Search This Blog

Sunday, March 31, 2019

शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा

शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा


    मुंबईच्या उत्तरेला पश्चिम रेल्वे मार्गावरील एक गजबजलेले उपनगर म्हणजे नालासोपारा. भारताच्या जवळपास सर्व राज्यांतील (काही परराष्ट्रातील सुद्धा) माणसे इथे आढळू शकतील इतकी विविधता इथल्या लोकसंख्येत आहे. खरे तर नाळा आणि सोपारा अशी दोन स्वतंत्र गावे इथे आहेत. एका मान्यतेनुसार ही मूळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी. याचे प्राचीन नाव शूर्पारक. कोणे एके काळी हे शहर एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर आणि कोकण प्रांताच्या राजधानीचं शहर म्हणून वैभवाने भरलेलं होते.  स्वत: गौतमबुद्धांनी या परिसराला भेट दिली असंही सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायाची बाजारपेठ म्हणून शूर्पारक बंदर जगप्रसिद्ध होते. इथून परदेशात मोठा व्यापार चालत असे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत शूर्पारक नगरी कोकण प्रांताची राजधानी होती. सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हे बुद्धगयेहून आणलेली महाबोधी वृक्षाची फांदी घेऊन याच बंदरातून श्रीलंकेला गेले होते. त्यानंतरच जगभर बौद्धधर्माचा प्रसार सुुरु झाला. या प्राचीन नगरीचा इतिहास सांगणाऱ्या वस्तू अजूनही जागोजागी आढळतात. वसई परिसरातील गास, निर्मळ, सोपारा, तुंगारेश्वर या स्थानांवर प्राचीन बांधकामे, मूर्ती, वस्तू मोठ्या संख्येने आढळतात. सोपाऱ्याच्या चक्रेश्वर तलाव आणि परिसरात सापडलेल्या काही मूर्ती महादेव मंदिरात आणि मंदिराबाहेर ओळीने ठेवलेल्या आहेत. या शिल्पांमध्ये हिंदू, जैन, बौद्ध अशी विविधताही आहे. गास या गावातील शेतात सापडलेले ‘ब्रम्हदेवाचे शिल्प’ हा या कलाकृतींचा उच्चस्तरीय नमुना. तसे पहायला गेलो तर ही सर्व शिल्पे म्हणजे केवळ दगडच, परंतु कोणा अज्ञात कलाकारांच्या हत्यारांतून ही मूक  शिल्पे हजारो वर्षांचा इतिहास कथन करतात. ओळीने रचलेल्या या शिल्प रांगामधील वरकरणी सामान्य भासणारे व सहसा कोणाचे लक्ष न वेधणारे एक शिल्प मात्र एक वेगळी परंपरा आपल्यासमोर मांडते.
दोन भक्तीमार्गांना, परंपरांना एकत्रित आणणारी ही मूर्ती आहे तरी कसली?

    चक्रेश्वर महादेव मंदिराच्या उत्तर दरवाजातून बाहेर पडल्यानंतर भव्य ब्रम्हमूर्तीचे दर्शन होते. या शिल्पाच्या उजव्या हाताला एक स्थानक म्हणजेच उभ्या स्थितीतील सुमारे चार फूट उंचीची पाषणमूर्ती कुंपणाच्या आधाराने ठेवलेली आहे. दोन्ही पायांवर सारखा तोल साधून शरीर कुठेही न वाकवता ताठ उभी असलेली, तसेच दृष्टी समोर असलेली ही मूर्ती आहे. मूर्तीकलेच्या परिभाषेत अशा मूर्तीला ‘समभंग’ मूर्ती म्हणतात. सहसा विष्णू, शीव, सूर्य व लक्ष्मी या मूर्ती समभंगात असतात. शिल्पाची थोडीफार झीज झाली असली तरी मुखावरील सौम्य भाव व योगारूढ स्थितीतील सात्विकता स्पष्टपणे जाणवते. मूर्तीचे हात भग्न झालेले आहेत. मूर्तीच्या पार्श्वबाजूस लंबवर्तुळाकार प्रभावलय दर्शवण्यात आले आहे. अधिक बारकाईने  निरीक्षण केल्यास मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या भागांमध्ये सूक्ष्म फरक असल्याचे जाणवते.


 हा सूक्ष्म भेद सर्वप्रथम लक्षात येतो तो मूर्तीच्या डोक्यावरील मुकुटावरून. डाव्या बाजूकडील मुकुट  खालून वर निमुळते होत गेले असून रत्नजडीत आहे. त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. अशा मुकुटला ‘किरीट मुकुट’ म्हणतात. विष्णू, सूर्य, कुबेर अशा देवतांच्या माथी हा मुकुट दाखवला जातो. उजव्या भागातील मुकुट खूपच वेगळे असून त्यात मस्तकावरील केशसंभार उंच मुकुटाप्रमाणे धरून बांधलेला आहे. या रचनेला ‘जटामुकुट’ म्हणतात.

सामान्यत: ब्रम्हा व शीव यांच्या माथी असा जटामुकुट असतो. या मुकुटामध्ये आभूषण म्हणून चक्क नररुंड म्हणजे मानवी कवट्या साकारल्या आहेत. या सर्व रचनेवरून मूर्तीचा उजवा भाग शिवरूप असून, डावीकडील भाग विष्णूरुप असल्याचे समजून येते. या निष्कर्षाला बळकटी देणारी आणखी काही लक्षणे या शिल्पात आहेत. शिव बाजूच्या पायाजवळ नंदी आहे.
सहसा विष्णू मूर्तीत आढळणारा जानव्यासारखा उदरापर्यंत येणारा ‘चेन्नवीर’ नावाचा अलंकार मूर्तीच्या डाव्या बाजूस आहे. दोन्ही खांद्यांवरून गुडघ्यापर्यंत लोंबणाऱ्या माळेतील खालचा भाग सुस्थितीत आहे. त्याच्या शिव भागाकडील माळेत नररुंड असून विष्णूरुपाकडे पुष्पमाला असल्याचे दिसते.
मूर्तीचे हात भंगले असल्याने त्यांच्या हातातील आयुधे, उपकरणे याविषयीची माहीती मिळत नाही, परंतु एकूण रचनेचा विचार करता या देवतांच्या प्रिय वस्तू त्या हातांमध्ये असाव्यात. शिव आणि विष्णू या दोघांच्या अशा एकत्रित मूर्तीला ‘हरिहर मूर्ती’ म्हणतात.  म्हणजेच चक्रेश्वर महादेव मंदिराजवळील ही दुर्मिळ मूर्ती हरिहराची आहे . या शिल्पामध्ये असे अनेक सूक्ष्म भेद असले तरी एकत्रितपणे पाहताना हे भेद एकरूप झाल्याचे दिसतात. शैव आणि वैष्णव वेगळे भासत असले तरी ते एकच आहेत हे या शिल्पातून सुचवणाऱ्या या कलाकाराचे कौशल्य अद्वितीय आहे.
      कंबोडीया येथील शिलालेखांमध्ये या एकत्रिकरणासाठी शम्भू-विष्णू, शंकर-अच्युत, हर- अच्युत, परमेश्वर-सारंगी, विष्णू-ईश, हरी-शंकर आणि हरी-ईश्वर  असे उल्लेख आले आहेत.  हरिहर हे शिव आणि विष्णू या दोन स्वतंत्र सिद्धांतांवर आधारित देवतांचे एकीकरण दाखवणारे स्वरूप आहे. असे स्वरूप त्या काळातील समाजधुरिण तत्वज्ञांना निर्माण करावे लागले. आपल्या भारतीय परंपरेमध्ये शैव आणि वैष्णव पंथ हे पूर्वीपासून त्यांच्या स्वतंत्र तत्त्वज्ञानावर चालत आले आहेत. पण या पंथामध्ये कालांतराने वाढत गेलेले मतभेद कुठेतरी थांबवणे, ही तत्कालीन समाजाची गरज बनली. या गरजेपोटी दोन्ही देवतांचे महाविलयन झाले.शिव-पार्वतीच्या अर्धनारीश्वरच्या धर्तीवर हरिहर संकल्पना विकसित होताना दिसते. याचे पुरावे वायूपुराण, शिवपुराण यांसारख्या पुराणांच्या आधारे पडताळता येतात. वायू पुराणात शिव आणि विष्णू या दोनही देवतांचा तितकाच सन्मान केला गेला आहे. विश्व उत्पत्तीचे मूळ शिवाला मानले आहे तर विष्णूच्या सूक्ष्म रूपात सर्वत्र असल्याचा उल्लेख आहे. विष्णू प्रकृती आणि शिव पुरूष असे स्वरूप मानले आहे. त्यामुळे हरिहर मूर्तींमध्ये शिवाच्या वाम बाजूला जी अर्धनारीश्वर मध्ये पार्वतीची बाजू आहे त्या बाजूला, विष्णू अंकित करतात.

एका श्लोकाद्वारे हरिहर स्वरूपाचे वर्णन केले आहे.
शिवायविष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे ।
शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः॥8।।
ईशादिविंशोत्तरशतोपनिषदः (51- 60.8 )

अर्थात शिव म्हणजेच विष्णूचे रूप आणि विष्णू म्हणजेच शिवाचे रूप आहे. शिव विष्णूच्या हृदयात आहे आणि विष्णू शिवाच्या. या एकात्मिक तत्त्वावर  हरिहर मूर्तीची संकल्पना मूर्त रूपात साकार झालेली आपल्याला दिसते. यातून पुढे अर्धशिव आणि अर्धविष्णू यांचा संयोग घडविणारा हरिहर पंथ निर्माण झाला. परंतु याचे आयुष्य अल्प होते आणि अकराव्या शतकानंतर तो फारसा प्रचलित राहू शकला नाही. हरि आणि हर यांच्या उपासकांचे हितसंबंध फार भिन्न होते आणि त्यातून स्मार्त-वैष्णव संघर्ष होत राहीले. कालानुरूप या जाणिवांमध्ये बदल होतच राहीले. प्राचिन काळातील वस्तूंमधून पुरातन  इतिहास समोर येत राहतो.
सोपाऱ्यातल्या अशा प्रत्येक शिल्पामागे एक रंजक कथा आहे. परंतु उनपावसाच्या कचाट्याने आणि आपल्या झापडबंद दुर्लक्षामुळे या शिल्पांची नासधूस होऊन हा कथासंग्रह फाटू लागलाय. त्यातील महत्त्वपूर्ण पाने गहाळ होऊ लागलीत. थोडी इतिहासाबद्दलच्या जागृततेची लहानशी संजीवनी या वस्तूंवर पडली तर ही शिल्पे बोलू लागतील, तुमच्याशी सुद्धा!

संदर्भ: भारताची मूर्तीकला- पं.महादेवशास्त्री जोशी, पुराणकथा आणि वास्तवता- दामोदर कोसंबी, वसईच्या इतिहासाची साधने- श्रीदत्त राऊत

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(सदर लेख दैनिक कर्नाळा 31 मार्च 2019 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.  https://epaper.ekarnala.com/uploads/epaper/2019-03/5c9faacb1d521.jpg )

Tuesday, March 5, 2019

नोटांतून पोटात


नोटांतून पोटात!

            “खाने से पहले सदा हात धोना कभी भी ना भुलेंगे हो,
ये आदत हमारी करे दूर बिमारी....” दूरदर्शनवरील जाहीरातींच्या एका सुप्रसिद्ध जिंगल्स मधील या ओळी. स्वच्छ हात धुवणारी सुंदर चेहऱ्याची  लहान मुले, त्यांच्या तितक्याच चकाचक कपड्यांतील आया सातत्याने टी.व्ही.च्या लहान पडद्यावर झळकताना दिसतात. अमुक ब्रँडचा साबण किंवा तमुक ब्रँडचे साहीत्य वापरल्यानंतर किटाणूंपासून कशी मुक्ती मिळते याचे साग्रसंगीत विश्लेषण या जाहीराती करतात. रोगजंतूंची भिती आणि आरोग्याची काळजी या प्रमुख भांडवलावर आधारीत एक भली मोठी बाजारपेठ हळूहळू आपले स्वच्छ धुतलेले हातपाय पसरून बसली आहे. साबण, हँडवॉश, सॅनिटायजर यांसारख्या पदार्थांनी जवळपास सर्वच घरांमध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे. या जाहीरांतीमागील नफेखोरीच्या भागाकडे थोडे दुर्लक्ष केले तर, त्यामधून दिला जाणारा ‘आदत हमारी, करे दूर बिमारी’चा संदेश सामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरू शकेल. या जाहीरातींनी सर्वसामान्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या काही चांगल्या सवयी निर्माण करण्यास हातभार लावला आहे. रोगजंतूंसारख्या छुप्या शत्रूपासून बचावण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी उपयोगी ठरतात व त्यातून रोगप्रतिबंध साधता येतो, हे सर्वज्ञात आहेच. आपल्या रोगकारक सवयी टाळून निरोगी राहण्याचा प्रयत्न अलिकडच्या काळात सर्वच स्तरांवर होऊ लागला आहे. रोगप्रसाराचे मार्ग खुंटवण्याचे यशस्वी प्रयत्न होत असताना रोगजंतूंच्या प्रवेशाची एक नविनच शक्यता समोर येत आहे. मनुष्य आयुष्यभर ज्याच्या मागे लागतो, ज्याला जीवापाड जपतो, ज्याच्यासाठी संघर्ष करतो अशा वस्तूद्वारेच रोगप्रसार होऊ शकतो याची कदाचित त्याने कल्पनाच केली नसेल. वस्तू हाताळणीच्या आपल्या विशिष्ट सवयींमुळे रोगजंतूंच्या प्रवासास सहाय्यीभूत ठरणारी ही बाब म्हणजे ‘पैसा.’(म्हणूनच ‘पैसा बहुत बुरी चीज है’ असे एका महान कलाकाराने एका महान चित्रपटात म्हटले असावे.)
‘चलनी नोटा आणि नाणी’ याद्वारे रोगप्रसार होऊ शकतो का?
आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अत्यंत महत्वपू्र्ण वस्तूच्या अयोग्य हाताळणीतून रोगजंतूंना फैलावण्याची संधी मिळू शकते का? दुर्दैवाने या मौल्यवान प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे द्यावे लागेल.
   चला पांढऱ्या पैशाची ही काळी बाजू पाहू...
नोटा आणि नाणी ही चलनाची पारंपारिक बाजू. पेपरलेस आणि ऑनलाईनच्या जमान्यात अजूनही रोख रक्कम सर्वाधिक व्यवहारांमध्ये वापरली जाते. वरकरणी सामान्य वाटणाऱ्या नोटांच्या हस्तांतरणात आपल्या विचित्र सवयींमुळे संसर्गाची शक्यता निर्माण होते. चलन हाताळण्याच्या काही अयोग्य परंतु नित्यनेमाने पाळल्या जाणाऱ्या सवयी पाहू. भारतात चलनी नोटा मोजतानाची सर्वात जास्त लोकप्रिय पद्धत म्हणजे हाताच्या बोटांना थुंकी लावून मोजणे.(दुसऱ्याला थुंकी लावण्यात आपण तरबेज आहोतच!) 

आपल्या थुंकीमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, त्यात काही रोगजंतूही असू शकतात. बोटाला थुंकी लावून नोटा मोजताना थुंकीसह हे सूक्ष्मजीव नोटांवर विराजमान होतात. या सूक्ष्मजीवांना फोफावण्यास आवश्यक वातावरण कायम राहील्यास ते आपला प्रवास चालू ठेवतात. या अयोग्य आणि अनारोग्यदायी पद्धतीने काम करणारी व्यक्ती केवळ थुंकीवाटे संसर्गास मदत करत नाही तर त्या नोटांवर आधीपासून उपस्थित असू शकणाऱ्या रोगजंतूंना आपल्या शरीराचे प्रवेशद्वार उघडून देत असते. अशा प्रकारे हे रोगजंतू नोटांतून पोटात पोहोचतात. काही लोकांच्या पैसे बाळगण्याच्या विचित्र सवयीही रोगजंतूंना सहाय्य करतात. हे लोक पैसे सुरक्षित राहण्यासाठी कपड्यांच्या आत लपवून ठेवत असल्याचे आढळून आले आहे. अशा वेळी नोटांचा शरीराला अधिक काळ स्पर्श होतो. घाम, शरीरावरील जखमांवाटे रोगजंतू नोटेवर जाऊन पोहोचतात. संसर्गजन्य त्वचारोगांचे जंतू अशा वेळेस आपली कामगिरी चोखपणे बजावतात. नाण्यांच्या बाबतीत तर याहूनही वाईट स्थिती आहे. लहान मुले सर्रासपणे नाणी तोंडात ठेवतात. यातून नाणे गिळण्याचा धोका तर आहेच पण संसर्गही होऊ शकतो. एका अभ्यासाअंतर्गत केल्या गेलेल्या सूक्ष्म तपासणीमध्ये चलनी नोटांवर स्टेफॅलोकॉकस ऑरेस, क्लबसिएला न्युमोनी, ई कोलाय, सुडोमोनास अरजिनोस यांसारख्या सूक्ष्मजीवांचे अस्तित्व आढळले. नोटांवर आढळलेल्या या सूक्ष्मजीवांमुळे मानवी आरोग्यास धोका संभवतो.

          नोटांची निर्मिती झाल्यानंतर त्या आपले ‘चलन’ हे नाव सार्थ करत बाद होईस्तोवर प्रवास करत राहतात. या दरम्यान त्या विविध व्यक्ती, प्रवृत्तीद्वारे हाताळल्या जातात.
 बरेचसे विक्रेते, व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या आठवणी नोटांसह ग्राहकाला भेट देतात. या आठवणींमध्ये मांसविक्रेत्याकडील प्राण्यांचे रक्त, मच्छी साठवण्यासाठी वापरलेल्या बर्फाचे पाणी असे बरेच काही असू शकते. एका पाहणीत विविध ठिकाणांहून जमा केलेल्या नोटांपैकी मच्छी आणि मांस विक्रेत्यांकडील नोटा अधिक संदूषीत असल्याचे लक्षात आले आहे.
फळविक्रेते, भाजीविक्रेते, रुग्णालये यांच्याकडील नोटांच्या नमुन्यांवरही रोगजंतू आढळले. रोगजंतूंना पोषक असे ओलसर वातावरण व त्यांच्या वाढीस योग्य तापमान कायम राहील्यास रोगजंतूंचे फावते. त्यामुळे या ठिकाणांवर संसर्ग निर्माण करू शकणाऱ्या चलनाची संख्या वाढते. यातून आपल्या नकळत रोगजंतूंचा शिरकाव आपल्या शरीरात होत राहतो.
   आश्चर्याची बाब म्हणजे नोटेच्या मूल्यावरही नोटांच्या संदूषणाचे प्रमाण बदलते. सामान्यपणे निरीक्षण केल्यास पाच, दहा ते वीस रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात अस्वच्छ असल्याचे आढळेल. किंमत कमी असल्यामुळे त्या निष्काळजीपणे हाताळल्या जातात. या नोटा जास्त वेळा हाताळल्या जात असल्याचाही परिणाम त्यांच्या रोगजंतू धारणावर होतो. याऊलट पाचशे किंवा अधिक मूल्याच्या नोटांचे महत्त्व जाणत असल्याने सहसा या नोटांची हाताळणी काळजीपूर्वक होते. मच्छी विक्रेत्यांकडे जर तुम्ही दहा किंवा वीस रुपयांची नोट दिलीत तर ते ओल्या हाताने स्विकारतात, पण शंभर, पाचशे सारख्या नोटांच्या बाबतीत मात्र हात स्वच्छ पुसून स्विकारल्या जातात. साठवणूकीच्या बाबतीतही अधिक मूल्याच्या नोटा काळजीपूर्वक साठवल्या जातात.

       लेखाच्या सुरूवातीस उल्लेखलेल्या ब्रँडच्या आणखी एका जाहीरातीमधील पुढच्या ओळी “जाने किस किसने छुआ है ये साबुन” असे म्हटले आहे.  दुसऱ्या व्यक्तीचा साबण, रुमाल अथवा कपडे न वापरणारे आपण इतरांनी वापरलेल्या नोटा सहज वापरतो, हाताळतो. परक्या व्यक्तीची वस्तू वापरण्याची वेळ आलीच तर त्या वस्तूला स्वच्छ धुवून निर्जंतुक करण्याकडे आपला कल असतो मात्र नोटांच्या बाबतीत ही शक्यताही संपून जाते. चलनी नोटा हे केवळ ‘अस्वच्छ आणि अयोग्य सवयींचे एक उदाहरण आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा कित्येक कृती नकळतपणे करत असतो ज्यातून आपले आणि इतरांचेही आरोग्य धोक्यात येऊ शकते. सवयीला इंग्रजीमध्ये HABIT असे म्हटले जाते. या शब्दाची एक गंमत आहे. यातील पहीले अक्षर काढले तरी थोडे काही (A Bit) शिल्लक राहते, आणखी एक एक अक्षर काढूनही थोडे (Bit आणि It) राहतेच. त्यामुळे सवय सोडणे कठीण असले तरी तरी आपल्या आरोग्याचा विचार करून अयोग्य सवयी बदलूया. आपले आणि इतरांचे जीवनही समृद्ध करूया.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(वरील लेखातील काही भाग नवेगाव आंदोलन मासिकाच्या मार्च 2019 च्या स्वच्छता विशेषांकात प्रकाशित झाला आहे.)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...