Search This Blog

Monday, May 21, 2018

चिरनेर : झाकलेला आणि राखलेला इतिहास


चिरनेर : झाकलेला आणि राखलेला इतिहास

       गाभाऱ्याच्या पायऱ्यांचा थंडगार स्पर्श, दगडी दिव्याचा मंद प्रकाश आणि वर्तुळाकार घुमटाखाली पितळी सापाने वेढलेले कोरीव शिवलींग. गळ्यात नक्षीदार पट्टे असलेल्या कलात्मक नंदीला नमस्कार करून गेल्यावर दिसणारे हे दृश्य. हे दृश्य आहे ‘महागणपती’ तिर्थक्षेत्र म्हणून नावारुपाला येत असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील शीव मंदिराचे.


मंदिराच्या शेजारील तलाव
   सुंदर अशा तलावाशेजारील या परिसरात पेशवेकालीन महागणपती मंदिर, मारूती मंदिर, पुरातन शीव मंदिर, भैरवनाथाचे मंदिर आणि जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे स्मारक असे बरेच काही आहे. त्याचबरोबर गावाबाहेरच्या डोंगरावरील अलिकडच्या काळात निर्माण झालेले ‘इंद्रायणी’ देवस्थानही प्रसिद्ध आहे. संकष्ट चतुर्थी आणि सुट्टयांच्या दिवशी या गावाचे रुपांतर पर्यटनस्थळात  होते.

चिरनेर म्हणजे महागणपती...
चिरनेर म्हणजे जंगल सत्याग्रह...
चिरनेर म्हणजे इंद्रायणी देवस्थान...

     पण चिरनेर म्हणजे केवळ इतकेच नाही, आणखी काहीतरी या परिसरात आहे, जे या परिसराच्या इतिहासाला शेकडो वर्षे मागे नेऊ शकते.
अशी आणखी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे चिरनेरची नोंद इतिहासात नव्याने घेतली जावी?
पुरातन शीव मंदिर
      ज्या शीव मंदिराचा आपण सुरूवातीला उल्लेख केलाय, त्यापासूनच सुरूवात करू. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना प्राचिन दगडी भिंतींना बाहेरून आधुनिक टाईल्स बसवल्या गेल्या.
मंदिराचा समोरील भाग
(आपल्याकडे पुरातन वास्तूंचा जीर्णोद्धार करताना बऱ्याचवेळेस मूळ वास्तूच्या सौंदर्याचा फारसा विचार होत नाही)  एक सभामंडपही बांधला गेला.दगडी मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली. सुदैवाने मंदिराचा आतील भाग जुन्या काळातील कला-कौशल्य मिरवत उभा आहे. काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास या मंदिराचे वेगळेपण लक्षात येते. मंदिरात आकर्षक शीवलिंगासह एक चतुर्भूज सहमूर्ती आहे(बहुधा विष्णू लक्ष्मी). 
चतुर्भूज मूर्ती
   तसेच बाहेरच्या भागातही दोन कोरीव शिवलिंग आहेत. मजबूत दगडी बांधकाम असलेले हे मूळ मंदिर कमीत कमी आठशे वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज आहे. या मंदिराबाहेरही एक झीज झालेला नंदी अर्धा जमिनीत गाडला गेलेला आहे.
गाडला गेलेला नंदी
तळ्याच्या पूर्वेला एका झाडाखाली एक वीरगळ स्तंभ देखिल आहे.
विरगळ स्तंभ

    पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिराच्या तळ्याकडील दिशेला एक आणि भैरवनाथाच्या(बहिरीदेवाच्या) मंदिरात एक पूर्ण आणि एक भग्न अशा एकूण तीन शिळा आहेत. इष्टिकाचिती आकाराच्या या शिळांच्या एकाच बाजूने कोरीव काम केले आहे. वरील बाजूस चंद्र-सूर्य, मधल्या भागात लेखन आणि तळाच्या बाजूला ‘गाढव आणि स्त्रीचा संकर’(!) अशी रचना आहे. सुमारे आठशे वर्षांपासून या शिळा येथे उभ्या आहेत.

गद्धेगाळ-शिलालेख

 अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या शिळा आहेत तरी काय?

   या वरकरणी असभ्य वाटणाऱ्या शिळांचे प्रयोजन काय?

चिरनेरच्या इतिहासात मोलाची भर घालू शकणाऱ्या या शिळा आहेत  ‘गद्धेगाळ’ किंवा ‘गधेगाळ’.
मंदिरातील गद्धेगाळ
    आता थोडंसं गद्धेगाळ संकल्पनेबद्दल जाणून घेऊया.
अपरान्त म्हणजेच उत्तर कोकणात राज्य करणाऱ्या शिलाहार राजांच्या काळात गद्धेगाळ कोरायला सुरुवात झाली असे मानले जाते. पुढे त्यांचे राज्य संपुष्टात आणणाऱ्या यादवकाळात सुध्दा ही पद्धत अस्तित्वात होती. रायगड जिल्ह्यातील अक्षी(अलिबाग) येथे सापडलेला गद्धेगाळ-शिलालेख, चाणजे-रानवड(उरण) येथील तीन गद्धेगाळ-शिलालेख शिलाहारकालीनच आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला गद्धेगाळींना शिलाहारकालीनच समजले जाते. परंतु जोपर्यंत त्याच्यावर असलेल्या शिलालेखाचे वाचन होत नाही, तोपर्यंत आपण त्यांचा काळ नेमकेपणाने ठरवू शकत नाही.
   गद्धेगाळींची रचना पाहिल्यास त्यांच्या वरच्या भागात चंद्र व सूर्य कोरलेले असतात.(हाच प्रकार वीरगळींच्या बाबतीतही आढळतो.) ‘आचंद्रदिवाकरौ’ म्हणजेच ‘जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत’ हे दान अबाधित राहील असा चंद्रसूर्य कोरण्यामागे हेतू असतो. चंद्रसूर्य यांच्यामध्ये मांगल्याचे प्रतिक म्हणून कलश कोरलेला असतो. मधल्या भागात शिलालेख आणि सर्वात खालच्या भागात गाढव व स्त्री यांचे संकर शिल्प अशी गद्धेगाळींची सर्वसाधारणपणे रचना असते. गाढव व स्त्री यांचे संकर शिल्प ही गद्धेगाळ ओळखायची खूण. कधी-कधी हत्ती आणि स्त्रीचा संकरही दाखवला जातो, अशा शिळांना हत्तीगाळ म्हणतात. सामान्यत: गद्धेगाळींवर असलेल्या लेखाच्या सुरुवातीला सन (शक), नंतर कोणत्या राजाने दान दिले त्याचे नाव, त्याच्या बिरुदावली व त्याची वंशावळ, दरबारातील अधिकारी, कोणाला काय दान दिले आणि सर्वात शेवटी शापवाणी अशी गद्धेगाळ असलेल्या मांडणी असते.गद्धेगाळी ह्या एकप्रकारे दानपत्रच असतात, फक्त हे दानपत्र दगडावर कोरलेले असते आणि त्याच्यावर शापवाणी असते. ही शापवाणी दिलेले दान हस्ते परहस्ते किंवा जबरदस्तीने घेऊ नये म्हणून कोरलेली असते.
      चिरनेर येथील गद्धेगाळसुद्धा शिलाहारकालीन असण्याची शक्यता आहे.(अजूनतरी शक्यताच!)  उरण तालुक्यातील चाणजे आणि रानवड परिसरात सापडलेले तीन शिलालेख सुद्धा गद्धेगाळच होते. संस्कृत-मराठी अशा मिश्र भाषांतील हे गद्धेगाळ शिलाहारकालीन आहेत. सध्या ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात असून त्यांचे वाचन झाले आहे. उरणच्या या शिलालेखांची नोंद कुलाबा गॅझेटिअर मध्ये आहे, परंतु चिरनेरच्या शिलालेखांची नोंद करण्याचा प्रयत्न मात्र झालेला नाही.
अस्पष्ट शिलालेख (दानपत्र)
 शीव मंदिराच्या बाहेर असलेल्या गद्धेगाळीवर शिलालेख असल्याचे दिसून येते परंतु ही शिळा शेंदूर विलेपित असल्याने तसेच दगडाची झीज झाल्याने त्याचे वाचन करणे कठीण आहे.
भग्न गद्धेगाळ
भैरवनाथ मंदिरामधील एका गद्धेगाळीचा केवळ तळाचा भाग शिल्लक आहे, त्यामुळे त्याचा संदर्भ मिळणे जवळपास अशक्य आहे. तर दुसऱ्या गद्धेगाळीवरील शिलालेखही दिसून येत नाही. शेंदूर विलेपनामुळे हे शिलालेख वाचता येत नसले तरी या शेंदूरामुळेच आज या शिळा व्यवस्थितपणे उभ्या आहेत. अन्यथा काही ठिकाणी या दानपत्रांची नासधूसही केली गेल्याची उदाहरणे आहेत. अक्षी-अलिबाग येथील शिलालेख तर गटारातून बाहेर काढला गेलाय. कर्नाटकातील गद्धेगाळ जमिनीत पुरले गेले, नष्ट केले. या दैवतीकरणामुळे गद्धेगाळींचा इतिहास झाकला गेला असला तरी त्या सुरक्षित राहून त्यांचा इतिहास काही प्रमाणात राखण्यासही मदत झाली आहे. चिरनेरच्या शिलालेखांचे वाचन झाल्यास काही ऐतिहासिक माहिती नव्याने समोर येण्याची शक्यता आहे. बंदी, प्रतिबंध आणि शुल्क या चक्रात अडकलेल्या पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक ठेव्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिक वर्तमानपत्रे आणि त्यांच्या पत्रकारांनीही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून या शिलालेखांना प्रकाशात आणण्याचे काम केले तर एक महत्त्वपूर्ण ठेवा जगासमोर आणण्यास मदत होईल. त्याचबरोबर आमच्यासारख्या सामान्यांनीसुद्धा अशा बाबींकडे डोळसपणे पहायला हरकत नसावी.
तूर्तास थांबतो...
    या गावातील नागरिक इतिहासाचे जतन करण्यात अग्रेसर आहेत. विविध सण, उत्सवांच्या माध्यमांतून ते आपली सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत. त्यामुळे समोर येत असलेल्या नविन ठेव्याचेही योग्य प्रकारे जतन करतील यात शंकाच नाही.
लवकरात लवकर या शिलालेखांचे वाचन होवो ही बुद्धीदेवता गणपती चरणी प्रार्थना!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: रायगड गॅझेटिअर (updated), शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख- वा.वि.मिराशी, महाराष्ट्रातील विरगळ- सदाशिव टेटविलकर, ब्लॉग-महाराष्ट्र देशा- पंकज समेळ

#चिरनेर #गद्धेगाळ #तुषारकी #chirner #gaddhegal #tusharki

Saturday, May 19, 2018

आमचे जीवाची माती







🍁🍃 आमचे जीवाची माती 🍂🍁

उधानाचा पानी🌊 घरादारान घुसला
नं धरनांचा पानी तोंड फिरवून रूसला😒

हिव खालीव दमभं आथा निंभाराचा चटका
नं तखरं देशावरती बोलतं गारांचा फटका

वारा 🌪सुटतंय तरी पुन घामाच्या धारा,😰
चइन नाय जीवाला सकाल-सांचे 🌄पारा

दर्यान नाय गवं पयलेसारकी मासली,🐠
आगरी-कोल्यांची तं साली जिंदगानीच भासली.😔

रानान 🌳आथा ऱ्हाला नाय जीव नं जान,🍂
डोंगराची🗻 माती जेली ऱ्हाली नाय शान

या असां कसां सगला उलटफेर झाला?🤔
पयलेसारका पुना मातोसरीचा फेरा आला!👹

डोंगर इकलंव त्याचा पैसा 💰आज मोप हाय,
मातोसरीचा नाय यो माती सरलंचा🌋 कोप हाय.

🌾मालान नाय ठेवलीव यक गवताची पाती,🌱
तुमचा निसता भराव नं आमचे जीवाची माती.

-तुषार म्हात्रे, पिरकोन(उरण)

Thursday, May 10, 2018

विमला कोण होती?



विमला कोण होती?
(What’s in the name - नावात काय आहे?)
      
       करकचून उन लागत होतं. अशा कडक उन्हातच उरणला एका लग्नसमारंभात हजेरी लावून घरी येण्यासाठी निघालो. शहरातल्या अंतर्गत रस्त्यांची कामे चालू असल्याने ‘ट्राफिक जाम’ मध्ये फसलो.  गुप्तधनाचा शोध चालल्यासारखे रस्ते खोदलेले, म्हणून नेहमीच्या मार्गाने जाण्याऐवजी उरणमधील विमला तलावाच्या बाजूने बाईक काढली. तळ्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ‘गोळा-सरबत’च्या गाडीने लक्ष वेधले. थंडगार लिंबू सरबत घेतली. चव नेेहमीपेक्षा वेगळी होती; बहुधा नजरचुकीने आज ग्लास धुतले गेले असतील! एकेक घोट घेत (सरबताचा) समोर तलावाकडे नजर टाकली. थंडगार पाण्यात पाणपक्षी डुबक्या मारत होते. मलाही तीच इच्छा झाली. सध्या डुंबण्यालायक वाटणारा हा तलाव कधीकाळी पिण्यालायक होता. या शहराला पिण्याच्या पाण्याचे तीन महत्त्वपूर्ण तलाव होते. त्यापैकी एक उरण-मोरा(मौर्य?) रस्त्यावर, दुसरा उरण-करंजा रस्त्यावर आणि हा तिसरा शहराच्या मध्यवर्ती - ‘विमला तलाव’. सभोवतालच्या राखलेल्या हिरवाईने नटलेला, शांत परिसरातील हा जलाशय. आबालावृद्ध, युगुलांचे आवडीचे फिरण्याचे ठिकाण म्हणजे विमला तलाव.
या तलावाचे नाव ‘विमला’ का बरे ठेवले असेल?

या नावात काय आहे?

ही ‘विमला’ कोण होती?

   या अशा वास्तूंच्या नावांचा शोध घेणे म्हणजे खोल पाण्याचा तळ गाठणे. सरबत संपवण्याचा प्रयत्न करत मी विमलाच्या शोधात निघालो.
आपण सध्या जो तलाव पाहतो याचा जीर्णोद्धार इ.स. १८६० मध्ये उरणच्या मामलेदाराने केला. जीर्णोद्धार करताना तळ्याच्या बांधकामात उरणच्या पोर्तुगीज भुईकोट किल्ल्याचे दगड वापरले गेले.(या किल्ल्याचे प्रवेशद्वार काळधोंडा-कोटनाका येथे होते.) मामलेदाराने जीर्णोद्धार केला, म्हणजे हा तलाव आणखी जुन्या काळातला आहे हे नक्की. कधीही न आटणाऱ्या या तलावाचे खरे नाव आहे ‘भिमाळे’ तलाव. पोर्तुगीजांनी या तलावाचा उल्लेख ‘बेमला’ आणि ‘बिमला’ केला. पुढे त्यात नावासह लिंगबदल होऊन ‘भिमाळे’ ची ‘विमला’ झाली. अर्थात ‘उरण-मुंबई’ची नोंद ‘ओरानु-बम्मारा’ करणाऱ्यांकडून फारशी अपेक्षा नाहीच.(आपण सुद्धा त्यांच्या ‘सँडहर्स्ट’ रोडला नेहमी ‘संडास’च करतो की!). हे तळं खोदताना ‘भीम राजाचा’ असे लिहलेला दगड सापडला होता. त्यामुळे तलावाचे नामकरण ‘भिमाळे’ करण्यात आले. जुन्या सर्व कागदपत्रांयमध्ये हा तलाव ‘भिमाळे’ नावानेच उल्लेखलेला आहे.
सरबत संपलं! ग्लासाच्या तळाला न विरघळलेले मीठ शील्लक होते. उरणचा इतिहासाही असाच आहे, या न विरघळलेल्या मीठासारखाच. चिमूटभरच दिसतो, पण काळाच्या
ओघात किती विरघळलाय देव जाणो.
   मी ‘विमलाच्या’ शोधात निघालो आणि हाती दगड लागला, तोही भीम राजाचा. आता हा ‘भीम राजा’ कोण? आणि उरणला त्याचा दगड कसा हे आणखी काही प्रश्न!
  भारताच्या ज्ञात इतिहासात सुप्रसिद्ध असे तीन ‘भीम’ राजे होऊन गेले. त्यापैकी गुजरात परिसरातील चालुक्य वंशात म्हणजेच ‘सोलंकी’ वंशात प्रथम भीमदेव आणि द्वितीय भीमदेव असे दोन राज्यकर्ते होऊन गेले. पहील्या भीम राजाचा काळ इ.स.१०२२ ते १०६३ असा होता. मोढेरा-अहमदाबाद येथील सुर्यमंदिर याच राजाने बांधले. गझनीच्या महमूदसोबत संघर्ष झालेला हा राजा. दुसऱ्या भीमदेवाचा काळ इ.स ११७८ ते १२४० होता. या दोन्ही राजांचे प्रभावक्षेत्र गुजरात आणि सभोवतालच्या परिसरात होते.
        तिसरा प्रसिद्ध ‘भीमराजा’ यादव कुळातला. याचा उल्लेख ‘बिंब राजा’ असाही केला जातो.
देवगिरीचा किल्ला
तेराव्या शतकाच्या प्रारंभी महादेव यादवाने शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वराचा पराभव केला आणि उत्तर कोकणचा ताबा मिळवला. पुढे या यादवांच्या साम्राज्यालाही यावनी आक्रमणामुळे जोरदार धक्के बसू लागले. देवगिरीचा पाडाव झाला. तरीही ठाणे आणि पैठण यादवांच्या अधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा भीमदेव (बिंबराज) यादव कोकण आणि पैठण परिसरात राहीला. तेव्हा अपरान्तातील अलिबाग परिसरात तीन लहान राज्ये होती. एक चौल येथे, दुसरें आवास- सासवणे येथे व तिसरे सागरगड येथे. चौल व आवास येथे हिंदू राज्ये होती. तर सागरगडावर दिल्लीच्या बादशहाच्या वतीने मुसलमान सरदार राज्य करत होता.
सागरगड
तो शेजारील राज्यांजवळून कर वसूल करून तो दिल्लीस पाठवी. (
सध्याची आपली राज्यव्यवस्था पण अशीच आहे का?) पुढे हा  सरदार बलाढ्य होऊन दिल्लीस कर पाठवीनासा झाला. बादशहाचे हुकूम अमान्य करू लागला. म्हणून दिल्लीच्या बादशहाने एक सरदार त्याच्या पारिपत्याकरितां पाठविला; परंतु त्यास यश न येतां तो दिल्लीस परत गेला. नंतर बादशहाने दुसरा सरदार पाठविण्याचे ठरवून मुंगीपैठणाचा राजा भीमदेव (बिंबराजा) यास पत्र पाठवून दिल्लीहून येणाऱ्या सरदारास मदत करण्याविषयीं विनंती केली. राजाने ती विनंती मान्य करून आपलें सर्व सैन्य घेऊन ठरल्याप्रमाणें दिल्लीहून येणार्‍या मुसलमान सरदारास ठाण्याजवळ येऊन मिळाला. राजा भीमाने आपल्या सर्व लोकांसह गड चढून छापा घातला; गडावरील सरदारांचा बिमोड केला व स्वत: गडावर राहून राज्यकारभार पाहू्ं लागला. काही दिवसांनी त्याने चौल व आवास- सासवणें येथील राज्ये जिंकली. आसपास कोणी शत्रू नसल्यामुळें राजाने परत जाण्याचा बेत रद्द करून तेथेच कायमचे राज्य स्थापण्याचें ठरविले. शांततेच्या वेळीं इतक्या मोठ्या सैन्याची जरूर नसल्यामुळें राजाने पुरेसे लोक पदरीं ठेवून बाकींच्यांनां गांवठाणे बसवून तेथें वसाहत करण्यास सांगितलें. मिठागराचे उत्पन्न चांगलें व किफायतशीर असल्यामुळें मुंगीपैठणास जाण्यापेक्षा येथेच राहणे या लोकांस अधिक आवडले. राजा भीमानंतरही त्याचे वंशज हे राज्य पुष्कळ वर्षे सुरळीतपणें चालवीत होते.
    म्हणजे मी ज्या भीम राजाचा शोध घेत होतो, तो हाच आहे हे नक्की.
      पुढें हळूहळू वसाहती वाढत जाऊन भीमदेवा सोबत आलेल्या कुळांच्या वस्ती रायगड (कुलाबा) जिल्ह्यांतील अलिबाग, पेण, पनवेल,उरण, कर्जत, रोहा व माणगांव तालुक्याचा थोडा भाग येथे व ठाणें जिल्ह्याचा बराचशा भागात पसरत गेल्या. 
मीठागर
जिथे खारटपणाचा भाग आहे तिथे व त्याच्या लगतच्या प्रदेशांतच अशी वस्ती पसरलेली आहे. भीमदेवाबरोबर जी कुळे आली ती इथेच स्थायिक झाली. ह्या सगळ्यांची नोंद ‘महिकावतीच्या बखरीत’ आहे. या बखरीत उल्लेखलेली चौधरी, म्हात्रे, पुरो, चुरी, सावे, ठाकूर, राऊत, पाटेल, चोघले ही कुळे येथे अजून राहतात.
   असा हा मुंबईला श्रमिकांची नगरी बनवणारा राजा भीम. या परिसरातील आगरी, कोळी, भंडारी, पाचकळशी, गवळी, कुणबी या समाजाला आश्रय देणारा. श्रमाचे महत्त्व जाणणारा . या भीमपराक्रमी राजाला सलाम.
शेक्सपिअर म्हणतो,नावात काय आहे? मला वाटतं नावात इतिहास आहे. तो लपलेला इतिहास शोधला, तर कळेल की नावातंच सर्व काही आहे.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: रायगड गॅझेटिअर(प्रकरण १२, पान क्र.६७८), महिकावतीची बखर (प्रस्तावना-वि.का.राजवाडे) https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%87
#उरण #विमलातलाव # भिमाळेतलाव #मुंबई #भीमदेव #बिंबदेव #तुषारकी #Uran #Vimalatalav #Bhimaletalav #Mumbai #Bhimdeo #Bimbdeo #Tusharki

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...