Search This Blog

Monday, April 1, 2024

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती

मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंदर. पेरिप्लस नुसार चौलच्या दक्षिणेस आणि पालेपट्टमीच्या (महाड परिसर) उत्तरेस हे बंदर स्थित आहे. मॅक क्रिंडल या तज्ञाच्या मते संस्कृतमध्ये उल्लेखलेला ‘मंद्रगिरी’ म्हणजे देखिल हेच बंदर. प्राचीन काळखंडात महत्त्वाचे असणारे हे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ‘मांदाड’ बंदर . या बंदरापासून निघालेला आणि कुडा-भाजे-बोरघाटमार्गे पैठणपर्यंत गेलेला एक सातवाहनकालीन रस्ता होता. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या.
या गावाच्या पूर्वेकडील महोबा डोंगरावर कुडे लेणी आहेत. इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी ही लेणी खोदली असल्याचे सांगण्यात येते. या लेण्याचा शोध १८४८ साली लागला. पाच चैत्य व एकवीस विहारांचा समावेश असलेल्या एकूण सव्वीस लेणी या विशाल कातळात कोरलेल्या आहेत. यात ब्राम्ही लिपीतील प्राकृत व संस्कृत शिलालेख आहेत. या लेण्यांपैकी चौदाव्या क्रमांकाचे लेणे आकाराने थोडे मोठे असून त्यातील दीर्घिकेच्या डाव्या भिंतीवर मागील बाजूस एक प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. या शिलालेखात “करहाटकचा लोहवाणिज महिक याची देणगी नमूद करणे” अशा अर्थाचे लेखन आहे.  करहाटक म्हणजे सध्याचा ‘कराड’ प्रांत. मुंबईजवळील कान्हेरी येथील लेण्यांमध्येही एका कम्माराने म्हणजे लोहाराने दान केल्याचा उल्लेख आहे. खरे पाहता ‘लेणी खोदणे’ हे प्रचंड खर्चिक काम. एखादा शासक अथवा मोठा व्यापारी यांनाच हा खर्च करणे शक्य व्हायचे. अशा परिस्थितीत लोह कारागिर, पाथरवटांनी देखिल लेण्याचे दान करणे ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. भटकंती करणारा एक सामान्य कामगार ते स्थिर व्यावसायिक अशी प्रगती करणे, त्या काळात खरेच शक्य झाले असेल का?
जिल्ह्यातील लोहकारागिरांच्या व पाथरवटांच्या कामगिरीचा आलेख कसा उंचावत गेला असावा?
           रायगड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाकडे लोहयुगीन संस्कृतीच्या दृष्टीने डोकावून पाहूया. जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर हातकुऱ्हाडी व रापी सारखी अश्मयुगीन हत्यारे सापडली होती. यावरून या भागामध्ये एक ते दीड लाख वर्षापूर्वीपासून मानव वस्ती नांदत होती हे स्पष्ट होते. रायगड जिल्ह्यात लोहयुगीन संस्कृतीचा उदय नेमका कधी झाला याविषयी निश्चीत माहिती सांगता येत नाही. मात्र लोखंडी छिन्न्यांसारख्या उपकरणांच्या सहाय्याने सह्याद्रीच्या कुशीत कोरलेली भव्य बौद्ध लेणी आजही तत्कालीन पाथरवट कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देतात. जिल्ह्यातील कुडा, चौल, पाले, कोल, ठाणाळे येथील बौध्द लेणी लोहयुगीन कारागिरीचे सुंदर नमुने .
उत्तर कोकणातील ही बौद्ध लेणी इतर लेण्यांपेक्षा उशिरा म्हणजेच इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात कोरली गेली आहेत. एका बौद्ध लेण्याचे संपूर्ण खोदकाम व कोरीव काम करण्यास तब्बल साठ वर्षाचा कालावधी लागत असे. त्यामुळे जेथे जेथे लेणी कोरण्याचे काम करावे लागे तेथे तेथे अनेक वर्षे हे कारागीर वसाहती करून राहू लागले. पर्यायाने या काळापर्यंत त्या कारागिरांची भटकीवृत्ती नाहीशी होऊन ते स्थिर होऊ लागले. अनेक बौद्ध भिक्षुंकडून या पाथरवट कारागिरांना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. पुढे त्यांच्याचपैकी काहींनी संपूर्ण लेण्याचे दान दिल्याचे उल्लेख अनेक शिलालेखांत आढळतात.  लोहयुगीन संस्कृतीमध्ये लोखंडी हत्यारे व कारागीरांची कला यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यासोबत मानवी वस्त्यांसाठी घरांची निर्मिती करताना मातीच्या भाजलेल्या विटा, लोखंडी खिळे, भाजलेली मातीची कौले, गावाभोवतीची तटबंदी, दळणाचे जाते, पाटा-वरवंटा, चलनातील नाणी, किनारपट्टीवरील बंदरे, व्यापार लेखनकला इ. गोष्टींचाही ओघाने उदय व विकास होत गेला.

     काही अभ्यासकांच्या मते रायगड जिल्ह्यातील लेण्यांचे कारागीर हे ‘आगरी’ समाजाचे होते. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ते म्हणतात, “आकर म्हणजे खाण, खाणीत करणारे म्हणजे आगरी. मूळच्या पैठण, नेवासा या ठिकाणी वास्तव्य करणारे हे लोक राष्ट्रकूट, चालुक्य, यादव यांच्या आश्रयाने पश्चिमेस आले. दक्षिण शैली आणि राजस्थानी शैली या दोहोंचा वापर करून त्यांनी पाषाणांतून मूर्ती, मंदिरे, किल्ले, गुंफा, स्तंभ, कोट बांधले. पाथरवट जमात स्वत:ला आगळे-आगरी म्हणून घेतात. नाशिक येथील मंदिरांच्या निर्मितीमध्येही याच कारागीरांचा हात असल्याचे मानले जाते. पंचवटीतील एका विस्तिर्ण गल्लीला आगरी समाजाचे नाव आहे. त्याचबरोबर जगप्रसिद्ध शैव लेणी असलेल्या घारापुरीचे मूळ नाव या आगरी पाथरवटांमुळे ‘अग्रहारपुरी’ होते, ज्यापासून सध्याचे घारापुरी  प्रचलित नाव तयार झाले आहे.” अर्थात या दाव्यांबाबत तज्ञांमध्ये एकमत नाही. परंतु रायगड जिल्ह्यात अदभुत शिल्प कौशल्य असणारे कारागीर होते व आपल्या असामान्य कौशल्यामुळेच त्यांनी स्वत:चा उत्कर्ष करून घेतला असल्याचे ठामपणे सांगता येते. पुढे लेणी खोदण्याचे प्रमाण कमी झाल्याने हे शिल्पकार आपल्या लोहयुगीन संस्कृतीसह विस्मृतीत गेले. परंतु त्यांनी आपल्या छिन्नीसारख्या अवजारांनी कोरलेल्या स्मृती चिरंतन राहील्यात.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Thursday, February 15, 2024

देवाचे मासे: वाळणकोंड

रांजणकुंडामुळे जीवदान!

      नदीपात्रातील रांजणकुंडांमुळे तयार झालेला डोह. जवळपास तीस मीटर लांब आणि दहा मीटर रुंदीचा हा डोह. डोहाच्या कडा इतक्या ताशीव की त्यात अडकलेल्या व्यक्तीला दोराशिवाय चढणे अशक्य व्हावे. डोहाची खोलीही तशीच अथांग. उन्हाळ्याच्या दिवसांतही न आटणारा हा जलकुंड. रोज अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहावरील  झुलत्या पुलावरून  हा डोह पाहण्यासाठी येतात. यातील काहीजणांच्या हातात तांदळाच्या लाह्या म्हणजेच मुरमुरे  असतात. डोहाच्या कडेला सुरक्षित जागा शोधून हे पर्यटक निळ्याशार डोहामध्ये मुरमुरे टाकतात. निळ्या रंगावर हे पांढरे कण तरंगत असतानाच अचानक पाण्याखाली थोडी हालचाल जाणवते. जलाचा पृष्ठभाग काळ्या-पांढऱ्या रंगांनी चमकू लागतो. क्षणार्धात शेकडो मासे या पृष्ठभागावर तरंगताना दिसतात. माशांसाठी टाकलेल्या खाऊमध्ये जसजशी वाढ होते, तसतशी त्यांची गर्दीही वाढत जाते. मोकळ्या आणि नैसर्गिक ठिकाणी एकाच जागेत इतक्या मोठ्या प्रमाणावर मासे आढळणे ही गोष्ट तशी दुर्मिळच म्हणावे लागेल. माशांनी भरलेला हा आश्चर्यकारक डोह पहायचा असेल तर तुम्हाला रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ परीसराकडे यावे लागेल. सुुप्रसिद्ध शिवथर घळीपासून काही किलोमीटर अंतरावर असणारा हा सुंदर परिसर म्हणजे ‘वाळणकोंड’. या डोहाला ‘वाळणकुंड’ किंवा ‘वाळणकोंडी’ असेही म्हटले जाते.
     भारताला पर्यावरण संवर्धनाची समृद्ध परंपरा आहे.  पश्चिम घाटात सामान्य जनतेने परंपरेने व स्वयंप्रेरणेने संरक्षित केलेल्या परिसरांची काही उदाहरणे पहायला मिळतात. या प्रकाराला ‘कम्युनिटी कंझर्वड एरिया(CCA)’ असे संबोधले जाते. विविध प्रकारच्या देवराई, गावकीची राखलेली जंगले ही संरक्षित अधिवासाची काही उदाहरणे. परंतु अगदी ब्रिटीश काळापासून ते आजतागायत सत्ताधाऱ्यांकडून या संरक्षित क्षेत्रांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आला आहे.
      रायगडमधील महाड तालुक्यातील वाळणकोंड हे ठिकाण अशाच एका ‘CCA’ चे उदाहरण आहे. वाळणकुंड म्हणजे एक प्रकारचे ‘मस्त्य अभयारण्य’च! सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उगम पावणारी काळ नदी डोंगरातून वेगाने वाहत येत वाळण गावालगत सपाटीला लागते. या नदीपात्राच्या खडकात पाण्याच्या प्रवाहामुळे एक मोठा डोह तयार झाला आहे,तोच  वाळणकुंड अथवा वाळणकोंडी. यातले पाणी कधीही आटत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत या डोहांतील मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत. या नदीवरील झुलत्या पुलावर उभे राहून डोहातील  मासे पाहता येतात. डोहात मुरमुरे, तांदूळ किंवा इतर खाण्याचे पदार्थ टाकले की प्रथम लहान, नंतर त्याहून मोठे मासे वर येत राहतात. स्थानिकांच्या मते माश्यांचे एकूण सात आहेत. या थरांतील मासे हळूहळू खालून वर येत राहतात. यापैकी सर्वात खाली चार ते पाच वर्षाच्या मुलाइतके मोठे मासे असल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे या अथांग डोहात एक मंदिर असून त्यात लग्नकार्यासाठी लागणारी भांडीकुंडी असून पूर्वीच्या काळी माशांना अन्न दिल्यानंतर ही भांडी वर येत असत असेही सांगीतले जाते.  यातील थोडा अतिशयोक्तीचा भाग वगळला तरी इथे आढळणारे मासे सामान्य नदीपात्राच्या तुलनेत आकाराने मोठेच आहेत. डोहात आढळणाऱ्या माशांमध्ये शिवडे, खउल, शिंगटी या लहान माशांसह खडस अर्थात महासीर (Deccan Mahseer) जातीचे भले मोठे मासे आहेत. यापैकी डोहात आढळणारी खडस माशाची जात धोक्यात असलेल्या प्रजातींपैकी एक आहे. त्यामुळे या माशांना अभय मिळणे हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
या माशांच्या विविध रंगछटा या डोहाला अधिकच आकर्षक बनवतात.  ‘देवाचे मासे’ अशी या डोहातील माशांची ओळख असल्याने, ते कधीच पकडले जात नाहीत. नदीकाठीच वरदायिनी मातेचे मंदिर आहे. रायगड परिसरातील स्थळदेवतांमध्ये वाळणकोंडीच्या देवीचा समावेश होतो. सुमारे साडेतिनशे वर्षांपासून हे देवस्थान प्रसिद्ध असल्याचा दावा संबंधितांकडून केला जातो. इसवी सन १७७४ मध्ये इथून जवळच्या लिंगाणा किल्ल्यावर झालेला उपद्रव शमवण्यासाठी तिथल्या कारभाऱ्यांनी वाळणकोंडीच्या देवीची यात्रा केल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर सन १८६४ मध्येही या देवीचा उत्सव झाल्याची नोंद आहे.  भक्तांच्या दृष्टीने हे देवस्थान फार कडक मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालण्याची प्रथा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या रस्त्याने जाताना वाहनचालक वाहन चालवतानाही आपली चप्पल काही काळ बाजूला काढून ठेवतात.
     निसर्गाकडून सर्व काही ओरबाडून घेण्याचा हा काळ. या काळात निसर्गाचे रक्षण होत असल्याची दुर्मिळ बाब पहावयास मिळणे आनंददायी आहे. देवावरच्या श्रद्धेने असो किंवा परंपरांचे पालन करण्याच्या रिवाजामुळे असो, इथले सामान्यजन जाणते-अजाणतेपणी जैवविविधता जपत आहेत. काळ नदीच्या प्रवाहासारखा वेग असलेला निसर्गाचा ऱ्हास, वाळणकोंडी सारख्या डोहांमुळे मंदावतोय. रायगडचा हा अनमोल वारसा संपूर्ण महाराष्ट्राने चालवायला हवा. याबाबतीत ती ‘वरदायिनी’ माता सर्वांनाच सुबुद्धी देवो ही अपेक्षा!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Thursday, December 14, 2023

‘दासबोधाची’ जन्मभूमी

        दासबोध! समर्थ रामदासांचा आणि रामदासी संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ. ओवीसंख्या तब्बल ७,७५१.  एकूण वीस दशक आणि प्रत्येक दशकात दहा समास. सध्या प्रचलित असलेल्या दोनशे समासी दासबोधापूर्वी एकवीस समासांचा एक दासबोध समर्थांनी रचला होता, ज्याचा उल्लेख‘जुना दासबोध’ असा केला जातो. या ग्रंथाची महाराष्ट्रात श्रद्धापूर्वक पारायणे केली जातात.
सुप्रसिद्ध साहित्यिक ‘वपु’ आपल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, “ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम ह्यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं, तरी चाललं असतं. दासबोधासारखा महान ग्रंथ, करमणूक करणारा ग्रंथ नव्हे. माणसांच्या वृत्तीतील एकही छटा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअरबाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात.”
१९०५ साली धुळे येथील रामदासी साहित्याचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव ह्यांनी कल्याणस्वामीने स्वहस्ते लिहिलेली दासबोधाची प्रत प्रसिद्ध केली आणि तिला स्वतःची एक विस्तृत प्रस्तावना जोडून ह्या ग्रंथाच्या अभ्यासाची एक दिशा दाखविली. दासबोध हा केव्हा आणि कोठे रचिला गेला, ह्या प्रश्नांची उत्तरे निर्णायकपणे मिळत नाहीत, पण शंकर देव यांच्या मते समर्थांच्या मुखातून बाहेर पडलेल्या दासबोधाचे लिखाण शिष्योत्तम कल्याणस्वामी नलावडे यांच्या हस्ते  ‘शिवथर घळ’ येथेच झाले.  माघ शुद्ध नवमीला इथल्या संस्थेकडून या घळीत ‘दासबोध जयंती’ साजरी होते.
      रायगड जिल्ह्यातील महाडपासून तीस किमी अंतरावर दासबोधाचे जन्मस्थळ मानली जाणारी शिवथरघळ आहे.दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली असल्याचे सांगण्यात येते. सर्व बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या वाघजई दरीच्या कुशीतील हे ठिकाण. काळ नदीच्या काठावर कुंभे शिवथर कसबे शिवथर, व आंबे शिवथर अशा तीन वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या गर्द झाडीने झाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या निसर्गरम्य सुंदर घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत.
      येथे जाण्यासाठी महाडवरून बस सुविधा आहेच. खाजगी वाहनाने थेट घळीच्या पायथ्याशी पोहोचता येते. अरूंद आणि विरळ वाहतुकीच्या रस्त्यांमुळे हा परिसर गैरसोयीचा वाटू शकतो. सिमेंटीकरणाच्या काळातही हा भाग झाडाझुडपांनी वेढलेला आहे. सह्याद्रीच्या पोटात अशा अनेक गुहा, घळी आहेत. समर्थांनी आपल्या भ्रमंतीमधून अशा कित्येक घळींचा शोध घेतला. त्या घळी रामदासांच्या वास्तव्याने रामघळी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सज्जनगडची रामघळ, मोरघळ, जरंड्याची खोबण, तोंडोशीची घळ, चंद्रगिरीतील घळ, चाफळची रामघळ, हेळवाकची रामघळ अशा अनेक घळी प्रसिद्ध आहेत. शिवथरघळही अशांच पावन घळींपैकी एक. सुमारे चाळीस मीटर लांब, पंचवीस मीटर रुंद आणि प्रशस्त अशी ही घळ. काळ नदीकाठचे वाघजाईचे घनदाट अरण्य, जवळच असणारे चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष हा सारा परिसर अभ्यासकांना खुणावणारा.
     जवळपास पंचेचाळीस मोठ्या पायऱ्या चढल्यानंतर आपण या घळीत पोहोचतो. या पायऱ्या चढून आल्यानंतरचा थकवा इथल्या शांततेने आणि गारव्याने जाणवत नाही. घळीतले नैसर्गिक वातानुकूलन जबरदस्त आहे. ज्या काळात समर्थ रामदास इथे राहीले तेव्हाचे इथले वातावरण अधिकच नीरव असेल.
आतल्या भागात समर्थ रामदास आणि त्यांचे शिष्य कल्याणस्वामी यांच्या जिवंत भासणाऱ्या मूर्ती आहेत.  तपश्चर्या करण्यासाठी किंवा एखादी कलाकृती प्रसवण्यासाठी याहून अधिक चांगली जागा मिळणे कठीण आहे.
      घळीच्या वरच्या बाजूस थेराव गावच्या हद्दीत चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्यांची जोती दिसतात. दोन्ही चौथरे वीस बाय दहा मीटरचे आहेत. शिवथर घळीपासून रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, चंद्रगड (ढवळगड), मंगळगड (कांगोरीगड), कावळ्या किल्ला या ठिकाणी जाण्याच्या सहज वाटा आहेत. शिवथर घळीच्या या वैशिष्ट्यांवर कडी करणारा घटक म्हणजे या घळीला झाकणारा धबधबा. घळीच्या शेजारून कोसळणाऱ्या या ओढ्याला ‘खुट्याचा विरा’ म्हणतात.  सुंदरमठाचे वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात-
“गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनि चालीली बळे।
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे।।”

पावसाळ्याच्या दिवसात येथे आल्यास ह्या ‘धबाबा’ शब्दाचा अर्थ गवसतो. या धबधब्यामुळे एक सौंदर्यानुभूती आपल्याला लाभते.
     दासबोधाचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्धी लाभलेले हे स्थळ. हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण आणि पर्यटकांच्या आवडीचे स्थळ आहे. असे असले तरीही काही अभ्यासक ‘दासबोधाचे जन्मस्थळ’ याहूनही वेगळे असल्याचा दावा करतात. हा ग्रंथ कोठे रचिला गेला, ह्याबाबत अजूनही एकमत नाही. शिवथरच्या घळीत तो लिहिला गेला, असे शंकर देवांचे मत आहे तर हनुमंतस्वामीच्या बखरीत समर्थ रामघळीस ग्रंथ लिहीत बसल्याचा उल्लेख आहे, तर समर्थप्रतापकार गिरीधर दासबोध सज्जनगडावर लिहिला गेल्याचे सांगतात.  ‘आत्माराम दासबोध l माझे स्वरूप स्वतः सिद्ध’ ही समर्थांची दासबोधाकडे पाहण्याची दृष्टी होती, तसेच त्यांचा सारा उपदेश आणि तत्त्वज्ञान ह्या ग्रंथात एकवटलेले आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेता तो वेळोवेळी आणि ठिकठिकाणी लिहिला गेला असण्याची शक्यता अधिक आहे. या अनेक ठिकाणांपैकी एक ‘शिवथरघळ’ निश्चितच आहे. या घळीच्या सान्निध्यात येणाऱ्यांना हा परिसर भारावून टाकतो. सुंदरमठावरील काव्याच्या शेवटी समर्थ म्हणतात...

“विश्रांती वाटते तेथे।जावया पुण्य पाहिजे।
कथा निरूपणे चर्चा, सार्थके काळ जातसे ।।”


- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Wednesday, November 1, 2023

पिंडीरुपातील स्मृतीचिन्हे

पिंडीरुपातील स्मृतीचिन्हे
    महान कार्य करणाऱ्या विभूतींची स्मारके सर्वत्रच उभारली जातात. आपल्या देशात अगदी प्राचीन काळापासून स्मारकांची परंपरा आहे. विशिष्ट प्रकारच्या स्मृतींना दृश्य रुप देण्याच्या प्रयत्नातून  ही पद्धत सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. प्रदेशानुसार त्याचे स्वरूप जरी बदलत असले तरी आपल्या प्रियजनांची आठवण टिकवून ठेवणे ही भावना सर्वत्र सारखीच आहे. रायगड जिल्ह्यात स्तंभ, देवळी, छत्री, तुळशीवृंदावन, वीरगळ, सतीशिळा अशा स्वरूपातील स्मारके आढळतात. महाराष्ट्रात ज्या छत्री आढळतात, त्यातील बहुसंख्य मराठ्यांच्या काळातील आहेत. स्मारक, समाधींचे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्यासाठी उभारलेली मेघ-डंबरी हा छत्रीचाच प्रकार.
जिल्ह्यातील रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील छत्री, पाचाडला राजमाता जिजाबाईंची छत्री आणि अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांची छत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाच्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणच्या घुमटीवजा देवळीही प्रसिद्ध आहेत. या स्मारकांसह आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार रायगड परिसरात पहायला मिळतो.
       कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे नावाचे स्थानक लागते.  रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बऱ्यापैकी दाट वस्तीचे हे गाव. विन्हेरे येथे रयत शिक्षण संस्थेचे एक हायस्कूल आहे.
या विद्यालयाच्या परिसरात फेरफटका मारताना काही वस्तू आपले लक्ष वेधतात. शाळेच्या बाहेरील रस्त्यावरील एका थांब्याला उभे राहीलो असता, एका वृक्षाखाली एक-दोन लहान आकाराचे दगडी शिवलिंग ठेवलेले आढळतात. या शिवलिंगांचे पूजन होत असल्याच्या कोणत्याही खुणा तिथे नाहीत. स्थानिकांच्या दृष्टीने हे नेहमीचे चित्र, परंतु नव्याने पाहणाऱ्याला मात्र यात थोडे आश्चर्य वाटू शकेल. याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर एक कौलारू छप्पर असेलेले सुंदर असे ‘स्वयंभू नागेश्वर महादेव मंदिर’ आहे.
मंदिरात शिवलिंगासह नंदी व कासवाच्या थोड्या अलिकडच्या प्रतिकृती पहायला मिळतात. मंदिराबाहेर नजर टाकल्यास एका चौथऱ्यावर चार पाच दगडी वस्तू आहेत, यापैकी दोन स्पष्टपणे लिंगरुपात असून उरलेल्या वस्तूंवर शिवलिंग कोरण्यात आले आहे. एका तुळशीवृंदावनाच्या शेजारीही सुंदर शिवलिंग आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाहीले असता तेथील गवतामध्येही काही गोल, चौकोनी आकारांचे दगडी शिवलिंग दिसून येतात. एखाद्या परिसरात इतक्या मोठ्या संख्येने अशा वस्तू आढळणे ही तशी दुर्मिळ बाब.
     असाच काहीसा प्रकार काही वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातील आंबिवली या गावात पहायला मिळाला होता. २०१३ साली आंबिवली गावातील कोंडीराम तानाजी खेडेकर यांनी त्यांच्या घराशेजारी गोठा बांधण्यासाठी पाया खोदायला सुरुवात केली असता तिथे एकामागून एक लहान-मोठय़ा आकाराचे आठ दगडी शिवलिंग आढळून आले. यातले काही शिवलिंग आयताकृती, तर काही गोल अशा रचनेच्या होत्या. या पिंडी साधारण तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या असल्याचे तज्ञांनी सांगीतले.
या दोन्ही ठिकाणांमधील साम्य म्हणजे दोन्ही परिसरांत आढळलेल्या प्राचीनत्वाच्या खुणा. महाडच्या या मंदिराबाहेरील कुंपणाला एक अप्रतिम कलाकुसर असलेली सतीशिळा आहे, तर कर्जतच्या आंबिवली परिसरात शिलाहारकालीन मूर्ती आढळल्या आहेत. अर्थातच या परिसरातील शिवलिंगांचाही जुन्या काळाशी संबंध आहे. इतक्या मोठ्या संख्येने आढळणाऱ्या या शिवलिंगांचे कारण काय असावे?
शिवलिंग अथवा पिंडी म्हणजे एक प्रकारचे स्मारकच...
   प्राचीन काळी मृत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ पिंड तयार करण्याची पद्धत होती. विन्हेरे व आंबिवलीतील पिंडी ही अशाच प्रकारची स्मारके आहेत. या वस्तूंद्वारे येथे राहणाऱ्या तत्कालीन महनीय व्यक्तींच्या स्मृती या पद्धतीने जतन केल्या आहेत.
पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या समाधीस्थळावरही शिवलिंग कोरले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर शिवमंदिराबाहेरही अशा पिंडी ठेवल्या आहेत.

मृत व्यक्तीच्या पुढे ‘कै.’ अर्थात ‘कैलासवासी’ असे संबोधन लिहिण्याची प्रथा आहे. मृत्यूनंतर ती व्यक्ती शिवाशी एकरूप झाली अशा अर्थाने ही स्मृती चिन्हे तयार होत गेली. आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ तयार केलेले शिवलिंग पुढे गावाच्या वेशीजवळ अथवा शिवमंदिराजवळ ठेवले जात असत. हे शिवलिंग स्मृतीचिन्ह असल्याने त्याला पूजेचा मान मिळण्याची शक्यता नसते. त्याचबरोबर त्याचे महत्त्व न जाणल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊन कालांतराने ही चिन्हे झाकली जातात. यातूनच आंबिवली सारखी उत्खननात शिवलिंग सापडण्याच्या घटना घडतात. यापैकी काही घटनांना कधी ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होते, तर कधी धार्मिक. दोन्ही कारणांमुळे त्या वस्तूंवरील वर्षानुवर्षाची साठलेली धूळ झाडली जाऊन त्या सर्वसामान्यांच्या नजरेसमोर येत राहतात. विन्हेरे, आंबिवलीसारखी कित्येक ठिकाणे या जिल्ह्याच्या पोटात दडलेली आहेत. या ठिकाणांवरील वस्तू ‘स्वयंभू’ होऊन प्रकटण्याची वाट पाहण्याऐवजी थोडा ‘स्वयंशोध’ घ्यायला हरकत नसावी.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(फोटो साभार: सिताराम झुराळे, विन्हेरे हायस्कूल)

Thursday, October 26, 2023

प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव

प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव!

      पोलादपूर! रायगडचे दक्षिण टोक. राजधानी रायगड, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा प्रतापगड आणि इतर लहानमोठ्या गडकोटांनी वेढलेला हा परिसर. इतर सर्वसामान्य गावांप्रमाणे इथल्या गावांनाही नवरात्रोत्सवाचे आकर्षण आहे. इथेही आश्विन महीन्याच्या प्रारंभी घराघरात घटस्थापना होते, गावोगावच्या मातेच्या मंदिरांमध्ये उत्साह, नवचैतन्य निर्माण होतो. ‘गरबा-रास-दांडीया’च्या आकर्षक चक्रात पोलादपूरही फेर घेतो. पण त्याचबरोबर या उत्सवादरम्यान ही फेर धरणारी पाऊले मोठ्या संख्येने महाबळेश्वर घाटाच्या दिशेने वळतात. या मार्गातील प्रतापगडावरील नवरात्रौत्सवासाठी महाड व पोलादपूर येथील भाविक वर्षानुवर्षे येत असतात. एकाअर्थी सातारा आणि रायगड जिल्ह्यांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा हा उत्सव.
  ज्या भवानी मातेच्या नावाने गडावर नवरात्रौत्सव साजरा होतो, त्या देवीच्या स्थापनेमागचा इतिहासही रंजक आहे. तुळजापूरची भवानी माता ही शिवाजी महाराजांची म्हणजेच भोसले घराण्याची कुलदेवता. त्याकाळी तुळजाभवानी मंदिर परिसरावर आदिलशाही सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ साली जावळीच्या प्रदेशावर आक्रमण करून चंद्रराव मोरेंचा पूर्ण पाडाव केला व जावळी काबीज केली. घाटावर व खाली रायगड प्रांतात देखरेख करता यावी, यासाठी इथल्या दुर्गम डोंगरावर किल्ले प्रतापगडाचे बांधकाम करण्यात आले.  मोरोपंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अजरेजी यादव यांनी या अभेद्य गडाचे बांधकाम केले. इथेच शिवरायांनी आदिलशाहीचा बलाढ्य सरदार, सेनापती अफजलखानाला मोठ्या चतुराईने नेस्तनाबूत केले. त्यामुळे किल्ले प्रतापगडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. स्वराज्यात सुरक्षित ठिकाणी भवानी मातेचे मंदिर असावे, या हेतूनं प्रतापगडावर देवीची स्थापना करण्यात आली. सध्या आपण पाहतो ती भवानीमातेची मूर्ती तयार करण्यासाठीही खूप खटाटोप करावा लागला. हिमालयातील तीन नद्यांच्या संगमावरून मूर्तीसाठीची शिला आणण्यात आली. त्रिशूल गंडकी, श्वेत गंडकी व सरस्वती अशी या नद्यांची नावे. याकामी नेपाळचे त्यावेळचे राजे लिलासेन सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठी मदत केली. पुढे अमात्य मोरोपंतांच्या हस्ते  भवानीची यथासांग प्राणप्रतिष्ठा केली गेली. वेदमूर्ती विश्वनाथ भट यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी संपन्न झाला. मुख्य गाभाऱ्यात स्थापन झालेली भवानी मातेची मूर्ती अष्टभुजा असून सालंकृतही आहे.
मातेच्या या आयताकृती मंदिराचं  संपूर्ण बांधकाम दगडी आहे. गाभारा, भवानी मंडप, नगारखाना अशा पद्धतीची बांधकामाची रचना आहे. या भवानी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम छत्रपतींच्या सातारा गादीवर आलेल्या छत्रपतींनी केले आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मंदिराच्या छतावर तांब्याचा पत्रा बसवून शिखराची मजबुती केल्याची नोंद सापडते. १९२० मध्ये मंदिराला आग लागून संपूर्ण भवानी मंडप आगीच्या भक्षस्थानी गेला. मात्र, साताऱ्याच्या गादीने हा मंडप पुन्हा बांधून घेतला. मूर्तीवरील संपूर्ण छत्र चांदीचे बनवले आहे. तसेच समोरील लाकडी खांबही चांदीमध्ये मढवले आहेत. तब्बल १०० किलो चांदी त्यासाठी वापरण्यात आल्याचे सांगीतले जाते.
       नवरात्रीत या गडावर एकूण दोन घट स्थापन केले जातात. त्यापैकी एक  खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेला आहे. तर दुसरा घट छत्रपती राजाराम महाराजांनी नवसापोटी स्थापना केलेला आहे. उत्सव काळात नऊ दिवस दररोज पहाटे व रात्री चौघडा झडतो. प्रत्येक दिवस वेगळा कार्यक्रम व वेगळा उत्साह घेऊन अवतरतो. चतुर्थीला पारंपरिक पद्धतीनं रात्री देवीचा गोंधळ घातला जातो. अलिकडच्या काळातील कानठळ्या बसवणाऱ्या गरब्याच्या गोंधळात हा ‘गोंधळ’ मात्र मनाला सुखावणारा वाटतो. ललितापंचमीला पालखी मिरवणूक काढली जाते. मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर ही पालखी मिरवणूक काढली जाते.
या रात्री अनेक पेटत्या मशालींच्या उजेडात भवानीमातेला साकडे घातले जाते. ही प्रथा गेल्या साडेतिनशे वर्षापासून सुरू असल्याचे मानले जाते. अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. नवरात्रौत्सवात आकर्षक कपड्यांतील तरूण तरूणी देवीसमोर फेर धरून रास-दांडीया खेळतानाचे दृश्य आपल्या अंगवळणी पडलेले आहे.
मात्र प्रतापगडावरील मंदिराच्या डाव्याबाजूकडील मोकळ्या जागेत झांज, ढोल आणि लेझिमच्या तालावर फेर धरणारे मराठमोळ्या वेशातील युवा वर्ग पाहील्यानंतर विशेष कौतुक वाटते. एकूणात गडावरील नवरात्र म्हणजे एक भव्यदिव्य सोहळाच असतो. हा सोहळा आपल्याला शिवकाळातील गतवैभवाची आठवण करून देतो. हा सोहळा देवीबरोबरच इतिहासाचाही जागर घालतो. पोलादपूर परिसरातील रायगडकर नियमितपणे हा सोहळा अनुभवतात. शिवरायांच्या राजधानीचे नाव भूषवणारा आपला ‘रायगड’ जिल्हा आहे. तेव्हा रायगडकरांनो येत्या नवरात्रौत्सवात गडावर या, उत्सव अनुभवा. एकदा इथल्या भवानी आईचाही जागर होऊ द्या!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Thursday, October 12, 2023

आरोग्यदायी उन्हेरे

उन्हेरे, सुधागड
        सध्या थंडीचा हंगाम चालू आहे. या थंड पण आल्हाददायक वातावरणात गरम पाण्याने स्नान करणे कोणाला आवडणार नाही? सकाळी उठल्यानंतर अथवा संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी गरम पाण्याचा शेक सर्वांनाच हवाहवासा वाटतो.  हे गरम पाणी मिळवण्यासाठी जुन्या काळातील बंब, चुलीपासून ते अलीकडच्या काळातील गॅस, हिटर, गिझर या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. या कामामध्ये सातत्याने उर्जाही खर्च होत असते. गरम पाणी मिळविण्यासाठी नेहमीची खटपट करावी लागत असताना, रोजच्या रोज आयतेच गरम पाणी मिळू लागले तर? ते ही स्वतंत्रपणे उर्जा खर्च न करता?
हो, आपल्याला निसर्गत:च गरम पाणी मिळू शकते. फक्त हे गरम पाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याची वाट न पाहता आपल्यालाच या पाण्यापर्यंत पोहोचावे लागेल.
      आपल्या देशात सगळीकडेच जमिनीची रचना वेगवेगळ‌ी आहे. जमिनीवरील आणि आतल्या भागातील  वैविध्यपूर्ण स्थितीमुळे एक चमत्कारिक गोष्ट पहावयास व अनुभवायास मिळते, ती म्हणजे जमिनीतील गरम पाण्याचे झरे. भारतात आढळणारे गरम पाण्याचे झरे पुरातन काळापासून मानवाला आकर्षित करीत आहेत. या पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे आजार बरे होत असल्याचे मानले गेल्याने देशभरात अनेक ठिकाणी लोक तेथे गर्दी करतात. गरम पाण्याचे झरे म्हणजे अनेक भूशास्त्रीय चमत्कारांपैकीच हे एक. यालाच उन्हेरे, उन्हवरे, उन्हाळे, असेही म्हणतात. महाराष्ट्रात अंदाजे 32 उन्हेऱ्यांच्या जागा आढळून आल्या आहेत. त्यांपैकी जेमतेम आठ उन्हेरे राज्याच्या पठारी भागात आहेत, बाकी उरलेले सर्व  उष्ण झरे कोकणात आढळतात. कोकणची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील ‘उन्हेरे’ आणि महाडमधील ‘सव’ येथील गरम झरे प्रसिद्ध आहेत. पाली येथील सुप्रसिद्ध बळ्ळालेश्वर तिर्थक्षेत्रापासून जवळच ‘उन्हेरे’ हे स्थळ आहे.
नैसर्गिक, भौगोलिक चमत्काराला देवत्व बहाल करण्याची परंपरा सगळीकडेच आहे. याच परंपरेतून या झऱ्यांच्याही आख्याईका तयार झाल्या आहेत. रामायण काळात सितामाईस स्नानासाठी गरम पाण्याची आवश्यकता असताना प्रभू श्रीरामाने बाण मारून हे स्थान तयार केले अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. या झऱ्यांवर कुंड बांधण्यात आले आहे. एकूण तीन प्रकारची कुंडे येथे आहेत. त्यापैकी एक स्त्रीयांसाठी व एक पुरूषांसाठी असे विभाजन आहे. कुंडांच्या तळाशी आशानी लाकडाच्या फळ्या टाकल्या आहेत. त्यावर उभे राहून स्नान करता येते. या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान आपल्या त्वचेला सुसह्य इतके आहे. या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात असे सांगण्यात येते. तिसर्‍या कुंडाचे तापमान मात्र जास्त आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला उन्हेरे येथे यात्रा भरते. सुकी मच्छी आणि घोंगड्या हे या यात्रेतील आकर्षण असते.
सव, महाड
  जिल्ह्यातील दुसरे उष्ण पाण्याचे स्थळ आहे महाड तालुक्यात. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना महाडजवळ आल्यावर सावित्री नदीचा प्रवाह दिसू लागतो. या नदीपलीकडे जो हिरवागर्द परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. होडीने नदी ओलांडून पलीकडे जायचे. गर्द झाडीतल्या पायवाटेने गेल्यावर आपण कुंडापाशी येऊन पोहोचतो. सवच्या कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. अतिशय स्वच्छ असा हा दर्गा आहे. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान इथे उर्स असतो. कुंडाच्या तळाला नारळाचे खोड बसवल्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. यामुळे येथे, डुंबणे सुरक्षित झाले आहे.
आसपास वस्ती असून, बहुतेक घरे मुस्लिम बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, महाड-आंबेत रस्त्यावरून कच्च्या  पायवाटेने गेल्यासही कुंडाशी पोहोचता येते.
      वरकरणी सामान्य भासणाऱ्या या कुंडांमध्ये गरम पाण्याचा चमत्कार होतो तरी कसा?
 पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन जमिनीवर येणाऱ्या या उन्हेऱ्यांना "हॉट स्प्रिंग'(Hot Spring) किंवा  ‘थर्मल स्प्रिंग'(Thermal Spring) असे म्हटले जाते. या गरम पाण्याचे तापमान सुमारे ३० अंश ते ७० अंश सेल्सिअसपर्यंत असते. पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरल्यानंतर  या झऱ्यांची निर्मिती होते. सामान्यत: उन्हेरे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात. जिथे शिलारस जमिनीच्या वरच्या थरालगत असतो तिथे ही शक्यता वाढते. जमिनीवरचे पाणी खडकांच्या फटींमधून खाली झिरपते. असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येताच तापते. त्याच्या काही भागाची वाफ होते. हे तापलेले पाणी खडकांमधील फटींतून वर ढकलले जाते व उन्हेऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. बऱ्याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक, लिथीयम, कॅल्शियम वगैरेंसारखे पदार्थ मिसळतात. काही ठिकाणी रेडियम धातूशी निगडीत धातूही सापडतात. म्हणूनच अशा उन्हेऱ्यांतून गंधकयुक्त पाणी बाहेर येते. या गंधकयुक्त पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात. या पाण्यामध्ये असलेल्या जीवाणू व वनस्पतींचा वापर काही प्रमाणात औषधे, वनस्पती तेल तयार करण्यासाठी केला जातो. हे पाणी औषधी असले तरी पिण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही. तसेच या पाण्यात जास्त वेळ थांबल्यास चक्कर येवू शकते.
      सध्या निसर्गाच्या या चमत्कारांचे रुपांतर पर्यटनस्थळात होत आहे. जाईल तिथे कचऱ्याच्या पाऊलखुणा उमटवणाऱ्या माणूस नावाच्या प्राण्याने इथेही आपली आधुनिक परंपरा कायम राखली आहे. कुंडांमध्ये साबणाचा वापर करणे, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या परिसरात फेकून देणे असले उद्योग या उन्हेरेंच्या परिसरातही केले आहेत. या कुंडांमध्ये स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात असे म्हणतात, पण त्याचबरोबर यातून आपली ‘अस्वच्छ मानसिकताही’ बरी व्हावी ही अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Friday, September 8, 2023

रायगडची शरभशिल्पे

श्री क्षेत्र हरिहरेश्वर! दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणारे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण . हे तीर्थस्थान भारतातही महत्वाचे  मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्वाची स्थाने आहेत.
सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. मुख्य मंदिराच्या समोरच हे भैरवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूकडील पाषाणात कोरलेले  वाघासारखे दिसणारे दोन प्राणी आपले लक्ष वेधून घेतात. हे प्राणी तीक्ष्ण नख्या असलेले व विक्राळ तोंडाचे आहेत. यापैकी उजव्या बाजूच्या मोठ्या आकाराच्या प्राण्याने आपल्या चार पायांत चार, शेपटीत एक आणि तोंडात शेपटी धरून उचललेला एक असे एकूण सहा हत्ती दाबून धरले आहेत. याच मंदिराच्या समोरील भागात एका लाकडी स्तंभावर आणखी दोन व्याघ्ररुपातील काष्ठ शिल्प आहेत. ही सर्व शिल्पे दारावरील म्हणजेच द्वारशिल्पे आहेत. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाने ही शिल्पे पाहावी, त्यातून योग्य संदेश घ्यावा या उद्देशाने त्यांची रचना केली जात असावी. जुन्या काळापासून भाविकांचा ओघ असलेल्या या मंदिर परिसरातील ही शिल्प कसली आहेत?
कोरीव वाघ अथवा सिंहसदृश प्राणी असणारे हे शिल्प सामान्यत: ‘शरभ’ म्हणून ओळखले जाते.
‘मूर्तिविज्ञान’ या ग्रंथाचे ग्रंथकार डॉ. ग.ह. खरे यांच्या मते महाराष्ट्रात किल्ल्यांच्या, मंदिरांच्या द्वारांवर ‘चार पायांचा, तीक्ष्ण नख्या असलेला विक्राळ तोंडाचा, दोन पंखांचा किंवा पंख नसलेला आणि लांब शेपटीचा प्राणी काढलेला असतो, तो शरभच असावा.
आता शरभ म्हणजे काय, ते जाणून घेऊ!
शरभ हे एक द्वारशिल्प आहे. गड, मंदिरे, सभामंडप यांच्या प्रवेशद्वारांवर शिलालेखांच्या बरोबरीने द्वारशिल्प लावलेली असतात.महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ. श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजावरील चिन्हही शरभच आहे. सिंह आणि व्याल यांच्यासारखे विक्राळ तोंड, चार पाय आणि लांब शेपटी असणारा काल्पनिक प्राणी म्हणजे शरभ. गड, कोट व दुर्गांच्या बांधणीविषयक ग्रंथांमध्ये शरभ शिल्पांची फारशी माहिती दिलेली नाही. परंतु ‘कामिकागम’,‘ उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत.शरभ हा शंकराचा अवतार मानला जातो. भगवान शंकराने धारण केलेले काल्पनिक रूप म्हणजे शरभ. शरभ संकल्पनेबद्दल अनेक कथा ऐकवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, हिरण्यकश्यपू वधासंदर्भातली.
“हिरण्यकश्यपू हा शंकराचा भक्त. भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूला मारले. पण या वधानंतर नरसिंह उग्र झाला. त्याने लोकांना त्रास द्यायला सुरूवात केली. त्रस्त आणि भयभित लोक भगवान शंकराला शरण गेले. नरसिंहाला नियंत्रित करून त्याला शिक्षा करण्यासाठी शंकराने पशू, पक्षी व नर यांची एकत्रित शक्ती घेतली आणि ते लोकांसमोर प्रकटले. दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख व लांब शेपूट अशा शरभ रुपातील शंकराने नरसिंहाला फाडले आणि त्याचे कातडे अंगावर पांघरले व त्याचे डोके स्वत:च्या मस्तकावर धारण केले.”
आपला देव इतर देवतांहून कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात अशा कथांची निर्मिती होत असते.
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा, सुधागड, जंजिरा, रायगड, घोसाळगड या किल्ल्यांवर शरभ शिल्प आढळते.
स्वराज्याची राजधानी रायगडावर तब्बल सात शरभ द्वारशिल्पे आहेत. रायगडावरील महादरवाजाच्या दोन्ही बाजूला शरभाची द्वारशिल्पे आहेत. डाव्या बाजूकडील शरभाने आपल्या उजव्या पायाखाली हत्तीला दाबून धरण्याचा पवित्रा घेतलाय.
तर उजव्या बाजूला हत्ती व शरभ समोरासमोर दर्शवले असून यातील शरभाच्या तुलनेत हत्तीचा आकार खूपच लहान दिसतो. रायगडाच्या माथ्यावरील राजदरबाराच्या प्रवेशद्वारावरही दोन शरभ आहेत. डाव्या बाजूकडील शरभाने पायाखाली एक आणि शेपटाने एक असे दोन हत्ती धरले आहेत. उजव्या बाजूचे शिल्प मात्र अनोखे म्हणता येईल असे आहे. त्याच्या प्रत्येक पायाखाली एक व शेपटीत एक असे एकूण पाच हत्ती पकडले आहेत. याच मुख्य द्वाराच्या दुसऱ्या बाजूस आणखी दोन शरभ शिल्प असून त्यांनी तिन हत्ती व एक गरूडासारखा दिसणारा काल्पनिक पक्षी ‘गंडभेरूंड’ धारण केला आहे. महाराजांच्या समाधी परिसरातील ओवऱ्यांजवळही एक शरभ शिल्प पाहता येते.
     सुप्रसिद्ध पाली गणपती जवळील सुधागड परिसरारतही आकर्षक शिल्प आढळतात.
रायगडावरील महादरवाजासारखे दिसणारे एक प्रवेशद्वार सुधागडावर आहे. तिथेही हत्तींना दाबून धरणारे शरभ आढळतात. पनवेल तालुक्यातील पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध कर्नाळा किल्ल्यावर मागील बाजूस दोन पंख असलेले शरभ आहेत.
तर कर्जत तालुक्यातील कोथळीगडावरही बालेकिल्ल्याच्या आत उजव्या बाजूला कातळात शरभशिल्प असून त्याची झीज झाली आहे. रोहा तालुक्यातील घोसाळे गडावर दोन शरभशिल्पे दुर्लक्षीत अवस्थेत कित्येक काळ पडून होती. याचबरोबर उरण तालुक्यातही अज्ञानाने झाकलेली शरभशिल्पे आढळतात.
शरभाच्या संदर्भात सांगीतल्या जाणाऱ्या कथांचा विचार केल्यास भगवान शंकराचे अर्धमानवी, अर्धपशू-पक्षीरूप म्हणजे शरभ. हिंदू धर्मशास्त्रातील एकशे आठ उपनिषदांपैकी ‘शरभोपनिषद’ हे एक प्रमुख उपनिषद मानले जाते. यावरून शरभाची संकल्पना हिंदू धर्मात अस्तित्वात असल्याचे सांगीतले जाते. परंतु सध्याच्या इथिएपिया अर्थात तत्कालीन अॅबिसेनिया प्रांतातून आलेल्या सिद्धी अंबर याने बांधलेल्या मेहरूब जेझिरा म्हणजेच किल्ले जंजिरा येथील महादरवाजाच्या बुरूजावरही शरभशिल्प आढळते
यांसह पंख असेलली व इतर अशी एकूण पाच आकर्षक शरभ शिल्पे या किल्ल्यावर आढळतात. सिद्धी हा मुस्लिम धर्मीय होता. याअर्थी शरभ ही कल्पना इतर धर्मातही असण्याची शक्यता आहेच. एक सांस्कृतिक आणि सांकेतिक संदेश धारण करणारी रायगड जिल्ह्यातील ही शरभ शिल्पे आवर्जून पहावी अशीच आहेत.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...