Search This Blog

Wednesday, November 27, 2019

देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!

देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!
       आषाढी आणि कार्तिकी  ह्या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या. याच दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास (चतुर्मास) पाळला जातो. याच काळात कर्क संक्रांतीस सूर्याचे उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास सुरुवात होते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. थोडक्यात कर्क संक्रांतीपासून देवांची रात्र चालू होते. साधारणपणे कर्क संक्रांत येते आषाढ मासात. याच मासात रात्र असल्याने ‘देव झोपी जातात’, अशी समजूत आहे. म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. तर  कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोपेेेेतून जागे होतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ किंवा ‘देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात. तसे पाहता दक्षिणायन सहा महिन्यांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण कार्तिकी एकादशीपर्यंत चारच महिने होतात. म्हणजे, एका अर्थाने दिवस उजाडायच्या आतच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. या काळात श्रीविष्णू निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते.
भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करण्याचा हा काळ. त्यामुळेच आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा होतो. कार्तिकी एकादशी नंतर येणारी पहिली प्रतिपदा ही मार्गशीर्ष महिन्यातील. यावेळी देवांची रात्र संपल्यामुळे  देवभूमीवरील हा आनंदोत्सवाचा दिवस ठरतो. त्यामुळे या प्रतिपदेला देवदिवाळी म्हणतात. ‘मासानाम् मार्गशीर्षोSहमस्मि' असे भगवान श्रीकृष्ण भगवदगीतेमध्ये सांगतात. सर्व मासात मार्गशीर्ष मास श्रेष्ठ असा याचा अर्थ. याच मार्गशीर्षाच्या प्रतिपदेला हा सण येतो. या दिवसापासून खंडोबाचा उत्सव सुरू होतो. पंचांगांमधून ‘देव दीपावली’ असा उल्लेख असतो. आपले बरेचसे सर्व व्यवहार देवांवर कल्पिण्याच्या प्रघातामुळे, माणसांप्रमाणे देवांच्या दिवाळीची कल्पना आली असावी.
 रायगड जिल्हा हा तसा कृषीप्रधान. शेती आणि पशुपालन हे पूर्वापार चालणारे व्यवसाय. अन्न गोळा करणारा समाज सहसा देवीची उपासना करतो, तर देवाचा उगम पशुपालक समाजात होतो. जिल्ह्यातील बहुसंख्य लोक या दोन्ही प्रकारातले. त्यामुळे कुलदैवत म्हणून खंडोबा, भवानी यांसह मातृदेवता, ग्रामदेवता या सर्वांनाच मान मिळतो. तांदूळ हे इथले मुख्य पीक. दुबार शेतीचा अपवाद वगळल्यास भातशेतीचा हंगाम जून ते ऑक्टोबर पर्यंतचा. ऐन दिवाळीच्या काळात भातकापणीस सुरूवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिवाळीचा काळ हा प्रचंड कामाचा असतो. पर्यायाने धान्य घरात आल्यानंतरच त्याच्या घरी ‘दिवाळी’ होते. यामुळे सामान्य शेतकऱ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या आसपास येणारी ‘देवदिवाळी’ निवांतपणे, सढळहस्ते  साजरी करता येते.
      जिल्ह्याच्या मध्य आणि दक्षिण भागात देवदिवाळी उत्साहात साजरी होते. रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यांत थोड्या फार साम्य-भेदाने देवदिवाळी संपन्न होते.  देवदिवाळी हा सण म्हणजे आपल्या कुलदैवताला, ग्रामदैवताला व उपास्यदेवतेला भजण्याचा दिवस. आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता अन् गावातील अन्य मुख्य आणि उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा या निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. पक्वान्नांचा महानैवेद्य दाखविला जातो. या दिवशी दक्षिण रायगड परिसरात वडे व घारग्याचा नैवेद्य दाखवला जातो.
‘कोंबडी-वडे’ हा या दिवशीचा खास आहार. विशेष बाब म्हणजे सर्व देवांचे नैवेद्य वेगवेगळ्या पानांवर दाखवले जातात. त्याबरोबर पितरांकरता नैवेद्याचे पान करून त्याचा पण नैवेद्य दाखवतात. यातील कुलदैवताच्या नावाने दाखवलेल नैवेद्याचे पान हे घरात प्रसाद म्हणून घेतले जाते आणि इतर सर्व नैवेद्याची पाने ही घराबाहेर गुरवास दिली जातात अथवा गाईस घातली जातात. माणगांव तालुक्यात देवदिवाळीत बैलांना गावाच्या वेशीबाहेर नेऊन नाचवण्याची प्रथा आहे. गावातील लहान मुले वेशीबाहेरील झाडाजवळ बैलाला बांधून त्याला सजवतात. त्यानंतर त्याला खेळवून आनंद घेतात. यावेळेस बैल उधळल्यास मात्र सर्वांची पांगापांग होते.
या सणाला काही ठिकाणी ‘बैलांची झुंज’ लावली जाते. नेहमी एकमेकांशी भांडणारी माणसे या दिवशी प्राण्यांच्या भांडणाचा आनंद लुटतात. महाड, पोलादपूर तालुक्यांत देवदिवाळीच्या निमित्ताने ‘रेड्यांच्या झुंजींचे’ आयोजन केले जाते. खास लढण्यासाठी पोसलेले रेडे वाजत गाजत खुल्या आखाड्यात उतरवले जातात. गुलाल उधळून, हाकारे करून त्यांना झुंजण्यास भाग पाडले जाते. यात ‘तुमचा खेळ होतो पण, आमचा जीव जातो’ अशी स्थिती या प्राण्यांची होते. काही प्राणीमित्र संघटना, जागृत नागरिकांमुळे ही मानवी (अपाशवी!) प्रथा थांबवण्यात थोडेफार यश आले आहे.

    देवदिवाळीसारखे सण हे लोकांना एकत्र करतात. आपल्या मातीपासून, कुळापासून दूर असलेल्या लोकांना काही काळासाठी का होईना पण जवळ आणतात. गांजलेल्या, थकलेल्या सामान्याच्या जीवनात चैतन्य निर्माण करतात ही बाब निश्चितच चांगली आहे. या सणांतही कालसुसंगतपणा आणि थोडी विवेकदृष्टी स्विकारली तर आपल्या वर्तणुकीने कदाचित आपला परिसराचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. असे झाल्यास खऱ्या अर्थाने देवांची दिवाळी साजरी होऊ शकेल; या पृथ्वीवरच्या स्वर्गात!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Saturday, November 16, 2019

रयत: शतकानंतरची पहाट

रयत: शतकानंतरची पहाट
       दिवस होता विजयादशमीचा. एकोणिसशे एकोणिस सालातल्या ऑक्टोबरच्या चार तारखेचा प्रसंग. भाऊराव पायगौंडा पाटील नावाच्या कर्मवीराने कराड तालुक्यातील काले गावात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही घोषणा सर्वसामान्य रयतेला उत्कर्षाची संधी मिळवून देणारी ठरली. ही घोषणा होती रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची. स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात बहुजनांसाठी, ग्रामीण भागातील जनतेला सुशिक्षित करण्याचे काम या संस्थेने केले. स्वत:च्या मालकीची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव 'रयत शिक्षण संस्था' असणे स्वाभाविकच होते.
अथांग विस्तारणारा व दीर्घायुष्य लाभलेला वटवृक्ष या संस्थेचे बोधचिन्ह आहे. आजघडीला जवळपास साडेचार लाख विद्यार्थी या वटवृक्षाच्या छायेत अध्ययन करत आहेत. सातशेहून अधिक शाखा आणि सुमारे सोळा हजार कर्मचारी वर्ग यामुळे ही संस्था आशिया खंडात विस्ताराने सर्वात मोठी शिक्षणसंस्था ठरते. जागतिकीकरणाच्या रेट्यात ‘विद्यार्थ्यांचे शिकणे’ आणि ‘संस्थेचे टिकणे’ या दोन्ही गोष्टींचा विचार करता ‘रयत’ या नव्या प्रवाहात समर्थपणे उतरली असल्याचे लक्षात येईल. बदलती शैक्षणिक धोरणे, नवे विचारप्रवाह याबाबतीतही संस्थेने सकारात्मक भूमिका स्विकारली. ‘स्वावलंबन’ तत्वाची कास धरून रयत शिक्षण संस्थेने यावर्षी आपले शतक पूर्ण केले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने काही उल्लेखनीय प्रकल्प सुरू केले आहेत. शतकीय पल्ला गाठताना या नव्या प्रकल्पांमुळे, विचारप्रवाहांमुळे शिक्षणक्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.
सेमी-इंग्रजी पर्यायाचा स्विकार:
रयत शिक्षण संस्थेतील शाळांचे प्रमुख माध्यम मराठी आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रातील नवपालकांचा इंग्रजी माध्यमाकडे असलेला ओढा सर्वश्रुत आहे. पालकांमध्ये असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणाची झळ संस्थेलाही बसू लागली होती. परिणामी संस्थेच्या काही शाळांमधील विद्यार्थीसंख्या वेगाने घटू लागली. आपल्या देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्चशिक्षण हे इंग्रजी भाषेतून उपलब्ध असल्याने, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना या उच्चशिक्षणासाठी सक्षम करणे हे संस्थेचे ध्येय होते. या आव्हानांवरील सुवर्णमध्य म्हणून संस्थेने ‘सेमी-इंग्रजी’ या द्वीभाषा माध्यमाचा स्विकार केला. परिणामी संस्थेतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एक नवा पर्याय उपलब्ध झाला. तसेच विद्यार्थीसंख्या टिकवणेही शक्य झाले. या नव्या पर्यायासाठी शिक्षकवर्गाला सक्षम करणे गरजेचे होते. यासाठी संस्थेने शासकीय मदतीची वाट न पाहता संस्थापातळीवर विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली. पूरक अध्यापन साहीत्य निर्माण केले. यामुळे सेमी-इंग्रजीच्या पर्यायासाठी एक सक्षम व प्रशिक्षित शिक्षकवर्ग निर्माण करता आला.

रयत गुरूकुल प्रकल्प:

ग्रामीण भागातील प्रज्ञावंत व होतकरू मुलांचा शोध घेऊन त्यांना सातारा शहरात सर्व शैक्षणिक सोयी पुरवून अध्यापकांच्या सानिध्यात राहण्याची संधी निर्माण करून देण्यासाठी विद्यालयात स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या प्रेरणेने १९९५ पासून महाराजा सयाजीराव विद्यालयात गुरुकुल प्रकल्प सुरू करण्यात आला. एक तुकडी आणि ३७ विद्यार्थ्यांसह सुरू केलेला हा प्रकल्प पुढे वटवृक्षाप्रमाणे विस्तारला. संस्थेच्या अन्य शाखांतूनही अशा प्रकल्पांची उभारणी झाली आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार करून संस्थेने निवासी, अनिवासी, दूरस्थ, मिनी गुरुकुल असे प्रकल्प सुरू केले आहेत. आज  तिनशेहून अधिक शाळांतील जवळपास दहा हजार विद्यार्थी गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहेत.
मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लावून आत्मविश्वास निर्माण करणे, गुणात्मक दर्जा उंचावणे, अभिरुचीचा शोध घेणे, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करणे. विविध शिष्यवृत्ती व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे. शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. गुरुकुलसाठी  सुसज्ज वर्ग खोल्या, एलसीडी, संगणक, विज्ञान,गणित प्रयोगशाळा, पुरेसे क्रीडा साहित्य, संगीत, कला वर्ग या पायाभूत घटकांची पूर्तता केली जाते. कर्मवीर विद्याप्रबोधिनीअंतर्गत हा प्रकल्प राबविला जातो. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. या तुकड्यांना सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आले. मुलांसाठी सकाळी दोन तास व रात्री दोन तास अभ्यासिका घेण्यात येते.
यामध्ये कृतीयुक्त अध्यापनावर भर दिला जातो. इंग्रजी संभाषण, गटचर्चा होतात. परीक्षेनंतर शिक्षकाकडून प्रश्नानुसार सूक्ष्मगुण मूल्यांकन करून लिखित मार्गदर्शन केले जाते. उत्तर पत्रिकांची अंतर्गत व बाह्य तपासणी करून बाह्यतज्ज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन केले जाते. भाषावार वक्तृत्व स्पर्धा, तज्ज्ञांची व्याख्याने , क्षेत्रभेट, व्यवसाय मार्गदर्शन, कार्यशाळा, स्नेहसंमेलन यांचे आयोजन केले जाते. शतक गाठताना संस्थेने शिक्षणक्षेत्राला पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प सुरू केला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाची कास: 
 भविष्यकालीन प्रगत युगासाठी संस्थेने विज्ञानदृष्टी निवडली. ‘रयत विज्ञान परिषद’ नावाच्या उपक्रमाद्वारे मोठ्या स्तरावरील विज्ञानमंथन घडवून आणले. विज्ञान संशोधन क्षेत्रातील शिक्षकांचा सहभाग वाढवण्याचे काम या परिषदेने केले. आतापर्यंत संस्थेच्या चार विभागांमध्ये ही परिषद संपन्न झाली असून, पुढील वर्षात संस्थेच्या दक्षिण विभागात ‘रयत विज्ञान परिषदे’चे आयोजन केले जाईल. याच परिषदेतून प्रेरणा घेऊन पुढे ‘रयत विज्ञान प्रकल्प’ आकारास येत आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेली वैज्ञानिक उपकरणे, विज्ञान खेळणी, शोधनिबंध, अॅक्टीवीटी बेस्ड लर्निंग, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग यांसारख्या विविध प्रकल्पांची निर्मिती व सादरीकरण रयत विज्ञान प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे. या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती निर्माण होण्यास मदत होत आहे.
शालेय शिक्षणासह उच्चशिक्षणातही रयत शिक्षण संस्था नाविन्यपूर्ण बदल स्विकारत आहे.
             क्रिकेटसारख्या खेळात ‘शतकाला’ खूप महत्त्व असते. पण काही वेळेस शतक ठोकलेला फलंदाज या टप्प्यावर थकलेला असतो. याच वेळेस लक्ष विचलित होऊन तो बाद होण्याची शक्यता असते. याऊलट काही फलंदाज शतकाला एक स्वल्पविराम समजून नव्याने पुढील डावाला सुरूवात करतात. हा शतकीय टप्पा गाठताना संस्थेसमोरही अनेक आव्हाने वारंवार उभी राहीली. परंतु या आव्हानांमुळे न थकता रयत शिक्षण संस्था जोमाने उभी राहीली. यापुढेही विविध समस्या निर्माण होतच राहतील. परंतु बाह्य परिस्थितीशी संघर्ष करूनच रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा राहीलाय, बहरलाय. संस्थेने नेहमीच स्वत:ला नविन आव्हानांसाठी तय्यार ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे जोपर्यंत आपल्या देशात ‘रयत’ आहे तोपर्यंत ‘रयत शिक्षण संस्था’ राहील हे नक्की!
- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Monday, November 11, 2019

‘अज्ञात’ मराठी वीर दौडले सात

‘अज्ञात’ मराठी वीर दौडले सात!
     १९१८ सालातल्या नोव्हेंबर महिन्यातला अकरावा दिवस. सकाळी १० वाजून ५९ मिनिटे झाली असताना एक अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. त्याच्या मृत्यूनंतर  मिनिटाभरातच सर्व युरोपभर युद्ध बंदी लागू झाली. सव्वा चार वर्षे अविरत चाललेले हे विनाशकारी युद्ध संपले. युरोपमधील चर्चमधून घंटानाद करून ही बातमी जनतेला कळवली गेली.
गेली दोन वर्षे बंद असलेल्या लंडनच्या प्रसिद्ध बिग बेन या घड्याळाने सकाळी ११.०० वाजता पुन्हा एकदा टोल दिले. सर्व युरोपभर शांतता पसरली; अर्थातच काही काळापुरती. हा घटनाक्रम आहे पहिल्या महायुद्धाचा. या महायुद्धात एकूण २४ लहान मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला. अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडातील कुठला न कुठला देश ह्या युद्धात सामील होता. युद्ध संपे पर्यंत ह्यात दोन्ही बाजूचे मिळून साधारणपणे दीड कोटीहून अधिक लोक मरण पावले तर त्याहून अधिक लोक जखमी झाले. शंभर वर्षापूर्वीचा काळ पाहता ही आकडेवारी भीषण आहे. पहिल्या महायुद्धाचा खर्च तब्बल ३३८ अब्ज डॉलर्स झाला. तोही १९१८ मध्ये. २०१९ मध्ये हा खर्च काढायचा झाल्यास किती होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. या युद्ध समाप्तीला नोव्हेंबर महिन्यात १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. खरेतर आपल्यापासून दूर असलेल्या युरोप नावाच्या खंडात घडलेले हे युदध; पण तरीही या युद्धाबद्दल आपण भारतीयांनी का जाणून घ्यायला हवे ?

विशेषत: रायगडवासियांनी?

      पहिल्या महायुद्धाच्या रायगड कनेक्शनसाठी आपण जिल्ह्याच्या दक्षिण टोकाकडील पोलादपूर तालुक्यात जाऊ. इथे लहान लहान टेकड्यांनी वेढलेला ‘तुर्भे’ नावाचा परिसर आहे. तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, खोंडा, वझरवाडी, देऊळवाडी, कलमवाडी यांसारख्या वस्त्यांनी बनलेला हा भाग. इथल्या देऊळवाडी व कलमवाडी जवळील लहानशा टेकडीवजा भागात एक स्तंभरुपी दगडी वास्तू पहायला मिळते.
सममित आकारातील हा स्तंभ मजबूत चिऱ्यांनी बनलाय. स्तंभावर एक आकर्षक संगमरवरी पाटी असून पाटीवर वरच्या बाजूस ‘TURUMBE KHURD’ अर्थात ‘तुरुंबे खुर्द’ असे ठळकपणे लिहिले आहे. त्याखालोखाल दोन कमळपुष्प असलेले तारकाचिन्ह आहेत. ब्रिटीश युद्ध परंपरेतील ‘स्टार’ आणि भारतीय कलेतील समृद्धतेचे चिन्ह ‘कमळ’ असा अनोखा संगम या रचनेत आहे. संगमरवरी पाटीच्या मध्यवर्ती भागात कमानयुक्त नक्षी असून त्यात सुरूवातीस गॉथिक शैलितील GRI असे चिन्ह कोरले आहे.
GRI चे पूर्ण रुप Georgius Rex Imperator असे असून ते पाचव्या ‘किंग जॉर्ज’च्या सन्मानार्थ वापरले जात असे. पुढे काही ओळी कोरलेलेया असून  महत्त्वपूर्ण नोंदींप्रती असलेली ब्रिटीशांची सजगता या स्तंभावरील लेखाने दिसून येते.

“FROM
THIS VILLAGE
83 MEN
WENT TO THE
GREAT WAR
1914-1919
OF THESE 7
GAVE UP
THEIR LIVES”

वरील ओळींनुसार, या गावातून ८३ लोक ‘ग्रेट वॉर’ मध्ये सहभागी झाले त्यापैकी सात जणांनी आपले प्राण गमावले.
यात उल्लेखलेला ‘ग्रेट वॉर’ म्हणजे पहिले महायुद्ध. १९२० पर्यंत पहिल्या महायुद्धाचा उल्लेख ‘ग्रेट वॉर’ किंवा ‘World War’ एवढाच व्हायचा. ‘लंडन टाइम्स’चा वार्ताहर रेपिंग्टन याने सर्वप्रथम ‘First World War’हा शब्द वापरला.(बहुधा भविष्यात दुसरे महायुद्ध होऊ घातल्याची जाणीव त्याला झाली असावी.) या सर्व विश्लेषणातून एक गोष्ट लक्षात येते की या गावातून मोठ्या संख्येने लोक पहिल्या  महायुद्धात सहभागी झाले होते.  तुर्भे परिसराप्रमाणेच देशाच्या विविध भागातून जर्मन आघाडीविरूद्ध लढण्यासाठी भारतीय सैन्य वापरण्यात आले. ही संख्या लाखांच्या घरात आहै. त्यापैकी साठ हजाराहून अधिकांनी प्राण गमावले तर सत्तर हजारांच्या आसपास सैन्य जखमी झाले.
     लेखन साहित्याच्या बाबतीत तर पहिल्या महायुद्धाने दुसऱ्या महायुद्धावर मात केली आहे. पहिल्या महायुद्धावर खूप सैनिकांनी कविता केल्या. जणू कवींची फौजच उभी राहिली. यात  कवी रूपर्ट ब्रुक, विल्फ्रेड ओवेन, सिफ्रिड ससून यांचा समावेश आहे.

यापैकी रूपर्टची एक कविता खूप गाजली

“If I should die, think only this of me:
That there's some corner of a foreign field
That is for ever England.”

‘जर मी लढाईत मरण पावलो तर एवढी आठवण ठेवा, की परदेशात कुठेतरी एक कोपरा आहे- जिथे माझ्या थडग्याच्या रूपाने इंग्लंड सदैव आहे..’

    असे अनेक वीरजवान आपल्या मृत्यूच्या तयारीनेच रणमैदानात उतरले होते. युरोपात कित्येक हजार एकर जमीन अशा सैनिकांच्या स्मशानभूमीसाठी वापरण्यात आली. पोलादपूर तालुक्यातून चौदा जणांच्या वीरमरणाची नावानिशी नोंद काही कागदपत्रांमध्ये आढळते. परंतु तुर्भे खुर्द येथील स्मारकावरील सात अज्ञात विरांचा शोध अजूनही बाकी आहे. कदाचित रुपर्ट म्हणतो त्याप्रमाणे जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हे मराठी भूमितील सात अज्ञात वीर चिरनिद्रा घेत शांतपणे पहुडले असावेत.
परदेशात सैनिकांच्या स्मारकाच्या जागेची बागेप्रमाणे उत्तम निगा राखली जाते, या स्थळांना सन्मान दिला जातो. युरोपातील एका देशात तर चक्क लग्न झाल्यावर वधू-वर सर्वप्रथम सैनिकांच्या स्मारकाला भेट देतात असल्याचे सांगीतले जाते. परंतु ब्रिटीशांच्या दूरदृष्टीने बांधलेल्या तुर्भे येथील स्मारकाच्या नशिबी आपली इतिहासविषयक ‘धूरदृष्टी’ आली. अज्ञानाच्या धुरकटपणामुळे हे स्मारक सुरूवातीस सपशेल दुर्लक्षिले गेले. पण ब्रिटीशकालीन बांधकाम आणि काही जागृत नागरिकांमुळे हा स्तंभ महायुद्धाच्या स्मृती जपत उभा आहे. ही वास्तू आणि या विरांच्या स्मृती अशाच चिरंतन राहो हीच अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...