Search This Blog

Thursday, December 7, 2017

ग्लोबल वॉर्मिंगची ढोबळ वॉर्निंग



 ‘ग्लोबल वॉर्मिंगची ढोबळ वॉर्निंग’

  गेल्या 5 जून रोजी सगळीकडे  ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा झाला. तसा तो प्रतिवर्षी होतच असतो. 2014 साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिनी’ आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रांमध्ये पर्यावरणविरोधी घटकांविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असा सूर साऱ्याच तज्ज्ञांनी लावला. वातावरणातील बदल रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सागरपातळी वाढत असून, त्यामुळे लहान बेटांना धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविरोधी घटकांमुळेच पूर, दुष्काळ, चक्रीवादळ इ. संकटे निर्माण होत आहेत, अशी चर्चा या चर्चासत्रांमध्ये होती.
     ‘ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदल’ या फार मोठय़ा जागतिक समस्या झाल्या आहेत. लहान बेट असलेल्या ५२ देशांना हरितगृह वायू उत्सर्जनाच्या वाढीमुळे धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिली.लहान बेटे असलेल्या ग्रेनेडा, मालदीव आणि मार्शल या देशांचे प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते.
      वरील बातमीच्या अनुषंगाने नुसतं ‘पर्यावरण’ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्यासमोर लगेच ‘जागतिक तापमानवाढ (Global Warming)’ हा शब्द समोर येतो. इतकं आपण या संकल्पनेला सरावलो आहोत. जितक्या गंभीरतेने पर्यावरणवादी जागतिक तापमानवाढीचे विनाशकारी संकट आपल्यासमोर मांडत आहेत, खरंच तितकं ते गंभीर आहे का?
हवामान बदलांकडे ज्या दृष्टीकोनातून आपण पाहतो तो ‘कोन’ थोडासा बदलून पाहू शकतो का? 
यांसारख्याच अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला गेलो तर काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
वारंवार चर्चिला जाणारा हरितगृह परिणाम आहे तरी काय? 
हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते. हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होउ नये म्हणून बंदिस्त असते व उबदार असते. हे घर काचेचे असून घरात उन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीत वापरतात. काही वायूंच्या रेणूंची रचना अश्या प्रकारची असते की ते उर्जालहरी परावर्तीत करू शकतात. कार्बन डायॉक्साईड, मिथेन,डायनायट्रोजन ऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायु असे आहेत जे उर्जालहरी परावर्तीत करू शकतात. परिणामत: पृथ्वीचे तापमान वाढतेे.पण ज्यावेळेस कोणतीही व्यक्ती तापमानवाढीबद्दल चर्चा करते तेव्हा ती चर्चा कार्बन डायॉक्साइडच्या पलीकडे जात नाही. ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत इतर वायूंचे प्रमाण कसे वाढते आहे, हे सांगणारे हवामान तज्ञ तापमानवाढीसाठी सर्वाधिक जबाबदार(दोन तृतीयांश) असणारा वायू  'पाण्याची वाफ' आहे हे जाणिवपूर्वक लपवतात की ते सुद्धा या कारणापासून अनभिज्ञ आहेत?
पाण्याची वाफ नैसर्गिकरित्या निर्माण होत असल्याने आता तापमानवाढीसाठी जबाबदार कोणाला धरणार?
खरं म्हणजे ज्या कार्बन डायॉक्साइडला जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार धरले जाते, त्याची तुलना तापमानवाढीच्या इतिहासाशी केल्यास उलटाच परिणाम दिसून येईल. पुढील आलेखांकडे नजर टाकल्यास इ.स. 1940 ते 1970 या कालखंडात कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण वाढताना दिसत आहे मात्र सरासरी जागतिक तापमानामध्ये विलक्षण घट दिसून येत आहे.(आलेख क्र. 1 व 2)



 हीच परिस्थिती इ.स. 2000 ते 2008 मध्येही दिसून आली आहे.(आलेख क्र.3) हे पुरावे काय सांगतात; कार्बन डायॉक्साइडमुळेच जागतिक तापमानवाढ वाढ होत आहे असे खात्रीने म्हणता येत नाही. आता कार्बन-डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण वाढत आहे, हे मात्र नक्की. याची 1957 पासूनची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार दक्षिण ध्रुव, सेचेलिस बेट, अशा विरोधी हवामानाच्या ठिकाणीही या वायूचे प्रमाण 315 पीपीएम होते, ते 2002 साली 370 एवढे झाले. ही आकडेवारी पाहिल्यावर असे वाटते, की केवढी ही प्रचंड वाढ! पण हे आकडे पार्टस्  पर मिलिअनचे आहेत. म्हणजे शेकडा वाढ 0.55, सुमारे अर्धा टक्का, तीही 45 वर्षांत!! आणि ही वाढ होताना अनेक ठिकाणचे तापमान कमी होत होते, हेही आपण पाहिले. याचा अर्थ सर्व जगभर तापमानवाढ होत आहे, हेही खरे नाही आणि वातावरणातील कार्बन डायॉक्साइड अफाट वाढल्यामुळे ते वाढते आहे, हेही खरे नाही. तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे, काही वर्षांतच जगातील बरीचशी बेटे पाण्याखाली जाणार, बांगलादेश निम्मा बुडणार, अशी भीती घालण्ययात आली. पण याला कसलाही आधार नाही. समुद्राच्या पातळीत दर वर्षी दीड ते अडीच मिलिमीटरने वाढ होत आहे, पण ती जागतिक तापमानवाढीमुळे नाही, कारण ही वाढ गेली सहा हजार वर्षे चालू आहे. या हिशेबाने आणखी शंभर वर्षांनी बांगलादेशातील भरतीचे पाणी काही सेंटीमिटरने वर चढलेले असेल. जगातील हिमखंड वेगाने वितळत आहेत, पिके नष्ट होत आहेत, नवे रोग पसरत आहेत, हे सर्व असेच अतिरंजित दावे आहेत. यांपैकी एकही वैज्ञानिक पातळीवर सिद्ध झालेला नाही. ऐंशीच्या दशकात  देखिल, कोणी दहा लाख तर कोणी, आहेत त्याच्या निम्म्या प्रजाती वीस वर्षात नष्ट होतील, अशी मते व्यक्त केली होती. तसे काहीही झालेले नाही.  सहारा वाळवंटाची व्याप्ती कमी होत आहे आणि आर्क्टिक  खंडात तर बर्फाची जाडी वाढत आहे. कारण, हे सर्व पोकळ दावे होते. मते, अंदाज, भाकीत, कॉम्प्यूटर मॉडेलचे निष्कर्ष यांना शास्त्रीय सिद्धान्तांचे रूप देऊन पर्यावरणवाद्यांनी भीती फैलावण्याचेच काम केले. त्यांना अनेक संस्थांनी, अगदी युनोनेही साहाय्य केले. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची एकप्रकारे ढोबळ वॉर्निंगच सुरू झाली.  याच  विषयावर सायन्स फिक्शन प्रकारातली 'मायकल क्रायटन(Michael Chryton) यांची ‘स्टेट ऑफ फिअर(State of fear)’ नावाची कादंबरी खूप गाजली. या लेखकाच्या मते राजकारण, कायदेकानू व प्रसिद्धिमाध्यमे यांच्या अभद्र युतीमुळे हे घडते आहे. त्याकरिता त्यांनी अनेक उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले आहे. अभ्यासूंनी ते पुस्तक अथवा ‘डॉ.प्रमोद जोगळेकरांनी’ केलेला अनुवाद मुळातून वाचावा. सध्या ऊतू जाणारे 'पर्यावरणप्रेम' पाहिल्यानंतर या पुस्तकाचे  महत्त्व कळून येते.
       सुमारे 500 कोटी  वर्षाचा इतिहास असणा-या पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती साधारणत: 50 लाख वर्षापूर्वी झाली. त्यातही अर्वाचीन माणसाच्या प्रगतीस सुमारे 14 हजार वर्षापूर्वी सुरूवात झाली. 150 कोटी वर्षे जुनी असणा-या जीवसृष्टीत 'मानव' नावाचा एक नवखा सजीव फार मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर घडवून आणू शकेल का? पूर, वादळ, भूकंप, ज्वालामुखी इ. सारख्या सध्या निसर्गात घडणा-या प्रत्येक  गोष्टींचं खापर 'ग्लोबल वॉर्मिंग'वर फोडणारे हे तथाकथित पर्यावरणवादी लोकांची सतत दिशाभूल का करतात? 
     2013 च्या डिसेंबरमध्ये अमेरिकेत थंडीची  लाट आली. अमेरिका अक्षरश: गोठली. तापमान काही ठिकाणी उणे 51 अंश से.पर्यंत घसरले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती कायम होती. हवामान बदलाचाच हा परिणाम आहे, अशा बातम्या डिसेंबर 2013 मध्ये भारतीय वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर छापल्या. पण, अशा त-हेची परिस्थिती गेल्या शतकातच दोन ते तीन वेळा निर्माण होऊन गेलेली होती. विसाव्या शतकामध्ये किमान दोन वेळा नायगारा धबधबा गोठला होता. अठराव्या शतकात युरोप आणि अमेरिकेत थंडीचा प्रचंड कडाका पडला होता. यासाठी उत्तर ध्रुवीय चक्रीवादळे कारणीभूत ठरतात, हेही आता सिद्ध झाले आहे. ही चक्रीवादळे दोन्ही ध्रुवीय प्रदेशात पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्यामुळे होत असतात. दरवर्षी ती इतकी भयावह नसतात. काही वेळा मात्र वेगळी परिस्थिती उद्भवते. तापलेल्या उत्तर अमेरिकी खंडातली आणि युरोपातली गरम हवा उत्तरेकडे सरकते. ही गरम हवा ध्रुवीय प्रदेशात पोहोचली की ध्रुवीय चक्रीवादळ वर उचलले जाते आणि युरोप, अमेरिकेवर त्यातले थंड वारे पसरतात. याच सुमारास दक्षिण गोलार्धात मात्र सरासरी तापमान वाढते. या  पृथ्वीच्या वातावरणाचे, त्यातील बदलाचे, त्या संबंधित घटनांबद्दलचा अभ्यास सुमारे दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाला. जोपर्यंत कृत्रिम उपग्रहांची पृथ्वीभोवती प्रदक्षिणा सुरू झाली नव्हती तोपर्यंत या अभ्यासाबाबतीत अत्यंत वाईट अवस्था होती. त्यानंतर   प्रथम ‘मोन्डेक्स’ प्रकल्पातून आणि इतर माहिती संकलनातून पृथ्वीवरील अन्योन्य परिणाम समोर आले. पॅसिफिक महासागराचे तापणे, एलनिनो प्रवाह, गल्फस्ट्रीम, विषुववृत्तीय अटलांटिकमधील परिस्थिती आणि ध्रुवीय वारे यांमुळे हवामानावर परिणाम होत असतो. याशिवाय ज्वालामुखीचे जगात इतरत्र होणारे उद्रेक, हे जागतिक हवामानासंबंधीचे सर्व अंदाज चुकवू शकतात.
     सध्याच्या काळात बड्या राष्ट्रांचे राष्ट्रीय धोरण हे आर्थिक नाड्या हातात असलेले बडे उद्योगधंदे ठरवत आले आहेत. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी पर्यावरणीय प्रश्नांचा वापर करून घेतलेला आहे. नव्वदीच्या दशकात ओझोन होल अर्थात ओझोन विवराचा खूप गवगवा झाला होता. ओझोनचा थर विरळ व्हायला सीएफसी (क्लोरो फ्लुरो कार्बन्स) कारणीभूत ठरतात, अशी हाकाटी पिटण्यात आली. नेमक्या त्याच सुमारास अमेरिकी रासायनिक उद्योगांनी सीएफसीला पर्यायी रसायने शोधून काढली, मग विविध जागतिक संघटनांद्वारे ती भारतासारख्या इतर विकसनशील देशांच्या गळ्यात मारण्यात आली. त्यानंतर पद्धतशीरपणे ओझोन थराबद्दलची हाकाटी कमी झाली. ओझोन विवर मागे पडले आणि मग जागतिक तापमानवाढीबद्दल ओरड सुरू झाली. खरे तर पृथ्वीवरील इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त कारखाने अमेरिकेत आहेत. खनिज तेलाचा सर्वात जास्त वापर अमेरिकेत होतो. जागतिक परिषदांमध्ये प्रदूषण कमी करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा अमेरिकेने स्वत:वर कुठलीही बंधने घालून द्यायला नकार दिला आहे. या पर्यावरणतज्ञांनी आम्ल पर्जन्याच्या प्रश्नावर बोलायचे टाळले आहे. एवढेच नव्हे, तर मोटारींमुळे होणारे प्रदूषण दुर्लक्षित करून लाकूडफाटा, गोव-या जाळणे आदी मुख्यत: विकसनशील देशांतील परंपरेने चालत आलेल्या इंधन स्रोताशी संबंधित क्रियांना जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार ठरवले आहे. ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी सायन्स अँड टेक्नोलॉजी या नियतकालिकाचे मुख्य संपादक असलेल्या लॉरेन्स हेक्ट यांनी, 1993मध्येच जागतिक तापमानवाढ ही बकवास असून सध्याच्या जलवायुमानातील गडबड ही आगामी हिमयुगाची नांदी असू शकते, असा इशारा दिला होता. पण त्यांच्या दाव्याला दुर्लक्षीले गेले. आतापर्यंतचे जाणवले गेलेले पर्यावरणाचे प्रश्न हे नेहमीच अमेरिकी उद्योगधंद्यांच्या अर्थकारणाशी संबंधित आहेत. अमेरिकी उद्योगधंद्यांनी सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पर्यावरणाचा शस्त्र म्हणून वापर करायला सुरुवात केली आहे. आपण सर्वजण सुजाण आहोत. काय खरे आणि काय खोटे याचा पडताळा आपण घेऊ शकतो. प्रसारमाध्यमे आपल्यासमोर काहीही वाढतील. आपण मात्र ‘नीरक्षीर विवेकबुद्धी’ वापरून ग्लोबल वॉर्मिंगच्या या ढोबळ वॉर्निंगला सामोरे जाऊया.

-श्री. तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: ग्लोबल वॉर्मिंग- अभिजित घोरपडे
            जागतिक तापमानवाढ, महासंकट की महाफसवणूक - डॉ.शरद अभ्यंकर
            State of fear - Michel Cryton

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...