रयत: शतकानंतरची पहाट
दिवस होता विजयादशमीचा. एकोणिसशे एकोणिस सालातल्या ऑक्टोबरच्या चार तारखेचा प्रसंग. भाऊराव पायगौंडा पाटील नावाच्या कर्मवीराने कराड तालुक्यातील काले गावात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही घोषणा सर्वसामान्य रयतेला उत्कर्षाची संधी मिळवून देणारी ठरली. ही घोषणा होती रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची. स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात बहुजनांसाठी, ग्रामीण भागातील जनतेला सुशिक्षित करण्याचे काम या संस्थेने केले. स्वत:च्या मालकीची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव 'रयत शिक्षण संस्था' असणे स्वाभाविकच होते.
अथांग विस्तारणारा व दीर्घायुष्य लाभलेला वटवृक्ष या संस्थेचे बोधचिन्ह आहे. आजघडीला जवळपास साडेचार लाख विद्यार्थी या वटवृक्षाच्या छायेत अध्ययन करत आहेत. सातशेहून अधिक शाखा आणि सुमारे सोळा हजार कर्मचारी वर्ग यामुळे ही संस्था आशिया खंडात विस्ताराने सर्वात मोठी शिक्षणसंस्था ठरते. जागतिकीकरणाच्या रेट्यात ‘विद्यार्थ्यांचे शिकणे’ आणि ‘संस्थेचे टिकणे’ या दोन्ही गोष्टींचा विचार करता ‘रयत’ या नव्या प्रवाहात समर्थपणे उतरली असल्याचे लक्षात येईल. बदलती शैक्षणिक धोरणे, नवे विचारप्रवाह याबाबतीतही संस्थेने सकारात्मक भूमिका स्विकारली. ‘स्वावलंबन’ तत्वाची कास धरून रयत शिक्षण संस्थेने यावर्षी आपले शतक पूर्ण केले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने काही उल्लेखनीय प्रकल्प सुरू केले आहेत. शतकीय पल्ला गाठताना या नव्या प्रकल्पांमुळे, विचारप्रवाहांमुळे शिक्षणक्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.
अथांग विस्तारणारा व दीर्घायुष्य लाभलेला वटवृक्ष या संस्थेचे बोधचिन्ह आहे. आजघडीला जवळपास साडेचार लाख विद्यार्थी या वटवृक्षाच्या छायेत अध्ययन करत आहेत. सातशेहून अधिक शाखा आणि सुमारे सोळा हजार कर्मचारी वर्ग यामुळे ही संस्था आशिया खंडात विस्ताराने सर्वात मोठी शिक्षणसंस्था ठरते. जागतिकीकरणाच्या रेट्यात ‘विद्यार्थ्यांचे शिकणे’ आणि ‘संस्थेचे टिकणे’ या दोन्ही गोष्टींचा विचार करता ‘रयत’ या नव्या प्रवाहात समर्थपणे उतरली असल्याचे लक्षात येईल. बदलती शैक्षणिक धोरणे, नवे विचारप्रवाह याबाबतीतही संस्थेने सकारात्मक भूमिका स्विकारली. ‘स्वावलंबन’ तत्वाची कास धरून रयत शिक्षण संस्थेने यावर्षी आपले शतक पूर्ण केले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने काही उल्लेखनीय प्रकल्प सुरू केले आहेत. शतकीय पल्ला गाठताना या नव्या प्रकल्पांमुळे, विचारप्रवाहांमुळे शिक्षणक्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.
सेमी-इंग्रजी पर्यायाचा स्विकार:
रयत शिक्षण संस्थेतील शाळांचे प्रमुख माध्यम मराठी आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रातील नवपालकांचा इंग्रजी माध्यमाकडे असलेला ओढा सर्वश्रुत आहे. पालकांमध्ये असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणाची झळ संस्थेलाही बसू लागली होती. परिणामी संस्थेच्या काही शाळांमधील विद्यार्थीसंख्या वेगाने घटू लागली. आपल्या देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्चशिक्षण हे इंग्रजी भाषेतून उपलब्ध असल्याने, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना या उच्चशिक्षणासाठी सक्षम करणे हे संस्थेचे ध्येय होते. या आव्हानांवरील सुवर्णमध्य म्हणून संस्थेने ‘सेमी-इंग्रजी’ या द्वीभाषा माध्यमाचा स्विकार केला. परिणामी संस्थेतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एक नवा पर्याय उपलब्ध झाला. तसेच विद्यार्थीसंख्या टिकवणेही शक्य झाले. या नव्या पर्यायासाठी शिक्षकवर्गाला सक्षम करणे गरजेचे होते. यासाठी संस्थेने शासकीय मदतीची वाट न पाहता संस्थापातळीवर विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली. पूरक अध्यापन साहीत्य निर्माण केले. यामुळे सेमी-इंग्रजीच्या पर्यायासाठी एक सक्षम व प्रशिक्षित शिक्षकवर्ग निर्माण करता आला.
रयत गुरूकुल प्रकल्प:
मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लावून आत्मविश्वास निर्माण करणे, गुणात्मक दर्जा उंचावणे, अभिरुचीचा शोध घेणे, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करणे. विविध शिष्यवृत्ती व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे. शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. गुरुकुलसाठी सुसज्ज वर्ग खोल्या, एलसीडी, संगणक, विज्ञान,गणित प्रयोगशाळा, पुरेसे क्रीडा साहित्य, संगीत, कला वर्ग या पायाभूत घटकांची पूर्तता केली जाते. कर्मवीर विद्याप्रबोधिनीअंतर्गत हा प्रकल्प राबविला जातो. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. या तुकड्यांना सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आले. मुलांसाठी सकाळी दोन तास व रात्री दोन तास अभ्यासिका घेण्यात येते.
यामध्ये कृतीयुक्त अध्यापनावर भर दिला जातो. इंग्रजी संभाषण, गटचर्चा होतात. परीक्षेनंतर शिक्षकाकडून प्रश्नानुसार सूक्ष्मगुण मूल्यांकन करून लिखित मार्गदर्शन केले जाते. उत्तर पत्रिकांची अंतर्गत व बाह्य तपासणी करून बाह्यतज्ज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन केले जाते. भाषावार वक्तृत्व स्पर्धा, तज्ज्ञांची व्याख्याने , क्षेत्रभेट, व्यवसाय मार्गदर्शन, कार्यशाळा, स्नेहसंमेलन यांचे आयोजन केले जाते. शतक गाठताना संस्थेने शिक्षणक्षेत्राला पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प सुरू केला आहे.
विज्ञान व तंत्रज्ञानाची कास:
भविष्यकालीन प्रगत युगासाठी संस्थेने विज्ञानदृष्टी निवडली. ‘रयत विज्ञान परिषद’ नावाच्या उपक्रमाद्वारे मोठ्या स्तरावरील विज्ञानमंथन घडवून आणले. विज्ञान संशोधन क्षेत्रातील शिक्षकांचा सहभाग वाढवण्याचे काम या परिषदेने केले. आतापर्यंत संस्थेच्या चार विभागांमध्ये ही परिषद संपन्न झाली असून, पुढील वर्षात संस्थेच्या दक्षिण विभागात ‘रयत विज्ञान परिषदे’चे आयोजन केले जाईल. याच परिषदेतून प्रेरणा घेऊन पुढे ‘रयत विज्ञान प्रकल्प’ आकारास येत आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेली वैज्ञानिक उपकरणे, विज्ञान खेळणी, शोधनिबंध, अॅक्टीवीटी बेस्ड लर्निंग, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग यांसारख्या विविध प्रकल्पांची निर्मिती व सादरीकरण रयत विज्ञान प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे. या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती निर्माण होण्यास मदत होत आहे.शालेय शिक्षणासह उच्चशिक्षणातही रयत शिक्षण संस्था नाविन्यपूर्ण बदल स्विकारत आहे.
क्रिकेटसारख्या खेळात ‘शतकाला’ खूप महत्त्व असते. पण काही वेळेस शतक ठोकलेला फलंदाज या टप्प्यावर थकलेला असतो. याच वेळेस लक्ष विचलित होऊन तो बाद होण्याची शक्यता असते. याऊलट काही फलंदाज शतकाला एक स्वल्पविराम समजून नव्याने पुढील डावाला सुरूवात करतात. हा शतकीय टप्पा गाठताना संस्थेसमोरही अनेक आव्हाने वारंवार उभी राहीली. परंतु या आव्हानांमुळे न थकता रयत शिक्षण संस्था जोमाने उभी राहीली. यापुढेही विविध समस्या निर्माण होतच राहतील. परंतु बाह्य परिस्थितीशी संघर्ष करूनच रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा राहीलाय, बहरलाय. संस्थेने नेहमीच स्वत:ला नविन आव्हानांसाठी तय्यार ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे जोपर्यंत आपल्या देशात ‘रयत’ आहे तोपर्यंत ‘रयत शिक्षण संस्था’ राहील हे नक्की!
- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)
Comments