Search This Blog

Thursday, March 18, 2021

कांदळवनांतील वांदळा

         दोन हजार अठरा सालच्या नोव्हेंबर महिन्यातील घटना. बंगालच्या उपसागरातून ‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडूतील नागपट्टणमच्या किनाऱ्याला धडकले. वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पाऊस यांमुळे किनारी भागाला मोठे नुकसान सोसावे लागले. या चक्रीवादळातून तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील मुथुपेठ आणि जावपास हा भाग आश्चर्यकारकरित्या बचावला. यामागील कारण शोधले असता अभ्यासकांना असे दिसून आले की, या गावांभोवती कांदळवनांचे आवरण होते. कांदळवनांनी किनारपट्टीचे रक्षण करण्याचा अनुभव तसा नवा नाही. याच कांदळवनांमुळे २००४ सालच्या त्सुनामी पासून आपल्या देशातील किनारी भागाला संरक्षण मिळाले होते.
         चंद्राच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात कांदळवने अर्थातच खारफुटीची जंगले आढळतात. विविध प्रकारच्या खारफुटी वनस्पतींनी समृद्ध असे हे जंगल ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था म्हणून ओळखली जाते. या वनांचे महत्त्व ओळखून आपल्या राज्याने कांदळवन संवर्धनासाठी वन विभागाअंतर्गत स्वतंत्र ‘कांदळवन कक्ष’(Mangrove Cell) स्थापन केला. देशामध्ये केवळ महाराष्ट्रात असा उपक्रम राबवला गेला आहे. कांदळवन कक्षाअंतर्गत या वनांतील एका वृक्षाला 'राज्य कांदळवन वृक्ष' घोषित करण्यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव पुढे 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत मंजूर झाल्याने महाराष्ट्र हे देशातील 'राज्य कांदळवन वृक्ष' म्हणून घोषित करणारे पहिले राज्य ठरले आहे. ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या या वृक्षाचे नाव ‘पांढरी चिप्पी’. राज्याद्वारे निवड केलेल्या जीवजातींतील शेकरू,हरियाल, जारूळ, ब्ल्यू माॅरमॉन आणि आंबा या सर्वांच्या यादीत आता पांढऱ्या चिप्पीचा समावेश झालाय. या वृक्षाचे शास्त्रीय नाव सोनेरेशिया अल्बा (Sonneratia alba) असे आहे. यातील ‘अल्बा’ हा लॅटिन शब्द पांढरा या अर्थाने आला आहे. हा रंग या वृक्षाला येणाऱ्या सुंदर पांढऱ्या फुलाशी संबंधित आहे.

ही फुले रात्री उमलतात व दिवसभर कोमेजलेल्या अवस्थेत राहतात. नवी मुंबईजवळील स्थानिकांच्या दृष्टीने या सर्व खारफुटी वनस्पती म्हणजे ‘बाऱ्हांची झारा’; तर या बाऱ्हांमध्ये आढळणाऱ्या पांढऱ्या चिप्पीला कांदळ, वांदळा, वांधळा अशा विविध नावांनी ओळखले जाते. भारतीय उपखंडासह आफ्रिका, ऑस्ट्रेलिया भागांतील खाडीकिनारी हा सदाहरित वृक्ष दिसून येतो. साधारणपणे तीन ते पंधरा मीटर उंचीचे वृक्ष सर्वत्र आढळतात. अपवादात्मक पण अनकूल परिस्थितीत तीस  मीटरची उंची गाठलेले वृक्षही आढळले आहेत. ओहोटीच्या वेळेस या अधिवासातील वृक्षांच्या आजूबाजूला पाहिल्यास वाढदिवसाच्या केकला खोचलेल्या मेणबत्त्यांप्रमाणे चिखलातून वरच्या दिशेने आलेली मुळे दिसतात.
             कायम दलदलीत राहील्याने मुळांना लागणारा ऑक्सिजन मिळविण्यासाठी अशी मुळे उगवलेली असतात.
या वृक्षाची पाने व फळे कच्ची अथवा शिजवून खाल्ली जातात. पूर्व आफ्रीकेत मात्र या वृक्षाची पाने उंटांचे खाद्य म्हणून प्रसिद्ध आहेत. कच्ची फळे आंबट असल्याने त्यांचे लोणचे बनवता येते. त्यातील आम्लतेमुळे व्हिनेगर बनवण्यासाठी त्याचा वापर होतो.

पुढे ही फळे पिकल्यानंतर त्यांना चीजसारखी चव येते.  अशी फळे जगभरात खाल्ली जातात. जंतविकार व श्वसनविकारांवरील उपचारपद्धतीमध्ये या फळांचा वापर होतो. लहान जखमांसाठी जंतुनाशक म्हणूनसुद्धा ही वनस्पती उपयुक्त ठरते. जळणासाठी इंधन म्हणून या वृक्षाचा वापर होतो. परंतु या लाकडात क्षार अधिक प्रमाणात असल्याने ‘जाळ नी धूर संगटच’ असा प्रकार घडून येतो. यामुळे वांदळ्याचा जळणासाठीचा वापर मर्यादित राहिला आहे. आकाराने व वयाने वाढलेल्या  वृक्षाच्या आतील लाकूड अतिशय टिकाऊ व मजबूत असते. लाकडाचे नुकसान करणारे किडे या वृक्षाच्या नादी लागत नाहीत.

त्यामुळे जहाजबांधणी, लाकडी पुल, घरासाठीदेखील या लाकडाचा काही प्रमाणात वापर होतो. विळा, कोयते यांची थरव म्हणून ओळखली जाणारी लाकडी मूठ या वृक्षापासून बनवली जाते. पण त्याचबरोबर या लाकडाचा वापर करताना त्यातील क्षारांमुळे बांधकामातील खिळे लवकर गंजू शकतात. यासाठी गंजरोधक क्षमता असलेले विशिष्ट प्रकारचे खिळे वापरता येतात. जमिनीवरील श्वसनमुळांपासून बुटांचे लाकडी सोल व चपला तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. पांढऱ्या चिप्पीच्या खोडापासून तपकिरी रंग (dye) मिळवता येतो.
     समुद्रकिनाऱ्यावरील माती धरून ठेवणारा हा वृक्ष, भरती-ओहोटीच्या क्षेत्रातील परिसंस्था निर्माण होण्यास व तेथील जैवविविधता टिकवून ठेवण्यास सहाय्य करतो. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणात ही खारफुटी वनस्पती सहजपणे टिकून राहिली आहे. दहा वर्षापूर्वी  इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत  या वनस्पतीचा समावेश केला. मात्र दर दोन वर्षांनी प्रकाशित होत असलेल्या वन सर्वेक्षण अहवालाच्या  महाराष्ट्रातील आकडेवारीचा विचार केल्यास खारफुटींचे क्षेत्र वाढल्याचेच दिसून येत आहे. असे असूनही जगभरातील किनारी भागातील मानवी हस्तक्षेपाचा वेग पाहता पुढील चित्र फारसे आशादायक वाटत नाही. अनेक नैसर्गिक संकटांमध्ये खारफुटींनी आपल्याला वाचवले आहे, आता आपणही त्यांना वाचवूया!

- तुषार म्हात्रे

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...