Search This Blog

Monday, April 1, 2024

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती

मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंदर. पेरिप्लस नुसार चौलच्या दक्षिणेस आणि पालेपट्टमीच्या (महाड परिसर) उत्तरेस हे बंदर स्थित आहे. मॅक क्रिंडल या तज्ञाच्या मते संस्कृतमध्ये उल्लेखलेला ‘मंद्रगिरी’ म्हणजे देखिल हेच बंदर. प्राचीन काळखंडात महत्त्वाचे असणारे हे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ‘मांदाड’ बंदर . या बंदरापासून निघालेला आणि कुडा-भाजे-बोरघाटमार्गे पैठणपर्यंत गेलेला एक सातवाहनकालीन रस्ता होता. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या.
या गावाच्या पूर्वेकडील महोबा डोंगरावर कुडे लेणी आहेत. इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी ही लेणी खोदली असल्याचे सांगण्यात येते. या लेण्याचा शोध १८४८ साली लागला. पाच चैत्य व एकवीस विहारांचा समावेश असलेल्या एकूण सव्वीस लेणी या विशाल कातळात कोरलेल्या आहेत. यात ब्राम्ही लिपीतील प्राकृत व संस्कृत शिलालेख आहेत. या लेण्यांपैकी चौदाव्या क्रमांकाचे लेणे आकाराने थोडे मोठे असून त्यातील दीर्घिकेच्या डाव्या भिंतीवर मागील बाजूस एक प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. या शिलालेखात “करहाटकचा लोहवाणिज महिक याची देणगी नमूद करणे” अशा अर्थाचे लेखन आहे.  करहाटक म्हणजे सध्याचा ‘कराड’ प्रांत. मुंबईजवळील कान्हेरी येथील लेण्यांमध्येही एका कम्माराने म्हणजे लोहाराने दान केल्याचा उल्लेख आहे. खरे पाहता ‘लेणी खोदणे’ हे प्रचंड खर्चिक काम. एखादा शासक अथवा मोठा व्यापारी यांनाच हा खर्च करणे शक्य व्हायचे. अशा परिस्थितीत लोह कारागिर, पाथरवटांनी देखिल लेण्याचे दान करणे ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. भटकंती करणारा एक सामान्य कामगार ते स्थिर व्यावसायिक अशी प्रगती करणे, त्या काळात खरेच शक्य झाले असेल का?
जिल्ह्यातील लोहकारागिरांच्या व पाथरवटांच्या कामगिरीचा आलेख कसा उंचावत गेला असावा?
           रायगड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाकडे लोहयुगीन संस्कृतीच्या दृष्टीने डोकावून पाहूया. जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर हातकुऱ्हाडी व रापी सारखी अश्मयुगीन हत्यारे सापडली होती. यावरून या भागामध्ये एक ते दीड लाख वर्षापूर्वीपासून मानव वस्ती नांदत होती हे स्पष्ट होते. रायगड जिल्ह्यात लोहयुगीन संस्कृतीचा उदय नेमका कधी झाला याविषयी निश्चीत माहिती सांगता येत नाही. मात्र लोखंडी छिन्न्यांसारख्या उपकरणांच्या सहाय्याने सह्याद्रीच्या कुशीत कोरलेली भव्य बौद्ध लेणी आजही तत्कालीन पाथरवट कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देतात. जिल्ह्यातील कुडा, चौल, पाले, कोल, ठाणाळे येथील बौध्द लेणी लोहयुगीन कारागिरीचे सुंदर नमुने .
उत्तर कोकणातील ही बौद्ध लेणी इतर लेण्यांपेक्षा उशिरा म्हणजेच इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात कोरली गेली आहेत. एका बौद्ध लेण्याचे संपूर्ण खोदकाम व कोरीव काम करण्यास तब्बल साठ वर्षाचा कालावधी लागत असे. त्यामुळे जेथे जेथे लेणी कोरण्याचे काम करावे लागे तेथे तेथे अनेक वर्षे हे कारागीर वसाहती करून राहू लागले. पर्यायाने या काळापर्यंत त्या कारागिरांची भटकीवृत्ती नाहीशी होऊन ते स्थिर होऊ लागले. अनेक बौद्ध भिक्षुंकडून या पाथरवट कारागिरांना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. पुढे त्यांच्याचपैकी काहींनी संपूर्ण लेण्याचे दान दिल्याचे उल्लेख अनेक शिलालेखांत आढळतात.  लोहयुगीन संस्कृतीमध्ये लोखंडी हत्यारे व कारागीरांची कला यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यासोबत मानवी वस्त्यांसाठी घरांची निर्मिती करताना मातीच्या भाजलेल्या विटा, लोखंडी खिळे, भाजलेली मातीची कौले, गावाभोवतीची तटबंदी, दळणाचे जाते, पाटा-वरवंटा, चलनातील नाणी, किनारपट्टीवरील बंदरे, व्यापार लेखनकला इ. गोष्टींचाही ओघाने उदय व विकास होत गेला.

     काही अभ्यासकांच्या मते रायगड जिल्ह्यातील लेण्यांचे कारागीर हे ‘आगरी’ समाजाचे होते. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ ते म्हणतात, “आकर म्हणजे खाण, खाणीत करणारे म्हणजे आगरी. मूळच्या पैठण, नेवासा या ठिकाणी वास्तव्य करणारे हे लोक राष्ट्रकूट, चालुक्य, यादव यांच्या आश्रयाने पश्चिमेस आले. दक्षिण शैली आणि राजस्थानी शैली या दोहोंचा वापर करून त्यांनी पाषाणांतून मूर्ती, मंदिरे, किल्ले, गुंफा, स्तंभ, कोट बांधले. पाथरवट जमात स्वत:ला आगळे-आगरी म्हणून घेतात. नाशिक येथील मंदिरांच्या निर्मितीमध्येही याच कारागीरांचा हात असल्याचे मानले जाते. पंचवटीतील एका विस्तिर्ण गल्लीला आगरी समाजाचे नाव आहे. त्याचबरोबर जगप्रसिद्ध शैव लेणी असलेल्या घारापुरीचे मूळ नाव या आगरी पाथरवटांमुळे ‘अग्रहारपुरी’ होते, ज्यापासून सध्याचे घारापुरी  प्रचलित नाव तयार झाले आहे.” अर्थात या दाव्यांबाबत तज्ञांमध्ये एकमत नाही. परंतु रायगड जिल्ह्यात अदभुत शिल्प कौशल्य असणारे कारागीर होते व आपल्या असामान्य कौशल्यामुळेच त्यांनी स्वत:चा उत्कर्ष करून घेतला असल्याचे ठामपणे सांगता येते. पुढे लेणी खोदण्याचे प्रमाण कमी झाल्याने हे शिल्पकार आपल्या लोहयुगीन संस्कृतीसह विस्मृतीत गेले. परंतु त्यांनी आपल्या छिन्नीसारख्या अवजारांनी कोरलेल्या स्मृती चिरंतन राहील्यात.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...