Search This Blog

Thursday, October 26, 2023

प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव

प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव!

      पोलादपूर! रायगडचे दक्षिण टोक. राजधानी रायगड, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा प्रतापगड आणि इतर लहानमोठ्या गडकोटांनी वेढलेला हा परिसर. इतर सर्वसामान्य गावांप्रमाणे इथल्या गावांनाही नवरात्रोत्सवाचे आकर्षण आहे. इथेही आश्विन महीन्याच्या प्रारंभी घराघरात घटस्थापना होते, गावोगावच्या मातेच्या मंदिरांमध्ये उत्साह, नवचैतन्य निर्माण होतो. ‘गरबा-रास-दांडीया’च्या आकर्षक चक्रात पोलादपूरही फेर घेतो. पण त्याचबरोबर या उत्सवादरम्यान ही फेर धरणारी पाऊले मोठ्या संख्येने महाबळेश्वर घाटाच्या दिशेने वळतात. या मार्गातील प्रतापगडावरील नवरात्रौत्सवासाठी महाड व पोलादपूर येथील भाविक वर्षानुवर्षे येत असतात. एकाअर्थी सातारा आणि रायगड जिल्ह्यांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा हा उत्सव.
  ज्या भवानी मातेच्या नावाने गडावर नवरात्रौत्सव साजरा होतो, त्या देवीच्या स्थापनेमागचा इतिहासही रंजक आहे. तुळजापूरची भवानी माता ही शिवाजी महाराजांची म्हणजेच भोसले घराण्याची कुलदेवता. त्याकाळी तुळजाभवानी मंदिर परिसरावर आदिलशाही सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ साली जावळीच्या प्रदेशावर आक्रमण करून चंद्रराव मोरेंचा पूर्ण पाडाव केला व जावळी काबीज केली. घाटावर व खाली रायगड प्रांतात देखरेख करता यावी, यासाठी इथल्या दुर्गम डोंगरावर किल्ले प्रतापगडाचे बांधकाम करण्यात आले.  मोरोपंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अजरेजी यादव यांनी या अभेद्य गडाचे बांधकाम केले. इथेच शिवरायांनी आदिलशाहीचा बलाढ्य सरदार, सेनापती अफजलखानाला मोठ्या चतुराईने नेस्तनाबूत केले. त्यामुळे किल्ले प्रतापगडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. स्वराज्यात सुरक्षित ठिकाणी भवानी मातेचे मंदिर असावे, या हेतूनं प्रतापगडावर देवीची स्थापना करण्यात आली. सध्या आपण पाहतो ती भवानीमातेची मूर्ती तयार करण्यासाठीही खूप खटाटोप करावा लागला. हिमालयातील तीन नद्यांच्या संगमावरून मूर्तीसाठीची शिला आणण्यात आली. त्रिशूल गंडकी, श्वेत गंडकी व सरस्वती अशी या नद्यांची नावे. याकामी नेपाळचे त्यावेळचे राजे लिलासेन सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठी मदत केली. पुढे अमात्य मोरोपंतांच्या हस्ते  भवानीची यथासांग प्राणप्रतिष्ठा केली गेली. वेदमूर्ती विश्वनाथ भट यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी संपन्न झाला. मुख्य गाभाऱ्यात स्थापन झालेली भवानी मातेची मूर्ती अष्टभुजा असून सालंकृतही आहे.
मातेच्या या आयताकृती मंदिराचं  संपूर्ण बांधकाम दगडी आहे. गाभारा, भवानी मंडप, नगारखाना अशा पद्धतीची बांधकामाची रचना आहे. या भवानी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम छत्रपतींच्या सातारा गादीवर आलेल्या छत्रपतींनी केले आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मंदिराच्या छतावर तांब्याचा पत्रा बसवून शिखराची मजबुती केल्याची नोंद सापडते. १९२० मध्ये मंदिराला आग लागून संपूर्ण भवानी मंडप आगीच्या भक्षस्थानी गेला. मात्र, साताऱ्याच्या गादीने हा मंडप पुन्हा बांधून घेतला. मूर्तीवरील संपूर्ण छत्र चांदीचे बनवले आहे. तसेच समोरील लाकडी खांबही चांदीमध्ये मढवले आहेत. तब्बल १०० किलो चांदी त्यासाठी वापरण्यात आल्याचे सांगीतले जाते.
       नवरात्रीत या गडावर एकूण दोन घट स्थापन केले जातात. त्यापैकी एक  खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेला आहे. तर दुसरा घट छत्रपती राजाराम महाराजांनी नवसापोटी स्थापना केलेला आहे. उत्सव काळात नऊ दिवस दररोज पहाटे व रात्री चौघडा झडतो. प्रत्येक दिवस वेगळा कार्यक्रम व वेगळा उत्साह घेऊन अवतरतो. चतुर्थीला पारंपरिक पद्धतीनं रात्री देवीचा गोंधळ घातला जातो. अलिकडच्या काळातील कानठळ्या बसवणाऱ्या गरब्याच्या गोंधळात हा ‘गोंधळ’ मात्र मनाला सुखावणारा वाटतो. ललितापंचमीला पालखी मिरवणूक काढली जाते. मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर ही पालखी मिरवणूक काढली जाते.
या रात्री अनेक पेटत्या मशालींच्या उजेडात भवानीमातेला साकडे घातले जाते. ही प्रथा गेल्या साडेतिनशे वर्षापासून सुरू असल्याचे मानले जाते. अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. नवरात्रौत्सवात आकर्षक कपड्यांतील तरूण तरूणी देवीसमोर फेर धरून रास-दांडीया खेळतानाचे दृश्य आपल्या अंगवळणी पडलेले आहे.
मात्र प्रतापगडावरील मंदिराच्या डाव्याबाजूकडील मोकळ्या जागेत झांज, ढोल आणि लेझिमच्या तालावर फेर धरणारे मराठमोळ्या वेशातील युवा वर्ग पाहील्यानंतर विशेष कौतुक वाटते. एकूणात गडावरील नवरात्र म्हणजे एक भव्यदिव्य सोहळाच असतो. हा सोहळा आपल्याला शिवकाळातील गतवैभवाची आठवण करून देतो. हा सोहळा देवीबरोबरच इतिहासाचाही जागर घालतो. पोलादपूर परिसरातील रायगडकर नियमितपणे हा सोहळा अनुभवतात. शिवरायांच्या राजधानीचे नाव भूषवणारा आपला ‘रायगड’ जिल्हा आहे. तेव्हा रायगडकरांनो येत्या नवरात्रौत्सवात गडावर या, उत्सव अनुभवा. एकदा इथल्या भवानी आईचाही जागर होऊ द्या!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Thursday, October 12, 2023

आरोग्यदायी उन्हेरे

उन्हेरे, सुधागड
        सध्या थंडीचा हंगाम चालू आहे. या थंड पण आल्हाददायक वातावरणात गरम पाण्याने स्नान करणे कोणाला आवडणार नाही? सकाळी उठल्यानंतर अथवा संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी गरम पाण्याचा शेक सर्वांनाच हवाहवासा वाटतो.  हे गरम पाणी मिळवण्यासाठी जुन्या काळातील बंब, चुलीपासून ते अलीकडच्या काळातील गॅस, हिटर, गिझर या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. या कामामध्ये सातत्याने उर्जाही खर्च होत असते. गरम पाणी मिळविण्यासाठी नेहमीची खटपट करावी लागत असताना, रोजच्या रोज आयतेच गरम पाणी मिळू लागले तर? ते ही स्वतंत्रपणे उर्जा खर्च न करता?
हो, आपल्याला निसर्गत:च गरम पाणी मिळू शकते. फक्त हे गरम पाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याची वाट न पाहता आपल्यालाच या पाण्यापर्यंत पोहोचावे लागेल.
      आपल्या देशात सगळीकडेच जमिनीची रचना वेगवेगळ‌ी आहे. जमिनीवरील आणि आतल्या भागातील  वैविध्यपूर्ण स्थितीमुळे एक चमत्कारिक गोष्ट पहावयास व अनुभवायास मिळते, ती म्हणजे जमिनीतील गरम पाण्याचे झरे. भारतात आढळणारे गरम पाण्याचे झरे पुरातन काळापासून मानवाला आकर्षित करीत आहेत. या पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे आजार बरे होत असल्याचे मानले गेल्याने देशभरात अनेक ठिकाणी लोक तेथे गर्दी करतात. गरम पाण्याचे झरे म्हणजे अनेक भूशास्त्रीय चमत्कारांपैकीच हे एक. यालाच उन्हेरे, उन्हवरे, उन्हाळे, असेही म्हणतात. महाराष्ट्रात अंदाजे 32 उन्हेऱ्यांच्या जागा आढळून आल्या आहेत. त्यांपैकी जेमतेम आठ उन्हेरे राज्याच्या पठारी भागात आहेत, बाकी उरलेले सर्व  उष्ण झरे कोकणात आढळतात. कोकणची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील ‘उन्हेरे’ आणि महाडमधील ‘सव’ येथील गरम झरे प्रसिद्ध आहेत. पाली येथील सुप्रसिद्ध बळ्ळालेश्वर तिर्थक्षेत्रापासून जवळच ‘उन्हेरे’ हे स्थळ आहे.
नैसर्गिक, भौगोलिक चमत्काराला देवत्व बहाल करण्याची परंपरा सगळीकडेच आहे. याच परंपरेतून या झऱ्यांच्याही आख्याईका तयार झाल्या आहेत. रामायण काळात सितामाईस स्नानासाठी गरम पाण्याची आवश्यकता असताना प्रभू श्रीरामाने बाण मारून हे स्थान तयार केले अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. या झऱ्यांवर कुंड बांधण्यात आले आहे. एकूण तीन प्रकारची कुंडे येथे आहेत. त्यापैकी एक स्त्रीयांसाठी व एक पुरूषांसाठी असे विभाजन आहे. कुंडांच्या तळाशी आशानी लाकडाच्या फळ्या टाकल्या आहेत. त्यावर उभे राहून स्नान करता येते. या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान आपल्या त्वचेला सुसह्य इतके आहे. या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात असे सांगण्यात येते. तिसर्‍या कुंडाचे तापमान मात्र जास्त आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला उन्हेरे येथे यात्रा भरते. सुकी मच्छी आणि घोंगड्या हे या यात्रेतील आकर्षण असते.
सव, महाड
  जिल्ह्यातील दुसरे उष्ण पाण्याचे स्थळ आहे महाड तालुक्यात. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना महाडजवळ आल्यावर सावित्री नदीचा प्रवाह दिसू लागतो. या नदीपलीकडे जो हिरवागर्द परिसर दिसतो तिथे सवची गरम पाण्याची कुंडे आहेत. होडीने नदी ओलांडून पलीकडे जायचे. गर्द झाडीतल्या पायवाटेने गेल्यावर आपण कुंडापाशी येऊन पोहोचतो. सवच्या कुंडांना लागूनच शाह शैलानी यांचा दर्गा आहे. अतिशय स्वच्छ असा हा दर्गा आहे. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान इथे उर्स असतो. कुंडाच्या तळाला नारळाचे खोड बसवल्यामुळे कुंडाची खोली कमी झाली आहे. यामुळे येथे, डुंबणे सुरक्षित झाले आहे.
आसपास वस्ती असून, बहुतेक घरे मुस्लिम बांधवांचीच आहे. इथे यायला आणखी एक वाट आहे, महाड-आंबेत रस्त्यावरून कच्च्या  पायवाटेने गेल्यासही कुंडाशी पोहोचता येते.
      वरकरणी सामान्य भासणाऱ्या या कुंडांमध्ये गरम पाण्याचा चमत्कार होतो तरी कसा?
 पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन जमिनीवर येणाऱ्या या उन्हेऱ्यांना "हॉट स्प्रिंग'(Hot Spring) किंवा  ‘थर्मल स्प्रिंग'(Thermal Spring) असे म्हटले जाते. या गरम पाण्याचे तापमान सुमारे ३० अंश ते ७० अंश सेल्सिअसपर्यंत असते. पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरल्यानंतर  या झऱ्यांची निर्मिती होते. सामान्यत: उन्हेरे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात. जिथे शिलारस जमिनीच्या वरच्या थरालगत असतो तिथे ही शक्यता वाढते. जमिनीवरचे पाणी खडकांच्या फटींमधून खाली झिरपते. असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येताच तापते. त्याच्या काही भागाची वाफ होते. हे तापलेले पाणी खडकांमधील फटींतून वर ढकलले जाते व उन्हेऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. बऱ्याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक, लिथीयम, कॅल्शियम वगैरेंसारखे पदार्थ मिसळतात. काही ठिकाणी रेडियम धातूशी निगडीत धातूही सापडतात. म्हणूनच अशा उन्हेऱ्यांतून गंधकयुक्त पाणी बाहेर येते. या गंधकयुक्त पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात. या पाण्यामध्ये असलेल्या जीवाणू व वनस्पतींचा वापर काही प्रमाणात औषधे, वनस्पती तेल तयार करण्यासाठी केला जातो. हे पाणी औषधी असले तरी पिण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही. तसेच या पाण्यात जास्त वेळ थांबल्यास चक्कर येवू शकते.
      सध्या निसर्गाच्या या चमत्कारांचे रुपांतर पर्यटनस्थळात होत आहे. जाईल तिथे कचऱ्याच्या पाऊलखुणा उमटवणाऱ्या माणूस नावाच्या प्राण्याने इथेही आपली आधुनिक परंपरा कायम राखली आहे. कुंडांमध्ये साबणाचा वापर करणे, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या परिसरात फेकून देणे असले उद्योग या उन्हेरेंच्या परिसरातही केले आहेत. या कुंडांमध्ये स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात असे म्हणतात, पण त्याचबरोबर यातून आपली ‘अस्वच्छ मानसिकताही’ बरी व्हावी ही अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...