Search This Blog

Tuesday, December 25, 2018

मासा...फुग्यासारखा फुगणारा

मासा...फुग्यासारखा फुगणारा
   एका तारांकीत रेस्टॉरंटमध्ये आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा होतोय. ट्रीट म्हणून टेबलवर एका माशाचा विशेष पदार्थ येतो.  मेनुकार्डवर नजर टाकल्यावर तिथे दोनशे डॉलर्स लिहलेले दिसते.(भारतीय चलनात किती होतील हो?) ही किंमत पाहून पदार्थाची चव आणखीनच वाढते. खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणारे हे दृश्य. पण थोडं थांबा... या डिशवर ताव मारण्यापूर्वी हा पदार्थ खाऊन प्रतिवर्षी मरण पावणाऱ्यांच्या संख्येकडे  एकदा नजर टाका. हा पदार्थ ज्या माशापासून बनलाय त्या माशामध्ये अत्यंत जहाल विष आहे. तब्बल तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतरच एखाद्या शेफला या माशाचे पदार्थ तयार करण्याची परवानगी असते. आपल्या मित्राचा जन्मदिवस साजरा करण्याच्या आनंदात आपलाच ‘मरणदिवस’ साजरा होऊ शकतो, हे कळल्यानंतर आता तुमची प्रतिक्रिया काय? असले अन्न खाणे जीवावर बेतू शकणारे असले तरी कित्येक खवय्ये हा पदार्थ खाणे प्रतिष्ठेचे समजतात. जपानमधील अनेक रेस्टॉरंटमध्ये मिळणारा हा अत्यंत जोखमीचा परंतु तितकाच चवदार पदार्थ म्हणजे ‘फुगू’. फुग्यासारखा फुगणाऱ्या माशापासून हा पदार्थ तयार केला जातो.
       दोनशेच्या जवळपास प्रजाती असणाऱ्या या माशाच्या काही जाती भारतातही आढळतात. जगभरात पफर फिश(Puffer fish) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माशाचे स्थानिक नाव त्याच्या फुगणाऱ्या पोटावरून ‘केंड मासा’ असे पडलेय. या प्रजातीतील रंगीबेरंगी फुग्यांसारखे दिसणारे काही दुर्मिळ मासे अरबी समुद्रातून मार्ग भरकटून मुंबई व कोकण किनारपट्टीवर येण्याच्या घटना नेहमीच घडतात.   यातील टेट्राडॉन्टीडी (Tentraodontidae) कुटूंबातील डायकोटोमायक्टर निग्रोवर्डीस (Dichotomyctere nigroviridis) ही प्रजाती या परिसरात नेहमीच आढळते. जपानी लोक त्याला मिदोरी फुगू (Midori fugu) म्हणतात. हिरवट रंगाच्या शरीरावरील काळ्या ठिपक्यांच्या आकर्षक नक्षीचा हा लहानसा मासा मुंबईलगतच्या खाडीप्रवाहांमध्ये, खारफुटीच्या किनारी जलाशयांमध्ये आढळतो. त्याच्या पोटाकडील भाग पांढरा असून पर आणि शेपटाकडील भाग फिक्कट हिरव्या रंगाचा असतो.  त्याच्या चोचीसारख्या तोंडात चार दात असतात. शैवाल, लहान किटक यांसारखे अन्न तो खात असला तरी या चार दातांचा उपयोग करून शंख, शिंपले, कोळंबी यांसारखे मृदूकाय कवचधारी खाऊ शकतो. केंड माशाचे दात (महागाईसारखे!) सातत्याने वाढत असतात. त्यामुळे या वाढणाऱ्या दातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठीण कवचाच्या भक्ष्यांचा उपयोग तो कानशी(Grinder) सारखा करतो. या माशाच्या अंगावर खवले नसतात, याचाच राग म्हणून की काय हा मासा इतर माशांची खवले खातो. यातूनही त्याच्या शिवशिवणाऱ्या दातांना फायदा होतो. 
  
केंड माशांचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि अनोखे वैशिष्टिय म्हणजे फुग्यासारखे फुगणे. पाण्यातील जीव असूनही या माशांना वेगाने पोहता येत नाही. जीवाला धोका निर्माण झाल्यास त्यांना पळ काढणे जमत नाही अशा वेळी भरपूर पाणी पिऊन किंवा पाण्याबाहेर असताना हवा खाऊन आपले शरीर फुगवतात. एका माशाचे विचित्र चेंडूसारख्या आकारात अचानक झालेले परिवर्तन   शत्रूला चकवते, पर्यायाने केंड माशाचा बचाव होतो. त्यांची जाड आणि खडबडीत त्वचा, काही प्रजातींच्या बाबतीत अंगावरील काटे स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरतात.इतर जलचरांच्या तुलनेत त्याची दृष्टीही उत्तम आहे.  या माशांच्या शरीरात टेट्रोडोटॉक्सिन (Tetraodotoxin) नावाचे विष असते. हे विष सायनाईडपेक्षा 1200 पटीने अधिक प्रभावी असते. साधारणत: एका केंड माशाच्या शरीरात तीस माणसे मरू शकतील इतके विष असते. परंतु हे विष संपूर्ण शरीरभर पसरलेले नसते. त्याच्या शरीरातील यकृताचा भाग सर्वाधिक विषारी असते. या प्रजातींच्या रंगावरूनही विषाचा अंदाज करता येतो. ‘गोरे रंग पे ना इतना गुमान कर’ हे गाणे केंड माशाला उद्देशून लिहले असावे, कारण या माशाचा रंग जितका उजळ तितकीच त्यातील विषक्षमताही अधिक. ‘फुगू’ हा पदार्थ तयार करताना अनुभवी स्वयंपाकी यातील यकृत आणि इतर विषारी घटक काळजीपूर्वक काढतात. एक लहानशी चुकही ग्राहकाला मृत्यूच्या दारात पोहोचवू शकते. माणसाला घातक ठरणाऱ्या या विषाचा शार्क माशावर कोणताही परिणाम होत नाही हे विशेष. शार्क मासा हे हलाहल सहजतेने पचवतो.
     नेहमीच्या अन्नाचा भाग म्हणून हा मासा प्रसिद्ध नसला तरी मत्स्यालयातील आकर्षण म्हणून तो आजही प्रसिद्ध आहे. परंतु त्याच्या वर्तणुकीमुळे त्याला इतर माशांपासून वेगळे ठेवले जाते.
परिणामी पफर फिश असेलेल्या मत्स्यघरांत त्याचेच भाईबंद आढळतात. केंड माशाला वैज्ञानिकांच्या दृष्टीने खूपच महत्त्व आहे. जनुकीय तंत्रज्ञानात तो एक प्रायोगिक जीव म्हणून ओळखला जातो. त्याच्या शरीरात मानवी शरीराइतकी जनुकांची संख्या असते.  सुमारे दहा वर्षाचे आयुष्य असणारा केंड मासा पाच वर्षाच्या आसपास प्रजननक्षम होतो. नर मासा उथळ किनारी भागातील योग्य जागा शोधून मादीला अंडी देण्याच्या कामी मदत करतो. या अंड्यांची संख्या तीन ते सातपर्यंत असते. टणक कवच असलेल्या अंड्यांतून योग्य वेळ येताच लहान केंड मासे बाहेर पडतात. पण हे मासे इतके लहान असतात की त्यांना पाहण्यासाठी भिंग घ्यावे लागेल. परंतु या माशांची संख्या सध्याच्या काळात इतकी कमी झाली आहे की साध्या डोळ्यांनी दिसण्याइतके मोठे झाल्यानंतरही त्यांना शोधणे अवघड झालेय. पूर्वीपासून समुद्रात नेहमीचा वावर असणारे हे मासे आढळल्यावर ‘दुर्मिळ केंड मासा सापडला’ अशी बातमी वर्तमानपत्रात येणे यातच सर्व काही आले. निसर्गाच्या अनेक रंगांपैकी एक असणाऱ्या या जीवसृष्टीत या फुगू माशांसारखे रंगीबेरंगी फुगे जागोजागी आढळतात. या फुग्यांमध्ये अनुकूलतेची हवा असेल तर ते अधिक उंच जातील, अन्यथा स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या मानवाच्या अहंकराचा फुगा फुटायला वेळ लागणार नाही.

- तुषार म्हात्रे

(विशेष आभार: चैतन्य पाटील, चिर्ले)

Tuesday, December 18, 2018

बालक-पालक

बालक-पालक
(मुंबई सकाळ 18 डिसेंबर 
     ओहोटीच्या किनाऱ्यासारखीच उघड्या शरीराची एक व्यक्ती  दलदलीतून मार्ग काढत पुढे चाललीय. चालता चालता चिखलातून काहीतरी वेचत कमरेला बांधलेल्या लहानशा भांड्यात तो जमा करतो. ते भांडे पुरेसे भरल्याची खात्री झाल्यानंतर तो चिखलातून बाहेर येतो. रस्त्यात लागणाऱ्या एका कातळावर तो आपले भांडे उपडे करतो. भांड्यातील जमा केलेले सर्व काही कातळावर चांगले रगडून, पुन्हा आपल्या भांड्यात ओततो. एका दिवसाच्या जेवणाची भ्रांत मिटल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकते.
  काय होते त्याच्या भांड्यात?


         मुंबईला जवळ असणाऱ्या खारेपाट परिसरातील लोकांच्या आहाराचा एक भाग असणारा, त्याच्या भांड्यातील तो पदार्थ म्हणजे ’पालक’. (हो पालकच!) प्युअर व्हेजची पाटी झळकणाऱ्या हॉटेलमधील ‘पालक-पनीर’ किंवा तत्सम पालेभाजीयुक्त पदार्थातील पालक नव्हे, तर समुद्रकिनाऱ्यावरच्या प्राणीविश्वातील ‘बालका’सारखा एक लहानसा जीव- ‘पालक’. मरीन पल्मोनेट स्लग (Marine Pulmonate slug) या नावाने ओळखला जाणाऱ्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव ऑन्चिडीयम डॅमेली (Onchidium damelii) असे आहे. स्थानिक अनेकवचनी नाव ‘पालका’. भरती-ओहोटीच्या क्षेत्रातील दलदल परिसरात हे जीव आढळतात. खारफुटीच्या वनांमध्ये ओहोटीच्या वेळेस त्यांना पाहता येते.  रायगडच्या किनारी परिसरात हा जीव खाण्यायोग्य (Edible) मानला जात असला तरी त्याच्या प्रजातीविषयी कित्येकांना माहीती नाही. snails)सारखा मृदूकाय प्राणी आहे, ज्यांना इंग्रजीत ‘स्लग(Slug)’ संबोधले जाते. अंडाकृती आकार असणाऱ्या पालकांची लांबी साधारणत: एक ते सात सेमी पर्यंतच असते. कवच नसले तरी त्याबदल्यात शरीराचे संरक्षण करू शकेल इतक्या कठीण त्वचेचे आवरण त्यांच्या अंगावर असते. त्यांचे मरीन पल्मोनेट स्लग असे वर्गीकरण होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यातील श्वसनप्रक्रीया.
पालकांच्या शरीराच्या आवरणाच्या काही भागाचे रुपांतर फुफ्फुसासारख्या अवयवामध्ये होते. पाठीवरच्या भागात असलेल्या लहान छिद्राद्वारे श्वासोच्छवास घडते. शरीराची ही रचना त्यांना गोगलगायींशी जवळचे नाते सांगणारी ठरते. असे असले तरी समोरील बाजूस त्वचेला चिकटून असणारे लहान डोळे त्याचे वेगळेपण जपतात. तसं पहायला गेलो तर पालक या हिरव्या वनस्पतीशी त्याचा ‘खून का रिश्ता’ आहे. या प्राण्याच्या रक्ताचा रंग हिरवट असतो. अर्थात हा बादरायण संबंध सोडला तर बाकी या दोन नामसाधर्म्याची तुलनाच न केलेली बरी. हा प्राणीसुद्धा शुद्ध शाकाहारीच बरं का! उपलब्ध वनस्पतींसह, कुजलेले पदार्थ, बुरशी यांचा फडशा पाडून ते एकप्रकारे आपल्या परिसंस्थेला मदतच करतात. अन्नाच्या शोधात निघालेले हे पालक आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडतात. या गंधामुळेच त्यांना आपले घर पुन्हा शोधता येते. शरीरावरील लहान लहान छिद्रे नाकाप्रमाणे वास ओळखण्याचे काम करतात. (इतके असंख्य नाक असल्यामुळे पालकांच्या 'पालकांना’ नाक कापले जाण्याची भितीच नसेल!) तोंडाकडील भागात बाहेरून न दिसणारे करवतीसारखे हजारो दात असतात, परंतु ते इतके लहान असतात की त्यांचे अस्तित्व लक्षात येत नाही. सुरीसारख्या धारदार किंवा सुईसारख्या टोकदार पृष्ठभागावरून चालताना हे सजीव आपल्या शारीरिक क्षमतेचा पुरेपूर वापर करतात. कोणत्याही प्रकारे इजा न होता ते या पृष्ठभागावरून चालू शकतात.
हा जीव म्हणजे खरंतर कवच नसलेल्या गोगलगायीं(
       पालकांचा समावेश आपल्या आहारात करणाऱ्यांमध्ये त्यांच्या चवीबाबत एक गंमतीशीर ‘समज’ आहे. त्यांच्या मते पालकांना पकडताना त्यांना ओलांडल्यास त्यांची चव कडवट लागते. या धारणेकडे शास्त्रीय दृष्टीने पाहील्यास या जीवांच्या स्वभाववैशिष्ट्याची माहीती मिळते. पालकांसारख्या प्राण्यांना आपल्या जीवाला धोका असल्याचे जाणवल्यास, ते आपले शरीर आक्रसतात व एक चिकट स्राव (mucus) स्रवतात. या चिकट स्रावाची चव कडवट असते. त्यामुळे त्यांच्या चवीबाबत कडू समज निर्माण होण्याचे कारण बहुधा हा स्रावच असेल.

      अादिम काळापासून अस्तित्वात असणाऱ्या या जीवांमधील प्रजोत्पादन अनोखेच आहे. त्यांच्या शरीरात पुरूष आणि स्त्री असे दोन्ही प्रजनन अंगे असतात. आपल्या जोडीदाराला पूरक असे रुप तयार करण्याचे कसब त्यांच्या अंगी असते. हे प्राणी योग्य वेळ पाहून पन्नास ते शंभर अंडी प्रतिवर्षी देऊ शकतात. या अंड्यांतून निर्माण झालेल्या नविन जीवांचेही प्रजोत्पादन पुढे चालूच राहते. अशा रितीने हा जीव आपले ‘पालक’ हे नाव सार्थ ठरवत आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ऐंशी हजाराहून लहान बालक-पालकांचा निर्माता ठरतो. या जीवांशी साधर्म्य असणाऱ्या अनेक प्रजाती सर्वत्र आढळतात. त्यामुळे “जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत” अशी स्थिती या प्राण्यांची आहे. मासे, बेडूक, पाली, सरडे, साप, पक्षी आणि अगदी मानव या सर्व प्राण्यांचे भक्ष्य असणाऱ्या या प्रजाती अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. मात्र या भावंडांतील ‘पालक’ संख्येने जास्त असूनही केवळ आपल्या अधिवासासाठी झगडतोय. समुद्रकिनाऱ्यावरील दलदलयुक्त भाग म्हणजे फक्त माती नसून तिथे एक वेगळे विश्व नांदत आहे हे मतीमध्ये मातीच भरलेल्या प्राण्याच्या लक्षात येत नाही. या सजीवसृष्टीचा निसर्ग हाच पालक आहे आणि आपण सर्व त्याचे बालक आहोत हे लक्षात ठेऊन वागलो तरी बरेच काही साध्य होईल.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

विशेष आभार: विनायक गावंड (पिरकोन), प्रथमेश म्हात्रे (आवरे)

Sunday, December 16, 2018

शालेय शिक्षण

शालेय शिक्षण... आज आणि उद्या
        दोन हजार सतरा सालातल्या नोव्हेंबरची घटना. कमी दर्जाचे शिक्षण दिल्याबद्दल भारतीय वंशाच्या व्यक्तीने एका विद्यापीठावर कोर्टात दावा ठोकला. तोही कुठल्या साध्यासुध्या नव्हे तर चक्क ब्रिटनमधील सुप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठावर! या दाव्यातला खरे-खोटेपणा सिद्ध होण्यास आणखी काही वेळ जाईल, पण ऑक्सफर्डसारख्या नामांकीत विद्यापीठालाही या दाव्याची दखल घ्यावी लागलीय, हे विशेष. सध्याच्या काळात  चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे  किती महत्त्वाचे आहे हे या दाव्याने अधोरेखित झाले. अर्थात आपल्या माध्यमांनी व जनतेनेही या बातमीकडे शिक्षणक्षेत्राकडे करतो तसेच दुर्लक्ष केले. ब्रिटनप्रमाणे भविष्यात आपल्या राज्याच्या ‘शालेय शिक्षणा’बाबत असे घडू शकेल का?
   याचे उत्तर शोधायचे असल्यास आपल्याला पहील्यांदा  महाराष्ट्रातील ‘शालेय शिक्षणाची सद्यस्थिती’ जाणून घ्यावी लागेल. खरं तर ब्रिटनच्या जवळपास दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेबद्दल एखादे निश्चित विधान करणे म्हणजे चक्रधर स्वामींच्या एका दृष्टांत कथेतील ‘आंधळ्यांनी हत्तीचे वर्णन करण्यासारखे’ आहे.
हत्तीचे विशाल रुप पाहू शकत नसल्याने केवळ त्याला स्पर्श करून हत्तीच्या आकारमानाचा अंदाज या कथेतील अंध लोक करतात आणि त्यातून निर्माण होणारी विसंगती इतरांसाठी चेष्टेचा विषय ठरते.आपल्या राज्यातील सध्याचे शालेय शिक्षण पाहता त्याला असे विविध कंगोरे असल्याचे लक्षात येईल, पण ‘कुणीही यावे आणि काहीही बोलावे' अशी शिक्षणक्षेत्राची अवस्था आहे. त्यामुळे एखादी विधायक 'क्रिया' करण्याऐवजी जो तो 'प्रतिक्रिया' देण्यातच धन्यता मानत आहे.
         प्राथमिक शिक्षणाचा विचार केल्यास  ‘शिक्षण’ ही सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांची मूलभूत गरज आहे, हे दोन हजार नऊ सालच्या शिक्षण हक्क कायद्याने (RTE) स्पष्ट केले. हा कायदा अस्तित्वात आल्यापासून यात बऱ्याच सुधारणा झाल्या. पण, यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले आहे का, याचा फारसा विचार झाल्याचे दिसले नाही. शिक्षण हक्क कायदा व त्याच्या अंमलबजावणीमध्ये उद्भवणाऱ्या अडचणी, शिक्षणाची घसरणारी गुणवत्ता, तरतुदींची पूर्तता  हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. सुरुवातीला शिक्षणव्यवस्था ही शिक्षककेंद्री होती. मात्र, आता ती बदलून रचनावादी करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरांवर सुरू झाला. सध्या राज्यात एक लाख चौऱ्यांशी हजार शाळा आहेत. शिक्षण हक्क कायद्याचा विचार करता राज्यातील फक्त साडेतीन हजार शाळांनी शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींची पूर्तता केली होती. (ही आकडेवारी अद्ययावत नसली, तरी यावरून थोडाफार अंदाज बांधता येतो.) या कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी  मार्च दोन हजार तेरा ही अंतिम मुदत होती. ही मुदत उलटून देखिल या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

      शिक्षण हक्क कायद्या बाबत गोंधळाचे वातावरण असतानाच मागील वर्षी नव्या ‘राष्ट्रीय शिक्षण धाेरणाचा’ (N.P.E.) महत्त्वपूर्ण भाग शासनाच्या वतीने विचारविनिमयासाठी उपलब्ध करण्यात आला. या मसुद्यावर विविध स्तरांवरून मते मागवण्यात आली होती. काही शिक्षणतज्ञ, शैक्षणिक संघटना यांद्वारे चर्चासत्रांचे आयोजन करून नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले गेले. एन.पी.ई. ज्या अहवालावर आधारीत आहे त्या सुब्रमणियन समितीचा अहवालही उपलब्ध आहे. या मसुद्यांवर चर्चा होणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीकडेही विशेष लक्ष पुरवावे लागेल. आतापर्यंतच्या सर्वच शैक्षणिक धोरणांचा अभ्यास केल्यास त्यात आदर्शवादी भूमिका मांडण्यात आली होती.तर अलीकडच्या काळातील शिक्षण धोरणात 'विद्यार्थीकेंद्री’ भूमिका स्विकारली गेली, परंतु या धोरणांची खरोखरच अंमलबजावणी झाली का? उदाहरणादाखल आपण प्रथम शिक्षणासाठीच्या आर्थिक तरतुदींचा विचार करू. 1968 पासूनच्या शिक्षण धोरणात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जी.डी.पी.) 6% इतका खर्च व्हावा ही अपेक्षा होती, परंतु आजतागायत हा खर्च 3.5% च्या वर गेलेला  नाही.(एन.पी.ई.च्या इनपुट्स मधील 4.21 मध्ये या बाबीचा उल्लेख केला गेला आहे.) वरीलप्रमाणेच शिक्षण हक्क कायद्यातील शाळेसाठी मानके व निकष (कलम 19) आणि विद्यार्थी शिक्षक प्रमाण (कलम 25) नुसार सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी 35 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक हे प्रमाण दिले आहे, मात्र जव्हार-मोखाडासारख्या आदिवासीबहुल भागातील काही शाळांमध्ये एकेका वर्गात 100 हून अधिक विद्यार्थी दाटीवाटीने बसलेले आढळतात. अशा ठिकाणी शिक्षण हक्क कायदा, शैक्षणिक धोरणे यांची आदर्शवादी भूमिका केवळ कागदावरच उरते. त्यामुळे शिक्षण धोरण कितीही परिपूर्ण, आदर्शवादी, कालसुसंगत असले तरीही त्याचे यश हे प्रत्यक्ष अंमलबजावणीवर अवलंबून असते.
       प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेची चाचपणी करण्यासाठी नॅशनल अचिव्हमेंट सर्वे (NAS),  ‘असर’ यांसारख्या अहवालांचाही आधार घेता येईल. हे सर्व रीपोर्ट बऱ्यापैकी वास्तवदर्शी आहेत. आपल्याकडे वाचन आणि लेखन या भाषा कौशल्यांची सद्यस्थिती दयनिय आहे. गणिती मूलभूत क्रियांच्या बाबतीत तर निराशाजनक अवस्था आहे. सदर अहवाल हा केवळ प्राथमिक शिक्षणासंदर्भात असला तरी माध्यमिक शाळांचे चित्र याहून वेगळे नाही. मानवी मुलभूत हक्कामध्ये समाविष्ट असणा-या या शिक्षणक्षेत्राच्या ह्या दुरावस्थेला जबाबदार कोण? विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्थाचालक, अधिकारी, शासन की आणखी कोण?
      या प्रश्नाचं उत्तर सोप्पं आहे- तुम्ही ज्या भूमिकेत सध्या आहात ते सोडून इतर सगळे! म्हणजे तुम्ही जर पालक असाल तर शिक्षक नीट शिकवत नाहीत म्हणून दोष द्यायचा आणि शिक्षक असाल तर पालक लक्ष देत नाहीत, शासन शालाबाह्य कामं लावतं म्हणून गळा काढायचा. सतत दुस-याकडे बोट दाखवण्याच्या वृत्तीमुळे आपली शिक्षणाची 'बोट' मात्र हेलकावे खाऊ लागली आहे हे आपण विसरत चाललो आहोत. राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असणा-या या शिक्षणक्षेत्राची ही अधोगती आपण किती दिवस उघड्या डोळ्यांनी पाहणार आहोत? हे चित्र बदलायचे असेल तर दुस-याला दोष देत बसण्यापेक्षा आपापली भूमिका आपण चोखपणे वठवली तरी पुरेसा 'असर' होईल.
      त्यामुळेच ऑक्स्फर्डसारख्या नामांकीत विद्यापीठावर ओढवलेली नामुष्की आपल्यावर येऊ नये म्हणून शिक्षकी पेशा हा 'व्रत-वसा' वगैरे मानन्याऐवजी या  पेशाला 'व्यवसाय' मानून काम केले तरीही बरेच काही साध्य होऊ शकेल. ज्याप्रमाणे इतर व्यवसायामध्ये आपल्या मूल्याचा पुरेपूर मोबदला ग्राहकाला मिळतो, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखिल हा व्यावसायिक दृष्टीकोन ठेवता येईल. ‘व्रत-वसा ’असल्या गोष्टींचा फारसा बाऊ न करता देखिल शिक्षकाला चांगले काम करता येईल. ‘दर्जात्मक’ शिक्षणाासाठी शिक्षणव्यवस्थेने   व्यवसायाभिमुख असणे कालसुसंगत ठरेल . या व्यवसायभिमुखतेचे पालन  सर्वच स्तरांवर झाल्यास निश्चितच उद्याचे शालेय शिक्षण गुणवत्तापूर्ण होऊ शकेल.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(वरील लेख सोळाव्या आगरी महोत्सवाच्या ‘कनसा’ या स्मरणिकेत प्रकाशित झाला आहे.)

Friday, December 14, 2018

सागरातील अष्टपैलू खेळाडू

 सागरातील अष्टपैलू खेळाडू
 फिफा विश्वचषक 2010 मधील अंतिम सामन्यास थोडाच अवधी बाकी होता. ऑरेंज आर्मी नेदरलँड आणि टिकी-टाका साठी प्रसिद्ध स्पेन आमनेसामने येणार होते. या प्रसंगी दोन्ही संघातील खेळाडू, त्यांचे उत्साही मार्गदर्शक आणि संभाव्य डावपेच यांविषयी फुटबॉल चाहत्यांमध्ये चर्चा होणे स्वाभाविकच होते. परंतु या धामधुमीच्या वातावरणात संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते जर्मनीकडे. नाही, जर्मनीच्या संघाकडे नाही; जर्मनीच्या ‘पॉल’ बाबाकडे. युरो 2008 स्पर्धेत आपल्या अचूक भविष्यवाणीने सर्वांना आश्चर्यचकीत करणाऱ्या ‘पॉल’ने या अंतिम सामन्यातही ‘स्पेन’ विश्वविजेता ठरण्याचे दिलेले संकेत अचूक ठरले. मनुष्यप्राण्याद्वारे दोन पायांनी खेळल्या जाणाऱ्या या खेळाचे भविष्य सांगणारा हा ‘पॉल’बाबा स्वत: मात्र आठ पायांचा(की हातांचा?) होता. हा पॉल बाबा म्हणजे समुद्री अष्टपैलू खेळाडू असणारा पॉल नावाचा ‘ऑक्टोपस’

        माकळी, माकूल या स्थानिक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मोलुस्का (Mollusca) या संघातील या प्राण्याच्या सामान्य प्रजातीचे नाव आहे ऑक्टोपस व्हल्गरीस (Octopus vulgaris). डोक्यापासून निघालेले आठ पाय आणि सहज न दिसणारी पोपटासारखी चोच हे या प्राण्याच्या शरीररचनेची ओळख. ऑक्टोपसच्या मृदू शरीरातील चोच हा एकमेव कठीण भाग. याच मजबूत तोंडाने तो शिंपले, खेकडे, कोळंबी यांसारख्या कवचधारी प्राण्यांचा फडशा पाडतो. या चोचीने शिंपल्याचे कवच फोडण्यात अपयश आल्यास कवचाला छिद्र पाडून आतील भागही तो खाऊ शकतो. या कामी त्याला सोंडेसारख्या आठ हातांचे सहाय्य लाभते. या हातांवरच लहान आणि अत्यंत गुंतागुंतीच्या स्नायूंनी बनलेले शेकडो चूषक(Suckers) असतात. हे चूषक एखाद्या सक्शन कपप्रमाणे काम करतात. आपल्या भक्ष्याचे मांस फाडता येईल इतकी ताकद या या चूषकांमध्ये असते. गरजेवेळी त्यांचा वापर करून माकळीला वजनदार वस्तूही उचलता येते. अन्नाच्या शोधात फिरताना कधी कधी तो स्वत:ही दुसऱ्याचे अन्न बनायची वेळ येते.  अशावेळेस आपल्या शरीरात साठवलेली मेलॅनीनयुक्त शाई उधळून शत्रूला गुंगारा देण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतो. या शाईमुळे परिसराची दृश्यमानता कमी होतेच, पण शत्रूच्या डोळ्यांची जळजळ होऊन स्व:बचावकार्यात मदत होते. त्यातूनही निभावले नाही तर भक्षकाच्या हाती लागलेले आपले हात त्यागून तो पळून जातो. ऑक्टोपसवर हल्ला करणारा प्राणी मात्र ‘देणाऱ्याचे हातही घ्यावे’ हे शब्द खरे करत हात चोळत बसतो. अर्थात आठ-आठ हात असणाऱ्या ऑक्टोपसला हे हस्तदान परवडते आणि काही कालावधीनंतर हा अवयव नव्याने उगवतोदेखिल.

         समुद्राच्या विशाल मैदानातील ऑक्टोपस हा एक मुरलेला खेळाडू मानला जाईल इतके कौशल्य त्याच्या अंगात आहे. बचावपटूंच्या अभेद्य भिंतीला चकवून अत्यंत वेगाने गोलपोस्टकडे धावणाऱ्या मेस्सीला आपण पाहीलेय. पृथ्वीवरील अत्यंत लवचिक असणाऱ्या प्राण्यांपैकी एक असलेला ऑक्टोपसदेखिल या फुटबॉलपटूंप्रमाणेच अत्यंत अरूंद जागेतून सहजपणे मार्ग काढू शकतो. बाह्यआकारावरून मोठा भासणारा हा प्राणी वेळप्रसंगी एखाद्या बाटलीतही मावू शकतो. रोनाल्डो- मेस्सी यांसारखे खेळाडू अनेक चाहत्यांच्या हृदयात विराजमान असतात, तर याऊलट ऑक्टोपसच्या शरीरातच अनेक हृदय विराजमान असतात. या प्राण्याला तीन हृदय असतात. त्यापैकी दोन लहान हृदय कल्ल्यांजवळ असून तेथून मिळालेले ऑक्सिजनयुक्त रक्त मोठ्या हृदयाकडे पाठवण्याचे काम करतात. पुढे मोठ्या हृदयाद्वारे हे रक्त संपूर्ण शरीरभर पसरवले जाते. या ऑक्टोपसने आपल्या प्रेयसीला रक्ताने पत्र वगैरे लिहलेच तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही कारण या प्राण्याच्या रक्ताचा रंगही शाईप्रमाणे निळाच असतो. मानवी रक्तामध्ये असणाऱ्या लोहाऐवजी माकळीमध्ये ताम्रयुक्त रक्त असते, ज्यामुळे त्या रक्ताला निळसर रंग प्राप्त होतो. रक्तातील याच घटकांमुळे थंड आणि अल्प ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या वातावरणातही शरीरात ऑक्सिजनचे वहन योग्य रितीने होण्यास मदत होते.

          हा प्राणी समुद्री जगतातील एक हुशार प्राणी म्हणून ओळखला जातो. एखाद्या पक्ष्याच्या मेंदूइतकाच त्यांचा मेंदू लहान असतो, तरीही त्या मेंदूचा कल्पक वापर त्यांच्याकडून होतो. शिंपले उघडण्यासाठी ते उपलब्ध साधनांचा वापर करू शकतात. एका प्रयोगामध्ये ऑक्टोपस बाटलीचे झाकणही उघडू शकतो, असे दिसून आले. ‘मेंदू गुडघ्यात असणे’ असे एखाद्याची अक्कल काढण्यासाठी बोलले जाते. पण पाण्याखाली खरंतर याऊलट घडते. कारण माकळीच्या शरीरातील दोन तृतीयांश चेतासंस्था त्याच्या पायांमध्ये सामावलेली असते. यामुळेच ‘थ्री इडीयटस्’ मधील ‘प्रोफेसर व्हायरस’प्रमाणे एकाच वेळेस अनेक कामे करता येणे त्याला शक्य होते. पायांतील चेतापेशींमुळे शरीरापासून वेगळे झाल्यानंतरही हे अवयव वेदनांना प्रतिसाद देतात. मानवाला जशी चमचमत्या आभूषणांची आवड असते तशीच आवड माकळीलाही आहे. आपला अधिवास असलेल्या जागी अशा चमकत्या वस्तू आणून तो परिसर सजवण्याचे काम ऑक्टोपस करतो. या परिसराला ‘ऑक्टोपस गार्डन’ म्हटले जाते.
       समुद्रातील या वेगळ्या जीवाचे काही भाईबंद याहूनही नखरेबाज आहेत. बहुरूप्या ऑक्टोपस (Mimic octopus) आपल्या शरीराची रचना आणि रंग बदलून  समुद्री सर्प, पाखट, मासा, जेलीफीश, दगड, वनस्पती यांसारखे रुप घेऊ शकतो. तर  निळ्या कडीवाल्या ऑक्टोपसच्या(Blue-ringed octopus) एका दंशाने मृत्यूही होऊ शकतो.
       समुद्रातील हा खेळाडू आयुष्याच्या मैदानातून मात्र लवकरच निवृत्त होतो. प्रजोत्पादनाचे कार्य संपल्यानंतर या प्राण्याचा मृत्यू होतो. त्यांचे जीवनमान एक ते पाच वर्षांइतकेच असते. त्यामुळेच फुटबॉल सामन्यांचे निकाल सुचवणाऱ्या पॉलचा मृत्यूही लवकरच झाला. बंदिस्त टँकमध्ये राहून इतरांचे भविष्य उघड करणाऱ्या पॉलला त्याच्या मृत्यूचे भविष्य कोणी विचारलेच नाही. पॉल हयात नसला तरी त्याच्यासारखे कित्येक जीव अजूनही या सागरात नांदत आहेत. मानवाच्या हाती असलेले त्यांचे भविष्य सुरक्षित रहावे ही सदिच्छा!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Wednesday, December 5, 2018

खेकड्यांचे झाड

खेकड्यांचे झाड

       भात कापणीच्या हंगामातील प्रसंग.एक शेतकरी दीर्घ श्वास घेऊन आपल्या खारजमिनीतल्या लहानशा तळ्यात बुडी मारतो. तो दिसेनासा झाल्यानंतर थोड्या वेळाने एक निष्पर्ण काटेरी झाड हळूहळू तळ्याच्या वर येते. ते झाड त्याच बुडी मारलेल्या शेतकऱ्याच्या हातात आहे. या झाडाच्या फांद्यांवर पानांऐवजी काहीतरी जिवंत वस्तू असल्यासारखे दिसते. क्षणभर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही- कारण त्याच्या हातातील संपूर्ण झाड खेकड्यांनी भरलेले असते.

    खेकड्यांचे झाड? असे कुठे असते का?
     पुराणकथांतील चमत्कारांनाही मागे टाकणारे हे दृश्य; इथल्या शेतकऱ्याच्या परिचयाचे. पालघर, रायगड जिल्ह्यातील खाडीलगतच्या भातशेतीच्या जमिनींमध्ये पूरक उत्पन्न म्हणून शेततळी राखली जातात. पावसाळ्याच्या दिवसांत या लहान लहान तळ्यांमध्ये विविध प्रकारचे मासे अंडी घालतात. कापणीचा हंगाम येईपर्यंत शेतातले पाणी बऱ्यापैकी कमी होत जाते. अशा वेळी शेतातील मासळी हळू हळू या तळ्यांकडे सरकत जाते. त्यामुळे येथील शेतकरी कापणीच्या हंगामात तळ्यात साठलेली, वाढलेली मत्स्यसंपत्ती काढून घेतो. या तळ्यातील माशांची वाढ होईपर्यंत त्यांना कोणी पकडू नये म्हणून बोर, रांजण, हाटुरण यांसारख्या काटेरी झाडांच्या फांद्या तळाला गाडून ठेवल्या जातात. या मोठ्या झुडूपाला ‘झाप’ म्हणतात. एखाद्याने या तळ्यात जाळे टाकलेच तर मासे मिळणे दूरच, पण त्या काट्यांमध्ये फसून त्याचे बहुमोल असे जाळेच फाटण्याची शक्यता असते.पाण्यात लपवलेले हे झाप कित्येक जलचरांसाठी आश्रयस्थान ठरतात. ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत चांगली वाढ होणारे ‘पेंदुर्ली’ नावाचे खेकडेसुद्धा याच झापाचा आधार घेतात. मोठ्या संख्येने हे खेकडे काटेरी झुडूपावर चिकटून बसल्याने तिथे ‘खेकड्यांचे झाडच’ उगवल्यासारखे वाटते.

         स्थानिक भाषेत पेंदुर्ली, बोदय, बोद्या या नावाने ओळखला जाणारा हा खेकडा पॅडलर क्रॅब (Paddler Crab) म्हणूनही ओळखला जातो. आर्थ्रोपोडा संघातील या प्राण्याला त्याच्या दहा हातांमुळे ‘डीकॅपोडा (Decapoda) या गणात स्थान मिळते. खाऱ्या पाण्यातले ‘चिंबोरी’ नावाने प्रसिद्ध असणारे खेकडे आणि पेंदुर्ली यांतील मुलभूत फरक म्हणजे त्यांचे पाय. पेंदुर्लीचे पाय चपटे आणि त्यांवर लहान केसांप्रमाणे रचना असल्याने तिला सामान्य खेकड्यापेक्षा अधिक सफाईदारपणे पोहता येते. आपल्या पायांचा वल्ह्यांसारखा (Paddles) वापर करता आल्यानेच या खेकड्याला पॅडलर क्रॅब असे नाव मिळालेय. सामान्य खेकड्याप्रमाणे निवाऱ्यासाठी बिळ करण्याऐवजी पेंदुर्ली खेकडे भाडेकरूंप्रमाणे तात्पुरता निवारा शोधतात. मग हा निवारा कधी पाण्यातल्या झापांचा असतो किंवा कधी भाताच्या रोपांचा असतो. खारजमिनीतली भाताची रोपे ओलसरपणामुळे बऱ्याचदा झुकलेली असतात. या झुकलेल्या रोपांच्या बुंध्याला हे खेकडे खूप वेळा आढळतात.  भात कापणीच्या पारंपारिक पद्धतीत बुंध्याला हात घालून विळ्याने कापणी केली जाते. अशा वेळेस तिथे दडून बसलेले हे खेकडे हाताला चावतात. (अर्थात खेकड्याचे हे चावणे सगळीकडून गांजलेल्या सामान्य शेतकऱ्यासाठी विशेष त्रासदायक ठरत नाहीत.) या खेकड्याच्या कवचाची रचना समद्वीभुज समलंब चौकोनाप्रमाणे असते. हे कवच तयार झाल्यानंतर त्याची वाढ होत नाही. आपण जसे आपली वाढ होत असताना लहान कपडे टाकून नविन कपडे घेतो, तसेच हे खेकडेही वरचे कवच टाकून आतील बाजूने नविन कवच तयार करतात. वाढीच्या पहील्या वर्षाला हे कवच बदलण्याची प्रक्रिया सहा ते सात वेळा घडते. त्यानंतर मात्र वर्षातून एक ते दोन वेळाच हे कवच-दान घडते. कवचाला लागूनच समोरील बाजूस गाडीच्या वायपर प्रमाणे वर येणारे दोन डोळे असतात. पाण्यातून वर आल्यावर हे डोळे तिथल्या खोबणीतून बाहेर निघतात. या लहानशा डोळ्यामध्ये शेकडो लहान लहान भिंगांची रचना असते. त्यांचा वापर पाण्याखाली, दाटी-फटींमध्ये लपताना मार्ग शोधण्यासाठी होतो. डोळ्यांच्या खालच्या बाजूस तोंडाचा भाग असतो. दातांचा त्रिफळा उडालेल्या व्यक्ती जशा अडकीत्त्याने सुपारी कातरून खातात तसेच हा खेकडादेखील आपल्या पंजाने अन्नाचे तुकडे करून नंतर तोंडात ढकलतो. नाही म्हणायला त्याच्या तोंडात तीन दात असतात. परंतु हे दात गोलाकार असल्याने अन्न चावण्याऐवजी केवळ घुसळण्याची क्रिया होते. पेंदुर्ली हा प्राणी मिश्राहारी. अन्न म्हणून त्याला वनस्पती, मृत जीव, मासे, कोलंबी यांसारखे जीव यातले काहीही चालते.
       कोळ्याप्रमाणे सांध्यांवर वाकणाऱ्या पायांमुळे खेकड्यांना गंमतीने ‘Spiders of the Sea’ असे म्हटले जाते. या पायांवर असलेल्या केसांमध्ये उवाही (Pubic Lice) होतात.(हो, तुमच्या आमच्या डोक्यात असलेल्या उवा!) उवांच्या बाबतीत इथे स्त्री-पुरूष भेद नाही. परंतु इतर शरीररचनेमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवतो.
नराच्या पोटाकडील भागाला त्रिकोणी आकाराचा एक कप्पा असतो, तर मादीच्या शरीराचा हाच भाग आकाराने मोठा व गोलाकार असून संपूर्ण पोटाकडील भागाला व्यापणारा असतो. मादीच्या पोटाकडील भागातच अंड्यांची उबवण होऊन त्यातून मोठ्या संख्येने लहान पिल्ले बाहेर पडतात. नर पेंदुर्लीचा पंजा मादी पेंदुर्लीपेक्षा आकाराने मोठा असतो. त्यामुळे ‘ये हाथ नही हथौडा है’ म्हणत तो नेहमीच वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. याच पंजाच्या साह्याने आवाज करून संपर्कही साधता येतो. एखाद्या गब्बर शत्रूने या खेकड्यावर हल्ला केलाच तर ‘ये हात हमका दे दे ठाकूर’ अशी मागणी व्हायच्या आतच तो आपले हात देऊन पळून जातो. पुढे योग्य पोषण झाले तर हा अवयव नव्याने उगवतो. 
        कोकणातील सुप्रसिद्ध खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेकड्यांच्या तुलनेत पेंदुर्ली हे गरीबांचे अन्न म्हणून ओळखले जाते. परंतु पेंदुर्ली ही ‘ब 12’ या जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत मानली जाते. त्यामुळे भविष्यात या खेकड्यांच्याही संवर्धनाचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाडी किनाऱ्यावरची परिसंस्था धोक्यात आली असताना या सध्याच्या काळातही नेहमीप्रमाणे भातशेतीचा हंगाम येतो. तो शेतकरी आशेचा श्वास घेऊन आपल्या उरल्या सुरल्या खारजमिनीतील लहानशा तळ्यात बुडी मारतो. तो दिसेनासा झाल्यानंतर एक निष्पर्ण काटेरी झाड हळूहळू तळ्याच्या वर येते. बुडी मारलेल्या व्यक्तीच्या हातात ते झाड  तसेच आहे. पण यावेळेस झाडाच्या फांद्यांवर पानांऐवजी फक्त काटेच दिसतात. पूर्वीसारखे खेकड्यांनी भरलेले झाड दिसत नाही. या झापांवरचा खेकड्यांचा आढळ कमी झालाय. कायम एकमेकांचे पाय ओढणाऱ्या मानवामुळे ‘खेकड्यांच्या झाडाची’ पानगळ झालीय. खाऱ्या पाण्यातील हे खरे चमत्कार पुन्हा पहायला मिळणे कठीण होत चाललेय. पण आशा अजूनही जिवंत आहे, पुन्हा एकदा मुंबई रायगडच्या खाडीकिनाऱ्यावर पूर्वीसारखीच जीवसृष्टी नांदेल. पेंदुर्ल्यांनी भरलेले हे ‘खेकड्यांचे झाड’ पुन्हा एकदा बहरेल.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...