Search This Blog

Wednesday, February 28, 2018

नमक-हराम

        “डबल फोर्टीफाईड- आयोडीनयुक्त, सबसे शुद्ध नमक!”  अशी जाहीरात आपण मोठ्या आवाजात आणि वारंवार टी.व्ही.वर पहात-ऐकत आलो आहोत. अायोडीनयुक्त मीठ खाल्ल्याचे होणारे विविध फायदे कंटाळवाण्या सरकारी जाहिरातींपासून ते मीठ उत्पादक कंपन्यांच्या झकपक जाहिरांतीत आपल्या मनावर ठसवले जातात. आपल्या घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर ‘आयोडीनयुक्त मीठ’, असे लिहिलेले दिसेल.  आयोडीन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉइड ग्रंथीमध्ये या आयोडीनपासून थायरॉक्सीन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे विविध आजार होतात हे माहित असल्यानेे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा जादा पुरवठा केला जातो.

    या सर्व बाबी सत्य असल्या तरी ‘आयोडीनयुक्त मीठाची’ दुसरी खारट बाजू पाहूया. 

   आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. त्यामुळे १ किलो मिठात सुमारे १५ ते ३० मि. ग्रॅ. या प्रमाणात  आयोडीन मिसळले जाते. मिठात आयोडीन टाकण्यासाठी चार असेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. यात पोटॅशिअम आयोडेट, पोटॅशिअम आयोडाइट, सोडिअम आयोडेट व सोडिअम आयोडाइड यांचा समावेश होतो. आयोडीन खूप अल्प प्रमाणात  शरीरास आवश्यक असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांचा विचार केल्यास आपल्या शरीराला सरासरी 100 ते 200 मायक्रोग्रॅम  आयोडीनची गरज असते. गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्या बाबतीत ही गरज 250 मायक्रोग्रॅमच्या वर असते. आयोडीनयुक्त मीठामुळे ही गरज भरून निघते. परंतु आपल्या अन्नपदार्थांचा विचार केल्यास सामान्य भारतीय व्यक्ती प्रतिदिन 10 ग्रॅम मीठाचे सेवन करते. कधीकधी हे सेवन 30 ग्रॅमपर्यंत असू शकते. हे सर्व मीठ आयोडीनयुक्त असल्यास सुमारे 300 ते 900 मायक्रोग्रॅम आयोडीन आपल्या शरीराला मिळते. 
       आता आयोडीनच्या इतर स्त्रोतांकडे पाहूया. मुख्यत्वे सागरी अन्नपदार्थांतून मुबलक प्रमाणात आयोडीन मिळते. समुद्री मासे, नैसर्गिक मीठ, कॉड माशाच्या यकृताचे तेल, दही, चीज इत्यादींपासून आयोडीन मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, फळे, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोडय़ा प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडीनचे प्रमाण जेथे कमी असेल तो भौगोलिक प्रदेश सोडून उर्वरीत प्रदेशात आयोडीन मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. भारताला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. देशाची मोठी लोकसंख्या या प्रदेशात नांदत आहे, या लोकसंख्येच्या आहारातील सागरी अन्नाचे प्रमाणही चांगलेच आहे. आयोडीनचा पुरवठा योग्य रितीने होण्याची शक्यता असताना, सरसकट सर्वांनाच ‘आयोडीनयुक्त मीठाची’ सक्ती कशासाठी?
       प्रत्येक व्यक्तीची वयोमानानुसार आयोडीन सेवनाची कमाल मर्यादा ठरलेली असते. लहान मुलांमध्ये ती 200 ते 500 मायक्रोग्रॅम्स तर प्रौढांमध्ये ती 1000 मायक्रोग्रॅम्सच्या आसपास असते.

   आपल्या गरजेपेक्षा आणि कमाल मर्यादेपेक्षा अधिक मात्रेतील आयोडीन आपल्या शरीरात नियमितपणे जात असेल तर काय? 

   जसे आयोडीनच्या अभावामुळे रोग होतात तसे अधिक्यामुळेही होतात. आयोडीनच्या अधिक मात्रेतील सेवनामुळे तोंडाची-घशाची जळजळ होणे, ताप, पोटदुखी, मळमळ, उलटी असे परिणाम होऊ शकतात. इतकेच नव्हे तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा गलगंड नावाचा विकार आयोडीनच्या अधिक्यामुळेही होऊ शकतो. 
अति सर्वत्र वर्जयेत’ असे एक संस्कृतमधील विधान आहे. हे विधान आयोडीनच्या वापराबाबतही पाळणे गरजेचे आहे. आयोडीनयुक्त मीठाच्या बाबतीत ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी’ अशी काहिशी अवस्था झाली आहे. ज्यांना आयोडीनची खरी गरज आहे, त्यांच्यासह सर्वांनाच जाणते अजाणतेपणी आयोडीनचा ‘बूस्टर डोस’ मिळत आहे. याबाबतीत ज्यांना गरज आहे अशांनाच मीठाद्वारे आयोडीन पुरवले गेले पाहिजे. नफा कमवण्याच्या नादात मीठ उत्पादक कंपन्यांनी चालवलेल्या भिती दाखवणाऱ्या जाहिराती थांबवून योग्य व शास्त्रीय माहितीयुक्त जाहिराती समोर आल्या पाहिजेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारे ‘आयोडीनयुक्त मीठ’ हे नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांच्या खेळाचा केवळ एक नमुना उदाहरण आहे. अशा कित्येक बाबी आरोग्याच्या नावाने आपल्या माथी मारल्या जातात. आपण मात्र या भावनिकतेच्या आहारी न जाता शास्त्राच्या कसोटीवर टिकणाऱ्या बाबींवरच विश्वास दाखवायला हवा. आता यापुढे ‘आयोडीनयुक्त मीठाच्या’ बाबतीत ‘नमक-हराम’ राहीलेलंच बरं!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Saturday, February 17, 2018

पिरकोनमधील वीरगळ (भाग 2)

(शोध अज्ञात वीराचा)
         ‘वीरगळ’ हा शब्द आता ‘पिरकोन’ परिसरात अनेकांच्या तोंडी रुळला असावा. नवी मुंबई, मुंबई  पासून अवघ्या तासाभराच्या अंतरावरील या परिसरात वीरगळ आढळले आहेत, हे मागील लेखामुळे बहुतांश लोकांना ज्ञात झाले. आपल्या राज्यात बऱ्याचशा ठिकाणी असे विरगळ आहेत. आपल्याकडे आढळणारे वीरगळ हे मुख्यत्वे मराठवाडा,पुणे  पासून ते कोकण, रायगड पर्यंत पसरलेले आहेत. वीरगळांना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. महाराष्ट्रात वीरगळांचे अनेक प्रकार आहेत. वीराच्या पराक्रमानुसार व पदानुसार दगडाच्या एकाच बाजूने तर कधी दोन्ही बाजूने किंवा चारी बाजूने चौकट करून वीराच्या युद्धप्रसंगाचे चित्र कोरले जाते. युद्ध प्रसंगात बरीच विविधता असते. पायदळ, घोडदळ स्वरूपातील युद्धप्रसंग आहेतच, पण हत्तीवरून आणि नौकेवरून झालेल्या लढायांचे प्रसंगही आढळतात. पारंपारिक युद्ध प्रसंगांसह आणखी काही वेगळ्या घटनांवरील वीरगळ असू शकतात. चोर लुटारूंपासून गाई गुरांचे रक्षण करताना मरण स्विकारलेला वीर किंवा रानटी प्राण्यांशी लढणारा वीर असेही काही प्रसंग आहेत.
    आपण पिरकोनमधील ज्या वीरगळीविषयी माहिती पाहणार आहोत, ती वीरगळ गावातील मारूती मंदिरासमोरील जागेत विराजमान आहे.
मारूती मंदिरासमोरील वीरगळ
          या वीरगळीचे वैशिष्ट्य म्हणजे स्तंभरूपी वीरगळीला केवळ एकच खण असून त्यात एक अतिशय आकर्षक अशी मानवाकृती कोरलेली आहे. कमरेपासून वरच्या भागापर्यंत ही आकृती असून एक हात उंचावलेला आणि दुसऱ्या हातात काठीसदृश वस्तू आहे. चेहऱ्याचा भाग उठावदार असून भरघोस केस किंवा फेटा बांधल्यासारखा भाग डोक्यावर दिसत आहे. या वीरगळीत कोणताही युद्धप्रसंग कोरलेला नाही, तसेच वीराच्या हातातील वस्तू शस्त्र वाटत नाही. बारकाईने पाहिल्यास या काठीसदृश वस्तूचा वरचा भाग जाड असून उर्वरीत भाग समान जाडीचा आहे. वरकरणी तरी ही वस्तू ‘गोवळकाठी’ भासते. गोवळकाठी म्हणजे ‘गुराख्याची काठी’. ही काठी गोवळकाठी असल्याचे मान्य केल्यास ही वीरगळ ‘गोवर्धन वीरगळ’ स्वरुपाची असल्याचे लक्षात येईल. मूळ गोवर्धन वीरगळात गाईचे शिल्पही असते, परंतु गाईंच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या वीराचे स्मारक म्हणजे ‘गोवर्धन वीरगळ’ अशा व्यापक अर्थाने आपण या वीरगळीकडे पाहूया.
  “केवळ गोधन वाचवताना धारातिर्थी पडलेला वीर ‘स्मारक बनवण्याइतका महत्त्वाचा’ असू शकेल का?”
या प्रश्नाचे उत्तर त्या काळाच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत दडले आहे.
    तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, कदंब, यादव यांसारख्या राजवटी राज्य करत होत्या, ठाणे-रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर-सातारा-पुणे परिसरात ‘शिलाहार’ राजवट होती. त्यांच्या राज्यात प्रत्येक गावाला स्वायत्तता होती असे संदर्भ आढळतात. गावाच्या चरितार्थासाठी पशुधन महत्त्वाचे साधन होते. गाय हे उत्पन्नाचे साधन असल्याने गाईगुरांच्या कळपांवरून व्यक्तींची व गावाचीही श्रीमंती मोजली जायची. गाईंचे दान हे मोठे दान मानले जायचे. सुमारे तेराव्या शतकाच्या सुरूवातीस यादव आणि शिलाहारांमध्ये युद्ध पेटले. हे युद्ध अनेक वर्षे चालले. त्याचबरोबर तेराव्या शतकानंतर उत्तरेकडून मुस्लिम आक्रमणे महाराष्ट्रात होऊ लागली.(काही वीरगळींच्या रचनेवरून हे स्पष्टही होते.) रोजच्या रोज चकमकी होऊन लूटमार व्हायची. या लूटमारीत गाई-गुरे पळवली जायची. त्यावेळी गोरक्षण हे पवित्र मानले जायचे. गोधनाच्या सुरक्षेसाठी नेमलेला गुराखी गाईगुरांच्या रक्षणासाठी जंगली प्राण्यांशी व लुटारूंशी लढताना प्राण पणाला लावून लढत असे, या कामात त्याला मरण आल्यास मोठ्या सन्मानाने त्याचे वीरगळ रुपातील स्मारक बनवले जात असे.
           पुढे अठराव्या शतकापर्यंत वीरगळ बनवण्याची परंपरा सुरू राहीली.अगदी अलीकडच्या काळाचा विचार केल्यास अजूनही महाराष्ट्रातील काही भागांत शेतामध्ये असे स्मारक बांधले जाते. पिरकोनमधील पशुपालनाची परंपरा पाहता ही वीरगळसुद्धा अशाच एखाद्या ‘गोरक्षकाची वीरगळ’ असावी असे वाटते.
या वीरगळीच्या वरच्या भागाचा विचार करूया.
वीरगळीचा लिखित भाग

वरील भागात एक कमळपुष्प कोरलेले असून त्याखाली ‘बारकणा पद गावड’ असे लिहले आहे. 


अशा स्वरूपाचे कोरीव काम करणाऱ्या तज्ञांशी संपर्क केला असता त्यांनी पुढील मत व्यक्त केले...
      “दगडावर कोरताना मराठी य, थ, द यांसारख्या अक्षरांची वळणे व्यवस्थित जमतीलच असे नाही. (दगडांवर नक्षी/नावे कोरण्याच्या प्रयत्नातून आलेला स्वानुभव आहे.)
तुम्ही दिलेल्या फोटोमधील दगडावर 'बारकणा' वाटणारा शब्द खरे तर 'बारकया' असू शकतो असे त्या 'ण'च्या वक्रतेवरुन वाटते. 'गावड'मधील 'ड' अक्षराचीही वळणे नीट न जमल्याने ते अक्षर 'र' वाटू शकते.
मग ही बाब लक्षात घेता, शेवटच्या ओळीतील 'पारका/पीरकोन' ऐवजी 'यास' असा शब्द व पुढे काहीतरी मजकूर असण्याची शक्यता निर्माण होते.”

        वरील अनुभवी मताचा विचार केल्यास ‘बारक्या पदू गावंड’ असे नाव या वीरगळीवर असल्याचे सिद्ध होते. या नावाचा अधिक शोध घेण्यासाठी गावातील वयाने ज्येष्ठ अशा जाणकार मंडळींशी चर्चा केली. त्यापैकी श्री.बळीराम गावंड(गुरूजी) यांनी सदर व्यक्ती त्यांच्याच पूर्वजांपैकी असल्याचे सांगीतले. त्यांच्या मते ‘बारक्या’ नावाची व्यक्ती 1880 ते 1900 या कालावधीतील असावी.  वीरगळ ज्या जागेत उभी आहे त्या जमिनीच्या मूळ मालकांच्या पूर्वजांपैकी ‘बारक्या पदू गावंड’  असल्याचे समजते.
        अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण या कलाकृतीचे बारकाईने निरीक्षण करून त्याची तुलना परिसरातील वीरगळींशी केल्यास काही वेगळ्या शक्यता मांडता येतात.
असममित कमळपुष्प
या वीरगळावरील ‘कमळपुष्पाची नक्षीचा विचार केल्यास ते असममित( Asymmetrical) वाटते.
 इतकेच नव्हे तर त्या नक्षीचे दृश्यरूपही आकर्षक नाही.
वेताळदेव येथील वीरगळ

पाणदिवे येथील वीरगळ
पाणदिवे व वेताळ देव परिसरातील वीरगळींवरील कमळपुष्प सममित असून अधिक आकर्षक व कलात्मक आहेत.

      ज्या वीरगळीच्या खालील कप्प्यात अत्यंत कठीण स्वरुपाचे काम करुन सुबक मानवाकृती कोरलेली आढळते, त्याच शिल्पाच्या वरील भागातील नक्षी इतकी सुमार का?
   याचे कारण कदाचित ही दोन्ही कामे वेगवेगळ्या कारागिर/कलाकारांद्वारे केलीे असण्याची शक्यता आहे. ही दोन्ही कामे वेगळ्या काळखंडातीलही असू शकतील. म्हणजे प्रत्यक्षात ही वीरगळ जुन्या काळखंडात उभारली जाऊन त्यावरील शिलालेख आधुनिक काळात केले असावे. असे असल्यास ज्याच्या नावाने ही वीरगळ उभी केली आहे आणि ज्यांचे नाव त्यावर कोरले गेले आहे, अशा दोन्ही व्यक्तींनी नक्कीच तत्कालीन समाजोपयोगी काम केले असावे. अर्थात हे केवळ अंदाज आहेत. भविष्यात आणखी संशोधन झाल्यास अधिक माहिती जाणून घेता येईल. भविष्यातील संशोधनाचे निष्कर्ष काहीही असोत, पण या भूमीवरती असे काही शूरवीर होऊन गेले त्यांच्या स्मृती आज ‘वीरगळ’ रुपात आपल्याकडे आहेत हे सत्य आहे.
        पिरकोनची ही भूमी, हा परिसर साक्षीदार आहे एका वैभवशाली आणि शौर्यशाली संस्कृतीचा...या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्यासमोर येऊ लागल्या आहेत. आपण आपली जबाबदारी ओळखून या ऐतिहासिक स्मृतींना जपूया, त्यातून प्रेरणा घेऊया... एक पाऊल पुढे टाकूया आपला भूतकाळ उजळवून भविष्याचे मार्ग प्रकाशित करण्यासाठी!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भमहाराष्ट्रातील वीरगळ- सदाशिव टेटविलकर, इतिहासाचे मूक साक्षीदार- आषुतोष बापट, विकीपीडीया - https://en.m.wikipedia.org/wiki/Hero_stone

(ही माहिती शोधण्याच्या कामी सहकार्य करणारे प्रलय गावंड, प्रणित गावंड तसेच माहिती देणारे बळीराम गावंड गुरूजी, लक्ष्मण गावंड यांचे आणि कोरीव लेखनाबद्दल स्वानुभव व्यक्त करणारे शिक्षण विकास मंचवरील सदस्य मंदार शिंदे आभार) 

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...