्यापासून दुरावलेली. त्यामुळे रुढार्थाने तो ‘नायक’ नाही; म्हणजेच ‘न-नायक (Anti Hero)'! या लुटारूला जमिनीवर राहण्याच्या कल्पनेचा देखिल तिटकारा आहे, इतकं सागरी जिवनावर तो प्रेम करतो. खरंतर ‘ब्लॅक पर्ल’चे मूळ नाव ‘विकेड वेंच’. मूळ व्यापारी असलेले हे जहाज कॅप्टन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली लुटारूंचे जहाज बनते.
पुढे तेच जहाज शापीत बनते. या विलक्षण जहाजाचा कप्तान म्हणून मिरवण्याची इच्छा असलेला आपला अवलिया जॅक, ते जहाज आणि पर्यायाने समुद्रावर सत्ता राखू इच्छिणारा समुद्री लुटारू ‘हेक्टर बर्बोसा’ यांच्यातील संघर्ष समुद्राच्या लाटांप्रमाणेच निरंतर चालणारा. इतकं काय आहे या ‘ब्लॅक पर्ल’ नावाच्या जहाजात की ज्याच्यासाठी अत्यंत स्वार्थी, संपत्तीचा लोभी जॅक हाती येऊ शकणारे धन, सुख लाथाडून या जहाजावर प्रेम करतो?
     संपूर्ण काळ्या रंगातील जहाजाचे शिडदेखिल काळेच आहे. चित्रपटातील ‘प्लाईंग डचमॅन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या जहाजाला केवळ ब्लॅक पर्लच मागे टाकू शकेल अशी तिची ख्याती. म्हणूनच कॅप्टन जॅक स्पॅरो आपल्या जहाजाला कोणाच्याही हाती न लागणारे या अर्थाने “Nigh Uncatchable” म्हणतो. एलिझाबेथ स्वान या पात्राने ब्लॅक पर्लविषयी विचारल्यावर तो म्हणतो....
        “फक्त स्पेनच नव्हे, तर संपूर्ण महासागर...संपूर्ण जग. जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपण जातो. हेच खरे जहाज असते. केवळ बाहेरून दिसणारी जहाजाची रचना, डेक आणि शीड हे जहाज नसतं. ही रचना फक्त जहाजाची गरज असते. पण खऱ्या अर्थाने जहाज काय आहे- ब्लॅक पर्ल काय आहे..... तर एक ‘स्वातंत्र्य’!”
संपूर्ण चित्रपटात अनाकलनीयपणे वावरणाऱ्या जॅकचे ब्लॅक पर्लवर का प्रेम आहे हे त्याच्या या संवादांनी कळून येते. त्याच्यासाठी हे जहाज म्हणजे स्वातंत्र्य आहे. हीच स्वातंत्र्याची कल्पना त्याला स्वत:चा जीव धोक्यात घालून संघर्ष करण्यास भाग पाडते. 
    या कथानकातील आणखी एका प्रसंगावरून जॅकचे ‘ब्लॅक पर्ल’वरील प्रेम दिसून येते. मोठ्या खटपटीनंतर जॅकला  एक चमत्कारीक ‘होकायंत्र’  मिळते.
परंतु या होकायंत्राची सुई उत्तर दिशेला स्थिर होण्याऐवजी भलतीकडेच वळते. त्यातील अमानवीय शक्तींमुळे ज्याच्या हाती हे यंत्र असेल त्याला मनापासून हव्या असलेल्या गोष्टीच्या दिशेने या होकायंत्राची सुई वळते. एलिझाबेथ स्वान या नायिकेच्या हातात हे होकायंत्र दिल्यावर ते यंत्र तिचा प्रेमी असलेल्या विल टर्नरचा मार्ग दाखवतो. मात्र जॅकच्या बाबतीत थोडे वेगळे घडते. ब्लॅक पर्ल हातातून निसटल्यानंतर जॅकच्या हाती जेव्हा हे होकायंत्र येते तेव्हा ती सुई जॅकची प्रेमिका ‘ब्लॅक पर्ल’ या जहाजाचीच दिशा दाखवते. 
        जॅकचे ब्लॅक पर्लवरील प्रेम सर्वज्ञात आहे, अगदी त्याच्या शत्रूंनाही हे ठाऊक आहे. या प्रेमामुळेच तो कित्येकदा अडचणीत आलाय. . फ्लाईंग डचमॅन या जहाजाचा भयानक कप्तान डेव्ही जोनस् समुद्रतळाशी असलेल्या ब्लॅक पर्लला वर काढण्याचे आमिष जॅकला दाखवतो. इतकेच नव्हे तर तेरा वर्षांसाठी ब्लॅक पर्लचे कप्तानपदही देण्याचे आश्वासन देतो. मात्र या बदल्यात जॅकने फ्लाईंग डचमॅन जहाजावर शंभर वर्षे गुलाम म्हणून काम करावे असा पेच घालतो. ब्लॅक पर्लच्या प्रेमात आकंठ बुडालेला जॅक या अजब आणि अपमानास्पद सौद्यालाही होकार देतो. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी अनेकवेळा स्पॅरोच्या शत्रूंनी ब्लॅक पर्ल परत मिळवून देण्याचे आमिष दाखवले आहे.

         ‘जॅक स्पॅरो’ आणि त्याचे ‘ब्लॅक पर्ल’ जहाज या खरंतर काल्पनिक गोष्टी. परंतु आपल्या स्वच्छंदपणावर, स्वातंत्र्यावर मनापासून प्रेम करणारी मंडळी आपल्या आजूबाजूलाही आढळतात. प्रसंगी संपत्ती, सुखालाही ते लाथाडतात. त्यांचे निर्णय सर्वसामान्य जीवनाच्या कसोटीवर टिकणारे नसतात, परंतु त्यांना नेमकेपणाने ठाऊक असते की आपण कशासाठी आपल्या आयुष्याची किंमत मोजत आहोत. इतरांच्या दृष्टीने हे लोक मानवी भावभावना नसलेल्या वाटतील परंतु ते देखील ‘प्रेम’ ही भावना जाणतात... त्याला जपतात. ते स्वत:वर प्रेम करतात, स्वत:च्या स्वातंत्र्यावर प्रेम करतात. या  अशाच स्वच्छंदी विचारांच्या व्यक्तींचे प्रतीनिधीत्व जॅक स्पॅरो करतो. 
     या चित्रपटाचा पाचवा भाग पाहील्यानंतर ब्लॅक पर्लचा समुद्री प्रवास संपत आल्याचे जाणवते. परंतु या चित्रपटाने आतापर्यंत मिळवलेले यश पाहता, जॅक स्पॅरो पुन्हा येईल याची खात्री आहे. पुन्हा पाहता येईल जॅक स्पॅरो आणि ‘ब्लॅक पर्ल’ची प्रेम कहाणी.


- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)


Wednesday, March 4, 2020

उत्सव गणरायाच्या विवाहाचा!

     शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय; कैलासावरील हे लहान आणि सुखी कुटुंब! सर्वसामान्यपणे मुले मोठी झाल्यावर त्यांचा विवाह करणे ही मात्यापित्यांची इच्छा असते. भगवान शंकर आणि पार्वतीलाही तशीच इच्छा वाटणे स्वाभाविकच आहे. शिवपुराणातील एका कथेनुसार एकदा गणेश आणि कार्तिकेय हे दोघेही, ‘कोणाचा विवाह आधी होणार?’ असे म्हणून वाद घालू लागले. आपल्या मुलांचा वाद संपावा म्हणून शंकर-पार्वतीने त्यांना संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा जो कोणी प्रथम पूर्ण करेल त्याचा विवाह आधी होईल, असे सांगितले. कार्तिकेय लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेला. चतुर गणपती बाप्पाने मात्र आपल्या आई-वडीलांना एका आसनावर बसवून मनोभावे पूजा केली, प्रदक्षिणा घातली आणि आपल्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शंकर-पार्वतीला हे रुचले नाही. परंतु गणरायाने  वेद आणि शास्त्रांचे दाखले देऊन ‘जो कोणी आपल्या मातापित्यांना प्रदक्षिणा घालेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळेल’ असा युक्तिवाद केला. गणेशाच्या या बोलण्यावर शंकर-पार्वती निरुत्तर झाले. हा सारा प्रसंग ब्रम्हदेवांच्या कानावर गेला. ते गणेशाच्या बुद्धिचातुर्याने अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्या दिव्य रूपाच्या दोन कन्या ‘सिद्धी’ आणि ‘बुद्धी’ यांचा विवाह गणेशासोबत करण्याचा निश्चय केला. पुढे गणपतीला सिद्धीपासून ‘क्षेम’ आणि बुद्धीपासून ‘लाभ’ असे दोन पुत्रही प्राप्त झाले. या सगळ्या घटनाक्रमांत कार्तिकेय कुठेच नव्हता. काही काळाने पृथ्वी प्रदक्षिणा करून कार्तिकेय परत आला, तेव्हा देवर्षी नारदांकडून गणपतीचा विवाह झाल्याची वार्ता कळली. कार्तिकेय रागावला, त्याने आपल्या कुटूंबाचा त्याग करण्याचा निश्चय केला. गणेशाच्या विवाहाच्या कथा सांगणाऱ्या अनेक कथांपैकी ही एक पुराणकथा.         
विवाहाच्या सर्व विधींमध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या गणपती बाप्पाला आपली विवाहाची इच्छा पूर्ण करताना आलेल्या नाना अडचणी या कथेत पहायला मिळतात. पुराणकाळात कठीण ठरलेला हा विवाह आधुनिक काळात मात्र सहजसाध्य ठरलाय. होय! रायगड जिल्ह्यातील एका गावाने गणेशाच्या विवाहाची जबाबदारी उचललीय. तीदेखील नित्यनेमाने!
 रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीलगत असलेल्या उरण तालुक्यातील पिरकोन हे एक ऐतिहासिक ठेवा असलेले गाव. गावातील सुप्रसिद्ध मारूती मंदिरासमोर पश्चिमाभिमुख गणेश मंदिर आहे. साध्या कौलारू छप्पराचे जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेले हे मंदिर. मंदिरात सध्या गणेशाची संगमरवराची सुंदर मूर्ती आहे. इथल्या पाटील कुटूंबियांचे पूर्वज धर्मा पाटील व नागू पाटील यांनी १८८४ साली हे मंदिर बांधल्याची नोंद आहे. शतकांपूर्वीच्या या मंदिरात फाल्गुन शुद्ध दशमी शके १८०६ रोजी सिद्धीविनायक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजतागायत या तिथीला श्रीगणेशाचा उत्सव साजरा होतो. या उत्सवासाठी ‘अर्जुन कमळ्या’ यांनी ८ मण तर ‘बाळा धर्मा’ यांनी ४ मण भाताची जमिन दान केल्याचे सांगण्यात येते. गावातील पाटील कुटूंबिय साल पद्धतीने उत्सव करतात. यावर्षी हा उत्सव तिथीप्रमाणेच ५ व ६ मार्च रोजी साजरा होणार आहे. सर्वत्र ‘माघ शुद्ध चतुर्थीला’ येणारी गणेश जयंती आणि ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थी’ला गणेशोत्सव साजरा होत असतो. पिरकोन गावात या उत्सवांसह ‘फाल्गुन शुद्ध दशमी व एकादशी’ हे आणखी दोन दिवस साजरे होतात.
या दिवशी सकाळी गणेशाचे पूजन होते. दिवसभर भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याच दिवशी गणपती बाप्पाच्या विवाहाची लगबग सुरू होते. या  परिसरात लग्नाच्या आदल्या दिवशीची हळद  प्रसिद्ध आहे. या रिवाजाप्रमाणेच गणेशाच्या मूर्तीलाही हळद लावली जाते. हा संपूर्ण दिवस गणरायाच्या हळदी कार्यक्रमाचा. फाल्गुन शुद्ध एकादशीचा दिवस गणेशाच्या विवाहाचा. मानवी रितीरिवाजाप्रमाणे चालणाऱ्या या विवाहसोहळ्यातील ‘मुहूर्त’ दैवी परंपरेला शोभेल असाच  आहे. एकादशीच्या रात्री बाराच्या मुहूर्तावर  गणेशाचा विवाह संपन्न होतो. एका आचणीमध्ये साडी, हिरव्या बांगड्या, नारळ, गूळ-खोबऱ्याची वाटी, दागिने, हळद कुंकू घेऊन नवरीची जय्यत तयारी होते. यानंतर समोर रिद्धी-सिद्धी कल्पून अंतरपाट धरले जाते. शेवटी मंगलाष्टके गाऊन मंगलमूर्तीचा विवाह पार पडतो. कोणे एके काळी खटपटीने झालेला गणेशाचा  विवाह प्रतिकात्मक रुपात नित्यनेमाने संपन्न होतो. 
या थोड्या वेगळ्या परंपरांप्रमाणेच गणेशाच्या विवाहकथाही वेगवेगळ्या आहेत. आपल्याकडे विवाहित आणि दोन पत्नी असणारा गणेश दक्षिणेत मात्र ब्रह्मचारी आहे. तिथे गणेशासोबत सिद्धी-बुद्धी दाखवल्या आहेत, पण त्यांना गणेशाच्या पत्नी न मानता सकारात्मक शक्ती मानल्या जातात. गणेश मूर्तीसोबत असलेल्या या स्त्रियांचे अंकन लहान स्वरूपात असल्याने काही ठिकाणी त्यांना दासीही समजले जाते. प्रांतानुसार गणेशाच्या पत्नींची नावेही बदलत जातात. उत्तर प्रदेशात त्या रिद्धी आणि सिद्धी आहेत.  शिवपुराणात सिद्धी, बुद्धी आहेत.  तर ब्रह्मवैवर्तपुराणात सिद्धी आहे, पण बुद्धीची जागा ‘पुष्टी’ नावाच्या सुंदर कन्येने घेतली आहे. मत्स्यपुराणात रिद्धी आणि बुद्धी आहेत. कधी कधी त्याचा विवाह सरस्वतीशी, तर कधी शारदेशी झाल्याचे मानले जाते. बंगालमध्ये तर दुर्गापूजेच्या वेळी गणपतीचा विवाह ‘कल बो’ या देवतेशी केला जातो. बंगाल असो वा महाराष्ट्र... आपल्या देवतांना मानवी रुपात कल्पून त्यांचे मानवाप्रमाणे सोहळे साजरे करण्याची परंपरा सर्वत्रच आढळते. या सण, उत्सवांच्या माध्यमातून आपल्या आराध्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न भक्तगण करित असतात. गणेश विवाहाच्या पिरकोनमधील अनोख्या परंपरेतून हेच पहायला मिळते.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Monday, March 2, 2020

बॉम्बे डाक ते बॉम्बे डक


“तू धरती पे चाहे जहा भी रहेगी,
तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा...”
      कुमार सानू-अलका याज्ञिक या द्वयींच्या सुवर्णकाळातील हे सुप्रसिद्ध गीत. डोक्याला पट्टी बांधलेल्या रांगड्या सनी देओलला नाचवण्याचा करिष्मा करणारा हा ‘जीत’पट. आपले डोळे बंद असतानाही आपल्या नायिकेला ओळखण्याचा दावा या गीतातला नायक करतो. या नायकाच्या म्हणण्याप्रमाणे  डोळे बंद केल्यानंतरही एखाद्याचे अस्तित्व खरंच जाणवू शकते का? याचे उत्तर आपण जाणतोच. आपल्या सभोवताली अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यांची ओळख डोळे बंद असतानाही होऊ शकते. काही गोष्टींच्या ओळखीसाठी त्यांचा गंधच पुरेसा असतो.
समुद्री जगतातील असाच एक जीव आहे, जो धरतीवर कुठेही असला तरी त्याच्या ‘खुशबू’(!) वरून लगेच ओळखू येतो. तो जिवंत, बर्फात टिकवलेला किंवा वाळलेला; कसाही असो, लक्ष वेधतोच. या तिन्ही अवस्थांत केवळ वासानेच समोरच्याला आपली दखल घ्यायला लावणारा हा समुद्री जीव म्हणजे ‘बोंबील’.
पक्षी नसूनही बॉम्बे डक (Bombay Duck) या वेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या माशाची नामकरण कथाही थोडी हटकेच आहे. फारूख धोंडी यांच्या 1990 सालच्या ‘बॉम्बे डक’ पुस्तकात या नावाचा उल्लेख आलाय. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरूवातीच्या दिवसांतील ही कथा आहे. त्यावेळेस मुंबईतील मासळी रेल्वे मार्गाने भारताच्या इतर भागात पोहोचवण्यास सुरूवात झाली होती. सुकवलेले बोंबील पेट्यांमध्ये भरून त्यांचे पार्सल वितरणासाठी पाठवले जायचे. या पेट्यांवर रेल्वेची ओळख म्हणून बॉम्बे डाक (Bombay Dak) असे लिहले जायचे. पुढे या पेटीवरच्या नावानेच आतल्या माशाला ओळखले जाऊ लागले, ज्याचे कालांतराने बॉम्बे डक असे नुतनीकरण झाले. या कथेसारख्याच बोंबील माशाच्या नामांतराच्या अनेक सुरस कथा आहेत. चमत्कारिक कथांनी भरलेल्या या माशाचे जीवनही तसेच आहे. नावात डक(Duck) असलेला हा जीव प्रत्यक्षात ‘लिझार्ड’ (Lizard) नाव असलेल्या माशांच्या जातकुळीतला आहे.  त्याचे शास्त्रीय नाव हर्पेडन नेहरीयस (Harpadon nehereus). त्याला काही ठिकाणी बम्मेलो(bummalo) म्हणूनही संबोधले जाते.
    इतर माशांपेक्षा थोडे विचित्र रूप असणाऱ्या बोंबलाला भारतीय समुद्रातील त्याच्या अनियमित वितरणामुळे ‘विचित्र मासा’(Strange Fish) म्हटले जाते. महाराष्ट्रानंतर तो थेट लक्षद्वीप, बंगालच्या उपसागरात आढळतो. चिनच्या दक्षिणेकडील भागातही त्याचा आढळ आहे. सरासरी वीतभर लांबीचे असणारे हे मासे फुटाहून अधिक लांबीचे आढळल्याची नोंद आहे. पाण्यात संचार करताना दोन्ही बाजूने चपटाकार शरीराचा असणारा हा मासा पाण्याबाहेर मात्र दंडगोलाकार भासतो. फिक्कट करड्या रंगाच्या या माशाच्या शरीरात नव्वद टक्क्याहून अधिक पाणी असते. त्यामुळे त्याचा संपूर्ण कारभार (अर्ध)पारदर्शक असतो. अपृष्ठवंशीय वर्गातील काही प्राण्यांसारखे लवचिक शरीर हे बोंबीलाचे वैशिष्ट्य. ‘शेंबडे बोंबील, गडगडे बोंबील’ ही त्याच्या याच वैशिष्ट्याचे वर्णन करणारी काही स्थानिक भाषेतील नावे. कणाहीन भासणारा हा मासा समुद्रात कसा पोहत असेल असेल, असा प्रश्न त्याला पाहून पडू शकतो. परंतु या शरीरावरील परांच्या साह्याने खोल समुद्रातून उथळ भागाकडे त्याचे येणे जाणे नेहमीच चालू असते. अंधाऱ्या समुद्रीतळाकडून पृष्ठभागाकडे येताना या माशाच्या सवयीच्या असणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेत वाढ होत जाते. यावरील उपाय म्हणून त्याच्या लहानशा डोळ्यांवर संरक्षक पातळ पडदाही असतो.
    नेहमी आश्चर्यकारक भाव असणारा त्याच्या जबडा रूंद असून त्याचा खालचा भाग पुढे आलेला असतो. या जबड्यातील लहान लहान दातांच्या साह्याने त्याला आपले भक्ष पकडणे शक्य होते.
हे मासे वर्षातून सहावेळा अंडी देतात. समुद्रतळाशी राहणारे हे जीव काहीवेळेस खोल समुद्रातून किनाऱ्यांकडे येतात. विशेषत: पावसाळी ऋतूत  नद्यांच्या त्रिभूज प्रदेशानजिक हे मासे अन्नाच्या शोधांत समूहाने येत असतात.
     बोंबील हा मासा मांसाहारी लोकांच्या अन्नाचा प्रमुख भाग आहे. ओल्या आणि सुक्या दोन्ही स्वरूपात त्याचा वापर होत असतो. मानवी शरीरातील उतींच्या वाढीसाठी आणि दुरूस्तीसाठी आवश्यक प्रथिने या माशामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्याचबरोबर अतिरिक्त रक्तस्राव थांबवण्यासाठी, हृदयरोगाची शक्यता कमी करणारे ओमेगा-3 हे स्निग्धाम्ल यात असते. तसेच या माशापासून अ जीवनसत्वही बऱ्यापैकी मिळते. इतर माशांच्या तुलनेत बोंबीलामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने अ‍ॅनिमिया असणाऱ्यांना तो उपयुक्त ठरतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, नख, केस, त्वचा यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक बोंबलामध्ये भरपूर प्रमाणात असतात. बोंबील माशाच्या शरीरातून मिळणाऱ्या तेलाचा वापर वेदनाशामक औषंधामंध्ये केला जातो.
या सर्व कारणांमुळेच हा मासा नेहमीच मासेमारांच्या निशाण्यावर राहतो. साधारणत: ‘डोल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या जाळ्याद्वारे या माशाची पकड केली जाते. परंतु अधिक हव्यासापोटी यांत्रिक बोटी, अवेळ मासेमारी, पर्ससीन नेट यांचा मार्ग अवलंबला जातो.एकीकडे ‘हमको तुमसे प्यार हुवा है...” म्हणत खवय्ये त्याचा फडशा पाडत सुटलेत, तर हे जीव मात्र ,“जीना दुश्वार हुवा है...”चा आर्त सूर आळवत आहे. समुद्राचे जल-तल बिघडवणाऱ्या माणसामुळे तर बोंबलांसारख्या कित्येक जीवांची बोंबच झाली आहे. केवळ वासानेच आपले लक्ष वेधणाऱ्या बोंबलांच्या अधि‘वासा’कडेही यानिमित्ताने लक्ष वेधावे हीच अपेक्षा.

-  तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(सदर लेख रयत विज्ञान पत्रिका सप्टेंबर 2020 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...