Search This Blog

Thursday, December 3, 2020

कोई मिल गया

  निळसर रंग आणि शरीराच्या तुलनेने मोठे डोके अशी वेगळीच रचना असलेले ‘जादू’ नावाचे पात्र आठवत असेल. परग्रहावरून आलेल्या  जीवाभोवती फिरणारी सायन्स फिक्शन प्रकारातील ‘कोई मिल गया’ या चित्रपटाची ही कथा. हृतिक रोशनच्या अभिनय कौशल्याला आणि प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा हा चित्रपट. ‘जादू’ असे नामकरण केलेला परग्रहावरील एक जीव आणि त्यामुळे घडणाऱ्या घटनांभोवती फिरणारे हे कथानक. चित्रपटात या अनोळखी प्राण्याला पाहून लोकांच्या मनात कुतूहल, भिती, आकर्षण अशा संमिश्र भावना निर्माण होत असल्याचे प्रसंग रंगवलेले आहेत. ‘Reel Life’ मधील या प्रसंगाशी साम्य असणारी ‘Real Life’ मधील घटना मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर घडून आली. फरक इतकाच की इथे हा अपरिचित जीव परग्रहावरील नसून आपल्या पृथ्वीतलावरीलच होता.
         महाराष्ट्रात गेल्यावर्षी  साधारणत: ३० ते ४० मीटर खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर बोटीच्या जाळ्यात एक काळ्या रंगाचा मासा अडकला. या अपरिचित माशाला पाहून इथल्या मच्छिमारांवर “कोई मिल गया” असेच म्हणायची वेळ आली. मच्छिमारांसाठी अनोळखी असणारा हा जीव एकटा नसून, तो झुंडीने पश्चिम किनाऱ्यावर दाखल झाला आहे. नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यातच पर्ससीन जाळ्यांच्या बोटीत दररोज आठ ते दहा टन, तर ट्रॉलर बोटींच्या जाळ्यात तीन ते चार टन ‘ हे अनोळखी मासे’ अडकले. मुंबईच्या ससून डॉकवर हे प्रमाण १५ ते १७ टन असल्याचे  पर्ससीन संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.  मत्स्यदुष्काळ असण्याच्या काळात इतके मासे सापडणे ही खरेतर आनंदाची बाब, परंतु आनंदी होण्याऐवजी मच्छिमारांनी या काळ्या माशाची तक्रार थेट ‘केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्था (CMFRI)’ यांच्याकडे केली आहे. या काळ्या  माशाविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल ‘सीएमएफआरआय’ने घेतली आहे.
 मच्छीमारांनाही अपरिचित आणि सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल, भिती निर्माण करणारा हा काळा मासा आहे तरी कोण?
    समुद्रातील प्रवाळ प्रदेशांत आढळणाऱ्या या काळ्या माशाचे नाव ‘ट्रिगरफिश’. बॅलीस्टीडी (Balistidae) कुळातील या माशांच्या जवळपास चाळीस प्रजाती आहेत. यात सर्वच काही काळे नाहीत, काही उजळ रंगाच्या प्रजातीदेखील आहेत. सामान्यत: उष्ण व समशितोष्ण कटिबंधात, इंडो-पॅसीफिक क्षेत्रात हे जीव आढळतात. उथळ समुद्र, प्रवाळ प्रदेशात त्यांचा वावर सर्वाधिक आहे. सुमारे २० ते ५० सेमीपर्यंत लांबी असणाऱ्या या माशांच्या काही प्रजाती १ मीटरपर्यंतही वाढू शकतात. काहीसे अंडाकृती भासणाऱ्या या माशांचे डोके शरीराच्या तुलनेने मोठे असते. सेल्फी काढताना तोंडाचा चंबू म्हणजेच ‘पाऊट’ करण्याचा एक अलिखित नियम आहे; ट्रिगरफिश हा नियम सेल्फी काढत नसतानाही पाळतो. याच तोंडाच्या वर मागील बाजूस लहान लहान डोळे असतात. जबडा लहान परंतु मजबूत असून त्यातील दातांच्या सहाय्याने तो शंख, शिंपलेही फोडू शकतो. या मजबूत दातांच्या जोडीला घशाजवळ वरच्या बाजूस आणखी एक सहा दातांची पट्टी असते. अन्नाच्या शोधात असताना हे मासे समुद्रतळाच्या वाळूखाली लपलेल्या खेकडे व इतर कवचधारी प्राण्यांनाही खणून काढतात. या कामासाठी ते परांचा वापर करतातच, सोबत तोंडातून हवेचा मारा करत भक्ष्य शोधतात. आपल्या शत्रूपासून बचाव करताना त्याचा पाठीवरचा मोठा काटा (Dorsal Spine) उभा राहतो,

त्यामागच्या लहान काट्याने त्याला आधार मिळून चाप बसतो. लहान काट्याला दाबल्याशिवाय हा चाप निघत नाही. बंदुकीच्या खटक्याप्रमाणे असलेल्या या रचनेमुळेच या माशाला ‘Triggerfish’ असे म्हटले जाते. हवाई द्वीप प्रदेशाने तर या माशाला ‘राज्य मासा (State Fish)’ म्हणून दर्जा दिला आहे.
     एखाद्या प्रदेशाचा राज्य प्राणी असलेला हा सामान्य जीव, दुसऱ्या प्रदेशातील लोकांना अनोळखी वाटतो इतकेच नव्हे तर त्याची तक्रारही केली जाते.
बरं... पृथ्वीतलावरील सर्वात धोकादायक प्राणी असणाऱ्या मनुष्याने त्याची तक्रार करावी असे त्याने केले तरी काय?
      या तक्रारीचे मूळ खवय्यांच्या पोटात दडलेले आहे. सुरमई, बांगडा, माकुळ यांसारखे मासे खवय्यांच्या आवडीचे. मनुष्याप्रमाणेच  ते या ‘काळ्या माशा’लाही आवडतात. तो आक्रमक आहेच, परंतु त्याची भूकही मोठी आहे. त्याच्या भुकेमुळे मासळीप्रेमींच्या आवडत्या माशांवर संक्रात येत असल्याची तक्रार कोकणासह मुंबईतील मच्छिमारांनी केली. मागील वर्षापासून हा ‘ट्रिगर फिश’ राज्याच्या किनारपट्टीजवळच्या क्षेत्रात धुमाकूळ घालत असल्याचे मच्छीमारांचे म्हणने आहे. ट्रिगरफिश’मुळे मागणी असलेल्या माशांच्या मासेमारीवर परिणाम झाल्याचा दावा मच्छिमारांनी केला आहे. त्याला शास्त्रज्ञांनीही दुजोरा दिला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये सुरमई, बांगडा हे मासे जाळ्यात सापडण्याचे प्रमाण घटल्याची माहिती ‘सीएमएफआरआय’चे शास्त्रज्ञ देतात. ‘ट्रिगरफिश’च्या अतिक्रमणाचा हा परिणाम असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. ट्रिगरफिशच्या तपासणीत त्याच्या पोटातूून माकुळ, सुरमई, बांगड्यांचे अवशेष सापडले.
ट्रिगरफिश’ खाण्यायोग्य नसल्याने त्यांना बाजारात भाव नाही. पण त्यांच्या झुंडी सुरमई, बांगडा, माकुळ यांच्या मागे लागतात आणि जाळ्यात अडकतात. यातूनच अचानकपणे या काळ्या माशांच्या झुंडीच्या झुंडी मच्छीमारांच्या जाळ्यात सापडू लागल्या आणि मच्छीमार चक्रावले. या अनोळखी माशांविषयी काहीच माहिती नसल्यामुळे  हे मासे त्यांनी फेकून दिले. परंतु त्यांचा वापर कोंबडय़ांचे खाद्य म्हणून करता येऊ शकतो असे कळल्याने ते सरासरी १५ रुपये किलोने विकले गेले. परंतु हा व्यवहारही तोट्याचा आहे. इतकेच नव्हे ट्रिगरफिशच्या काही जाती विषयुक्त (ciguatoxic) असल्याने त्यांच्या वाटेला कोणी जात नाही.
        या माशाविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन शास्त्रज्ञांनी अभ्यास सुरू केला आहे. समुद्रातील प्रवाह बदलांमुळे (Currents, Waves) हे मासे आपल्या राज्याच्या सागरी परिक्षेत्रात आले असावेत, असे प्राथमिक निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. या निरीक्षणांचा विचार करता ‘काळ्या माशाचे आक्रमण’ होण्यास थोड्याफार प्रमाणात मानवी हस्तक्षेप कारणीभूत असण्याची शक्यता आहे. यातील गंमतीचा भाग म्हणजे ‘सुरमई-बांगडा-माकुळ’ यांना फस्त करतो म्हणून ‘ट्रिगरफिश’कडे बंदूक रोखणारे लोक त्या माशांना फस्तच करणारे आहेत. समुद्र ज्याचे घर आहे, समुद्री जीव ज्याचे नैसर्गिक खाद्य आहे, त्याच माशाला समुद्राबाहेर राहणारा मनुष्यप्राणी परग्रहावरील जीवासारखाच (ExtraTerrestrial) मानतो आणि तो दिसल्यावर ‘कोई मिल गया’ म्हणतो,यातच सर्व काही आले.

- श्री.तुषार  म्हात्रे



रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...