Search This Blog

Friday, August 3, 2018

निर्मात्याच्या शोधात

निर्मात्याच्या शोधात’

                   नेहमीची वर्दळ पार करत नालासोपारा रेल्वे उड्डाणपुलावरून पश्चिमेच्या‘शूर्पारक’ नगरीत म्हणजेच सोपारा गावात दाखल झालो. इच्छित स्थळाकडे जाण्याऐवजी विरारच्या दिशेकडे मार्गक्रमण केले.

विष्णूमूर्ती- बोळींज
बोळींज गावातील एका वृक्षाखाली उभी असलेली एक कोरीव विष्णूमूर्ती, केवळ आयुधांच्या जागेत बदल असणारी करमाळे येथील तलावात सापडलेली व सध्या सुरक्षित छप्पराखाली असणारी आणखी एक विष्णूमूर्ती पाहीली आणि पुन्हा सोपाऱ्याच्या दिशेने निघालो.
विष्णूमूर्ती- करमाळे
सृष्टीकर्त्या ब्रम्हालाही हेवा वाटेल असे टुमदार बंगले आणि सभाेवतालच्या हिरवळीने नटलेला हा मार्ग. नालासोपाऱ्याच्या पूर्वेला जमिनीसह आकाशातही जागा व्यापणाऱ्या गच्च इमारती तर पश्चिमेला इमारतींबरोबरच गावपण टिकवून ठेवलेल्या वाड्या आहेत. दोन्ही बाजूकडील लोकवस्त्यांमध्ये जमिन अस्मानाचं अंतर. याच मार्गाने पुढे जात एका लहानशा विहीरीला वळसा घालून तलावाजवळील ‘चक्रेश्वर महादेव’ मंदिराजवळ पोहोचलो.

प्राचीन शुर्पारक नगरीतील चक्रतीर्थ किंवा चक्रेश्वर नावाच्या या तलावाचा अगदी रामायण-महाभारतातही उल्लेख असल्याचे सांगीतले जाते.
   विस्ताराने आणि सौंदर्याने विशाल असणाऱ्या चक्रेश्वर तलावाच्या दिशेकडील प्रवेशद्वारातून महादेव मंदिरात प्रवेश केला. शिवलिंगाचे दर्शन घेऊन उजवीकडे वळलो.
मंदीराच्या गर्भगृहाबाहेरच एका बंदिस्त जागेत शिव-पार्वती, गणपती, अंबिका, मिनाक्षी अप्सरा अशी सुंदर आणि दुर्मिळ शिल्पे आहेत.
मंदिरातच एका बाजूला मारूतीची मिशी असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे.
मिशी असलेला मारूती
वसई किल्ल्यातील मारूतीशी साधर्म्य असणारी ही मूर्ती. मारूतीच्या एका अंगाला अग्नीदेवाची झीज झालेली मूर्ती आहे. मंदिराच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यानंतर एक जुने रामंमदिर आहे. या मंदिराच्या बाहेरच्या भिंतीला एक वराह मूर्तीही आढळते. आश्चर्याची बाब म्हणजे महादेव मंदिर आणि कुंपण यांच्यामधील मोकळ्या जागेत एक भले मोठे शिवलिंग आहे, परंतु त्याकडे विशेष लक्ष पुरवल्याचे भासत नाही.या परिसराच्या कुंपणाला लागून अनेक सुंदर मूर्त्या ओळीने ठेवलेल्या आढळतात.
गजलक्ष्मी


वीरगळ




गजलक्ष्मी, विष्णू, वीरगळ, नंदी इत्यादी भंग झालेल्या लहान-मोठय़ा मूर्ती यात आहेत.
 अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हा तलावाचा गाळ उपसताना सापडलेल्या या प्राचीन व दुर्मिळ अशा मूर्ती. या मूर्त्यांच्या रांगेतच ब्रह्मदेवाची आठ फूट उंचीची समभंग रचनेतील अचल मूर्ती आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ब्रह्मदेवाची मूर्ती म्हणून ओळखली जाते. सृष्टीचा निर्माता मानला जाणारा ब्रम्हा येथे उघड्या आभाळाखाली ‘स्थानक’ म्हणजेच उभ्या स्थितीत दिसतो.

“ब्रम्हा कमंडलुधर: कर्तव्य: स चतुर्मुख।
हंसारूढ: क्वचित् कार्य: क्वचिच्च कमलासन:।।
वर्णत: पद्मगर्भाभश्चतुर्बाहु: शुभेक्षण:।
कमंडलुं वामकरे स्रुवं हस्ते तु दक्षिणे।।”
ब्रम्हा मूर्ती

     या पुराणांतील वर्णनाप्रमाणे येथील चतुर्मुखी ब्रम्हा दर्शनी त्रिमुख व चतुर्भूज रुपात आहे. पाठीमागील उजव्या हातात स्रुवा व डाव्या हाती वेद आहेत.  समोरच्या डाव्या हाती कमंडलू असून उजवा हात जमिनीच्या दिशेने आहे. या मूर्तीतील ब्रम्हदेवाच्या उजव्या हातातील स्रुवा-म्हणजे यज्ञाच्या वेळेस आहुती देण्यासाठी वापरली जाणारी पळी अतिशय सुबक आणि देखणी आहे. मूर्ती पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेणारे हे उपकरण मुर्तीचे सौंदर्य वाढवते.  रूप मंडनातील वर्णनानुसार दाढीधारी ब्रम्ह्याचे रूप पहायला मिळते. या मूर्तीतील समोरील मुखाला दाढी आहे. हे दाढी असलेले रूपही मूर्तीचे समभंगत्व राखून आहे. सामान्यत: शिव व ब्रम्हा यांच्या माथी जटामुकूट असतो, परंतु येथील मूर्तीवर किरीट मुकुट असून त्यात ‘किर्तीमुख’ कोरले आहे.
मूर्तीच्या पायाजवळ डाव्या बाजूला सावित्री व हंस असून, उजव्या पायाजवळ वेदधारी ऋषी आहेत. अंगावरील आभूषणे, यज्ञोपवित यांच्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण लयबद्धता मूर्तीकाराने साधली आहे.
   या सुंदर मूर्तीसह आणखी एक झीज झालेली ब्रम्हदेवाची मूर्ती सोपाऱ्यात आहे.
     पुराणांनी ब्रम्हदेवाला सृष्टीचा निर्माता मानले असले तरी ब्रम्हदेवाची स्वतंत्र मंदिरे भारतात खूप कमी आहेत. पुष्कर(राजस्थान), ब्रम्हा कर्मळी(गोवा), कुल्लू, कुंभकोणम, तिरूपत्तूर अशी काही ब्रम्हदेवाची सुप्रसिद्ध मंदिरे आहेत. 
प्राचीन काळात वैदिक, जैन आणि बौद्ध धर्माचे केंद्र असणाऱ्या शूर्पारक नगराचा लौकीक पाहता चक्रेश्वर तलाव परिसरात अतिशय सुंदर व भव्य मंदिर होते असे मानायला हरकत नाही. तलावात शास्त्रीय पद्धतीने शोध घेतल्यास इथल्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकता येऊ शकेल. ब्रम्हदेवाच्या मूर्ती दुर्मिळ मानल्या जात असताना नालासोपाऱ्यात दोन मूर्ती आढळणे ही इथल्या प्राचिनत्वाला अधोरेखित करणारी गोष्ट आहे. ही दुर्मिळ आणि सुंदर कलाकृती उन-पाऊस झेलत उभी आहे. परिणामी मूर्तीच्या दगडाची झीज होत आहे.
चक्रेश्वर तलाव- सोपारा

परंतु कला आणि इतिहासाप्रतीच्या आपल्या उदासीनतेच्या चक्रात हा चक्रेश्वराचा परिसरही सापडलाय. काही वर्षांपूर्वी येथील तळ्याचा गाळ काढला गेला, असाच काहीसा दुर्लक्षाचा गाळ आमच्या दृष्टीवर पडलाय तोही निघायला हवा. या सृष्टीच्या निर्मात्याची चतुर्भूज मूर्ती निर्माण करणाऱ्या अज्ञात कलाकाराला द्वीभूजांनी मनोमन नमस्कार केला आणि निघालो प्राचिन शूर्पारक नगरीतून अर्वाचीन नालासोपाऱ्याकडे....

तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भभारताची मूर्तीकला- पं.महादेवशास्त्री जोशी

#सोपारा #शूर्पारक #सुप्पारक #नालासोपारा #चक्रेश्वर #चक्रतीर्थ #ब्रम्हा #ब्रम्हदेव #मूर्ती

(सदर लेख दैनिक कर्नाळामध्ये शनिवार 4 ऑगस्ट 2018च्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे.)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...