Search This Blog

Thursday, December 14, 2023

‘दासबोधाची’ जन्मभूमी

        दासबोध! समर्थ रामदासांचा आणि रामदासी संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ. ओवीसंख्या तब्बल ७,७५१.  एकूण वीस दशक आणि प्रत्येक दशकात दहा समास. सध्या प्रचलित असलेल्या दोनशे समासी दासबोधापूर्वी एकवीस समासांचा एक दासबोध समर्थांनी रचला होता, ज्याचा उल्लेख‘जुना दासबोध’ असा केला जातो. या ग्रंथाची महाराष्ट्रात श्रद्धापूर्वक पारायणे केली जातात.
सुप्रसिद्ध साहित्यिक ‘वपु’ आपल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, “ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम ह्यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं, तरी चाललं असतं. दासबोधासारखा महान ग्रंथ, करमणूक करणारा ग्रंथ नव्हे. माणसांच्या वृत्तीतील एकही छटा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअरबाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात.”
१९०५ साली धुळे येथील रामदासी साहित्याचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव ह्यांनी कल्याणस्वामीने स्वहस्ते लिहिलेली दासबोधाची प्रत प्रसिद्ध केली आणि तिला स्वतःची एक विस्तृत प्रस्तावना जोडून ह्या ग्रंथाच्या अभ्यासाची एक दिशा दाखविली. दासबोध हा केव्हा आणि कोठे रचिला गेला, ह्या प्रश्नांची उत्तरे निर्णायकपणे मिळत नाहीत, पण शंकर देव यांच्या मते समर्थांच्या मुखातून बाहेर पडलेल्या दासबोधाचे लिखाण शिष्योत्तम कल्याणस्वामी नलावडे यांच्या हस्ते  ‘शिवथर घळ’ येथेच झाले.  माघ शुद्ध नवमीला इथल्या संस्थेकडून या घळीत ‘दासबोध जयंती’ साजरी होते.
      रायगड जिल्ह्यातील महाडपासून तीस किमी अंतरावर दासबोधाचे जन्मस्थळ मानली जाणारी शिवथरघळ आहे.दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली असल्याचे सांगण्यात येते. सर्व बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या वाघजई दरीच्या कुशीतील हे ठिकाण. काळ नदीच्या काठावर कुंभे शिवथर कसबे शिवथर, व आंबे शिवथर अशा तीन वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या गर्द झाडीने झाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या निसर्गरम्य सुंदर घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत.
      येथे जाण्यासाठी महाडवरून बस सुविधा आहेच. खाजगी वाहनाने थेट घळीच्या पायथ्याशी पोहोचता येते. अरूंद आणि विरळ वाहतुकीच्या रस्त्यांमुळे हा परिसर गैरसोयीचा वाटू शकतो. सिमेंटीकरणाच्या काळातही हा भाग झाडाझुडपांनी वेढलेला आहे. सह्याद्रीच्या पोटात अशा अनेक गुहा, घळी आहेत. समर्थांनी आपल्या भ्रमंतीमधून अशा कित्येक घळींचा शोध घेतला. त्या घळी रामदासांच्या वास्तव्याने रामघळी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सज्जनगडची रामघळ, मोरघळ, जरंड्याची खोबण, तोंडोशीची घळ, चंद्रगिरीतील घळ, चाफळची रामघळ, हेळवाकची रामघळ अशा अनेक घळी प्रसिद्ध आहेत. शिवथरघळही अशांच पावन घळींपैकी एक. सुमारे चाळीस मीटर लांब, पंचवीस मीटर रुंद आणि प्रशस्त अशी ही घळ. काळ नदीकाठचे वाघजाईचे घनदाट अरण्य, जवळच असणारे चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष हा सारा परिसर अभ्यासकांना खुणावणारा.
     जवळपास पंचेचाळीस मोठ्या पायऱ्या चढल्यानंतर आपण या घळीत पोहोचतो. या पायऱ्या चढून आल्यानंतरचा थकवा इथल्या शांततेने आणि गारव्याने जाणवत नाही. घळीतले नैसर्गिक वातानुकूलन जबरदस्त आहे. ज्या काळात समर्थ रामदास इथे राहीले तेव्हाचे इथले वातावरण अधिकच नीरव असेल.
आतल्या भागात समर्थ रामदास आणि त्यांचे शिष्य कल्याणस्वामी यांच्या जिवंत भासणाऱ्या मूर्ती आहेत.  तपश्चर्या करण्यासाठी किंवा एखादी कलाकृती प्रसवण्यासाठी याहून अधिक चांगली जागा मिळणे कठीण आहे.
      घळीच्या वरच्या बाजूस थेराव गावच्या हद्दीत चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्यांची जोती दिसतात. दोन्ही चौथरे वीस बाय दहा मीटरचे आहेत. शिवथर घळीपासून रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, चंद्रगड (ढवळगड), मंगळगड (कांगोरीगड), कावळ्या किल्ला या ठिकाणी जाण्याच्या सहज वाटा आहेत. शिवथर घळीच्या या वैशिष्ट्यांवर कडी करणारा घटक म्हणजे या घळीला झाकणारा धबधबा. घळीच्या शेजारून कोसळणाऱ्या या ओढ्याला ‘खुट्याचा विरा’ म्हणतात.  सुंदरमठाचे वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात-
“गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनि चालीली बळे।
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे।।”

पावसाळ्याच्या दिवसात येथे आल्यास ह्या ‘धबाबा’ शब्दाचा अर्थ गवसतो. या धबधब्यामुळे एक सौंदर्यानुभूती आपल्याला लाभते.
     दासबोधाचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्धी लाभलेले हे स्थळ. हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण आणि पर्यटकांच्या आवडीचे स्थळ आहे. असे असले तरीही काही अभ्यासक ‘दासबोधाचे जन्मस्थळ’ याहूनही वेगळे असल्याचा दावा करतात. हा ग्रंथ कोठे रचिला गेला, ह्याबाबत अजूनही एकमत नाही. शिवथरच्या घळीत तो लिहिला गेला, असे शंकर देवांचे मत आहे तर हनुमंतस्वामीच्या बखरीत समर्थ रामघळीस ग्रंथ लिहीत बसल्याचा उल्लेख आहे, तर समर्थप्रतापकार गिरीधर दासबोध सज्जनगडावर लिहिला गेल्याचे सांगतात.  ‘आत्माराम दासबोध l माझे स्वरूप स्वतः सिद्ध’ ही समर्थांची दासबोधाकडे पाहण्याची दृष्टी होती, तसेच त्यांचा सारा उपदेश आणि तत्त्वज्ञान ह्या ग्रंथात एकवटलेले आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेता तो वेळोवेळी आणि ठिकठिकाणी लिहिला गेला असण्याची शक्यता अधिक आहे. या अनेक ठिकाणांपैकी एक ‘शिवथरघळ’ निश्चितच आहे. या घळीच्या सान्निध्यात येणाऱ्यांना हा परिसर भारावून टाकतो. सुंदरमठावरील काव्याच्या शेवटी समर्थ म्हणतात...

“विश्रांती वाटते तेथे।जावया पुण्य पाहिजे।
कथा निरूपणे चर्चा, सार्थके काळ जातसे ।।”


- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...