Search This Blog

Monday, July 29, 2019

मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते

मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते!
(कोकण मराठी साहीत्य परिषद आयोजित निबंध स्पर्धेत, शिक्षक गट प्रथम क्रमांक)
       जगभरात सुमारे सहा हजार भाषा बोलल्या जातात. यातील  कित्येक भाषा प्रतिवर्षी मरण पावतात. वाचायला थोडे चमत्कारिक वाटेल पण हे खरे आहे; भाषांचाही मृत्यू होतो. विशिष्ट भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण शून्यावर येणे, व्यवहारातून  वापर नाहीसा होणे म्हणजेच भाषेचे मरण. त्याचबरोबर कित्येक भाषांमध्ये लक्षणीय बदल घडत असतात. सर्वाधिक भाषिक लोकसंख्येच्या यादीत मराठी भाषेचा एकोणिसावा क्रमांक लागतो. जगभरातील अकरा कोटीहून अधिक लोक मराठी भाषेचा वापर करतात. ही भाषा बोलणारे लोक (जागतिक स्तरावर)  ७२ देशांमध्ये पसरलेले आहेत.भारतातल्या ३५ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत मराठी भाषिक लोक महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यामुळे ती केवळ एखाद्या प्रांताची भाषा न राहता, राष्ट्रीय भाषा ठरते. संविधानाने मान्य केलेल्या २२ राजभाषांपैकी मराठी ही एक राजभाषा आहे.

शिलाहार, यादव काळातील कित्येक शिलालेख, ताम्रपटांवर संस्कृतसह मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. शिवकाळात इंग्रज, मोगलांशी पत्रव्यवहारात फारशी भाषा वापरली जात असली तरी राजव्यवहार भाषा मराठीच होती. मराठी केवळ प्राचीन भाषाच नाही तर श्रेष्ठ दर्जाची साहीत्य परंपरा असणारी भाषा आहे हे म्हाईंभट, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास या संत कवींपासून ते अलिकडच्या कुसुमाग्रजांसारख्या लेखणीतून सिद्ध होत आले आहे.
इतकी समृद्ध भाषिक परंपरा आणि बहुसंख्य असणाऱ्या मराठीची सद्यस्थिती काय आहे?
महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरात अजूनही मराठी बोलली जाते. मातृभाषा मराठी असणारे लोक आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीलाच प्राधान्य देताना आढळतात. असे असूनही मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण कसे आहे? सध्याच्या उपलब्ध आकडेवारीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील जवळपास ७० टक्के विद्यार्थी अजूनही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या बाबतीत दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती (अजून तरी!) समाधानकारक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘ज्ञानभाषा’ म्हणून मराठीचे स्थान कसे आहे याचा विचार व्हायला हवा.
केवळ ‘ज्ञान मिळवणे’ हाच उद्देश असल्यास मातृभाषेतून शिक्षण घेणे हा शास्त्रीयदृष्ट्या योग्य पर्याय आहे. परंतु सध्याच्या शिक्षणाचा विचार केल्यास ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण हा मुद्दा कालबाह्य ठरत चाललाय. त्यामुळे या काळात शिक्षणाचा उद्देश हा आर्थिक बाबींशी संबंधित असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांमध्ये करिअरच्या दृष्टीने प्रसिद्ध असणाऱ्या विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य या ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण हे इंग्रजीतून उपलब्ध आहे. मराठीला ज्ञानभाषा बनायचे असेल तर सर्वप्रथम मराठी ही करिअरची भाषा व्हायला हवी.
या ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण मराठीतून सहज उपलब्ध झाल्यास आपोआपच मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढू शकेल.  इयत्ता ११ वी पासूनचे विज्ञान व वाणिज्य शाखेचे मराठी अभ्यासक्रम तयार करणे;  कृषी, विधी, सामाजिक विकास, ग्रंथालय शास्त्र, पत्रकारिता (वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या) या शाखा-विषयांचे पदविका, पदवी व पदव्यूत्तर शिक्षणाचे अभ्याक्रम निर्माण करणे असे उपाय केल्यास मराठी भाषेची वाटचाल सक्षम ज्ञानभाषेकडे करता येईल.  अभियांत्रिकी, वैद्यकीय, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याही शाखांचे पदवी-पदव्यूत्तर स्तरावरील अभ्यासक्रम तयार करणे; तसेच वरील सर्व शाखांची अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे, अशा उपाययोजना पूरक ठरतील. हे अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्याने लागू करण्यासाठीचा कार्यक्रमही राबवता येईल.
लेखात उल्लेखलेला 'विज्ञान,अभियांत्रिकी, वैद्यकीय या शाखांसाठी मराठी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके' या उपायांवर अल्पप्रमाणात कार्यवाही होत आहे.  अशाप्रकारे ११ वी, १२ वी ची विज्ञान शाखेतील काही विषयांची पाठ्यपुस्तके पुण्यातील ज्ञानभाषा प्रकाशनाने निर्माण केलेली आहेत. मराठीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या मुद्द्यांवर प्रत्यक्ष स्वरूपात कामही केले आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची पुस्तके तज्ञ प्राध्यापकांच्या सहकार्याने तयार झाली आहेत. त्यांचा वापरही शेकडो विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे. थोडक्यात काय तर उच्च शिक्षण मराठीतून शक्य झाल्यास मराठी ही खात्रीने ज्ञानभाषा होऊ शकते.
विज्ञान, तंत्रज्ञानाचे ‘मराठीतून उच्चशिक्षण’ हा मुद्दा मान्य केला तरी जागतिक स्तरावर हे व्यवहार्य आहे का? असे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठी भाषेच्या जागतिक स्तरावरील वापराच्या व्यवहार्यतेच्या बाबतीतही वस्तुस्थितीवर आधारित भाष्य करणे योग्य ठरेल. जागतिक स्तरावर सर्वाधिक भाषिक लोकसंख्या चिनी असूनही तिच्या खालोखाल असणाऱ्या स्पॅनिश आणि इंग्रजी या भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास सारख्या प्रमाणात भाषिक लोकसंख्या असूनही मराठी (१.१०%)  आणि फ्रेंच (१.१२%)  या दोन भाषांच्या सार्वत्रिक वापरात खूपच अंतर आहे. युरोपियन देशांमध्ये फ्रेंच भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भारतातही करिअरच्या दृष्टीने फ्रेंच भाषा शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. अशीच काहीशी स्थिती जर्मन (१.३९%) भाषेबाबतही आहे. इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन यांसारख्या भाषा शिकल्यानंतर मिळू शकणाऱ्या संभाव्य संधींमुळे त्यांचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे मराठी भाषेतून उच्चशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास या भाषेचा सार्वत्रिक वापर वाढण्याची शक्यता आहे. पर्यायाने मराठीची ज्ञानभाषेकडे वाटचाल सुलभ होऊ शकते.
मराठी तंत्रज्ञानाची भाषा होण्यासाठीचा आणखी एक सहजसोपा मार्ग म्हणजे भाषेतील उपलब्ध ज्ञानस्रोतांचे युनिकोडीकरण करणे. इंटरनेटच्या युगात अतिशय वेगाने माहीतीची देवाणघेवाण होत आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या संधीचा फायदा मराठी भाषा अभ्यासक आणि समर्थकांनी घ्यायला हवा. अधिकाधिक माहीती मराठीतून उपलब्ध होणे हे मराठी भाषेच्या ज्ञानभाषा होण्यावर शिक्कामोर्तब करणारे ठरेल यात शंकाच नाही. यासाठी जुन्या दर्जेदार  आणि उपयुक्त ग्रंथांना युनिकोड रुपात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करणे गरजेचे आहे. अशा स्वरूपाचे काम केल्यानंतर सहज उपलब्धता, सुधारणा, भाषेचा जास्तीत जास्त वापर असे फायदे होऊ शकतील.
     मराठी ही राजभाषा आणि महाराष्ट्रात अधिकृत व्यवहार भाषा असली तरीही सर्वच शासकीय यंत्रणांमध्ये या भाषेचा योग्य वापर होत नाही. विविध शासन निर्णयांवरील बोजड मराठी भाषा, इंग्रजीचा अधिक वापर याचेही दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे शासकीय पातळीवरील मराठीचा वापर या ज्ञानभाषेला बळ देऊ शकेल.

खरे तर मराठी ही ज्ञानाची भाषा आहेच. तिच्या वापरकर्त्यांच्या अज्ञानामुळे तिची वाढ खुंटली आहे. परंतु अलिकडच्या काळात ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, मराठी बोला चळवळ, मराठी साहित्य मंडळे यांसारख्या चळवळींमुळे मराठीच्या प्रसाराला खतपाणी मिळत आहे. या वरकरणी लहान वाटणाऱ्या उपक्रमांतून उद्याच्या पराक्रमाची पायाभरणी केली जाते हे निश्चित. या सर्वांना बळ मिळो आणि एक समर्थ ज्ञानभाषा म्हणून मराठीची घोडदौड जग पादाक्रांत करो ही सदिच्छा.

- श्री. तुषार चंद्रकांत म्हात्रे (माध्यमिक शिक्षक)
शाळा: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र, ता.वसई (पालघर)
फोन : 9820344394
इ-मेल : tusharmhatre1@gmail.com

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...