Search This Blog

Saturday, July 20, 2019

झिम्मा खेळणारा कोकणचा राजा

झिम्मा खेळणारा कोकणचा राजा

      आपला देश म्हणजे विविध रंगांच्या, विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांनी तयार झालेली एकप्रकारची गोधडीच. प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीचे व आचार, विचारांचे तुकडे यात सामावलेले आहेत. भैगोलिक विविधतेमुळे हे तुकडे स्वतंत्र वाटत असले, तरी संस्कृतीच्या समान धाग्याने ते एकत्र जोडलेले आहेत. या सांस्कृतिक जोडणीमुळे हा देश अधिकच रंगीबेरंगी, मायेची उब देणारा ठरला आहे. या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात समोर येत असतात. ‘लोकगीत’ नावाचा प्रकारही असाच, संस्कृतीचे दर्शन घडवणारा. या लोकगीतांतही  प्रदेशानुसार प्रकार दिसून येतात. लोकजीवनाशी जोडलेली संस्कारगीते, ऋतुगीते, श्रमगीते, नृत्यगीते तसेच विविध सण-उत्सवप्रसंगी गायिली जाणारी गाणी सर्वत्रच आढळतात. देशातील लोकगीतांची परंपरा  प्राचीन काळापासूनच आहे. ती परंपरा वैविध्यपूर्ण आहेच, पण त्याचबरोबर समृद्धही आहे.

       पूर्वी ‘कुलाबा’ असे नामकरण असलेला रायगड जिल्हा खरंतर कोकण प्रांताचाच एक भाग. वसई, ठाणे प्रांतापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते अगदी गोव्यापर्यंतच्या ‘अपरांत’ म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या या पट्टयातील  हा भाग. हा जिल्हा उत्तर कोकण म्हणूनही ओळखला जातो. अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या मधील चिंचोळ्या भागात वसलेल्या या संपूर्ण  प्रदेशात भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सारखेपणा आहे. हा सारखेपणा इथल्या कथांमध्ये, गीतांमध्येही दिसून येतो.
या परिसराचा इतिहास पाहता इथे मौर्य, कलचुरी, सातवाहन, त्रैकूटक, वाकाटक, चालुक्य, कदंब, शिलाहार, यादव, शिवाजीराजे भोसले, पोर्तुगीज, डच, पेशवे व शेवटी इंग्रज यांनी राज्य केले. त्यामुळे या राजवटींचा परिणाम लोकजीवनावर व पर्यायाने परिसरांतल्या लोकगीतांवर झाला आहे. कोकणचे वैशिष्ट्य सांगणारी कित्येक लोकगीते प्रसिद्ध आहेत. उत्तर कोकणच्या लोकसाहित्यातील अनेक संदर्भ फार वेगळ्या कथा आपल्यासमोर मांडतात. मात्र हे साहित्य अभ्यासून, त्यातून अचूक ऐतिहासिक निष्कर्ष काढणे कठीण असते. परंतु त्यातही संदर्भांचा आधार घेत सत्याच्या जवळपास नक्कीच जाता येते.
 या परिसरातल्या अनेक लोकगीतांपैकी “आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो” हे एक सुप्रसिद्ध गीत. अगदी बडबड गीतांसारखी रचना असणारे हे लोकगीत  मंगळागौरींसारख्या सणांमध्ये घातल्या जाणाऱ्या फुगड्यांमध्ये हमखास गायिले जाते. लहान मुलांसाठीच्या गीतांच्या यादीतही हे गीत असते. पण विशेष दखल घेण्याइतके या गीतामध्ये आहे तरी काय? 

   फळांचा राजा मानल्या कोकणातील सुप्रसिद्ध आंबा या फळासाठी हे गीत लिहिले असल्याचे वरकरणी वाटेल.

 पण अधिक काळजीपूर्वक पाहील्यास इथल्या स्थानिक बोलीपेक्षा थोड्या वेगळ्या स्वरूपाची भाषा यात वापरल्याचे लक्षात येईल. ‘कोकणच्या इतिहासाची पार्श्वभूमी’ या महत्त्वपूर्ण ग्रंथात लेखक ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर’ यांनी या गीतासंदर्भात एक वेगळे अनुमान मांडले आहे. त्यासाठी त्यांनी चतुर्भाणांचे संदर्भ दिले आहेत. ‘भाण’ हा खरंतर एक संस्कृत एकपात्री आणि एकअंकी नाट्यप्रकार आहे. यातील नायक हे  नाटकांत सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पात्रांप्रमाणे नसून खऱ्या जीवनातले स्त्री-पुरूष असायचे. या नायकांना ‘विट’ असे म्हटले जायचे.

हे नायक आकाशाकडे पाहून काल्पनिक पात्रांशी संवाद साधत. मुख्यत्वे ही नाटके हास्यरसप्रधान असायची, त्याखालोखाल करूणरस, शृंगाररस यांचाही समावेश होता. पद्मप्राभृतकम् , धूर्तविटसंवाद, उभयाभिसारिका आणि पादताडितकम् या चार नाट्यसंहिता चतुर्भाणी म्हणून प्रसिद्ध आहेत. शेजवलकरांच्या मते ‘कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ या लोकगीतातील कोकणचा राजा म्हणजे ‘चतुर्भाणांतील अपरान्ताधिपती इन्द्रवर्मा’ होय. हा राजा इन्द्रवर्मा, इन्द्रस्वामी, इन्द्रदत्त या नावांनीही ओळखला जातो. भाणांतील वर्णनावरून राजा इन्द्रदत्त हा काव्यगायन, नृत्य इत्यादी शास्त्रे जाणणारा असा होता. थोडक्यात हा राजा खरंच झिम्मा खेळायचा. सर्वगुणसंपन्न, सुंदर, प्रेमळ,हौशी आणि खास करून स्त्रियांबाबत जास्त प्रेमळ असे त्याचे वर्णन. तो विट लोकांत सुप्रसिद्ध होता. नाचणाऱ्या हत्तीवर बसून वारांगनांच्या अंगणात प्रवेश करणारा, असेही त्याचे उल्लेख आहेत. या वारांगना कलावती व सुसंस्कृत असत. अशा स्त्रीयांचे समाजातील स्थान बरेच वरचे असायचे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क असणे ही त्याकाळी फार निंद्य गोष्ट मानली जात नसावी. 
       तिसऱ्या ते पाचव्या शतकाच्या काळखंडात गाजलेल्या त्रैकूटक राजवटीतील हा राजा.  रायगड गॅझेटीअरमधील नोंदीनुसार त्रैकूटक राजवटीतील इंद्रदत्त, दऱ्हसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन आणि विक्रमसेन असे  पाच राजे ज्ञात आहेत.
या राजवटीतील काही लेख आणि नाणी उपलब्ध आहेत, त्याआधारे काही महत्त्वपूर्ण माहीती मिळते. या झिम्मा खेळणाऱ्या इंद्रदत्त राजाचा मुलगा दऱ्हसेन.  त्याचा एक ताम्रपट सुरतच्या दक्षिणेकडील पारडी या ठिकाणी सापडला. यात दऱ्हसेनाने अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. सध्या गुजरात राज्यात असणारा पारडी हा परिसर बहुधा त्याकाळी कोकणात समाविष्ट असावा. तसेच लाट देश  म्हणजेच गुजरातपर्यंत या कोकणच्या राजाचे राज्य पसरले असावे. म्हणजे इन्द्रदत्त राजा केवळ झिम्माच खेळत नव्हता तर रणांगणावरील शत्रूला युद्धात नाचवणाराही असावा असे वाटते. त्याअर्थी त्रैकूटक राजे ‘अपरान्ताधिपती’ म्हणजे सर्व पश्चिमेचे राजे होते असे सांगता येईल.
     असा हा ‘झिम्मा खेळणारा कोकणचा राजा’. सध्या रायगड जिल्हा ज्या अपरांताचा भाग होता, त्या परिसरावर राज्य करणारा. जो केवळ पराक्रमीच नव्हता, तर कलेला राजाश्रय देणारा होता. आपल्या अनोख्या लीलांमुळे त्याला लोकगीतात स्थान मिळाले. हजारो वर्षानंतरही तो लोकांच्या मुखी अमर झालाय- जाणतेपणी अथवा अजाणतेपणी!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...