Search This Blog

Sunday, November 6, 2022

केजीएफची सुवर्णकथा

            स्टार यशला सुपरस्टार अशी ओळख मिळवून देणारा सिनेमा म्हणजे केजीएफ. प्रशांत नीलचे दिग्दर्शन, जबरदस्त एडीटींग आणि कोलारच्या सोन्याच्या खाणींची पार्श्वभूमी या सर्वांनी या चित्रपटाला सोनेरी यश मिळवून दिले. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या या कलाकृतीच्या दोन्ही भागांनी चांगलाच गल्ला जमवला. या मूळ कन्नड भाषेतील चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी ज्या ‘कोलार गोल्ड फिल्डस्’च्या अवतीभोवती हे कथानक घडते त्या खाणी मात्र खरंच अस्तित्वात आहेत. बेंगलुरू पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर केजीएफ वसले आहे.


 फार पूर्वीपासूनच कोलारच्या खाणींमधून सोने मिळवले जात होते, अगदी सिंधू-संस्कृतीपासून.  ब्रिटिश काळात केजीएफ पुन्हा एकदा चर्चेत आले, जेव्हा इथे नव्याने सोन्याची खाण सापडली. या खाणींमधून त्याकाळी देशातील नव्वद टक्क्यांहून अधिक सोन्याचे उत्पादन होत होते. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस सोन्याचे खाणकाम करण्याच्या बाबतीत भारत जगात सहाव्या क्रमांकावर होता. सोन्याचे सध्याचे मूल्य पाहता ही आकडेवारी लक्षणीय आहे. 


केजीएफ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरील सोने आले तरी कुठून?

 या सोनेरी प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या जन्मकथेपासून सुरूवात करावी लागेल. ही कथा आहे तब्बल साडेचारशे कोटी वर्षापूर्वीची. विश्वाच्या पसाऱ्यात नुकतीच जन्मलेली पृथ्वी तिच्या सध्याच्या रुपापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. मुख्यत: द्रवरूप लोखंड आणि इतर जड मुलद्रव्यांचा तो उष्ण गोळा होता. पुढे या गोळ्याला मोठ्या मोठ्या खगोलीय वस्तू येऊन टकरा देत होत्या. या धडकांनी तिची रासायनिक घडणच बदलून जात होती. आणखी साठ-सत्तर कोटी वर्षांनी पृथ्वी थंड होऊ लागली. पृथ्वीच्या थंड होण्यातून भूपृष्ठ तयार झाले. या भूपृष्ठावर अंतर्भागातील शिलारस येऊन सावकाशपणे थंड होऊ लागला

. या प्रक्रीयेतून ग्रॅनाईटसारखे खडक बनले. सावकाश थंड होण्याने  खडक कठीण बनतो आणि खनिजांचे स्फटिकही आकाराने मोठे होतात. यामुळेच पृथ्वीवर अनेक ठिकाणी ग्रॅनाईटचे गोलघुमटाकार खडक तयार झाले. बेंगलुरू-हैदराबाद मार्गात असे जमिनीतून उगवल्यासारखे राखाडी रंगाचे खडक तुम्हाला पहायला मिळतील.  हे दगड कठीण असले तरी शिलारसाचे थंड होणे सर्वत्र एकसारखे नसल्याने या घुमटांमध्ये उभे-आडवे सांधे तयार झाले. पुढे या खडकांची झिज होतानाही कांद्यासारखी वर्तुळे तयार झाली. असे झिजलेले खडक ‘Inselberg Rock’ म्हणून ओळखले जातात. बेंगलुरूच्या पूर्वेकडील कोलार परिसरात असे सांधे असणारे खडक आहेत. हे सांधेच केजीएफ साठी सोन्याचे लॉकर ठरले.

पण लॉकर म्हणजे सोने नव्हे; मग ही मोकळी तिजोरी सोन्याने कशी भरली गेली असावी? 

     भारताचे वर्णन करताना, “देशात एकेकाळी ‘सोन्याचा धूर’ निघत होता” असे म्हटले जाते. पृथ्वीच्या विचार करता इथे नुसता धूरच नाही, तर सोन्याचा वर्षावच झालेला आहे. आज पृथ्वीवर असलेले सर्व सोने कित्येक कोटी किलोमीटर अंतरावरील प्रचंड ताऱ्यांच्या पोटात घडलेले आहे. हे तारे मरताना खूप मोठे स्फोट झाले.

या स्फोटानंतर हेलियमसारखे वायू व धूळीचे ढग यांमध्ये काही धातू तयार झाले. सोने या नवधातूंपैकीच एक. यातूनच ताऱ्यांच्या विखुरलेल्या तुकड्यांपासून बनलेल्या लघुग्रहांना सोन्याचा स्पर्श झाला. अशा लघुग्रहांच्या, उल्कांच्या वर्षावातून आपल्या ग्रहावर सोने व इतर धातू आले. शास्त्रज्ञांच्या मते अंदाजे २५० कोटी वर्षापूर्वी एक मोठा लघुग्रह कोलार परिसरात धडकला. या खगोलीय वस्तूने आपल्या सोबत आणलेल्या सोन्याने ग्रॅनाईटच्या सांध्यांचे लॉकर भरले.

या आघाताने ग्रॅनाईटच्या सांध्यांमध्ये सोन्याच्या शिरा घडल्या.  सोने खनिज रुपाऐवजी शुद्ध रुपात आढळत असल्याने हे सोने वर्षानुवर्षे झळाळत राहीले. उन-वारा-पाऊस यांसारख्या घटकांमुळे खडकांची झीज होऊन सोन्याचे कण वाहून ओढे, नद्यांच्या काठी चमकू लागले. या चकाकत्या कणांनी पृथ्वीवर अलिकडेच दाखल झालेल्या मनुष्यप्राण्याचे लक्ष वेधले. मनुष्याच्या करामतीने इथले नैसर्गिक लॉकर उघडायला सुरूवात झाली. खाणकाम जोरात चालू लागले. इथल्या सुवर्णखाणींमुळे ब्रिटिशकाळात केजीएफ हे भारतात पूर्णपणे वीज पोहोचलेले पहिले शहर बनले. वीज पोहोचल्यानंतर येथील सोन्याचे उत्खनन आणखी वाढवण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. १९५६ मध्ये कोलार खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. पुढे भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने याठिकाणी काम सुरू केले.

सुरुवातीच्या यशानंतर कंपनीच्या नफ्याचा आलेख दिवसेंदिवस खालावतच गेला. या पार्श्वभूमीवर, अखेर २००१ भारत गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने येथील खाणकाम थांबवण्याचा निर्णय घेतला. केजीएफ थांबले असले तरी मनुष्याचा हव्यास थांबलेला नाही. त्याचा वरवर निरर्थक वाटणाऱ्या मौल्यवान वस्तूंचा शोध सुरूच आहे. आता सुवर्ण-रत्नांच्या शोधांत पृथ्वी खोदून झाल्यानंतर त्याची नजर अवकाशाकडे न जावो म्हणजे झालं!

-- तुषार म्हात्रे

संदर्भ: इंडिका- प्रणय लाल

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...