Search This Blog

Monday, July 29, 2019

मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते

मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते!
(कोकण मराठी साहीत्य परिषद आयोजित निबंध स्पर्धेत, शिक्षक गट प्रथम क्रमांक)
       जगभरात सुमारे सहा हजार भाषा बोलल्या जातात. यातील  कित्येक भाषा प्रतिवर्षी मरण पावतात. वाचायला थोडे चमत्कारिक वाटेल पण हे खरे आहे; भाषांचाही मृत्यू होतो. विशिष्ट भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण शून्यावर येणे, व्यवहारातून  वापर नाहीसा होणे म्हणजेच भाषेचे मरण. त्याचबरोबर कित्येक भाषांमध्ये लक्षणीय बदल घडत असतात. सर्वाधिक भाषिक लोकसंख्येच्या यादीत मराठी भाषेचा एकोणिसावा क्रमांक लागतो. जगभरातील अकरा कोटीहून अधिक लोक मराठी भाषेचा वापर करतात. ही भाषा बोलणारे लोक (जागतिक स्तरावर)  ७२ देशांमध्ये पसरलेले आहेत.भारतातल्या ३५ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत मराठी भाषिक लोक महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यामुळे ती केवळ एखाद्या प्रांताची भाषा न राहता, राष्ट्रीय भाषा ठरते. संविधानाने मान्य केलेल्या २२ राजभाषांपैकी मराठी ही एक राजभाषा आहे.

शिलाहार, यादव काळातील कित्येक शिलालेख, ताम्रपटांवर संस्कृतसह मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. शिवकाळात इंग्रज, मोगलांशी पत्रव्यवहारात फारशी भाषा वापरली जात असली तरी राजव्यवहार भाषा मराठीच होती. मराठी केवळ प्राचीन भाषाच नाही तर श्रेष्ठ दर्जाची साहीत्य परंपरा असणारी भाषा आहे हे म्हाईंभट, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास या संत कवींपासून ते अलिकडच्या कुसुमाग्रजांसारख्या लेखणीतून सिद्ध होत आले आहे.
इतकी समृद्ध भाषिक परंपरा आणि बहुसंख्य असणाऱ्या मराठीची सद्यस्थिती काय आहे?
महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरात अजूनही मराठी बोलली जाते. मातृभाषा मराठी असणारे लोक आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीलाच प्राधान्य देताना आढळतात. असे असूनही मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण कसे आहे? सध्याच्या उपलब्ध आकडेवारीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील जवळपास ७० टक्के विद्यार्थी अजूनही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या बाबतीत दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती (अजून तरी!) समाधानकारक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘ज्ञानभाषा’ म्हणून मराठीचे स्थान कसे आहे याचा विचार व्हायला हवा.
केवळ ‘ज्ञान मिळवणे’ हाच उद्देश असल्यास मातृभाषेतून शिक्षण घेणे हा शास्त्रीयदृष्ट्या योग्य पर्याय आहे. परंतु सध्याच्या शिक्षणाचा विचार केल्यास ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण हा मुद्दा कालबाह्य ठरत चाललाय. त्यामुळे या काळात शिक्षणाचा उद्देश हा आर्थिक बाबींशी संबंधित असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांमध्ये करिअरच्या दृष्टीने प्रसिद्ध असणाऱ्या विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य या ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण हे इंग्रजीतून उपलब्ध आहे. मराठीला ज्ञानभाषा बनायचे असेल तर सर्वप्रथम मराठी ही करिअरची भाषा व्हायला हवी.
या ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण मराठीतून सहज उपलब्ध झाल्यास आपोआपच मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढू शकेल.  इयत्ता ११ वी पासूनचे विज्ञान व वाणिज्य शाखेचे मराठी अभ्यासक्रम तयार करणे;  कृषी, विधी, सामाजिक विकास, ग्रंथालय शास्त्र, पत्रकारिता (वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या) या शाखा-विषयांचे पदविका, पदवी व पदव्यूत्तर शिक्षणाचे अभ्याक्रम निर्माण करणे असे उपाय केल्यास मराठी भाषेची वाटचाल सक्षम ज्ञानभाषेकडे करता येईल.  अभियांत्रिकी, वैद्यकीय, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याही शाखांचे पदवी-पदव्यूत्तर स्तरावरील अभ्यासक्रम तयार करणे; तसेच वरील सर्व शाखांची अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे, अशा उपाययोजना पूरक ठरतील. हे अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्याने लागू करण्यासाठीचा कार्यक्रमही राबवता येईल.
लेखात उल्लेखलेला 'विज्ञान,अभियांत्रिकी, वैद्यकीय या शाखांसाठी मराठी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके' या उपायांवर अल्पप्रमाणात कार्यवाही होत आहे.  अशाप्रकारे ११ वी, १२ वी ची विज्ञान शाखेतील काही विषयांची पाठ्यपुस्तके पुण्यातील ज्ञानभाषा प्रकाशनाने निर्माण केलेली आहेत. मराठीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या मुद्द्यांवर प्रत्यक्ष स्वरूपात कामही केले आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची पुस्तके तज्ञ प्राध्यापकांच्या सहकार्याने तयार झाली आहेत. त्यांचा वापरही शेकडो विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे. थोडक्यात काय तर उच्च शिक्षण मराठीतून शक्य झाल्यास मराठी ही खात्रीने ज्ञानभाषा होऊ शकते.
विज्ञान, तंत्रज्ञानाचे ‘मराठीतून उच्चशिक्षण’ हा मुद्दा मान्य केला तरी जागतिक स्तरावर हे व्यवहार्य आहे का? असे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठी भाषेच्या जागतिक स्तरावरील वापराच्या व्यवहार्यतेच्या बाबतीतही वस्तुस्थितीवर आधारित भाष्य करणे योग्य ठरेल. जागतिक स्तरावर सर्वाधिक भाषिक लोकसंख्या चिनी असूनही तिच्या खालोखाल असणाऱ्या स्पॅनिश आणि इंग्रजी या भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास सारख्या प्रमाणात भाषिक लोकसंख्या असूनही मराठी (१.१०%)  आणि फ्रेंच (१.१२%)  या दोन भाषांच्या सार्वत्रिक वापरात खूपच अंतर आहे. युरोपियन देशांमध्ये फ्रेंच भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भारतातही करिअरच्या दृष्टीने फ्रेंच भाषा शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. अशीच काहीशी स्थिती जर्मन (१.३९%) भाषेबाबतही आहे. इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन यांसारख्या भाषा शिकल्यानंतर मिळू शकणाऱ्या संभाव्य संधींमुळे त्यांचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे मराठी भाषेतून उच्चशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास या भाषेचा सार्वत्रिक वापर वाढण्याची शक्यता आहे. पर्यायाने मराठीची ज्ञानभाषेकडे वाटचाल सुलभ होऊ शकते.
मराठी तंत्रज्ञानाची भाषा होण्यासाठीचा आणखी एक सहजसोपा मार्ग म्हणजे भाषेतील उपलब्ध ज्ञानस्रोतांचे युनिकोडीकरण करणे. इंटरनेटच्या युगात अतिशय वेगाने माहीतीची देवाणघेवाण होत आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या संधीचा फायदा मराठी भाषा अभ्यासक आणि समर्थकांनी घ्यायला हवा. अधिकाधिक माहीती मराठीतून उपलब्ध होणे हे मराठी भाषेच्या ज्ञानभाषा होण्यावर शिक्कामोर्तब करणारे ठरेल यात शंकाच नाही. यासाठी जुन्या दर्जेदार  आणि उपयुक्त ग्रंथांना युनिकोड रुपात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करणे गरजेचे आहे. अशा स्वरूपाचे काम केल्यानंतर सहज उपलब्धता, सुधारणा, भाषेचा जास्तीत जास्त वापर असे फायदे होऊ शकतील.
     मराठी ही राजभाषा आणि महाराष्ट्रात अधिकृत व्यवहार भाषा असली तरीही सर्वच शासकीय यंत्रणांमध्ये या भाषेचा योग्य वापर होत नाही. विविध शासन निर्णयांवरील बोजड मराठी भाषा, इंग्रजीचा अधिक वापर याचेही दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे शासकीय पातळीवरील मराठीचा वापर या ज्ञानभाषेला बळ देऊ शकेल.

खरे तर मराठी ही ज्ञानाची भाषा आहेच. तिच्या वापरकर्त्यांच्या अज्ञानामुळे तिची वाढ खुंटली आहे. परंतु अलिकडच्या काळात ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, मराठी बोला चळवळ, मराठी साहित्य मंडळे यांसारख्या चळवळींमुळे मराठीच्या प्रसाराला खतपाणी मिळत आहे. या वरकरणी लहान वाटणाऱ्या उपक्रमांतून उद्याच्या पराक्रमाची पायाभरणी केली जाते हे निश्चित. या सर्वांना बळ मिळो आणि एक समर्थ ज्ञानभाषा म्हणून मराठीची घोडदौड जग पादाक्रांत करो ही सदिच्छा.

- श्री. तुषार चंद्रकांत म्हात्रे (माध्यमिक शिक्षक)
शाळा: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र, ता.वसई (पालघर)
फोन : 9820344394
इ-मेल : tusharmhatre1@gmail.com

Saturday, July 20, 2019

झिम्मा खेळणारा कोकणचा राजा

झिम्मा खेळणारा कोकणचा राजा

      आपला देश म्हणजे विविध रंगांच्या, विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांनी तयार झालेली एकप्रकारची गोधडीच. प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीचे व आचार, विचारांचे तुकडे यात सामावलेले आहेत. भैगोलिक विविधतेमुळे हे तुकडे स्वतंत्र वाटत असले, तरी संस्कृतीच्या समान धाग्याने ते एकत्र जोडलेले आहेत. या सांस्कृतिक जोडणीमुळे हा देश अधिकच रंगीबेरंगी, मायेची उब देणारा ठरला आहे. या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात समोर येत असतात. ‘लोकगीत’ नावाचा प्रकारही असाच, संस्कृतीचे दर्शन घडवणारा. या लोकगीतांतही  प्रदेशानुसार प्रकार दिसून येतात. लोकजीवनाशी जोडलेली संस्कारगीते, ऋतुगीते, श्रमगीते, नृत्यगीते तसेच विविध सण-उत्सवप्रसंगी गायिली जाणारी गाणी सर्वत्रच आढळतात. देशातील लोकगीतांची परंपरा  प्राचीन काळापासूनच आहे. ती परंपरा वैविध्यपूर्ण आहेच, पण त्याचबरोबर समृद्धही आहे.

       पूर्वी ‘कुलाबा’ असे नामकरण असलेला रायगड जिल्हा खरंतर कोकण प्रांताचाच एक भाग. वसई, ठाणे प्रांतापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते अगदी गोव्यापर्यंतच्या ‘अपरांत’ म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या या पट्टयातील  हा भाग. हा जिल्हा उत्तर कोकण म्हणूनही ओळखला जातो. अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या मधील चिंचोळ्या भागात वसलेल्या या संपूर्ण  प्रदेशात भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सारखेपणा आहे. हा सारखेपणा इथल्या कथांमध्ये, गीतांमध्येही दिसून येतो.
या परिसराचा इतिहास पाहता इथे मौर्य, कलचुरी, सातवाहन, त्रैकूटक, वाकाटक, चालुक्य, कदंब, शिलाहार, यादव, शिवाजीराजे भोसले, पोर्तुगीज, डच, पेशवे व शेवटी इंग्रज यांनी राज्य केले. त्यामुळे या राजवटींचा परिणाम लोकजीवनावर व पर्यायाने परिसरांतल्या लोकगीतांवर झाला आहे. कोकणचे वैशिष्ट्य सांगणारी कित्येक लोकगीते प्रसिद्ध आहेत. उत्तर कोकणच्या लोकसाहित्यातील अनेक संदर्भ फार वेगळ्या कथा आपल्यासमोर मांडतात. मात्र हे साहित्य अभ्यासून, त्यातून अचूक ऐतिहासिक निष्कर्ष काढणे कठीण असते. परंतु त्यातही संदर्भांचा आधार घेत सत्याच्या जवळपास नक्कीच जाता येते.
 या परिसरातल्या अनेक लोकगीतांपैकी “आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो” हे एक सुप्रसिद्ध गीत. अगदी बडबड गीतांसारखी रचना असणारे हे लोकगीत  मंगळागौरींसारख्या सणांमध्ये घातल्या जाणाऱ्या फुगड्यांमध्ये हमखास गायिले जाते. लहान मुलांसाठीच्या गीतांच्या यादीतही हे गीत असते. पण विशेष दखल घेण्याइतके या गीतामध्ये आहे तरी काय? 

   फळांचा राजा मानल्या कोकणातील सुप्रसिद्ध आंबा या फळासाठी हे गीत लिहिले असल्याचे वरकरणी वाटेल.

 पण अधिक काळजीपूर्वक पाहील्यास इथल्या स्थानिक बोलीपेक्षा थोड्या वेगळ्या स्वरूपाची भाषा यात वापरल्याचे लक्षात येईल. ‘कोकणच्या इतिहासाची पार्श्वभूमी’ या महत्त्वपूर्ण ग्रंथात लेखक ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर’ यांनी या गीतासंदर्भात एक वेगळे अनुमान मांडले आहे. त्यासाठी त्यांनी चतुर्भाणांचे संदर्भ दिले आहेत. ‘भाण’ हा खरंतर एक संस्कृत एकपात्री आणि एकअंकी नाट्यप्रकार आहे. यातील नायक हे  नाटकांत सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पात्रांप्रमाणे नसून खऱ्या जीवनातले स्त्री-पुरूष असायचे. या नायकांना ‘विट’ असे म्हटले जायचे.

हे नायक आकाशाकडे पाहून काल्पनिक पात्रांशी संवाद साधत. मुख्यत्वे ही नाटके हास्यरसप्रधान असायची, त्याखालोखाल करूणरस, शृंगाररस यांचाही समावेश होता. पद्मप्राभृतकम् , धूर्तविटसंवाद, उभयाभिसारिका आणि पादताडितकम् या चार नाट्यसंहिता चतुर्भाणी म्हणून प्रसिद्ध आहेत. शेजवलकरांच्या मते ‘कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ या लोकगीतातील कोकणचा राजा म्हणजे ‘चतुर्भाणांतील अपरान्ताधिपती इन्द्रवर्मा’ होय. हा राजा इन्द्रवर्मा, इन्द्रस्वामी, इन्द्रदत्त या नावांनीही ओळखला जातो. भाणांतील वर्णनावरून राजा इन्द्रदत्त हा काव्यगायन, नृत्य इत्यादी शास्त्रे जाणणारा असा होता. थोडक्यात हा राजा खरंच झिम्मा खेळायचा. सर्वगुणसंपन्न, सुंदर, प्रेमळ,हौशी आणि खास करून स्त्रियांबाबत जास्त प्रेमळ असे त्याचे वर्णन. तो विट लोकांत सुप्रसिद्ध होता. नाचणाऱ्या हत्तीवर बसून वारांगनांच्या अंगणात प्रवेश करणारा, असेही त्याचे उल्लेख आहेत. या वारांगना कलावती व सुसंस्कृत असत. अशा स्त्रीयांचे समाजातील स्थान बरेच वरचे असायचे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क असणे ही त्याकाळी फार निंद्य गोष्ट मानली जात नसावी. 
       तिसऱ्या ते पाचव्या शतकाच्या काळखंडात गाजलेल्या त्रैकूटक राजवटीतील हा राजा.  रायगड गॅझेटीअरमधील नोंदीनुसार त्रैकूटक राजवटीतील इंद्रदत्त, दऱ्हसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन आणि विक्रमसेन असे  पाच राजे ज्ञात आहेत.
या राजवटीतील काही लेख आणि नाणी उपलब्ध आहेत, त्याआधारे काही महत्त्वपूर्ण माहीती मिळते. या झिम्मा खेळणाऱ्या इंद्रदत्त राजाचा मुलगा दऱ्हसेन.  त्याचा एक ताम्रपट सुरतच्या दक्षिणेकडील पारडी या ठिकाणी सापडला. यात दऱ्हसेनाने अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. सध्या गुजरात राज्यात असणारा पारडी हा परिसर बहुधा त्याकाळी कोकणात समाविष्ट असावा. तसेच लाट देश  म्हणजेच गुजरातपर्यंत या कोकणच्या राजाचे राज्य पसरले असावे. म्हणजे इन्द्रदत्त राजा केवळ झिम्माच खेळत नव्हता तर रणांगणावरील शत्रूला युद्धात नाचवणाराही असावा असे वाटते. त्याअर्थी त्रैकूटक राजे ‘अपरान्ताधिपती’ म्हणजे सर्व पश्चिमेचे राजे होते असे सांगता येईल.
     असा हा ‘झिम्मा खेळणारा कोकणचा राजा’. सध्या रायगड जिल्हा ज्या अपरांताचा भाग होता, त्या परिसरावर राज्य करणारा. जो केवळ पराक्रमीच नव्हता, तर कलेला राजाश्रय देणारा होता. आपल्या अनोख्या लीलांमुळे त्याला लोकगीतात स्थान मिळाले. हजारो वर्षानंतरही तो लोकांच्या मुखी अमर झालाय- जाणतेपणी अथवा अजाणतेपणी!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Saturday, July 6, 2019

भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!

भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!

    भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात खरिपात म्हणजेच पावसाळी हंगामात प्रामुख्याने भातशेती होते. जिल्ह्यात लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होते, यंदाही होण्याची शक्यता आहे. या वर्षी जून महिन्याच्या पहील्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मध्यंतरी फोनच्या नेटवर्कप्रमाणे अचानक गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. या पावासामुळे लावणीच्या हंगामाला सुरूवात होईल; काही भागात भात लावणीला प्रारंभदेखील झाला आहे. योग्य वातावरणाचा फायदा घेत सर्वत्र भात लावणी होत असली, तरी काही गावांमध्ये मात्र लावणी सुरू होण्यासाठी विशिष्ट दिवसाची वाट पहावी लागते. संपूर्ण गावात ‘तो’ विशिष्ट दिवस आल्याशिवाय लावणी करायची नाही असे संकेत आहेत. आधुनिक काळात असे खरेच कुठे घडते का?

     मुंबई-गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील जिते नावाचे एक सर्वसामान्य गाव. या गावात जुलै महीन्याच्या पहील्या आठवड्यात एक जत्रा संपन्न झाली. महाराष्ट्रातील विविध जत्रांचा हंगाम कधीचाच संपून गेला असताना, भर पावसात ही कसली जत्रा भरते याचेच सर्वांना आश्चर्य वाटेल. यावर्षीच्या जत्रेत गावातील म्हात्रे कुटूंबियांनी एकत्र जमून जवळच्या म्हसोबाला बोकडाचा नैवेद्य दाखवला. सगळ्यांनी मिळून जेवण केले. चांगले पीक यावे म्हणून प्रार्थना केली. असे प्रत्येक वर्षी कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा देवाला बळी देऊन भात लावणीस सुरूवात होते. इथले स्थानिक लोक या जत्रेला पालं जत्रा किंवा पाले जत्रा म्हणतात. ही जत्रा होईपर्यंत गावातील शेतकरी भात लावणीस सुरूवात करत नाहीत. चुकून एखाद्याने जत्रेपूर्वीच लावणी केली तर त्याला ‘गावकी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या समांतर न्यायव्यवस्थेकडून दंडही आकारला जातो.

   पाल म्हणजे वसती. एकाअर्थी ही नव्या वसतीची जत्रा. तर ‘पाले’ या शब्दाचे उगमस्थानही शेतीशी संबंधित असल्याचे संदर्भ आहेत. नव्या वसतीसाठीच्या दैवतांमध्ये ‘केत्रपाले’ हा उल्लेख आढळतो. केत्रपाले म्हणजे ‘क्षेत्रपाल’. याचा अर्थ ‘शेतांचा संरक्षक’ असा होतो. हे विशेषण काही ठिकाणी शिवाला वापरले गेले आहे, परंतु जास्त वेळा शेषालाच क्षेत्रपाल संबोधले जाते. शेतात अधून मधून दिसणाऱ्या सापाला या कारणांमुळेच राखणदार मानले जात असावे. थोडक्यात ‘पाले जत्रा’ म्हणजेच शेताचा संरक्षक मानल्या जाणाऱ्या देवाची जत्रा.
    असाच काहीसा प्रकार उरण तालुक्यातील काही गावांमध्येही घडतो. इथे लावणीच्या आरंभाबरोबरच गावातील रोगराई, इडा-पीडा टाळण्यासाठी ग्रामदैवताला मान दिला जातो. गावावरील संभाव्य संकट टाळण्यासाठी एका परडीत खाण्याचे पदार्थ आणि इतर मानाच्या वस्तू ठेवून वेशीबाहेर सोडून दिल्या जातात. यानंतर ‘हम साथ साथ है’ म्हणत तिखटाचे म्हणजेच मांसाहारी जेवण केले जाते. त्यामुळेच की काय या कार्यक्रमाला ‘साथ’ असे म्हणतात.
या साथीचे ओली आणि सुकी असे दोन प्रकारही आहेत. मांसाहार अर्पण केला असेल तर ओली साथ आणि फक्त नारळ असेल तर सुकी साथ म्हटले जाते. उरणपूर्वेकडील टाकीगांव येथे यावर्षी केवळ नारळ अर्पण करून लावणीला सुरूवात झाली. रायगडच्या दक्षिणेकडील माणगांव, महाड परिसरातही अशाच प्रकारे लावणीपूर्वीची जत्रा असते. भरघोस पीक यावे म्हणून देवाला मान-पान दिले जात असल्याने या जत्रेला इथे ‘हिरवळीचं देणं’ म्हणतात. ज्या पीकांवर आपला उदरनिर्वाह चालतो, त्या अन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. थोड्या फार फरकाने राज्याच्या इतर भागातही ही पावसाळी जत्रा साकारत असते. कधी या साथीतल्या नैवेद्याचा मानकरी वेताळदेव असतो, तर कधी बहीरीदेव, बापदेव, वाघेश्वर, म्हसोबा किंवा वेशीवरचा कोणताही ग्रामदेव.महाराष्ट्रातील जुनी ‘गावसई’ची प्रथाही अशीच आहे. या अत्यंत जुन्या प्रथेत भगत ठरवेल त्या दिवशी सर्व स्थानिक देवता, भुतेखेते यांची शांती केली जाते. गावातील व्यक्तींना सात किंवा नऊ दिवस गावाच्या बाहेर रहावे लागे. या काळात शेतावर राहून आणि आवश्यक ती पूजाअर्चा, रक्तबळी झाल्यानंतर रहिवासी भरघोस पीक, कमी रोगराई आणि सर्वांची वाढती सुबत्ता येण्याच्या विश्वासाने परत येत. स्थळ, श्रद्धास्थाने बदलत राहतात पण भाबड्या भक्तांची श्रद्धा सर्वत्र तीच असते.

    या प्रथेचा उगम अगदी हजारो वर्षांपूर्वी असल्याचे संशोधकांचे म्हणने आहे.  ‘गावसई’च्या प्रथेतील परत येण्याचा समारंभ म्हणजे पुनश्च केलेली वसती मानली जात असावी. मानव समूह जेव्हा एका जागी स्थिर नव्हता. सतत भटकत असायचा तेव्हापासून या प्रथा निर्माण झाल्या असल्याची शक्यता आहे. कृषिपूर्व काळातील लोकांच्या नेहमीच्या रस्त्याला त्यांची देवस्थाने असत. याच चौरस्त्यांवर सुफलतेचे विधी एकत्रपणे साजरे होत.
सतत स्थलांतर होत असल्याने अलिकडच्या काळाप्रमाणे जमिनीवर मालकी असण्याचा प्रश्नच नव्हता.  त्यामुळे जमिनीची मालकी ही प्राचीन कल्पना नाही. रानावनांत राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने जमीन ही मालमत्ता नसून तो केवळ एक भूदेश असायचा. हा भूदेश नांगराने कसला जाईपर्यंत तिथल्या शेतीला फारसा अर्थ नव्हता. शेतीसाठी तत्कालीन मानवाला सुपिक जमिनीवरील जंगल साफ करणे भाग होते आणि आपल्या मोसमी पावसाच्या प्रदेशात ते लोखंडी अवजाराशिवाय शक्य होणार नव्हते. नव्याने वसती करताना लोखंडी अवजारांचा वापर होत गेला. जसजसे जंगल तुटू लागले, तसतशा वस्त्या स्थिर होत गेल्या. रायगड जिल्ह्यात स्थिर शेती करणारी गावे वसली तरी भ्रमंती काळातल्या जुन्या प्रथा अजूनही विस्मृतीत गेल्या नाहीत.
    रायगडच्या प्रत्येक वाडी-वस्तीत अशा कित्येक प्रथा आणि कथा दडलेल्या आहेत. या प्रथा चांगल्या की वाईट हा विषय तूर्तास बाजूला ठेवला आणि या प्रथांचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला तर इथल्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा नक्कीच सापडतील. चला शोधूया मग!

    - तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

विशेष आभार: संतोष म्हात्रे (भोम), प्रशांत परदेशी(टाकीगांव), प्रतिक्षा म्हात्रे (जिते), मानसी साळुंखे (अलिबाग)

Monday, July 1, 2019

रुचकर मिठाचा प्रवास

रुचकर मिठाचा प्रवास
(मुंबई सकाळ, रायगड टुडे 1 जुलै 2019)

    ‘जोहान अल्ब्रेट डी मन्डेलस्लो’ असे भले मोठे नाव असलेला एक जर्मन साहसी पर्यटक. सतराव्या शतकात तो भटकंतीच्या इराद्याने इराण, भारत या देशांत फिरला. आपल्या प्रवास वर्णनाच्या नोंदींमध्ये त्याने रायगडवासीयांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण नोंद केली.
भारतातील ‘ओरानु-बाम्मारा’ येथे मीठ तयार होत असल्याचे त्याने लिहिले. या परिसरात सोलर टेबल सॉल्टचे कारखाने असून मीठाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याचेही त्याने म्हटलेय. 1638 सालातली ही गोष्ट. मन्डेलस्लोच्या नोंदीतील ‘ओरानु-बाम्मारा’ म्हणजे खरंतर ‘उरण-मुंबई’. त्याने पाहीलेले सोलर टेबल सॉल्टचे कारखाने म्हणजे येथील मीठागरे. या नोंदींचा विचार केल्यास रायगडच्या किनारपट्टीवरील मीठव्यवसाय किमान चारशे वर्षांपासून असल्याचे म्हणता येईल. पण रायगडच्या मीठाची ही चविष्ट परंपरा केवळ इतकीच जुनी नाही, तर त्याच्या काहीशे वर्षे आधीचेही पुरावे आहेत. उरण तालुक्यातील सर्वात जुनी लिखित नोंद असलेल्या ‘पिरकोन-आवरे’ ताम्रपटातही मीठव्यवसायाचे उल्लेख आहेत. इसवी सन 1120 च्या शिलाहारांच्या एका दानपत्रात पिरकोन आणि आवरे या गावांचे उत्पन्न वेदअध्ययनार्थींना वाटून दिले होते, परंतु यातून दोन्ही गावांच्या हद्दीतील मिठागरातून मिळणारा कर वगळण्यात आला होता. यावरून सुमारे नऊशे वर्षे आधीपासूनही इथे मीठ तयार होत असल्याचे दिसते. इतकेच नव्हे तर त्यावरील कर आकारणीच्या संदर्भावरून अपरांतातील अलिबाग, पेण आणि उरणच्या खारेपाट विभागात एक व्यवसाय म्हणून मीठ उत्पादन होत असल्याचे स्पष्ट होते.

       अजूनही या परिसरात पारंपरिक पद्धतीने मीठाचे उत्पादन होत आहे. इतक्या वर्षांची परंपरा असलेले फारच थोडे व्यवसाय शिल्लक आहेत, मीठ उत्पादन हा त्यातलाच एक व्यवसाय. भलीमोठी किनारपट्टी लाभलेल्या मुंबई, रायगड, ठाणे परिसरात समुद्राच्या पाण्यापासून नैसर्गिक पद्धतीने मीठ तयार करतात.
यातल्या एका पद्धतीत कामगार मिठाचा अंश असलेले पाणी समुद्रातून गाळण्यांद्वारे प्रत्यक्ष उपसतात. ही सर्वात जुनी पद्धत आहे. पण यातून अगदीच कमी मीठ मिळते. शिवाय वेळही जास्त लागतो. दुसऱ्या आणि प्रचलित पद्धतीतून मीठ नावाचं पांढरं सोनं मिळवण्यासाठी इथल्या कामगारांना प्रचंड घाम गाळावा लागतो. या कामगारांना खारवे म्हणतात. या खारव्यांचे नेतृत्व  मुकादम म्हणजेच मीठागराचा खातेदार करतो.
पावसाळी दिवसांत बरेचसे खारवे इतर कामे करतात. अकुशल मानल्या  जाणाऱ्या या खारव्यांचे काम खरंतर अधिकच कौशल्यपूर्ण असते.

       मीठ बनविण्याच्या प्रक्रीयेची सुरूवात पावसाळ्याच्या समाप्तीनंतर येणाऱ्या मोठ्या उधाणापासून होते. भरतीचे पाणी ये-जा करण्यासाठी बनलेल्या अरूंद वाटांमधून समुद्राचे पाणी खारजमिनीवर येत असते. या पाण्याला अडवणारी एक ‘मोठी बंदी’ (मोठा बांध)  असते. तिचे दार या दिवसांत उघडतात. या उघड्या दारातून समुद्राचे पाणी आत येते.  ‘वळण’ नावाच्या मोठ्या मैदानासारख्या भागात हे पाणी साठवले जाते. या साठवलेल्या पाण्यापासून मीठ तयार होण्यापूर्वी त्या रत्नाकरालाही एक प्रकारची अग्नी परीक्षा द्यावी लागते. वळणांतले पाणी मीठागराला अगदी लागून असलेल्या लहान तलांवामध्ये घेतले जाते. पुढे हेच पाणी मीठ तयार करताना उपसले जाणार असल्याने, या तलावांना उपसणी म्हटले जाते. प्रत्यक्षात ज्या भागात मीठ तयार होते त्या लहान आणि नियोजनबद्ध आयताकृती तळ्यांना कोंडी म्हणतात. लहान लहान बांधांनी तयार झालेल्या कित्येक कोंड्यांनी मिळून मिठागर तयार होते. यातील एक एक कोंडी तयार करणे हे कौशल्याचे आणि मेहनतीचे काम असते. साधारणपणे खारजमिनीचा भाग दलदलयुक्त असतो.
परंतु कोंड्यांचा तळ मात्र लाकडी ठोकण्याद्वारे ठोकून मातीच्या अंगणासासारखा कठीण बनवला जातो. हा भाग जमिनीचा भाग इतका कठीण असतो की त्यात एखादी मोटारसायकल चालवली तरीही परिणाम होणार नाही. ही कोंडी आता मीठाचे उत्पादन घेण्यासाठी तयार झालेली असते. आता उपसणी नावाच्या तलावातील पाणी आणखी एका लहान तलावात आणले जाते. इथे त्या पाण्याचे जास्तीत जास्त बाष्पीभवन होऊ दिले जाते. परिणामी पाण्यातील मीठाचे प्रमाण वाढून, ते अधिक घन बनते. या पाण्याला तापवणीचे पाणी म्हणतात. अलिबाग, पेण आणि उरण तालुक्यांतील या मीठागरांमध्ये तापवणीच्या पाण्याची स्थिती तिथीप्रमाणे मोजतात.
तर ठाणे-पालघर परिसरात हे पाणी शास्त्रीय पद्धतीने तापमापीसारख्या दिसणाऱ्या  हायड्रोमीटर नावाच्या घनतामापक उपकरणाद्वारे मोजले जाते. मीठ तयार करण्यासाठी योग्य घनतेचे पाणी पाटांच्या सहाय्याने कोंड्यांपर्यंत पाठवले जाते. नैसर्गिक झडप (व्हॉल्व) तंत्राद्वारे हे काम चालते. कोंडीतल्या पाण्याच्या पातळीचे मापन अंगुली या एककाने करतात. यासाठी प्रत्यक्षात हाताच्या बोटांनी किंवा एका लाकडी अवजारानेही मापन करता येते.  विशिष्ट अंगुले पाणी जमा झाले की पुढील जबाबदारी सूर्यनारायणावर सोपवली जाते. बाष्पीभवनामुळे हळूहळू पाण्याचा अंश कमी होत जाऊन मीठाचे थर तयार होऊ लागतात. अखेर या प्रदीर्घ प्रक्रीयेतून पांढऱ्या शुभ्र रंगाचे खड्यासारखे मीठ जमा होते.
 निवळा नावाच्या लांब लाकडी फावड्याद्वारे ते बांधाकडे ओढले जाते कोंडीचा तळ कठीण असल्याने फावड्यासारखे ओढूनही या मीठामध्ये माती मिसळत नाही. मेहनतीतून तयार झालेले हे नैसर्गिक मीठ ‘नावडतीने’ वाढले तरीही ‘अळणी’ लागणार नाही इतके सुंदर आणि स्वच्छ असते मीठ तयार होऊनही इथले काम संपत नाही.
या मीठाची योग्य साठवणूक करणेही गरजेचे असते. उन्हाळ्याच्या दिवसांत उघड्यावर मीठाच्या राशी ठेवल्या जातात. गरजेनुसार हे मीठ वितरकांपर्यंत पोहोचवले जाते.
   पावसाळ्याच्या दिवसात मीठाचे उत्पादन थांबलेले असते. खारव्याचे काम करणाऱ्या बऱ्याचशा कामगारांना या वेळी सुट्टी असते. परंतु तयार झालेल्या मीठाचे काय करायचे? एकवेळ पावसापासून बचाव होईल, पण हवेतील आर्द्रतेचे काय?
या समस्येवरही मीठकामगारांकडे चांगलाच उपाय आहे. मीठाची रास जिथे रचायची असेल तो भाग मीठाचा भुसा टाकून चांगलाच चोपला जातो. भोवताली चिखलाचे बांध घातले जातात. रास उभी राहील्यानंतर खालच्या बाजूने कपडे चढवल्यासारखे पेंढ्याने शिवले जाते. हा पेंढादेखील खाऱ्या पाण्यात बुडवून, सुकवून ठेवलेला असतो. खालून वरच्या दिशेने या पेंढ्याचे आवरण चढवले जाते. शेंड्याकडील भागावर अतिरिक्त झाकण देऊन पुन्हा चिखलाने लिंपले जाते. सीमेंटने प्लास्टर केल्यासारखे या मीठाच्या राशींचे आवरण कठीण बनते. या सर्व उठाठेवीतून मीठ हवाबंद होते. पुढे जेव्हा गरज असेल तेव्हा हे आवरण काढता येते.

     अस्मानी कृपेवर अवलंबून असलेल्या या व्यवसायाचे भवितव्य मात्र सुलतानी धोरणांवर अवलंबून आहे. शतकानुशतकांची परंपरा असणाऱ्या मीठाचा व्यवसाय आता अळणी होत चाललाय. थोडा मदतीचा हात आणि थोडी नशिबाची साथ मिळाली तर हा व्यवसाय पुन्हा एकदा उजळून निघेल; शुभ्र मीठासारखाच!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

विशेष आभार: श्री.छगन गावंड, श्री.चंद्रकांत म्हात्रे (पिरकोन), श्री. अनंता म्हात्रे -खातेदार (जूचंद्र)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...