Search This Blog

Monday, July 16, 2018

वीरगळ : वीरांचे दगड

वीरगळ : वीरांचे दगड
(नवे-गांव आंदोलन मासिकाच्या ‘दगडांच्या देशा’ विशेषांकात प्रसिद्ध लेख)

      रानेवने, गिरीदुर्गांच्या अनघड वाटा असोत की खेडोपाड्यातल्या मळलेल्या वाटा असोत, या मार्गाने निरूद्देश भटकत राहणाऱ्या मुसाफीरांना नेहमीच खुणावणाऱ्या काही गोष्टी असतात. या वरकरणी मूक आणि निर्जीव भासणाऱ्या गोष्टी भटक्यांशी बोलतात देखील. राकट-कणखर आणि दगडांच्या मानल्या जाणाऱ्या महराष्ट्रदेशी खेड्यांच्या वेशीजवळ, मंदिरांजवळ असेच मूक पण इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंगांबद्दल भाष्य करणारे ‘दगड’ आढळतात. कित्येकदा अशा कोरीव दगडांवरील शिलापट आपण कुतूहल म्हणून पाहतो आणि नंतर विसरूनही जातो. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील हे महत्त्वपूर्ण दगडी पुरावे दुर्लक्षामुळे कालांतराने मातीत मिसळून जातात. 
 भारतात प्राचीन काळापासून स्मृती जपण्यासाठी स्मारके उभारण्याची प्रथा आहे. समाधी, वृंदावन, स्मृतीस्तंभ, देऊळ, शिवलिंग असे विविध प्रकार यात आहेत. असाच एक चित्रांकीत स्मृतीदगड म्हणजे ‘वीरगळ’.
आता हे ‘वीरगळ’ म्हणजे काय?
या दगडाला एवढे महत्त्व का द्यावे?
 “एखाद्या शूरवीरास कोणत्या कारणास्तव वीरगती प्राप्त झाली आहे त्याचे चित्रण ज्या शिळेवर कोरले जाते तीला ‘वीरगळ’ म्हणतात.” 
वीरगळाला इंग्रजीत  Hero Stone अथवा Stone Image असेही म्हटले जाते. वीरगळ हा शब्द कन्नड भाषेतील ‘वीर-कळ’ किंवा ‘वीर कल्लू’ या शब्दावरून तयार झाला आहे. वीर-कळ म्हणजेच ‘वीरांचा दगड’. उत्तर भारतात त्याला ‘वीरब्रम्ह’ तर केरळात त्याला ‘तर्रा’ असे म्हणतात.
      युद्धात कामी आलेल्या योद्ध्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा वीरगळ उभारल्या गेल्या आहेत. स्तंभरूपी वीरगळावर चौकटींमध्ये वीराच्या आयुष्यातील प्रसंग कोरलेले असतात. साधारणत: खालच्या चौकटीत मरून पडलेला वीर तर मधल्या खणात अप्सरा ह्या वीराला सन्मानाने घेऊन जाताना दिसतात. त्याच्या वरच्या कप्प्यात नंदी, शिवलिंग, पूजा विधी सांगणारा ब्राम्हण व शिवलिंगाची पूजा करणारा वीर, तर सर्वात वरच्या खणात कलश म्हणजे वीराचे कैलाश गमन दाखवलेले असते. कलशाच्या दोन्ही बाजूस चंद्र-सूर्य कोरलेले असून याचा अर्थ जो पर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत तो पर्यंत ह्या वीराची किर्ती कायम राहील हे यातून सांगायचे असते.
 सामान्यत: चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या काळात अधिकाधिक वीरगळ तयार झाल्याचे आढळते. परंतु सर्वच वीरगळ या राजवटीतील नाहीत. शिलाहार, कदंब, यादव या राजवटीतही असे दगड कोरले गेले आहेत.वसईजवळील सोपारा (पूर्वीचे नाव शूर्पारक) येथे प्राचीन बुद्धस्तूपाभोवती सहा वर्षापूर्वी केलेल्या पुनरउत्खननात लहान भांडी, नाणी, लहान स्तूप, बुद्धमुर्ती सापडल्या होत्या. या सापडलेल्या वस्तूंमध्ये एका वीरगळाचाही समावेश होता. या परिसरात आढळलेल्या बऱ्याचशा वस्तू सम्राट अशोकाच्या काळातील आहेत. त्यामुळे हे वीरगळदेखील इसवी सनापूर्वीच्या काळातील असण्याची शक्यता आहे.(दुर्दैवाने अजूनही हे वीरगळ दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे.)
     आपल्या देशात वीरगळांचे विविध प्रकार आहेत. एक ते बारा फुट इतकी उंचीतील विविधता यात आढळते. सामान्य सैनिक, सेनापती, प्रधान, राजा यांच्या दर्जाप्रमाणे या शिल्पपटांमध्ये बदल होत जातात. या शिल्पपटांवर वीराच्या युद्धप्रसंगाचे चित्रीकरण केले जाते. यातील युद्धप्रसंगांमध्येही विविधता असू शकते. वीराने वापरलेली शस्त्रे, वाहन यानुसारही चित्रीकरण असते. घोडेस्वार, हत्तीस्वार, रथारूढ वीरही पहायला मिळतात. नौकांच्या साह्याने केलेले आरमारी युद्धही या दगडांवर कोरले गेले आहे.
यातील काही वीरगळांवर वीराबरोबरच वीरपत्नीही दाखवलेली असते. कधी कधी वीरगळांवर काटकोनात दुमडलेला, मनगटापर्यंत चुडा भरलेला हाताचा पंजा दाखवतात. याला ‘भडखंबा’ म्हणतात. हा हात सतीचा असल्याने त्याला सतीशिळा किंवा सतीचे वीरगळ असेही म्हटले जाते. महाड येथील विन्हेरे गावात, नवी मुंबईजवळील पिरकोन येथे अशा सतीशिळा आढळल्या आहेत. वीरांच्या इतिहासातील सतीप्रथेची काळी किनार यानिमित्ताने दिसून येते.
   तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, कदंब, यादव यांसारख्या राजवटी राज्य करत होत्या, ठाणे-रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर-सातारा-पुणे परिसरात ‘शिलाहार’ राजवट होती. त्यांच्या राज्यात प्रत्येक गावाला स्वायत्तता होती असे संदर्भ आढळतात. गावाच्या चरितार्थासाठी पशुधन महत्त्वाचे साधन होते. गाय हे उत्पन्नाचे साधन असल्याने गाईगुरांच्या कळपांवरून व्यक्तींची व गावाचीही श्रीमंती मोजली जायची. गाईंचे दान हे मोठे दान मानले जायचे. सुमारे तेराव्या शतकाच्या सुरूवातीस यादव आणि शिलाहारांमध्ये युद्ध पेटले. हे युद्ध अनेक वर्षे चालले. त्याचबरोबर तेराव्या शतकानंतर उत्तरेकडून मुस्लिम आक्रमणे महाराष्ट्रात होऊ लागली.(काही वीरगळींच्या रचनेवरून हे स्पष्टही होते.) रोजच्या रोज चकमकी होऊन लूटमार व्हायची. या लूटमारीत गाई-गुरे पळवली जायची. त्यावेळी गोरक्षण हे पवित्र मानले जायचे. गोधनाच्या सुरक्षेसाठी नेमलेला गुराखी गाईगुरांच्या रक्षणासाठी जंगली प्राण्यांशी व लुटारूंशी लढताना प्राण पणाला लावून लढत असे, या कामात त्याला मरण आल्यास मोठ्या सन्मानाने त्याचे वीरगळ रुपातील स्मारक बनवले जात असे. या स्मारकामध्ये गायीचे शिल्प असते अशा वीरगळांना ‘गोवर्धन वीरगळ’ म्हणतात.
    वीरांच्या दगडांवरील कलात्मकताही वैशिष्ट्यपूर्ण असते. एकसार-बोरीवली येथे असेच वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ आहेत.यातील दोन शिल्पांवर  जमिनीवरील  युद्ध तर दोन शिल्पपटांवर नौकायुद्धाचे चित्रण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कलेच्या बाबतीत अशी अप्रतिम वीरगळ नाही.हत्तीदळ पायदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि नाविकदल अशा चारही दळांच्या वापराचे सूक्ष्म चित्रण यात आहे.या वीरगळांच्या देखणेपणाचा कळस म्हणजे  त्यावरील आकर्षक कलश. कलशस्वर्गरोहणाचे प्रतिक असलेला कलश सुंदर अप्सरा घेऊन जात असल्याचे चित्र दिसते.  चार चौकटींमधून कोरलेले युद्धप्रसंगाचे चित्रण कल्पकता आणि कलात्मकता दोघांचाही उच्च संयोग दर्शवतो. नौकायुद्ध यातील व्यक्तींची वस्त्र प्रावरणे, अलंकार, वाद्ये याबाबतीतही अतिशय बारकाईने काम केले आहे. काळाच्या ओघात वीरगळाची थोडी झीज झाली असली तरी त्याच्या मूळ सौंदर्यात आणि भव्यतेत कमीपणा आलेला नाही, हे विशेष. एकसार(बोरीवली पश्चिम) गावातल्या या शिल्पांवर कोणतीही तिथी किंवा कोणाचेही नाव कोरलेले नाही.
   पुरातत्ववेत्ता हेन्री कझेन्सच्या मते  शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धाचे व त्यात वीरमरण पत्करलेल्या सोमेश्वराचे शिल्पचित्रण त्यात आहे.
‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख- वा.वि.मिराशी’ या पुस्तकातदेखिल एकसारचे विरगळ सोमेश्वराचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
  या दोन्ही तज्ञांना दुजोरा देत या विरगळांचे महत्त्व सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या ‘महाराष्ट्रातील विरगळ’ या पुस्तकात खूप चांगल्या रितीने विशद केले आहे
 आपल्या प्रदेशावरील संकटाशी लढताना वीराने गाजवलेल्या शौर्याचे प्रतिक या दगडांच्या रुपात आपल्यासमोर शेकडोंनी उभे आहेत. आपल्या इतिहासाचा समृद्ध वारसा या वीरगळांच्या निमित्ताने समोर येत आहे. आता गरज आहे ती या ऐतिहासिक वारशाच्या जतनाची. या अनाम वीरांनी दाखवलेल्या शौर्याची जाणीव ठेवून समाजाप्रती आपली बांधिलकी ठेवून असेच समाजकार्य पुढे चालू ठेवण्याची. हे दगड यापुढेही आपल्याला प्रेरणा देतील, समाजविघातक प्रवृत्तींविरूद्ध लढण्यासाठी.
चला सर्वांनी मिळून या ऐतिहासिक आणि समृद्ध वारशाला जपूया... आपल्या भूमीसाठी, आपल्या लोकांसाठी वीरमरण पत्करलेल्या या अनाम वीरांनाआठवणीत ठेवूया...
या मूक दगडांची भाषा जाणून घेऊया.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...