Search This Blog

Thursday, March 25, 2021

मेरा ‘पत्ता’ ही मेरी पहचान है

अंदमान-निकोबार बेटांवर अनेक आदिवासी जमाती आढळतात. अत्याधुनिक समाजजिवनापासून दूर असलेल्या त्यांच्या जगात विविध समस्यांवर पारंपारिक ज्ञानाच्या आधारे मार्ग काढला जातो. या जमातींपैकी काही जमातींमध्ये सर्पदंश झाल्यावर एका वनस्पतीची कोवळी पाने, मुळे कुटून दंशाच्या जागी लावली जातात. त्यामुळे विषाचा प्रभाव कमी होतो असा त्यांचा दृढ समज आहे. ही वनस्पती तीच आहे जी त्यांच्या पूर्वजांनी विषारी बाणांच्या जखमांसाठी वापरली होती. रानातल्या लोकांद्वारे पूर्वापार वापरल्या  जाणाऱ्या या वनस्पतीचे नाव निवगूर. तर शास्त्रीय नाव ॲकँथस इलिसिफोलियस (Acanthus ilicifolius). खारफुटीच्या जंगलांत आढळणाऱ्या व ‘होली’ (होळी नव्हे!) वनस्पतींप्रमाणे पानांची रचना असल्याने या वनस्पतीला इंग्रजीत ‘होली मॅन्ग्रोव्ह’ किंवा ‘सी होली’ असे म्हटले जाते. तिलाच काही ठिकाणी मारांडी, मारांडो अशा नावांनी ओळखले जाते. तर संस्कृत ग्रंथांत तिचा हरिकुस असा उल्लेख सापडतो. भारत, श्रीलंका, मलेशिया, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांत या सदापर्णी वनस्पतीचा प्रसार आहे.


          ही वनस्पती झुडूपवर्गीय असली तरी तिची गोलसर आकाराची खोडे सरळ वाढतात. साधारणपणे अर्धा ते दीड मीटरपर्यंतची उंची ते गाठू शकतात.  “मेरा ‘पत्ता’ ही मेरी पहचान है!” असे म्हणत निवगूर आपल्या पानांचे ओळखपत्र समोर करते. मारांडीची जाड आणि गुळगुळीत पाने खोडांवर समोरासमोर उगवलेली असतात. करवतीप्रमाणे दात असलेली, नागमोडी व काटेरी पाने हे या वनस्पतीचे वैशिष्ट्य. गुळगुळीत पानांच्या तळाशी दोन उपपर्णी काटे असतात. कांदळवनांतून फेरफटका मारताना निवगूराची दाट झुडूपे बऱ्याचदा वाट अडवतात. एखाद्या जलदुर्गाच्या तटबंदी प्रमाणेच निवगूरांची ही काटेरी तटबंदी भेदणे अवघड असते. अंधाऱ्या जगात मात्र निवगूर आपली पानांची ओळख लपवते. गडद सावलीत वाढल्यास या वनस्पतीची पाने काटेरी न राहता सामान्य पानांसारखीच दिसतात. त्यामुळे दोन वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या निवगूरांच्या पानांच्या रचनेत फरक आढळल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. डिसेंबर ते मे या कालावधीत निवगूराला निळसर जांभळ्या रंगांची सुंदर व नाजूक फुले येतात. बिनदेठाची ही फुले जोडीने समोरासमोर उगवतात. फळे बोंडाप्रमाणे असतात. पक्व झाल्यानंतर ही लंबगोल बोंडे फुटून त्यातील चपट्या बिया जवळपासच्या दोन मीटर परिसरात पसरतात. 


         खाऱ्या पाण्यातून शोषलेले क्षार बाहेर न पडल्याने वनस्पतीचा रस अधिक क्षारयुक्त असतो. बहुधा यामुुुुळेच अन्न म्हणून या वनस्पतीचा वापर केल्याचे फारसे ज्ञात नाही. पण मुंबई किनारपट्टीलगतच्या प्रदेशांत निवगूराचा पाला जनावरांना खाऊ घालतात. तोंडाच्या विशिष्ट रचनेचे वरदान लाभलेल्या शेळ्यांना ही काटेरी वनस्पती सहज चघळता येते, पण गाई, म्हैशींना हा पाला बारीक कुटून द्यावा लागतो. निवगूराचा पाला दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त ठरतो. दक्षिण आशियाई भागात निवगूराचे अनेक औषधीय उपयोग ज्ञात आहेत. विशेषत: या वनस्पतीचा वेदनाशामक गुणधर्म लक्षात घेऊन शरीराच्या सूज आलेल्या भागावर ही पाने व आले एकत्र वाटून त्याचा लेप लावतात. संधिवातावर व मज्जातंतूंच्या वेदनांवर पानांचा वापर करून शेक दिला जातो. तर पोटदुखीवर उपाय म्हणून आल्यासोबत निवगूराच्या मुळांचे मिश्रण खायला दिले जाते किंवा  कोवळी पाने दालचिनीसोबत चघळण्यास सांगीतले जाते . मारांडीच्या पानांचा रस खोकला व दमा यांसारख्या विकारांमध्ये गुणकारी ठरतो. ही वनस्पती दुधासोबत उकळून प्रदर व इतर लैंगिक आजारांवरील उपचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. इतकेच नव्हे तर जुन्या काळात बाळंतपण सोपे व्हावे म्हणून निवगूराची पाने पाण्यात कुस्करून ते पाणी प्यायला देत असत.आणि हो! या वनस्पतीचा काढादेखील करता येतो.



       या औषधीय उपयोगांसह निवगूराचे काही व्यावसायिक उपयोगही आहेत. निवगूर जाळून मिळणाऱ्या राखेचा उपयोग साबण तयार करण्यासाठी होतो. या कारणांसाठी त्याची लागवडही केली जाते. काटेरी असली तरी आपल्या विशेष गुणांमुळे ही वनस्पती तिच्यावर उगवणाऱ्या निळ्या जांभळ्या फुलांसारखा सुरेख आनंद रूग्णांच्या जीवनात फुलवते. याच कारणांमुळे आपल्या राज्यातील निवगूराची सहज उपलब्धता लक्षात घेऊन अधिकचे संशोधन होणे गरजेचे आहे.

- तुषार म्हात्रे

Thursday, March 18, 2021

कांदळवनांतील वांदळा

         दोन हजार अठरा सालच्या नोव्हेंबर महिन्यातील घटना. बंगालच्या उपसागरातून ‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडूतील नागपट्टणमच्या किनाऱ्याला धडकले. वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पाऊस यांमुळे किनारी भागाला मोठे नुकसान सोसावे लागले. या चक्रीवादळातून तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील मुथुपेठ आणि जावपास हा भाग आश्चर्यकारकरित्या बचावला. यामागील कारण शोधले असता अभ्यासकांना असे दिसून आले की, या गावांभोवती कांदळवनांचे आवरण होते. कांदळवनांनी किनारपट्टीचे रक्षण करण्याचा अनुभव तसा नवा नाही. याच कांदळवनांमुळे २००४ सालच्या त्सुनामी पासून आपल्या देशातील किनारी भागाला संरक्षण मिळाले होते.
         चंद्राच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात कांदळवने अर्थातच खारफुटीची जंगले आढळतात. विविध प्रकारच्या खारफुटी वनस्पतींनी समृद्ध असे हे जंगल ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था म्हणून ओळखली जाते. या वनांचे महत्त्व ओळखून आपल्या राज्याने कांदळवन संवर्धनासाठी वन विभागाअंतर्गत स्वतंत्र ‘कांदळवन कक्ष’(Mangrove Cell) स्थापन केला. देशामध्ये केवळ महाराष्ट्रात असा उपक्रम राबवला गेला आहे. कांदळवन कक्षाअंतर्गत या वनांतील एका वृक्षाला 'राज्य कांदळवन वृक्ष' घोषित करण्यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव पुढे 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत मंजूर झाल्याने महाराष्ट्र हे देशातील 'राज्य कांदळवन वृक्ष' म्हणून घोषित करणारे पहिले राज्य ठरले आहे. ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या या वृक्षाचे नाव ‘पांढरी चिप्पी’. राज्याद्वारे निवड केलेल्या जीवजातींतील शेकरू,हरियाल, जारूळ, ब्ल्यू माॅरमॉन आणि आंबा या सर्वांच्या यादीत आता पांढऱ्या चिप्पीचा समावेश झालाय. या वृक्षाचे शास्त्रीय नाव सोनेरेशिया अल्बा (Sonneratia alba) असे आहे. यातील ‘अल्बा’ हा लॅटिन शब्द पांढरा या अर्थाने आला आहे. हा रंग या वृक्षाला येणाऱ्या सुंदर पांढऱ्या फुलाशी संबंधित आहे.

ही फुले रात्री उमलतात व दिवसभर कोमेजलेल्या अवस्थेत राहतात. नवी मुंबईजवळील स्थानिकांच्या दृष्टीने या सर्व खारफुटी वनस्पती म्हणजे ‘बाऱ्हांची झारा’; तर या बाऱ्हांमध्ये आढळणाऱ्या पांढऱ्या चिप्पीला कांदळ, वांदळा, वांधळा अशा विविध नावांनी ओळखले जाते. भारतीय उपखंडासह आफ्रिका, ऑस्ट्रेलिया भागांतील खाडीकिनारी हा सदाहरित वृक्ष दिसून येतो. साधारणपणे तीन ते पंधरा मीटर उंचीचे वृक्ष सर्वत्र आढळतात. अपवादात्मक पण अनकूल परिस्थितीत तीस  मीटरची उंची गाठलेले वृक्षही आढळले आहेत. ओहोटीच्या वेळेस या अधिवासातील वृक्षांच्या आजूबाजूला पाहिल्यास वाढदिवसाच्या केकला खोचलेल्या मेणबत्त्यांप्रमाणे चिखलातून वरच्या दिशेने आलेली मुळे दिसतात.
             कायम दलदलीत राहील्याने मुळांना लागणारा ऑक्सिजन मिळविण्यासाठी अशी मुळे उगवलेली असतात.
या वृक्षाची पाने व फळे कच्ची अथवा शिजवून खाल्ली जातात. पूर्व आफ्रीकेत मात्र या वृक्षाची पाने उंटांचे खाद्य म्हणून प्रसिद्ध आहेत. कच्ची फळे आंबट असल्याने त्यांचे लोणचे बनवता येते. त्यातील आम्लतेमुळे व्हिनेगर बनवण्यासाठी त्याचा वापर होतो.

पुढे ही फळे पिकल्यानंतर त्यांना चीजसारखी चव येते.  अशी फळे जगभरात खाल्ली जातात. जंतविकार व श्वसनविकारांवरील उपचारपद्धतीमध्ये या फळांचा वापर होतो. लहान जखमांसाठी जंतुनाशक म्हणूनसुद्धा ही वनस्पती उपयुक्त ठरते. जळणासाठी इंधन म्हणून या वृक्षाचा वापर होतो. परंतु या लाकडात क्षार अधिक प्रमाणात असल्याने ‘जाळ नी धूर संगटच’ असा प्रकार घडून येतो. यामुळे वांदळ्याचा जळणासाठीचा वापर मर्यादित राहिला आहे. आकाराने व वयाने वाढलेल्या  वृक्षाच्या आतील लाकूड अतिशय टिकाऊ व मजबूत असते. लाकडाचे नुकसान करणारे किडे या वृक्षाच्या नादी लागत नाहीत.

त्यामुळे जहाजबांधणी, लाकडी पुल, घरासाठीदेखील या लाकडाचा काही प्रमाणात वापर होतो. विळा, कोयते यांची थरव म्हणून ओळखली जाणारी लाकडी मूठ या वृक्षापासून बनवली जाते. पण त्याचबरोबर या लाकडाचा वापर करताना त्यातील क्षारांमुळे बांधकामातील खिळे लवकर गंजू शकतात. यासाठी गंजरोधक क्षमता असलेले विशिष्ट प्रकारचे खिळे वापरता येतात. जमिनीवरील श्वसनमुळांपासून बुटांचे लाकडी सोल व चपला तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. पांढऱ्या चिप्पीच्या खोडापासून तपकिरी रंग (dye) मिळवता येतो.
     समुद्रकिनाऱ्यावरील माती धरून ठेवणारा हा वृक्ष, भरती-ओहोटीच्या क्षेत्रातील परिसंस्था निर्माण होण्यास व तेथील जैवविविधता टिकवून ठेवण्यास सहाय्य करतो. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणात ही खारफुटी वनस्पती सहजपणे टिकून राहिली आहे. दहा वर्षापूर्वी  इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत  या वनस्पतीचा समावेश केला. मात्र दर दोन वर्षांनी प्रकाशित होत असलेल्या वन सर्वेक्षण अहवालाच्या  महाराष्ट्रातील आकडेवारीचा विचार केल्यास खारफुटींचे क्षेत्र वाढल्याचेच दिसून येत आहे. असे असूनही जगभरातील किनारी भागातील मानवी हस्तक्षेपाचा वेग पाहता पुढील चित्र फारसे आशादायक वाटत नाही. अनेक नैसर्गिक संकटांमध्ये खारफुटींनी आपल्याला वाचवले आहे, आता आपणही त्यांना वाचवूया!

- तुषार म्हात्रे

Saturday, March 6, 2021

हार-कारा

       मुंबई व आसपासच्या भागांतील खाडीकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. इथे सापडणाऱ्या मत्स्यप्रजातींबरोबरच मासेमारीच्या पद्धतींमध्येदेखील खूप विविधता आहे. मासेमारीच्या विविध पद्धतींपैकी ‘हाताने चाचपून मासे पकडणे‘ ही पद्धत बऱ्याचदा उथळ पाण्यात  वापरली जाते. मात्र अशा तऱ्हेने मासे पकडताना या पाण्यात आक्रमक पंजे असलेल्या खेकडा प्रजातीतील जीव आढळला तर ही पद्धत काहीशी अवघड ठरते. अशा वेळेस नेहमीचा मासेमार याच पाण्यातील एका वनस्पतीकडे हात पसरतो. या जाळीदार वनस्पतीच्या  गुंडाळीने त्या आक्रमक सागरी जीवाला झाकून तो आपले लक्ष्य साध्य करतो."


मासेमारीमध्ये जीत मिळवण्यास सहाय्य करणारी ही जलीय वनस्पती ‘हार’ या वैशिष्ट्यपूर्ण नावाने ओळखली जाते. म्हणजे मासेमारांना एकप्रकारे “हार के बाद ही जीत” मिळते. यातील गंमतीचा भाग सोडला तरी आणखी काही मार्गांनी ही वनस्पती मच्छीमारांना उपयुक्त ठरते. हारांच्या आसपास थोडे मोठे मासे आढळण्याची शक्यता असते, यामुळेच बरेचसे मासेमार माशांच्या शोधात या वनस्पतीच्या जंजाळात आपले नशिब आजमावत असतात.

       एकमेकांत गुंफलेल्या हिरव्या रंगाच्या कित्येक नाजूक वेली पाण्यात एकत्र येऊन तिची सुंदर जाळीदार रचना तयार होते. बहुदा या रचनेमुळेच तिचे ‘हार’ असे नामकरण झाले असावे. पण नावात ‘हार’ असूनही तिला फुले येत नाहीत. यातल्या  बऱ्याचशा जाती गोड्या पाण्यात आढळत असल्या तरी, खाडीकिनारीलगतच्या मिश्र पाण्यात या वनस्पतीचा चांगलाच विस्तार आढळून येतो.  ही शैवालवर्गीय वनस्पती ‘कारा(Chara)’ कुळातील आहे. ती स्टोनवर्ट, सँडग्रास या इंग्रजी नावाने ओळखली जाते. हाराला एक वैशिष्ट्यपूर्ण उग्र गंध असतो. यामुळेच तीला मस्कग्रास (Muskgrass), स्कंकवीड (Skunk Weed) अशीही नावे आहेत. काही ठिकाणी तिला हारवळ असेही म्हणतात. हार हा शैवाल वर्गातील प्रगत प्रकार असला तरी रचना पाहून चुकून तिला सामान्य वनस्पती समजले जाते. ही शैवाल उत्क्रांतीच्या टप्प्यातील कित्येक खुणा आपल्या अंगावर बाळगून आहे. संशोधकांच्या मते जमिनीवरील वनस्पतींची पूर्वज म्हणता येईल इतपत लक्षणे कारामध्ये आढळतात. या दोन प्रकारांतील हरितद्रव्य आणि काही रंगद्रव्ये यांबाबतीतले साम्य सहज पडताळता येते.

     कारा ही वनस्पती मनुष्याच्या नेहमीच्या अन्नाचा भाग नाही. परंतु कारावर अवलंबून असणारे इतर अनेक जीव आहेत जे मनुष्यासाठी उपयुक्त ठरतात. पाणबदके, हंस यांसारखे जलसंचार करणारे काही पक्षी आ‘हार’ म्हणून हारच निवडतात. पाण्यातील अपृष्ठवंशीय जीव, किटक या वनस्पतीचा आधार घेतात.लहान तलावाच्या विश्वात इथल्या जलचरांसाठी ही वनस्पती ‘उत्पत्ती-स्थिती-लय’ या त्रिसूत्रीचा अविष्कार घडवू शकते. तिच्या आसपास वाढणाऱ्या किटक व लहान जीवांच्या रुपाने ती जिताडा, बोईट यांसारख्या माशांसाठी अन्न उपलब्ध करते.  लहान तलावांतील समुद्री जीव बऱ्याचदा उथळ पाण्यामुळे त्यांच्या शत्रूच्या सहज भक्षस्थानी पडू शकतात, अशा वेळेस पाण्यचा पृष्ठभाग झाकू शकणारी कारा त्यांना निवारा देते. माशांच्या लहान पिल्लांना या निवाऱ्यामुळे चांगलेच संरक्षण लाभते. पण ही वनस्पती अतीप्रमाणात वाढल्यास तलावांसारख्या स्थिर पाण्यातील ऑक्सिजन शोषला जाऊन माशांचा मृत्यूदेखिल होतो. हार पाणथळ जागेतील माती धरून ठेवण्यास सहाय्य करते. मानवासाठी लक्षणीय ठरणारी बाब म्हणजे ज्या पाण्यात ही वनस्पती असते तिथे मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासाच्या निर्मितीला अटकाव होतो. 

          जीवसृष्टीच्या विकासाचा इतिहास दाखवणाऱ्या या वनस्पतीचा मागोवा सध्याच्या उपलब्ध पुराव्यानुसार सुमारे चार ते पाच कोटी वर्षापर्यंत घेता येतेे. निसर्गचक्राच्या सातत्यपूर्ण बदलांची आव्हाने स्विकारून, प्रतिकूलतेच्या संकटांपुढे या वनस्पतीने ‘हार’ मानली नाही. आपण निसर्गाला अनुकूल वर्तन ठेवले या सभोवतालच्या जैवविविधतेेेला एक शाश्वत ब‘हार’ येईल.

- तुषार म्हात्रे 

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...