Search This Blog

Wednesday, December 25, 2019

सूर्यग्रहण आणि दानसंस्कृती

    २०१९ या वर्षाची अखेर जवळ आली आहे. यावर्षीचं अखेरचं सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबरच्या मार्गशीर्ष अमावस्येला होईल. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ६ जानेवारीला तर दुसरे २ जुलैला होते. २६ डिसेंबर रोजीचे हे सूर्यग्रहण भारतासोबतच सौदी अरब, कतार, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया, सुमात्रा, फिलीपाईन्स, सिंगापूर आणि गुआम इथेही दिसणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येऊन चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते, तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले, तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेलेे, तर ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ होते. भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे. खरेतर ग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना. परंतु विज्ञानासह ज्योतिष आणि धार्मिक दृष्टीनेही ग्रहणकाल महत्त्वाचा समजला जातो. सामान्यपणे धार्मिक दृष्ट्या सूर्यग्रहण हे अशुभ मानले जाते. ग्रहणाला अशुभ मानन्यातून, त्यापासून आपल्याला अपाय होऊ नये यासाठी जप करणे, दान करणे असे विविध उपाय योजले जातात.  ग्रहणकाल हा संधीकाल असल्याने या काळात केलेल्या जप आणि दान यांचे फळ अनंत पटींनी मिळते, अशा समजामुळे ग्रहणमोक्षानंतर आपल्या ऐपतीनुसार दान करावे असे सुचविले जाते.
  उत्तर कोकण समजल्या जाणाऱ्या रायगड परिसरातही ग्रहणकाळात दान करण्याची परंपरा आहे. ही नेमकी पद्धत केव्हा सुरू झाली ठाऊक नाही. परंतु सूर्यग्रहणाला दान करण्याची संस्कृती कमीत कमी हजार वर्षे जुनी असल्याचे सांगता येईल. ग्रहण आणि दान यांच्यातील संबंध दृढ करणारे तीन ऐतिहासिक लेख या संस्कृतीच्या प्राचीनतेला दुजोरा देतात. यातील दोन लेख हे उरण जवळील चांडिजे अर्थात चाणजे या गावात सापडले. हे लेख म्हणजे खरेतर गद्धेगाळ आहेत.
यातील पहिला शिलालेख हा शिलाहार नृपती अपरादित्यदेव या राजाच्या काळातील आहे. या लेखावर माघ शुद्ध प्रतिपदा शके १०६० असा उल्लेख आहे. इंग्रजी कालगणनेप्रमाणे ही तारीख गुरूवार १३ जानेवारी ११३९ अशी येते. या लेखात शिलाहार नृपती अपरादित्यदेव, त्याची माता लीलादेवी, त्याचे मंत्री सोढनायकु व लक्ष्मणैयप्रभु यांचे उल्लेख आहेत. या दिवशी आलेल्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता लीलादेवीच्या कल्याणार्थ नागुम म्हणजे सध्याचे नागाव येथील आंबराई व चांडीजे (चाणजे) येथील जमिन श्रीधर नावाच्या व्यक्तीस दान केली. चाणजेचा दुसरा शिलालेख हा चैत्र अमावस्या शके ११८२ चा आहे.  सोमवार १२ एप्रिल १२६० तारखेच्या या शिलालेखाची नोंद पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी  पहिल्यांदा केली.  प्रसिद्ध तज्ञ डॉ. सांकलिया, डॉ. उपाध्याय आणि डॉ. तुळपुळे यांनी यानंतर या शिलालेखावर काम केले आहे. यावरील लेख हा संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील आहे. विनायकाला नमन करून सुरूवात झालेल्या या लेखात  “सूर्योपरागे उ रण आगराभू | चांडिजेग्रामप्रतिवदकोंथलेस्थानवाटिकाभू |” असे उरण, चांडिजे (चाणजे), कोंथलेस्थान(काळाधोंडा) या स्थानांचे स्पष्ट उल्लेख आहेत. शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वरदेवानेसूर्यग्रहणाच्या दिवशी कोंथलेस्थान येथील जमिन व काही आर्थिक मदत उत्तरेश्वर देवस्थानाला दिल्याचे संदर्भ आहेत.  या शिलालेखांसह आणखी एक शिलालेख उरणमधील रानवड या ठिकाणी आढळला, परंतु यातील दान हे संक्रांतीनिमित्त केले आहे. सध्या हे तिनही शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पहायला मिळतील.

      सूर्यग्रहणाला दान दिल्याचा तिसरा लेख हा शिलालेख नसून ताम्रशासन आहे. २४ ऑक्टोबर ११२० रोजीच्या आश्विन अमावस्येला झालेल्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील परुकुने (पिरकोन) आणि अऊरे (आवरे) या गावांचे उत्पन्न पंधरा ब्राम्हणांना समप्रमाणात वाटून देण्यात आले. शिलाहारांचा महाकुमार केशिदेवाने आधी शिवाचे पुजन करून फुले वाहीली, सूर्यदेवास नमस्कार करून ‘राम’क्षेत्रातील ‘शिल’तिर्थाच्या खाऱ्या पाण्याद्वारे हा दानसंकल्प पूर्ण केला असे वर्णन या पटात आहे. या दानासह दिवेआगार येथील दानपत्रेही ज्ञात झाली आहेत.
     सूर्यग्रहण, संक्रांत काळात दान करणाऱ्या या शिलाहारांच्या जवळपास दहा वेगवेगळ्या शाखांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात राज्य केले. त्यापैकी महाराष्ट्रातील उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार ही तीन घराणी प्रभावी मानली जातात.  उत्तर कोकणचे अर्थात रायगड परिसरातील आणि कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला तगरपुराधीश्वर असे गौरवाने म्हणवून घेत. हे राजे शांतताप्रिय असल्याचे मानले जाते. त्यांच्या राजवटीत हिंदू, बौद्ध, जैन धर्म मोकळेपणाने नांदत असल्याचे मत इतिहासतज्ञ व्यक्त करतात.  यापैकी शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वराच्या अंमलाखाली ‘अपरान्त’ म्हणजेच उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील जवळपास चौदाशे गावे होती. या काळात सूर्यग्रहणासारख्या खगोलीय व नैसर्गिक घटनांना दैवी समजून त्यापासून आपले इप्सित साधण्यासाठी दानसंकल्प केले आहेत. हे दानसंकल्प सुमारे हजार वर्ष जुने आहेत. काळ बदललाय, या घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदललाय. परंतु अजूनही थोड्या प्रमाणात दानसंस्कृती टिकून आहे. श्रद्धा असो वा गैरसमज, या निमित्ताने एखाद्या गरजूला मदत मिळते; हेच यातील समाधान!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...