Search This Blog

Saturday, July 6, 2019

भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!

भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!

    भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात खरिपात म्हणजेच पावसाळी हंगामात प्रामुख्याने भातशेती होते. जिल्ह्यात लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होते, यंदाही होण्याची शक्यता आहे. या वर्षी जून महिन्याच्या पहील्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मध्यंतरी फोनच्या नेटवर्कप्रमाणे अचानक गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. या पावासामुळे लावणीच्या हंगामाला सुरूवात होईल; काही भागात भात लावणीला प्रारंभदेखील झाला आहे. योग्य वातावरणाचा फायदा घेत सर्वत्र भात लावणी होत असली, तरी काही गावांमध्ये मात्र लावणी सुरू होण्यासाठी विशिष्ट दिवसाची वाट पहावी लागते. संपूर्ण गावात ‘तो’ विशिष्ट दिवस आल्याशिवाय लावणी करायची नाही असे संकेत आहेत. आधुनिक काळात असे खरेच कुठे घडते का?

     मुंबई-गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील जिते नावाचे एक सर्वसामान्य गाव. या गावात जुलै महीन्याच्या पहील्या आठवड्यात एक जत्रा संपन्न झाली. महाराष्ट्रातील विविध जत्रांचा हंगाम कधीचाच संपून गेला असताना, भर पावसात ही कसली जत्रा भरते याचेच सर्वांना आश्चर्य वाटेल. यावर्षीच्या जत्रेत गावातील म्हात्रे कुटूंबियांनी एकत्र जमून जवळच्या म्हसोबाला बोकडाचा नैवेद्य दाखवला. सगळ्यांनी मिळून जेवण केले. चांगले पीक यावे म्हणून प्रार्थना केली. असे प्रत्येक वर्षी कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा देवाला बळी देऊन भात लावणीस सुरूवात होते. इथले स्थानिक लोक या जत्रेला पालं जत्रा किंवा पाले जत्रा म्हणतात. ही जत्रा होईपर्यंत गावातील शेतकरी भात लावणीस सुरूवात करत नाहीत. चुकून एखाद्याने जत्रेपूर्वीच लावणी केली तर त्याला ‘गावकी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या समांतर न्यायव्यवस्थेकडून दंडही आकारला जातो.

   पाल म्हणजे वसती. एकाअर्थी ही नव्या वसतीची जत्रा. तर ‘पाले’ या शब्दाचे उगमस्थानही शेतीशी संबंधित असल्याचे संदर्भ आहेत. नव्या वसतीसाठीच्या दैवतांमध्ये ‘केत्रपाले’ हा उल्लेख आढळतो. केत्रपाले म्हणजे ‘क्षेत्रपाल’. याचा अर्थ ‘शेतांचा संरक्षक’ असा होतो. हे विशेषण काही ठिकाणी शिवाला वापरले गेले आहे, परंतु जास्त वेळा शेषालाच क्षेत्रपाल संबोधले जाते. शेतात अधून मधून दिसणाऱ्या सापाला या कारणांमुळेच राखणदार मानले जात असावे. थोडक्यात ‘पाले जत्रा’ म्हणजेच शेताचा संरक्षक मानल्या जाणाऱ्या देवाची जत्रा.
    असाच काहीसा प्रकार उरण तालुक्यातील काही गावांमध्येही घडतो. इथे लावणीच्या आरंभाबरोबरच गावातील रोगराई, इडा-पीडा टाळण्यासाठी ग्रामदैवताला मान दिला जातो. गावावरील संभाव्य संकट टाळण्यासाठी एका परडीत खाण्याचे पदार्थ आणि इतर मानाच्या वस्तू ठेवून वेशीबाहेर सोडून दिल्या जातात. यानंतर ‘हम साथ साथ है’ म्हणत तिखटाचे म्हणजेच मांसाहारी जेवण केले जाते. त्यामुळेच की काय या कार्यक्रमाला ‘साथ’ असे म्हणतात.
या साथीचे ओली आणि सुकी असे दोन प्रकारही आहेत. मांसाहार अर्पण केला असेल तर ओली साथ आणि फक्त नारळ असेल तर सुकी साथ म्हटले जाते. उरणपूर्वेकडील टाकीगांव येथे यावर्षी केवळ नारळ अर्पण करून लावणीला सुरूवात झाली. रायगडच्या दक्षिणेकडील माणगांव, महाड परिसरातही अशाच प्रकारे लावणीपूर्वीची जत्रा असते. भरघोस पीक यावे म्हणून देवाला मान-पान दिले जात असल्याने या जत्रेला इथे ‘हिरवळीचं देणं’ म्हणतात. ज्या पीकांवर आपला उदरनिर्वाह चालतो, त्या अन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. थोड्या फार फरकाने राज्याच्या इतर भागातही ही पावसाळी जत्रा साकारत असते. कधी या साथीतल्या नैवेद्याचा मानकरी वेताळदेव असतो, तर कधी बहीरीदेव, बापदेव, वाघेश्वर, म्हसोबा किंवा वेशीवरचा कोणताही ग्रामदेव.महाराष्ट्रातील जुनी ‘गावसई’ची प्रथाही अशीच आहे. या अत्यंत जुन्या प्रथेत भगत ठरवेल त्या दिवशी सर्व स्थानिक देवता, भुतेखेते यांची शांती केली जाते. गावातील व्यक्तींना सात किंवा नऊ दिवस गावाच्या बाहेर रहावे लागे. या काळात शेतावर राहून आणि आवश्यक ती पूजाअर्चा, रक्तबळी झाल्यानंतर रहिवासी भरघोस पीक, कमी रोगराई आणि सर्वांची वाढती सुबत्ता येण्याच्या विश्वासाने परत येत. स्थळ, श्रद्धास्थाने बदलत राहतात पण भाबड्या भक्तांची श्रद्धा सर्वत्र तीच असते.

    या प्रथेचा उगम अगदी हजारो वर्षांपूर्वी असल्याचे संशोधकांचे म्हणने आहे.  ‘गावसई’च्या प्रथेतील परत येण्याचा समारंभ म्हणजे पुनश्च केलेली वसती मानली जात असावी. मानव समूह जेव्हा एका जागी स्थिर नव्हता. सतत भटकत असायचा तेव्हापासून या प्रथा निर्माण झाल्या असल्याची शक्यता आहे. कृषिपूर्व काळातील लोकांच्या नेहमीच्या रस्त्याला त्यांची देवस्थाने असत. याच चौरस्त्यांवर सुफलतेचे विधी एकत्रपणे साजरे होत.
सतत स्थलांतर होत असल्याने अलिकडच्या काळाप्रमाणे जमिनीवर मालकी असण्याचा प्रश्नच नव्हता.  त्यामुळे जमिनीची मालकी ही प्राचीन कल्पना नाही. रानावनांत राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने जमीन ही मालमत्ता नसून तो केवळ एक भूदेश असायचा. हा भूदेश नांगराने कसला जाईपर्यंत तिथल्या शेतीला फारसा अर्थ नव्हता. शेतीसाठी तत्कालीन मानवाला सुपिक जमिनीवरील जंगल साफ करणे भाग होते आणि आपल्या मोसमी पावसाच्या प्रदेशात ते लोखंडी अवजाराशिवाय शक्य होणार नव्हते. नव्याने वसती करताना लोखंडी अवजारांचा वापर होत गेला. जसजसे जंगल तुटू लागले, तसतशा वस्त्या स्थिर होत गेल्या. रायगड जिल्ह्यात स्थिर शेती करणारी गावे वसली तरी भ्रमंती काळातल्या जुन्या प्रथा अजूनही विस्मृतीत गेल्या नाहीत.
    रायगडच्या प्रत्येक वाडी-वस्तीत अशा कित्येक प्रथा आणि कथा दडलेल्या आहेत. या प्रथा चांगल्या की वाईट हा विषय तूर्तास बाजूला ठेवला आणि या प्रथांचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला तर इथल्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा नक्कीच सापडतील. चला शोधूया मग!

    - तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

विशेष आभार: संतोष म्हात्रे (भोम), प्रशांत परदेशी(टाकीगांव), प्रतिक्षा म्हात्रे (जिते), मानसी साळुंखे (अलिबाग)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...