Search This Blog

Thursday, October 26, 2023

प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव

प्रतापगडावरचा नवरात्रौत्सव!

      पोलादपूर! रायगडचे दक्षिण टोक. राजधानी रायगड, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा प्रतापगड आणि इतर लहानमोठ्या गडकोटांनी वेढलेला हा परिसर. इतर सर्वसामान्य गावांप्रमाणे इथल्या गावांनाही नवरात्रोत्सवाचे आकर्षण आहे. इथेही आश्विन महीन्याच्या प्रारंभी घराघरात घटस्थापना होते, गावोगावच्या मातेच्या मंदिरांमध्ये उत्साह, नवचैतन्य निर्माण होतो. ‘गरबा-रास-दांडीया’च्या आकर्षक चक्रात पोलादपूरही फेर घेतो. पण त्याचबरोबर या उत्सवादरम्यान ही फेर धरणारी पाऊले मोठ्या संख्येने महाबळेश्वर घाटाच्या दिशेने वळतात. या मार्गातील प्रतापगडावरील नवरात्रौत्सवासाठी महाड व पोलादपूर येथील भाविक वर्षानुवर्षे येत असतात. एकाअर्थी सातारा आणि रायगड जिल्ह्यांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा हा उत्सव.
  ज्या भवानी मातेच्या नावाने गडावर नवरात्रौत्सव साजरा होतो, त्या देवीच्या स्थापनेमागचा इतिहासही रंजक आहे. तुळजापूरची भवानी माता ही शिवाजी महाराजांची म्हणजेच भोसले घराण्याची कुलदेवता. त्याकाळी तुळजाभवानी मंदिर परिसरावर आदिलशाही सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ साली जावळीच्या प्रदेशावर आक्रमण करून चंद्रराव मोरेंचा पूर्ण पाडाव केला व जावळी काबीज केली. घाटावर व खाली रायगड प्रांतात देखरेख करता यावी, यासाठी इथल्या दुर्गम डोंगरावर किल्ले प्रतापगडाचे बांधकाम करण्यात आले.  मोरोपंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अजरेजी यादव यांनी या अभेद्य गडाचे बांधकाम केले. इथेच शिवरायांनी आदिलशाहीचा बलाढ्य सरदार, सेनापती अफजलखानाला मोठ्या चतुराईने नेस्तनाबूत केले. त्यामुळे किल्ले प्रतापगडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. स्वराज्यात सुरक्षित ठिकाणी भवानी मातेचे मंदिर असावे, या हेतूनं प्रतापगडावर देवीची स्थापना करण्यात आली. सध्या आपण पाहतो ती भवानीमातेची मूर्ती तयार करण्यासाठीही खूप खटाटोप करावा लागला. हिमालयातील तीन नद्यांच्या संगमावरून मूर्तीसाठीची शिला आणण्यात आली. त्रिशूल गंडकी, श्वेत गंडकी व सरस्वती अशी या नद्यांची नावे. याकामी नेपाळचे त्यावेळचे राजे लिलासेन सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठी मदत केली. पुढे अमात्य मोरोपंतांच्या हस्ते  भवानीची यथासांग प्राणप्रतिष्ठा केली गेली. वेदमूर्ती विश्वनाथ भट यांच्या मार्गदर्शनाखाली हा विधी संपन्न झाला. मुख्य गाभाऱ्यात स्थापन झालेली भवानी मातेची मूर्ती अष्टभुजा असून सालंकृतही आहे.
मातेच्या या आयताकृती मंदिराचं  संपूर्ण बांधकाम दगडी आहे. गाभारा, भवानी मंडप, नगारखाना अशा पद्धतीची बांधकामाची रचना आहे. या भवानी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम छत्रपतींच्या सातारा गादीवर आलेल्या छत्रपतींनी केले आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मंदिराच्या छतावर तांब्याचा पत्रा बसवून शिखराची मजबुती केल्याची नोंद सापडते. १९२० मध्ये मंदिराला आग लागून संपूर्ण भवानी मंडप आगीच्या भक्षस्थानी गेला. मात्र, साताऱ्याच्या गादीने हा मंडप पुन्हा बांधून घेतला. मूर्तीवरील संपूर्ण छत्र चांदीचे बनवले आहे. तसेच समोरील लाकडी खांबही चांदीमध्ये मढवले आहेत. तब्बल १०० किलो चांदी त्यासाठी वापरण्यात आल्याचे सांगीतले जाते.
       नवरात्रीत या गडावर एकूण दोन घट स्थापन केले जातात. त्यापैकी एक  खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेला आहे. तर दुसरा घट छत्रपती राजाराम महाराजांनी नवसापोटी स्थापना केलेला आहे. उत्सव काळात नऊ दिवस दररोज पहाटे व रात्री चौघडा झडतो. प्रत्येक दिवस वेगळा कार्यक्रम व वेगळा उत्साह घेऊन अवतरतो. चतुर्थीला पारंपरिक पद्धतीनं रात्री देवीचा गोंधळ घातला जातो. अलिकडच्या काळातील कानठळ्या बसवणाऱ्या गरब्याच्या गोंधळात हा ‘गोंधळ’ मात्र मनाला सुखावणारा वाटतो. ललितापंचमीला पालखी मिरवणूक काढली जाते. मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर ही पालखी मिरवणूक काढली जाते.
या रात्री अनेक पेटत्या मशालींच्या उजेडात भवानीमातेला साकडे घातले जाते. ही प्रथा गेल्या साडेतिनशे वर्षापासून सुरू असल्याचे मानले जाते. अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. नवरात्रौत्सवात आकर्षक कपड्यांतील तरूण तरूणी देवीसमोर फेर धरून रास-दांडीया खेळतानाचे दृश्य आपल्या अंगवळणी पडलेले आहे.
मात्र प्रतापगडावरील मंदिराच्या डाव्याबाजूकडील मोकळ्या जागेत झांज, ढोल आणि लेझिमच्या तालावर फेर धरणारे मराठमोळ्या वेशातील युवा वर्ग पाहील्यानंतर विशेष कौतुक वाटते. एकूणात गडावरील नवरात्र म्हणजे एक भव्यदिव्य सोहळाच असतो. हा सोहळा आपल्याला शिवकाळातील गतवैभवाची आठवण करून देतो. हा सोहळा देवीबरोबरच इतिहासाचाही जागर घालतो. पोलादपूर परिसरातील रायगडकर नियमितपणे हा सोहळा अनुभवतात. शिवरायांच्या राजधानीचे नाव भूषवणारा आपला ‘रायगड’ जिल्हा आहे. तेव्हा रायगडकरांनो येत्या नवरात्रौत्सवात गडावर या, उत्सव अनुभवा. एकदा इथल्या भवानी आईचाही जागर होऊ द्या!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...