Search This Blog

Thursday, September 19, 2019

पाचवीला पुजलेली सटी

सटीचा लेखाजोखा

      आतल्या खोलीतून नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाहेरच्या बाजूला मात्र काही साहित्याची जमवाजमव चाललीय. ‘मालटा’ नावाने ओळखला जाणारा दगडी दिवा, जाते, पाटा-वरवंटा अशा दगडी साहीत्याची यादी केली जातेय. कधीकाळी नेहमीच्या वापरात असलेल्या या वस्तू,  पण सध्याच्या काळात मिळवणे दगडासारखेच कठीण झाल्यासारख्या. ही सर्व जमवाजमव चालली आहे ती जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आयुष्य व आरोग्य लाभावे या हेतूने केल्या जाणाऱ्या पाचवीची. सहसा मुलीकडे होणारा हा विधी. संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार साम्य-भेदाने होत असलेला हा विधी पश्चिम किनारपट्टीवरील रायगड परिसरातही होताना दिसतो.
    या विधीवेळी लहान बाळाला वस्त्रांशिवाय निंगडीच्या म्हणजेच निरगुडीच्या पानांवर झोपवले जाते. या पानांवरून उचलण्याचा मान आत्याचा असतो. निरगुडी ही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मानले जाते. पाचवीच्या या विधीमध्ये एका सुपात तांदळावर कलश ठेवतात. त्यावर नारळ ठेवून केळीच्या पानाचा लहानसा भाग उभा केला जातो. समोर पानाचे पाच विडे मांडून त्या विड्यांवर सुपारी,बदाम, खारीक,अक्रोड,हळकुंड यांसारखे पदार्थ मांडले जातात. या दिवशी घुगऱ्या ,उकडीच्या पीठाचे मुटके, पिठाचा दिवा बनवला जातो. बाळंतिणीच्या खाटेच्या चार पायांजवळ चार पीठाचे दिवे व एक दिवा मोरीजवळ ठेवतात.
    जिल्ह्याच्या उत्तर भागातील विधीमध्ये नाममात्र फरक असतो. इथे पाट्यावर वरवंटा ठेवून सात विड्याची पाने देठ खाली करून वरवंट्याला टेकून ठेवतात .पानाच्या टोकांना शेंदूर लावतात. काजळाची दोन बोटे प्रत्येक पानाला दोन डोळे म्हणून लावतात. काही ठिकाणी रुईच्या पानांवर ‘सटी व लाठा’ अशी दोन चित्रे काढली जातात. समोर पीठाचे सात दिवे व पाटयाच्या चार कोपऱ्यांना चार पीठाचे दिवे लावतात. प्राचीन परंपरेची जपणूक करणारा मालटा हा दगडी दिवा पाट्याच्या मध्यभागी लावतात. नंतर पूजन करून नैवैद्य दाखवला जातो.

    याच विधीला ‘सटी’ असेही म्हटले जाते. ही सटी म्हणजे ‘सटवाई’ किंवा ‘सटवी’ या नावाने ओळखली जाणारी आणि प्राचीन काळापासून पुजली जाणारी मातृदेवता. अगदी शिवी म्हणून वापरला जाणारा हा शब्द खरंतर मूळ संस्कृत ‘षष्ठी’ या शब्दापासून तयार झाला आहे. मुलाच्या जन्मानंतरच्या सहाव्या रात्री ‘सटवी’ देवीची शांती करण्यासाठी रात्रभर दिवा लावून ठेवतात. पाट्यावर एक नारळ, कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल, मुलगा असेल तर हातोडा व मुलगी असेल तर कोयती असे एक शस्त्रही ठेवतात व त्यांचे पूजन करतात. त्या रात्री देवी स्वत: येऊन त्या मुलाच्या कपाळावर त्याचे अदृश्य पण अटल भवितव्य आणि स्वभाववैशिष्ट्य लिहिते, असा समज आहे. यालाच ‘ब्रम्हलिखित’ असे म्हटले जाते. "सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका" अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. रस्त्याच्या कडेला किंवा चौरस्त्यावरील दगडावर दिसणाऱ्या लाल रेघा, अर्पण केलेले अन्न आणि कापलेला लिंबू ह्या सटवीच्या व्रताच्या खुणा. रात्रीच्या वेळेस उपासक स्त्रीद्वारे हे क्रियाकर्म केलेले असते.

 सटवी, सटुआई, सटी,षष्ठी,रानसटवाई, छटी, घोडा सटवाई या नावांनी ओळखली जाणारी ही मातृदेवता आहे तरी कोण?
या मातृकेशी विशिष्ट प्रकारचे नाते असलेल्या स्कंदाला ‘षष्ठीप्रिय’ म्हणतात. स्कंद म्हणजेच शिवपुत्र कार्तिकेय. काश्यपसंहितेप्रमाणे षष्ठी ही स्कंदाची बहिण आहे. स्कंद व विशाख हे तिचे दोन भाऊ. तर याऊलट ‘देवी भागवत पुराण’ व महाभारतानुसार ती स्कंदाची पत्नी आहे. इथे ती देवमेना या आणखी एका उपनावाने ओळखली जाते. सुश्रुतसंहिता षष्ठीला ‘रेवती’ हे आणखी एक नाव देते.  कुषाणकाळातील एका मूर्तीमध्ये षष्ठी स्कंद आणि विशाख या दोघांमध्ये उभी असलेली दिसते. तिचे षष्ठी हे नाव सार्थक करणारी ही मूर्ती आहे. कारण या शिल्पात तिच्या खांद्यावर ओळीने पाच डोकी दिसतात. कुषाणकाळानंतर शिल्प क्षेत्रांत हा प्रकार लुप्त झाला. सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदेवता आहे. हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो. असे असले तरी गुप्त काळांत मात्र बांधकाम होत असल्याचे दिसते. स्कंदगुप्ताच्या काळातील एका लेखांत छंदक नावाच्या व्यक्तीने षष्ठीदेवीचे एक मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. याच काळात षष्ठीदेवीच्या नावाला धरून मुलांची नावे ठेवण्याची पद्धत होती. सन ५३२ मध्ये मध्यप्रदेशातील मंदसोर येथे कोरलेल्या यशोधर्मन उर्फ विष्णुवर्धन याच्या लेखांत ‘षष्ठीदत्त’ नावाची व्यक्ती आढळते, तसेच द्रोणसिंहाच्या भामोद्रामोहता ताम्रपटाचा क्षत्रक नावाचा लेखक ‘षष्ठीदत्तां’चा मुलगा होता. बंगाली लोकांत षष्ठीचरण हे नाव आज ही आढळते.
   प्राचीन काळापासून या देवीला पुजले जात असले तरी  पुरूषांचा तिच्या पूजेशी काही संबंध नसतो. षष्ठी-सटी-सटवी म्हणजेच शक्तीचे दुर्गा हे रुप मानले असले तरी लोकमताप्रमाणे ती अविवाहित आहे. ‘म्हसोबाला नाही बायको आणि सटवीला नाही दादला’ असे म्हटले जाते. याच कारणांमुळे ‘पाचवी-सटी’ या कार्यक्रमाच्या वेळेस पुरुषांची उपस्थिती टाळली जाते. परंतु कालांतराने जसे दगडी दिव्याची जागा धातूच्या दिव्याने घेतली, तसेच या ‘लेडीज स्पेशल’च्या कार्यक्रमात पुरूषांनीही शिरकाव केला. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ‘मांस-मद्या’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी श्रद्धा असणारा एक वर्ग या प्राचीन संस्कृतीला अर्वाचीन पद्धतीने साजरा करतोय. ‘अर्थ समस्या’ नावाची गोष्ट पाचवीलाच पुजलेल्या मुलींच्या पालकांसाठी ही नवी प्रथा अनर्थाकडे नेत आहे. यामुळे आधीच समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मुलीकडील लोकांना हा ‘जादाचा भुर्दंड’ बसतो. अर्थात संस्कृतीत घडणारे नवे बदल स्विकारायला हवेतच, पण हे बदल असंस्कृत नसतील याची काळजी घ्यायला हवी. या नव्या प्रथांना आवर घालायलाच हवा. देवी सटवाईच या नव्या प्रथाकारांच्या भाळी सद्बुद्धी लिहो, ही सदीच्छा!

                          - तुषार म्हात्रे , पिरकोन (उरण)

Thursday, September 12, 2019

शिव गौरा

       उरणच्या दक्षिणपूर्व विभागाला तालुका ठिकाणापासून विलग करणाऱ्या खाडीकिनारी वसलेले खोपटे हे विस्ताराने मोठे गाव.  सात पाड्यांनी मिळून बनलेल्या या गावात इतरांसारखाच गणेशोत्सव साजरा होतोच, पण त्याच जोडीला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव इथले गावकरी साजरा करतात. तोही तब्बल आठ दशकांपासून! पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. शिव आणि शक्तीतील वर्चस्ववादाचे प्रतिक असणारे कलगी-तुऱ्याचे जंगी सामने आणि पारंपरिक नृत्य हे या विविधरंगी कार्यक्रमांचे वैशिष्ट्य. संपूर्ण महाराष्ट्र भाद्रपद महीन्यात गौरी-गणपतींची प्रतिष्ठापना करत असताना खोपटे गावातील शिवगौरा उत्सव मंडळ एकप्रकारे शिवोत्सवच साजरा करतात. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी गावातील पाटील पाड्यात थेट भगवान शंकर सुंदर आरास असलेल्या जागेत विराजमान होतात. भाद्रपद शुक्ल द्वादशीला गौराविसर्जन होते. शाडूच्या मातीपासून बनलेल्या ‘गौरा’ म्हणजेच शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

शिवमूर्तीची निर्मिती आणि पूजन हे याच परिसरापुरते होते की आणखी कुठे?
 सहसा प्रतिक रुपात होत असलेले शिवपूजन मूर्तीरुपात कसे आले?
समन्वयवादी भारतीय प्रवृत्तीची एक फार मोठी फलश्रुती म्हणून शिवाचे नाव घेता येईल. आज अस्तित्वात असलेल्या शैव संप्रदायांत अनेक प्राचिन मते व संप्रदायांची मिळवणी झालेली दिसते. शिव व शक्ती हे भौतिक जगताचे आधारस्तंभ मानले जातात. सृष्टीचे मूळ शिवशक्तीच्या संयोगात आहे. शिवलिंग हे शिवशक्तीचे प्रत्यक्ष प्रतिक असते. सिंधुनदीच्या खोऱ्यात ज्या प्राचीन वसाहतींचे अवशेष सापडले आहेत, त्या वसाहतींच्या काळापासून लिंगपूजा आपल्या देशांत सुरू असल्याचे सांगता येते. मुळांत शिवलिंग हुबेहूब मानवलिंगांसारखे घडवत असत. पुढे त्याला सुरेख खांबाचे स्वरूप मिळाले. चौकोनी, अष्टपैलू आणि गोल अशा तिन्ही रुपांतील शिवलिंगे पहायला मिळतात. या लिंगावरच शंकर, सूर्य, गणपती यांसारख्या देवतांच्या प्रतिमा दिसू लागल्या. कलेच्या क्षेत्रात इतकी परिवर्तने होण्यासाठी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत सुमारे चौदाशे वर्षांचा कालावधी लागला.
   खोपटे गावात होत असलेला ‘गौरा’ हा शंकराचा मानवाकार प्रतिमा प्रकार. हे शिव-पूजनाचे दुसरे प्रतिक होय. लिंगपूजा अधिक प्रमाणात प्रचलित असली तरी शिवाच्या प्रतिमापूजनाची  सुरूवातही सिंधु संस्कृतीपासून होत असल्याचे संदर्भ आढळतात. सिंधुच्या खोऱ्यातून मिळालेल्या एका ठशावर ‘पशुपती’ शिवाचे अंकन असल्याचे मत इतिहासतज्ञ सर जॉन मार्शल यांनी मांडले आहे. शिवाचे एक रुप मानला जाणारा रुद्र ऋग्वेद, अथर्ववेदांतही दिसतो. रूद्र म्हणजे शत्रूंना रडविणारा. शिवाचे वेदांमधील उल्लेख गिरीष अर्थात पर्वतांचा अधिपती, नीळ्या गळ्याचा म्हणून नीलग्रीव, लाल रंगाचा म्हणून विलोहित असे रंगीबिरंगी आहेत. त्याचबरोबर तो नक्तंतर म्हणजे निशाचर असून धनुष्यबाण धारण करणारा म्हणून ‘निषंगी’ व ‘इषुधिमान’ आहे. शिवाला अभिषेक घालताना ज्या रुद्राध्यायाचे पारायण करतात त्यानुसार शिव हा शत्रूच्या डोळ्यांत पाणी आणणारा व संहारक असा पराक्रमी योद्धा आहेच, त्याचबरोबर तो ‘प्रथमो दैवो भिषक्’ म्हणजे देवांचा प्रथम वैद्य आहे. पौराणिक काळापर्यंत असुर, भूत-पिशाच्च यांना जवळचा वाटणारा रुद्र ‘महादेव’ या उपाधीपर्यंत पोहोचला. शंकराचा पौराणिक धर्मात पूर्ण रुपाने समावेश केव्हा झाला असावा हे सांगता येणे कठीण आहे, पण हे समायोजन समजून घेण्यासाठी रुद्र आणि नरनारायण यांची उपयोगी ठरते.
या कथेप्रमाणे दक्षयज्ञांचा विध्वंस केल्यावर रूद्राने बद्रिकाश्रमांत बसलेल्या नर व नारायणांवर आक्रमण केले. प्रथम युद्धाला चांगलेच तोंड लागले पण पुढे ब्रम्हदेवाच्या मध्यस्थीमुळे ते थांबले व दोन्ही पक्षांत समेट झाला. या युद्धात नारायणाने रुद्रांचा गळा दाबल्याने रूद्राला ‘शितिकणठ’ असे नाव मिळाले, तर नारायणाने रूद्राच्या शूलाला 'श्रीवत्स’ या चिन्हाच्या रुपाने स्वत:च्या छातीवर मिरवण्याचे कबूल केले. या कथांमधून शिवाचे पुराणांमधील ‘महाविलयन’ समजून घेता येते. लिंग, मातीच्या ठशांवरील शिवप्रतिके, नाण्यांवरील शिवप्रतिमा यांआधारे शिवस्वरूपाचे विवेचन करता येते. परंतु शंकराच्या प्रत्यक्ष मूर्ती कधीपासून अस्तित्वात आली असावी?
 अर्थशास्त्र आणि पतंजलीच्या आधाराने शिवमूर्तीची प्राचीनता मौर्यकाळापर्यंत नेता येते. अश्वत्थाम्याने शिवाचा ‘श्वेतविग्रह’ निर्माण केला होता व त्याची होम, हवन करून पूजा केली असल्याचा उल्लेख महाभारतात आहे.लोककलेचे सोपे, उत्तम व स्वस्त माध्यम म्हणजे माती. शिवाच्या ज्ञात रुपाचे वर्णन करणाऱ्या मातीच्या मूर्ती उत्तर कुषाण व गुप्त काळात आढळतात. जटाजूट असलेला, गळ्यांत व हातांत सापाचे दागिने घालणारा शंकर माती व पाषाणाच्या मूर्त्यांमध्ये साकारला जाऊ लागला. शिवाचा वैशिष्ट्यपूर्ण असा तिसरा नेत्र हा कुषाणकाळापर्यंत  आडवा होता. पुढे गुप्त काळापासून तो उभा कोरला जाऊ लागला. सातव्या शतकापासून शिवाच्या जटा मुकूटाप्रमाणे दाखवण्यात येऊ लागल्या. त्रिशूल, सर्प, खटव्ांग, डमरू व घट ही प्रमुख आयुधे मूर्तीमध्ये आढळतात. आपल्या कल्पनेप्रमाणे दैवतांना विविध रुपांत पाहणाऱ्या कलाकारांमुळे शिवाची अनेक रुपे पहायला मिळतात.
या रुपाच्या प्रेमाखातर आणि महादेवावरील श्रद्धेपोटी गौरा उत्सवापुरती मर्यादित असणारे शिवाचे मूर्तीरुप खोपटे ग्रामस्थांनी कायमस्वरूपी आपल्या मंदिरात स्थापन केले आहे. विश्वाचे उर्जा केंद्र अशी मान्यता असणाऱ्या शिवाचे हे केंद्र  संपूर्ण खोपटे परिसराला या उत्सवाच्या निमित्ताने उर्जा पुरवतो.

          - तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(विशेष आभार: जगन पाटील, प्रेमानंद भगत-खोपटे)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...