Search This Blog

Monday, July 16, 2018

वीरगळ : वीरांचे दगड

वीरगळ : वीरांचे दगड
(नवे-गांव आंदोलन मासिकाच्या ‘दगडांच्या देशा’ विशेषांकात प्रसिद्ध लेख)

      रानेवने, गिरीदुर्गांच्या अनघड वाटा असोत की खेडोपाड्यातल्या मळलेल्या वाटा असोत, या मार्गाने निरूद्देश भटकत राहणाऱ्या मुसाफीरांना नेहमीच खुणावणाऱ्या काही गोष्टी असतात. या वरकरणी मूक आणि निर्जीव भासणाऱ्या गोष्टी भटक्यांशी बोलतात देखील. राकट-कणखर आणि दगडांच्या मानल्या जाणाऱ्या महराष्ट्रदेशी खेड्यांच्या वेशीजवळ, मंदिरांजवळ असेच मूक पण इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंगांबद्दल भाष्य करणारे ‘दगड’ आढळतात. कित्येकदा अशा कोरीव दगडांवरील शिलापट आपण कुतूहल म्हणून पाहतो आणि नंतर विसरूनही जातो. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील हे महत्त्वपूर्ण दगडी पुरावे दुर्लक्षामुळे कालांतराने मातीत मिसळून जातात. 
 भारतात प्राचीन काळापासून स्मृती जपण्यासाठी स्मारके उभारण्याची प्रथा आहे. समाधी, वृंदावन, स्मृतीस्तंभ, देऊळ, शिवलिंग असे विविध प्रकार यात आहेत. असाच एक चित्रांकीत स्मृतीदगड म्हणजे ‘वीरगळ’.
आता हे ‘वीरगळ’ म्हणजे काय?
या दगडाला एवढे महत्त्व का द्यावे?
 “एखाद्या शूरवीरास कोणत्या कारणास्तव वीरगती प्राप्त झाली आहे त्याचे चित्रण ज्या शिळेवर कोरले जाते तीला ‘वीरगळ’ म्हणतात.” 
वीरगळाला इंग्रजीत  Hero Stone अथवा Stone Image असेही म्हटले जाते. वीरगळ हा शब्द कन्नड भाषेतील ‘वीर-कळ’ किंवा ‘वीर कल्लू’ या शब्दावरून तयार झाला आहे. वीर-कळ म्हणजेच ‘वीरांचा दगड’. उत्तर भारतात त्याला ‘वीरब्रम्ह’ तर केरळात त्याला ‘तर्रा’ असे म्हणतात.
      युद्धात कामी आलेल्या योद्ध्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा वीरगळ उभारल्या गेल्या आहेत. स्तंभरूपी वीरगळावर चौकटींमध्ये वीराच्या आयुष्यातील प्रसंग कोरलेले असतात. साधारणत: खालच्या चौकटीत मरून पडलेला वीर तर मधल्या खणात अप्सरा ह्या वीराला सन्मानाने घेऊन जाताना दिसतात. त्याच्या वरच्या कप्प्यात नंदी, शिवलिंग, पूजा विधी सांगणारा ब्राम्हण व शिवलिंगाची पूजा करणारा वीर, तर सर्वात वरच्या खणात कलश म्हणजे वीराचे कैलाश गमन दाखवलेले असते. कलशाच्या दोन्ही बाजूस चंद्र-सूर्य कोरलेले असून याचा अर्थ जो पर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत तो पर्यंत ह्या वीराची किर्ती कायम राहील हे यातून सांगायचे असते.
 सामान्यत: चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या काळात अधिकाधिक वीरगळ तयार झाल्याचे आढळते. परंतु सर्वच वीरगळ या राजवटीतील नाहीत. शिलाहार, कदंब, यादव या राजवटीतही असे दगड कोरले गेले आहेत.वसईजवळील सोपारा (पूर्वीचे नाव शूर्पारक) येथे प्राचीन बुद्धस्तूपाभोवती सहा वर्षापूर्वी केलेल्या पुनरउत्खननात लहान भांडी, नाणी, लहान स्तूप, बुद्धमुर्ती सापडल्या होत्या. या सापडलेल्या वस्तूंमध्ये एका वीरगळाचाही समावेश होता. या परिसरात आढळलेल्या बऱ्याचशा वस्तू सम्राट अशोकाच्या काळातील आहेत. त्यामुळे हे वीरगळदेखील इसवी सनापूर्वीच्या काळातील असण्याची शक्यता आहे.(दुर्दैवाने अजूनही हे वीरगळ दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे.)
     आपल्या देशात वीरगळांचे विविध प्रकार आहेत. एक ते बारा फुट इतकी उंचीतील विविधता यात आढळते. सामान्य सैनिक, सेनापती, प्रधान, राजा यांच्या दर्जाप्रमाणे या शिल्पपटांमध्ये बदल होत जातात. या शिल्पपटांवर वीराच्या युद्धप्रसंगाचे चित्रीकरण केले जाते. यातील युद्धप्रसंगांमध्येही विविधता असू शकते. वीराने वापरलेली शस्त्रे, वाहन यानुसारही चित्रीकरण असते. घोडेस्वार, हत्तीस्वार, रथारूढ वीरही पहायला मिळतात. नौकांच्या साह्याने केलेले आरमारी युद्धही या दगडांवर कोरले गेले आहे.
यातील काही वीरगळांवर वीराबरोबरच वीरपत्नीही दाखवलेली असते. कधी कधी वीरगळांवर काटकोनात दुमडलेला, मनगटापर्यंत चुडा भरलेला हाताचा पंजा दाखवतात. याला ‘भडखंबा’ म्हणतात. हा हात सतीचा असल्याने त्याला सतीशिळा किंवा सतीचे वीरगळ असेही म्हटले जाते. महाड येथील विन्हेरे गावात, नवी मुंबईजवळील पिरकोन येथे अशा सतीशिळा आढळल्या आहेत. वीरांच्या इतिहासातील सतीप्रथेची काळी किनार यानिमित्ताने दिसून येते.
   तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, कदंब, यादव यांसारख्या राजवटी राज्य करत होत्या, ठाणे-रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर-सातारा-पुणे परिसरात ‘शिलाहार’ राजवट होती. त्यांच्या राज्यात प्रत्येक गावाला स्वायत्तता होती असे संदर्भ आढळतात. गावाच्या चरितार्थासाठी पशुधन महत्त्वाचे साधन होते. गाय हे उत्पन्नाचे साधन असल्याने गाईगुरांच्या कळपांवरून व्यक्तींची व गावाचीही श्रीमंती मोजली जायची. गाईंचे दान हे मोठे दान मानले जायचे. सुमारे तेराव्या शतकाच्या सुरूवातीस यादव आणि शिलाहारांमध्ये युद्ध पेटले. हे युद्ध अनेक वर्षे चालले. त्याचबरोबर तेराव्या शतकानंतर उत्तरेकडून मुस्लिम आक्रमणे महाराष्ट्रात होऊ लागली.(काही वीरगळींच्या रचनेवरून हे स्पष्टही होते.) रोजच्या रोज चकमकी होऊन लूटमार व्हायची. या लूटमारीत गाई-गुरे पळवली जायची. त्यावेळी गोरक्षण हे पवित्र मानले जायचे. गोधनाच्या सुरक्षेसाठी नेमलेला गुराखी गाईगुरांच्या रक्षणासाठी जंगली प्राण्यांशी व लुटारूंशी लढताना प्राण पणाला लावून लढत असे, या कामात त्याला मरण आल्यास मोठ्या सन्मानाने त्याचे वीरगळ रुपातील स्मारक बनवले जात असे. या स्मारकामध्ये गायीचे शिल्प असते अशा वीरगळांना ‘गोवर्धन वीरगळ’ म्हणतात.
    वीरांच्या दगडांवरील कलात्मकताही वैशिष्ट्यपूर्ण असते. एकसार-बोरीवली येथे असेच वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ आहेत.यातील दोन शिल्पांवर  जमिनीवरील  युद्ध तर दोन शिल्पपटांवर नौकायुद्धाचे चित्रण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कलेच्या बाबतीत अशी अप्रतिम वीरगळ नाही.हत्तीदळ पायदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि नाविकदल अशा चारही दळांच्या वापराचे सूक्ष्म चित्रण यात आहे.या वीरगळांच्या देखणेपणाचा कळस म्हणजे  त्यावरील आकर्षक कलश. कलशस्वर्गरोहणाचे प्रतिक असलेला कलश सुंदर अप्सरा घेऊन जात असल्याचे चित्र दिसते.  चार चौकटींमधून कोरलेले युद्धप्रसंगाचे चित्रण कल्पकता आणि कलात्मकता दोघांचाही उच्च संयोग दर्शवतो. नौकायुद्ध यातील व्यक्तींची वस्त्र प्रावरणे, अलंकार, वाद्ये याबाबतीतही अतिशय बारकाईने काम केले आहे. काळाच्या ओघात वीरगळाची थोडी झीज झाली असली तरी त्याच्या मूळ सौंदर्यात आणि भव्यतेत कमीपणा आलेला नाही, हे विशेष. एकसार(बोरीवली पश्चिम) गावातल्या या शिल्पांवर कोणतीही तिथी किंवा कोणाचेही नाव कोरलेले नाही.
   पुरातत्ववेत्ता हेन्री कझेन्सच्या मते  शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धाचे व त्यात वीरमरण पत्करलेल्या सोमेश्वराचे शिल्पचित्रण त्यात आहे.
‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख- वा.वि.मिराशी’ या पुस्तकातदेखिल एकसारचे विरगळ सोमेश्वराचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
  या दोन्ही तज्ञांना दुजोरा देत या विरगळांचे महत्त्व सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या ‘महाराष्ट्रातील विरगळ’ या पुस्तकात खूप चांगल्या रितीने विशद केले आहे
 आपल्या प्रदेशावरील संकटाशी लढताना वीराने गाजवलेल्या शौर्याचे प्रतिक या दगडांच्या रुपात आपल्यासमोर शेकडोंनी उभे आहेत. आपल्या इतिहासाचा समृद्ध वारसा या वीरगळांच्या निमित्ताने समोर येत आहे. आता गरज आहे ती या ऐतिहासिक वारशाच्या जतनाची. या अनाम वीरांनी दाखवलेल्या शौर्याची जाणीव ठेवून समाजाप्रती आपली बांधिलकी ठेवून असेच समाजकार्य पुढे चालू ठेवण्याची. हे दगड यापुढेही आपल्याला प्रेरणा देतील, समाजविघातक प्रवृत्तींविरूद्ध लढण्यासाठी.
चला सर्वांनी मिळून या ऐतिहासिक आणि समृद्ध वारशाला जपूया... आपल्या भूमीसाठी, आपल्या लोकांसाठी वीरमरण पत्करलेल्या या अनाम वीरांनाआठवणीत ठेवूया...
या मूक दगडांची भाषा जाणून घेऊया.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Thursday, July 5, 2018

मेस्सी जैसा कोई नही

मेस्सी जैसा कोई नही
समस्त फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खऱ्या अर्थाने रंगात येत असताना बलाढ्य मानल्या जाणाऱ्या संघांचा बेरंग व्हायची वेळ आली आहे. विजेतेपदाचे दावेदार आणि गत वर्षीचा विजेता संघ जर्मनी साखळीतच गारद झाला. तर गतउपविजेत्या अर्जेंटिनावरही स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की आलीय. अर्जेंटिनापाठोपाठ पोर्तुगाल आणि स्पेनचे संघही परतीच्या प्रवासाला लागलेत. मेस्सी आणि रोनाल्डो या स्पर्धेत यापुढे पहायला मिळणार नाहीत याची चाहत्यांना खंत तर आहेच, पण  मॅराडोनानंतर केवळ अर्जेंटीनाच नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावणारा मेस्सी पुढील विश्वचषकात खेळण्याची शक्यताही कमीच वाटते. त्या अर्थाने लिओनेल मेस्सीचा हा अखेरचा विश्वचषक. फुटबॉल या खेळावर अधिराज्य गाजवणाऱ्या या खेळाडूला जगज्जेत्या संघाचा कधीच भाग होता आले नाही ही सल त्याला कायम राहील. यंदाच्या विश्वचषकातील अखेरचा सामना गमावल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सर्व काही सांगून जात होते.

एका सामान्य कुटूंबातील मुलगा ते एक उच्च दर्जाचा फुटबॉलपटू हा त्याचा प्रवास कसा होता?

“जेव्हा तुम्ही या लहान मुलाला पाहता तेव्हा विचार करता की हा खूपच बुटका आणि अशक्त आहे, ह्याला फुटबॉल खेळताही येणार नाही. परंतु तो ज्या प्रक्रीयेतून घडलाय ते पाहता नक्कीच काहीतरी भव्य करेल!”
बारा वर्षीय लहानग्या लिओबद्दल नेवेल्स ओल्ड बॉईज क्लबचे प्रशिक्षक आद्रेयन कोरीयन यांनी पहिल्यांदा व्यक्त केलेले हे मत.
      लिओनेलचा जन्म अर्जेंटिनाचा. वडील एका फॅक्टरीत साफसफाईचं काम करत. 'नेवेल्स ओल्ड बॉईज' या क्लबमधून त्यान फुटबॉल जगतात पदार्पण केलं. चौथ्या वर्षापासून फुटबॉल हेच सर्वस्व बनलेल्या मेस्सीला बाराव्या वर्षीच अनपेक्षीत धक्का बसला. अचानक त्याच्या रक्तामधील संप्रेरकाची वाढ थांबली. त्याची उंची चार-साडेचार फुटापेक्षा अधिक वाढणार नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. उपचारासाठी महिन्याला अंदाजे 1500 डॉलर्स खर्च येणार असल्याचे सांगीतले गेले. या धक्क्याने कुटुंबावर आभाळच कोसळलं. फुटबॉलपटू बनण्याचं लिओचं स्वप्न नजरेसमोर धुळीस मिळत होतं. त्याच वेळी बार्सिलोना क्लबचे डायरेक्टर कार्लेस रेक्सेच यांचं मेस्सीकडे लक्ष गेलं. एकाग्रता, तीक्ष्ण नजर, चपळाई, वेग आणि क्षणात प्रतिस्पर्ध्याँना चकवण्याची ताकद या गुणांमुळेच बार्सिलोनानं दुर्धर विकारासह त्याला स्वीकारलं. या उपकारांची जाणिव ठेवून मोठ्या मोठ्या ऑफर्स ठुकरावत मेस्सी कायम बार्सिलोनाशी संलग्न राहिला. क्लब संस्कृतीशी फारशा परिचित नसलेल्या लोकांना त्याचे क्लबसाठी खेळणे स्वार्थीपणाचे वाटते. परंतु व्यावसायिक फुटबॉलमध्ये इतर राष्ट्रीय स्पर्धांपेक्षा क्लबांतर्गत लीग्जनाच महत्त्व असतं.

‘विंगर’ असलेल्या मेस्सीचं बलस्थान आहे ‘ड्रिबलिंग’ आणि ‘डॉजिंग’! चेंडू दोन्ही बाजूंनी खेळवत वेगाने गोलपोस्टच्या दिशेने धावणारा मेस्सी पाहीला की त्याच्या पायातील जादू दिसून येते.पेप गुआरडीओला या नावाजलेल्या प्रशिक्षकाच्या मतानुसार मेस्सी हा असा एकमेव खेळाडू आहे, जो चेंडू पायात नसताना ज्या वेगानं धावतो, त्यापेक्षा अधिक वेगानं तो चेंडू पायात घेऊन धावतो.  एक प्रकारची सहजता त्याच्या खेळात असते. सहसा डाव्या पायानं गोल मारणाऱ्या मेस्सीने आपल्या उजव्या पायावरही गेल्या काही वर्षांत मेहनत घेतल्याचं दिसून येतं. संधी मिळाली तर हेडरद्वारे गोल मारायलाही तो कधी चुकत नाही.
समोरून येणाऱ्या विरूद्ध संघाच्या बचावपटूंना चकवणारे त्याचे ‘डॉजिंग’चे कौशल्यही दैवी म्हणावे इतके अप्रतिम आहे. कधी कधी तर केवळ मेस्सीला रोखणे हाच उद्देश ठेवून काही संघ खेळताना दिसतात. या विश्वचषकातही असे दिसून आले. दुर्दैवाने मेस्सीला रोखण्याचे डावपेच यशस्वी झाले आणि त्याचे चाहते एका कौशल्यपूर्ण खेळाला मुकले. याच कौशल्याचा वापर करून त्याने बार्सिलोना क्लबला कित्येक वेळा विजेतेपद मिळवून दिलेत.
विक्रमी पाच वेळा त्याने फुटबॉल जगतातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘बलोन डी ओर’ पुरस्कारावर आपले नाव कोरलंय.
    राहता राहिलं त्याचं अर्जेटिनासाठीचं कर्तृत्व. मेस्सीने 2005 साली अर्जेंटीनाला एकहाती युथ विश्वचषक स्पर्धा जिंकून दिली. या स्पर्धेत त्याने गोल्डन बॉल आणि गोल्डन शूज हे दोन्ही पुरस्कार पटकावले. बीजींग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक, विश्वचषकाचे उपविजेतेपद मिळवून देण्यातही तो यशस्वी ठरलाय. संघ काही एकट्या-दुकट्याच्या खांद्यावर चालत नाही, पण मेस्सीनं तो चालवण्याचा प्रयत्न केलाय. आता बहुदा खांदेपालट व्हायची वेळ आलीय. मेस्सीला दुसरा मॅराडोना म्हटलं जायचं, पण तो पहिला मेस्सी आहे. फुटबॉल चाहत्यांनी मॅराडोनाला ‘एल दियोस’ म्हणजे देव अशी उपमा दिली आहे. तर मेस्सीलासुद्धा त्याचे चाहते ‘मसीहा’ (प्रेषित) मानतात.
केवळ अर्जेंटिनालाच नव्हे, तर संपूर्ण फुटबॉल जगतालाच तो अजूनही हवा आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा खेळ पाहणं नेहमीच आनंददायी होतं, यापुढेही काही काळ हा आनंद मिळावा हीच अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(वरील लेखातील काही भाग दैनिक कर्नाळा 6 जून 2018 च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

Wednesday, July 4, 2018

देवाचा गाव

देवाचा गाव
(उरण-पेण रस्त्यातील एक दैवी मार्ग)



उरणहून पेणकडे जाताना नेहमीचा रस्ता सोडून वशेणी गावाजवळून उजव्या हाताच्या वळणाकडे पाहीलं की ‘दादर’ असे लिहलेला एक  दिशादर्शक बाणाचा फलक दिसतो. या बाणाची आज्ञा पाळून वाट पकडली की एक पक्का डांबरी रस्ता आपले स्वागत करतो. रस्त्यावर टाकलेला कचरा चुकवत निघायचं. थोडंसच अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला पसरलेली खारजमिन दिसते. नाकाला खारा वारा झोंबू लागतो. मोकळ्या रस्त्यावर वाहनाने थोडा वेग घेताच समोर उरण आणि पेण तालुक्याला जोडणारा खाडीपूल समोर येतो. खारफुटीच्या हिरवाईने वेढलेला, दूरवर पसरलेला जलाशय आपल्याला थोडा वेळ थांबण्यासाठी खुणावतो. सूर्योदय-सूर्यास्त अशा दोन्ही वेळेस इथले सौंदर्य अप्रतिम भासते. या परिसरातील दृश्यश्रीमंतीच्या प्रेमात पडल्याने इथे शाहरूख खानने आपल्या ‘रईस’ चित्रपटातील काही भागाचं चित्रीकरण केले होते. या सौंदर्यांला सावधपणे न्याहाळत एक मोठे वळण घेऊन आपण उतरू लागतो. या मार्गाने उतरल्याबरोबर आधीच्या सभोवतालातील बदल जाणवतो. रस्त्यावर सांडलेली वाळू ही जाणीव अधिक तीव्र करते. चक्क रस्त्याला लागून पार्क केलेली एखादी होडी, वाळूचा(रेती) लहानसा ढीग आणि खारफुटीने वेढलेले रस्ते दिसतात.
फारशा रूंद नसणाऱ्या या रस्त्याच्या कडेला दलदलीच्या भागातील तुरळक वस्ती दिसू लागते. हा संतोषी पाडा. खारफुटीच्या हिरवाईने रंगलेल्या रस्त्यावरचा स्वप्नवत प्रवास संपून आपण जागे होतो, तोपर्यंत आपले वाहन एखाद्या खड्डयात आदळून कसेतरी सावरलेले असतो. खोल खड्डयांतून रस्ता चुकवतच आपल्याला पुढे जावे लागते.(कारण खड्डे चुकवायचा प्रयत्न केला तर रस्त्याच्या खालूनच वाहन चालवावे लागेल.) वाहनचालकाचं कौशल्य आजमवणारा प्रवास असाच चालू असताना, गावाची वस्ती सुरू होते. इथून पुढे आपण जे काही पाहतो, त्याला ‘दैवी दृश्य’च म्हणावे लागेल. तळ्याच्या काठावर असणाऱ्या रस्त्यावर पंधरा ते वीस गणपती कोणाचीतरी वाट पहात असल्यासारखे विराजमान झालेले- काही रंगीत तर काही पांढरे शुभ्र. आजूबाजूला काहीच नाही.
  नवख्या व्यक्तीला संभ्रमात पाडणारे हे दृश्य. पुढे जावं तर लहानशा शेतात एकाच आकाराचे पन्नासहून अधिक गणपती, तसेच पांढरेशुभ्र. हे ‘गणपती’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ‘ब्रँड’ म्हणून लोकप्रिय होत असलेल्या ‘पेणच्या गणेशमूर्ती’. सुमारे शंभर वर्षाची परंपरा असणारा ही कलाकृती. सुरूवातीला केवळ शाडूच्या असणाऱ्या या गणपतींनी काळाप्रमाणे बदलत ‘प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे’ रूप धारण केले आहे. या रस्त्यावरील जोहे- हमरापूर या गावांचा ही परंपरा टिकवण्यामागे आणि ब्रँड तयार होण्यात मोठा वाटा आहे. याच रस्त्याने पुढे जाऊन आपण जोहे गावात प्रवेश करतो. जागोजागी गणेशमूर्ती नेणारे लहान-मोठे ट्रक आपला प्रवास अधिक मंद करतात. या थांबत थांबत केलेल्या प्रवासात गणेशमूर्तींचे कारखाने अधिक जवळून पाहता येतात. साच्यातून मूर्ती काढण्यात मग्न झालेले, मांडी घालून फिरत्या पाटावरील गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवणारे अनेक कलाकार दिसतात.
बाहेरच्या वर्दळीशी देणं घेणं नसलेले, अंगावर प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे शिंतोडे उडालेले हे कलाकार या निर्जीव मूर्तीत प्राण ओतण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे वाटतात. काही ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया आणि घरातील लहान मुलेही कामाला हातभार लावताना दिसतात. इथल्या मूर्तीशाळा घरातच असतात आणि इथली घरे मूर्तीशाळेतच असल्यासारखी भासतात. या घरांच्या आतमध्ये, दरवाजात, ओट्यावर, पडवीत, अंगणात, माळ्यावर, रस्त्यावर  सर्वत्रच गणेशमूर्ती उभ्या असतात. अद्वैतात ‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी इश्वर वसलेला आहे’ असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याचे द्वैत रुप असेच असावे की काय? अशी शंका येते. पावसाळ्याच्या दिवसांत तर या गणेशमूर्तींचे कमी जागेतील व्यापून उरणे अधिकच जाणवते. या परिसरात गोऱ्या गोमट्या गणेशमूर्तींचे प्रमाण अधिक असले तरी अध्ये मध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या कलाकृतीही पहायला मिळतात. एकसारखेच दृश्य डोळ्यांसमोरून सरकत असताना अचानक समोर आलेली पाच-सहा फूटांहून अधिक उंचीची मूर्ती आपले लक्ष वेधते. एखादे शस्त्र धारण केलेली परंतु डोळ्यांत कृपाशिर्वाद देणारे भाव असणारी मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. ‘जय मल्हार’, ‘बाहुबली’, ‘बाजीराव पेशवा’ अशा ट्रेंडमध्ये असणाऱ्या गणेशमूर्तीही रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असतात. देवतांनी व्यापलेल्या या दैवी दृश्याने भारावून जात असतानाच अर्धवट काम झालेल्या, वाहतूक करताना मोडतोड झालेल्या गणेमूर्तीही आढळतात. पार्थिवतेची जाणिव करून देणारी ही दृश्ये पाहून दु:खही होतं, पण पुढे कधितरी हीच मूर्ती नवे साज चढवून तयार झालेली पाहीली की आनंदही होतो.
मातीला देवपण देणारी ही कला पाहीली, की कलेच्या देवतेचा या मूर्तीकरांवर विशेष आशिर्वाद असल्यासारखे वाटते.
गणेशाची विविध रुपे डोळ्यांसमोरून सरकत असताना वाहनांचा आवाज येत राहतो, सुरूवातीला हलका असणारा हा आवाज अधिक गडद होत जातो. मुंबई-गोवा महामार्ग जवळ आल्याचा तो संकेत असतो. सुमारे दहा किमीचा वळसा वाचवणारा, त्याचबरोबर एका वेगळ्या जगातून प्रवास घडवून आणणारा हा मार्ग. या दैवी मार्गाची निवड केल्यानेआपण सुदैवी ठरल्यासारखे वाटते. आपण पुढे जातो, मात्र पुन्हा याच मार्गाने परत यावे असे मनात ठरवूनच!

              - तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(सदर लेख दैनिक सकाळ, मुंबई आवृत्ती 4 जूलै 2018 मध्ये प्रसिद्ध झाला आहे)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...