Search This Blog

Wednesday, December 25, 2019

सूर्यग्रहण आणि दानसंस्कृती

    २०१९ या वर्षाची अखेर जवळ आली आहे. यावर्षीचं अखेरचं सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबरच्या मार्गशीर्ष अमावस्येला होईल. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ६ जानेवारीला तर दुसरे २ जुलैला होते. २६ डिसेंबर रोजीचे हे सूर्यग्रहण भारतासोबतच सौदी अरब, कतार, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया, सुमात्रा, फिलीपाईन्स, सिंगापूर आणि गुआम इथेही दिसणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येऊन चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते, तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले, तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेलेे, तर ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ होते. भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे. खरेतर ग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना. परंतु विज्ञानासह ज्योतिष आणि धार्मिक दृष्टीनेही ग्रहणकाल महत्त्वाचा समजला जातो. सामान्यपणे धार्मिक दृष्ट्या सूर्यग्रहण हे अशुभ मानले जाते. ग्रहणाला अशुभ मानन्यातून, त्यापासून आपल्याला अपाय होऊ नये यासाठी जप करणे, दान करणे असे विविध उपाय योजले जातात.  ग्रहणकाल हा संधीकाल असल्याने या काळात केलेल्या जप आणि दान यांचे फळ अनंत पटींनी मिळते, अशा समजामुळे ग्रहणमोक्षानंतर आपल्या ऐपतीनुसार दान करावे असे सुचविले जाते.
  उत्तर कोकण समजल्या जाणाऱ्या रायगड परिसरातही ग्रहणकाळात दान करण्याची परंपरा आहे. ही नेमकी पद्धत केव्हा सुरू झाली ठाऊक नाही. परंतु सूर्यग्रहणाला दान करण्याची संस्कृती कमीत कमी हजार वर्षे जुनी असल्याचे सांगता येईल. ग्रहण आणि दान यांच्यातील संबंध दृढ करणारे तीन ऐतिहासिक लेख या संस्कृतीच्या प्राचीनतेला दुजोरा देतात. यातील दोन लेख हे उरण जवळील चांडिजे अर्थात चाणजे या गावात सापडले. हे लेख म्हणजे खरेतर गद्धेगाळ आहेत.
यातील पहिला शिलालेख हा शिलाहार नृपती अपरादित्यदेव या राजाच्या काळातील आहे. या लेखावर माघ शुद्ध प्रतिपदा शके १०६० असा उल्लेख आहे. इंग्रजी कालगणनेप्रमाणे ही तारीख गुरूवार १३ जानेवारी ११३९ अशी येते. या लेखात शिलाहार नृपती अपरादित्यदेव, त्याची माता लीलादेवी, त्याचे मंत्री सोढनायकु व लक्ष्मणैयप्रभु यांचे उल्लेख आहेत. या दिवशी आलेल्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता लीलादेवीच्या कल्याणार्थ नागुम म्हणजे सध्याचे नागाव येथील आंबराई व चांडीजे (चाणजे) येथील जमिन श्रीधर नावाच्या व्यक्तीस दान केली. चाणजेचा दुसरा शिलालेख हा चैत्र अमावस्या शके ११८२ चा आहे.  सोमवार १२ एप्रिल १२६० तारखेच्या या शिलालेखाची नोंद पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी  पहिल्यांदा केली.  प्रसिद्ध तज्ञ डॉ. सांकलिया, डॉ. उपाध्याय आणि डॉ. तुळपुळे यांनी यानंतर या शिलालेखावर काम केले आहे. यावरील लेख हा संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील आहे. विनायकाला नमन करून सुरूवात झालेल्या या लेखात  “सूर्योपरागे उ रण आगराभू | चांडिजेग्रामप्रतिवदकोंथलेस्थानवाटिकाभू |” असे उरण, चांडिजे (चाणजे), कोंथलेस्थान(काळाधोंडा) या स्थानांचे स्पष्ट उल्लेख आहेत. शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वरदेवानेसूर्यग्रहणाच्या दिवशी कोंथलेस्थान येथील जमिन व काही आर्थिक मदत उत्तरेश्वर देवस्थानाला दिल्याचे संदर्भ आहेत.  या शिलालेखांसह आणखी एक शिलालेख उरणमधील रानवड या ठिकाणी आढळला, परंतु यातील दान हे संक्रांतीनिमित्त केले आहे. सध्या हे तिनही शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पहायला मिळतील.

      सूर्यग्रहणाला दान दिल्याचा तिसरा लेख हा शिलालेख नसून ताम्रशासन आहे. २४ ऑक्टोबर ११२० रोजीच्या आश्विन अमावस्येला झालेल्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील परुकुने (पिरकोन) आणि अऊरे (आवरे) या गावांचे उत्पन्न पंधरा ब्राम्हणांना समप्रमाणात वाटून देण्यात आले. शिलाहारांचा महाकुमार केशिदेवाने आधी शिवाचे पुजन करून फुले वाहीली, सूर्यदेवास नमस्कार करून ‘राम’क्षेत्रातील ‘शिल’तिर्थाच्या खाऱ्या पाण्याद्वारे हा दानसंकल्प पूर्ण केला असे वर्णन या पटात आहे. या दानासह दिवेआगार येथील दानपत्रेही ज्ञात झाली आहेत.
     सूर्यग्रहण, संक्रांत काळात दान करणाऱ्या या शिलाहारांच्या जवळपास दहा वेगवेगळ्या शाखांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात राज्य केले. त्यापैकी महाराष्ट्रातील उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार ही तीन घराणी प्रभावी मानली जातात.  उत्तर कोकणचे अर्थात रायगड परिसरातील आणि कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला तगरपुराधीश्वर असे गौरवाने म्हणवून घेत. हे राजे शांतताप्रिय असल्याचे मानले जाते. त्यांच्या राजवटीत हिंदू, बौद्ध, जैन धर्म मोकळेपणाने नांदत असल्याचे मत इतिहासतज्ञ व्यक्त करतात.  यापैकी शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वराच्या अंमलाखाली ‘अपरान्त’ म्हणजेच उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील जवळपास चौदाशे गावे होती. या काळात सूर्यग्रहणासारख्या खगोलीय व नैसर्गिक घटनांना दैवी समजून त्यापासून आपले इप्सित साधण्यासाठी दानसंकल्प केले आहेत. हे दानसंकल्प सुमारे हजार वर्ष जुने आहेत. काळ बदललाय, या घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदललाय. परंतु अजूनही थोड्या प्रमाणात दानसंस्कृती टिकून आहे. श्रद्धा असो वा गैरसमज, या निमित्ताने एखाद्या गरजूला मदत मिळते; हेच यातील समाधान!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Wednesday, December 18, 2019

हातपाटीच्या हातावरील पोट!

हातपाटीच्या हातावरील पोट!
        दीर्घ श्वास घेऊन शिडशिडीत अंगाचा, कांती रापलेला एक मनुष्य थोड्या उथळ समुद्राचा तळ गाठतो. त्याच्या हातात दोरखंडांनी बांधलेली एक प्लास्टिक फायबरची मजबूत घमेलेवजा पाटी आहे. आपल्या ताकदीच्या बळावर तो समुद्रतळाची वाळू खरवडून घमेले भरतो. पृष्ठभागावर तरंगणाऱ्या मचव्यापासून एक काठी तळापर्यंत सोडलेली आहे. घमेले भरल्याबरोबर तो मनुष्य विशिष्ट प्रकारे काठी वाजवून आपल्या वरच्या साथीदारांना इशारा करतो. इशारा मिळताच मचव्यावरील माणसे वाळूने भरलेले घमेले वर खेचून घेतात. या वाळूसरशी पाण्याखालील व्यक्तीदेखील वर येते; पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेण्यासाठी....
बांधकामासाठी लागणारी रेती हातपाटीच्या साह्याने उपसा करणाऱ्यांची ही कथा. यालाच डुबी पद्धतीने रेती काढणे असेही म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात उरण, पेण, अलिबाग पासून ते अगदी माणगाव, महाड पर्यंतच्या समुद्रकिनारी या पद्धतीने वाळू काढली जाते. केवळ समुद्रच नव्हे तर अगदी खाडी व नदीपात्रातूनही वाळू उपसा होत असतो.
        बऱ्यापैकी साठवणक्षमता असलेला मचवा (होडी), पाटी, दोरखंड, बांबू, लाकडी फळ्या आणि कुशल कामगार इतक्या मोजक्या भांडवलावर आधारीत हा व्यवसाय. इथल्या कामगारांना सरसकट खलाशी संबोधतात. तर गावाकडे त्यांना मचवेकरी या नावाने ओळखले जातात.  या मचवेकऱ्यांमध्येही कामाच्या स्वरूपानुसार काही प्रकार आहेत. हातपाटी घेऊन पाण्यात बुडी मारणारा तो ‘बुड्या’. (उरण,पनवेल परिसरात त्याचा उच्चार ‘बुऱ्या’ असा करतात.) तर वाळूने भरलेली हातपाटी ओढणारे ते ‘वढ्या’.(यांचाही उच्चार ‘वऱ्ह्या’ असा होतो!). लांब अंतरापर्यंत व अधिक काळ रेती उपसा करणाऱ्या मचव्यांवर जेवण रांधणारे ‘रांधे’ असतात. यात सर्वाधिक कौशल्याचे आणि महत्त्वाचे काम असते ‘बुड्या’चे. तो पोहण्यात तरबेज असावा लागतो. पाण्याखाली जितका अधिक काळ राहता येईल तितक्या जास्त प्रमाणात रेती उपसता येईल हे साधे गणित. याशिवाय दिवसाकाठी अधिकाधिक बुड्या होणेही गरजेचे. शास्त्रात ‘Rule of  Threes’ नावाने एक नियम प्रसिद्ध आहे. या नियमानुसार साधारणपणे एखादी निरोगी व्यक्ती जास्तीत जास्त तीन आठवडे अन्नाविना, तीन दिवस पाण्याविना आणि तीन मिनीटे हवेशिवाय जिवंत राहू शकते. अपवादात्मक परिस्थितीत किंवा सरावाने यात वाढ होऊ शकते. परंतु या परिस्थितीतही मेंदूला मोठ्या प्रमाणावर लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा देखिल यातील महत्त्वाचा घटक ठरतो.
ऑक्सिजनचा अभाव एक मिनीटांहून अधिक काळ जाणवल्यास मेंदूतील पेशी मृत व्हायला सुरूवात होते, तीन मिनीटानंतर मेंदूला गंभीर इजा होऊ शकते. तर दहा-पंधरा मिनीटानंतर मेंदू प्रत्यक्षात मृत  पावतो.  पाण्याखालील कामाचा दीर्घकालीन परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. सतत पाण्याखाली काम केल्याने ऐकू न येणे, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होण्याची शक्यता असते. या सर्व बाबींचा विचार करता काही आठवड्यांच्या अन्नासाठी हे सामान्य कामगार काही मिनीटे सलग पाण्याखाली राहून असामान्य काम करतात. मचव्याखाली सोडलेली काठी त्याचा जीवनाधार असते. समुद्रांतर्गत प्रवाहांमुळे वाहून जाण्यापासून या काठीमुळे आधार मिळतो. एका दमात अशा चाळीस ते पन्नास पाट्या उपसल्यानंतर त्याला अर्ध्या तासाची विश्रांती मिळते. अर्थात या जबाबदारीच्या बदल्यात मिळणाऱ्या रेतीच्या उत्पन्नातील मोठा वाटाही त्याला मिळतो. बुड्यांच्या जोडीला मेहनतीचे काम बजावणारे ‘वऱ्ह्या’ लोक कष्टाच्या दृष्टीने कठीण काम करतात. रेतीने भरलेली जड पाटी पाण्यात असेपर्यंत हलकी वाटते, परंतु पाण्याबाहेर खेचताना अधिक ताकद लावावी लागते. यासाठी मोठ्या प्रमाणावर उर्जा लागते. ही उर्जा पुरवण्यासाठी ‘रांधे’लोक काम करतात. अखेर ‘सैन्य पोटावर चालते’ या वाक्प्रचारानुसार स्वयंपाक्यांचे कामही तितकेच महत्त्वाचे ठरते.
      एकादशीच्या दरम्यान हे मचवेकरी  घरी येतात, सप्तमी-अष्टमी पर्यंत हा सुट्टी कालावधी चालतो. त्याचबरोबर होळी, गणपती यांसारख्या सणासुदीलाही ते घरी असतात. हे कामगार घरी येताना लगेच ओळखू येतात. नुकत्याच मिळालेल्या मेहनतान्याच्या पैशातून घेतलेला खाऊ आणि इतर सामानाने भरलेल्या भरगच्च पिशव्या ही त्यांची ओळख. गावात आल्यावर कधिकधी खोल विहिरींमध्ये बुडालेल्या वस्तू काढणे यांसारखी विशेष कामगिरीही ते बजावत असतात.  मचव्यावरील रांधे जेव्हा एखाद्या लग्नप्रसंगी किंवा गावच्या कार्यक्रमात स्वयंपाक करतात, तेव्हा त्यांचे सगळी मेहनत चवीच्या रुपाने जेवणात उतरते. आळीचे एकत्र जेवण बनवताना या रांध्यांनी ‘खाना’ नावाने बनवलेला स्वयंपाक विलक्षण असतो.
    यांत्रिकीकरणाची झळ या व्यवसायालाही बसलीय. ड्रेजर मशिन आणि सक्शन पंपाच्या अश्वशक्तीपुढे बुड्याची छाती कमी पडू लागली. पारंपरिक पद्धतीने गरजेपुरता होणारा वाळू उपसा अधाशीपणे होऊ लागला.
त्यातच विनापरवाना चालणाऱ्या छुप्या रेती उपशामुळे पारंपरिक कामगारांनाही चांगला माल मिळणे कठीण झाले. आधीच तळाशी असणाऱ्या पारंपरिक हातपाटी वाळू व्यवसायावर मंदीचे सावट आले. रायगडच्या समुद्रकिनारी अजूनही बुड्यांचा श्वास घुमतोय. अवैधपणे चालणाऱ्या वाळू उपशावर नियंत्रण राखल्यास निसर्गाशी समन्वय राखत चालणाऱ्या या व्यवसायालाही थोडा आधार मिळेल, मचव्यातील काठीसारखा...

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...