शोले आणि ‘सांभा’ दगड
‘शोले’ चित्रपट रिलीज होऊन यंदा पन्नास वर्षे झाली. इतक्या वर्षानंतरही चित्रपट रसिकांमध्ये शोलेची जादू अजूनही कायम आहे. त्यातील दृश्ये, संवाद, गाणी अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. यातील केवळ मुख्य कलाकारच नव्हे, तर अगदी लहानात लहान भूमिका करणारेही तितकेच गाजलेत.
तुम्हाला “कितने आदमी थे?” असे म्हणत हातातला पट्टा दगडांवर घासत चालणारा गब्बर आठवत असेलच. गब्बरच्या जोडीला “अरे ओ सांभा!” असा आवाज दिल्यानंतर भल्या मोठ्या दगडावर नेम धरून बसलेला “जी सरदार!” म्हणनारा ‘सांभा’ही डोळ्यांसमोर येत असेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या आणि गब्बर कमाई करणाऱ्या या चित्रपटातल्या दगडांची कथाही तितकीच मनोरंजक आहे.
गेली पन्नास वर्षे ‘सांभा’ ज्या राखाडी रंगाच्या दगडांवर बसून गब्बरला उत्तरे देतोय, ज्या दगडांवर ‘जब तक है जान’ म्हणणाऱ्या बसंतीची पावले थिरकलीत, ते दगड तब्बल अडीचशे ते तिनशे कोटी वर्षांपासून तिथे उभे आहेत. बेंगलुरूजवळच्या रामनगरा जिल्ह्यातील हे दगड ‘रामनगर खडक’ याच नावाने ओळखले जातात. याच दगडांच्या पार्श्वभूमीवर रमेश सिप्पींनी गब्बरसिंगचा अड्डा उभा केला होता. आपण या दगडांना गंमतीने ‘सांभा- दगड’ म्हणूया. इथले एकमेकांवर तोलल्यासारखे उभे असणारे दगड आहेत ‘नाईस’(Gneiss) प्रकारातले. त्यांना ‘नीस’ असेही म्हटले जाते. खडकांचा हा प्रकार ग्रॅनाईट आणि बेसॉल्टपेक्षा थोडा तरूण आहे. जुने खडक वितळून नवे खडक तयार होताना तीव्र दाब असेल तर नीस तयार होतात. रामनगरातल्या निस खडकांच्या विशिष्ट रचनेला क्लोजपेट ग्रॅनाईट म्हणतात. हे राखाडी दगड पावसाळ्यात मात्र चमकत्या काळ्या रंगासारखे दिसतात.
चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जसे ‘शोले’चे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे, तसेच या दगडांचे सजीवसृष्टीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे साधेसुधे खडक नाहीत. हे खडक दोन क्रेटॉन्सच्या मध्ये आढळणाऱ्या खडकांपैकी आहेत.
आता हा ‘क्रेटॉन’ काय प्रकार आहे?
क्रेटॉनलाच ‘भूखंड केंद्रक’ किंवा ‘ढालक्षेत्र’ म्हटले जाते. थोडक्यात पृथ्वीच्या बाहेरच्या कवचाचा जुना आणि स्थिर भाग. पृथ्वीवरील खंडांचे वहन (Continental Drift) ऐकून असालच; या सगळ्या स्थित्यंतरातूनही शेकडो कोटी वर्षे कवचाचा फारसा न बदलेला भाग म्हणजे क्रेटॉन. सांभा दगड(जांभा नव्हे!) ज्या क्रेटॉनचा भाग आहे, त्याचं नाव आहे ‘धारवाड क्रेटॉन.’ हा क्रेटॉन पृथ्वीवरील सर्वात प्राचीन खडकांपैकी एक आहे. हे जवळपास अडीचशे ते तिनशे कोटी वर्षापूर्वीचे खडक. ऑस्ट्रेलिया, ग्रीनलँड आणि दक्षिण आफ्रिका या भागातच धारवाड क्रेटॉनपेक्षा जुने खडक सापडतात. इंडोनेशियातले काही खडक तर तीस कोटी वर्षापूर्वीचे आहेत. काही खडक तरूण तर काही जुने असे का झाले असेल?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. अंदाजे पाचशे कोटी वर्षे मागे. तेव्हा आपली सूर्यमाला जन्माला येण्याची प्रक्रिया सुरू होती. महास्फोटातून आपल्या सूर्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्याभोवती धूळ आणि खडकांचे तुकडे होते. पुढे या धूळ-खडकांमध्ये पुंजके बनू लागले. गुरूत्वाकर्षणाने मोठे खडक लहान खडकांना, धुळीला आपल्याकडे खेचत होते. यातूनच ग्रह तयार होऊ लागले. प्रत्येक ग्रहात वितळलेल्या खडकांचा गाभा होता. साडे चारशे कोटी वर्षापूर्वी आपली पृथ्वी सूर्याभोवती एखाद्या गरम गोळ्यासारखी फिरत होती. हा गोळा पाहूनच “लोहा गरम है!” सारखा संवाद सलिम-जावेद यांना सुचला असावा इतकं लोखंड त्यात होते. सोबतीला काही जड मुलद्रव्येही त्यात होती.
या पृथ्वीवर वितळलेले खडक आणि धातू यांच्या लाव्हारसाच्या लाटा पृथ्वीवर येत होत्या. यादरम्यान एका लघुग्रहाची पृथ्वीला धडक बसल्याने निर्माण झालेल्या उष्णतेने पृथ्वी पूर्णत: वितळून गेली. या घटनेनंतर पृथ्वीमधील पदार्थांचे थर तयार होऊ लागले. सर्वात आतमध्ये लोखंड आणि निकेल होते. त्याभोवती कमी घनतेचे पण मोठ्या आकाराचे प्रावरण घडले. प्रावरणाच्या वर कवच घडले. हे विभाजन होत असताना पृथ्वीवर उल्कांचा पाऊस पडतच होता. पृथ्वीचा जन्म झाल्यापासून सुमारे अडीचशे कोटी वर्षांपर्यंत अवकाशातील मोठ्या या वस्तू पृथ्वीला टकरा देतच होत्या. यामुळे कवचाला खड्डे पडून त्यातून वितळलेले धातू पृष्ठभागावर येत राहीले. या धातूंपैकी लोखंड हा धातू मोठ्या प्रमाणावर वर येत राहीला. लोखंड या धातूने द्रवांशी व वायूंशी प्रक्रिया करत नवनवी रसायने घडवली. पुढे पृथ्वीचे पृष्ठ कडक होत सलग खडकांचे कवच बनत गेले. सुमारे तिनशे कोटी वर्षानंतर धारवाड क्रेटॉन घडवणाऱ्या ग्रॅनाईटसारखे खडक घडायला लागले.
शिलारस भूपृष्ठावर येऊन सावकाश थंड होऊन ग्रॅनाईट घडतात. या संथपणाने झालेल्या क्रियेमुळे खडक कठीण होतो आणि खनिजांचे स्फटिकही आकाराने मोठे होतात. तज्ञांच्या मते भारतीय जमिनीच्या तळाशी मुख्यत: धारवाड खडक आहेत. जय विरू ज्या दगडांच्या पाठीमागे लपून गब्बरशी लढा देतात ते दगड पृथ्वीवरील कित्येक स्थित्यंतराचा सामना करत दिमाखात उभे आहेत. हे दगड लक्षवेधी दगड धारवाड एक खडकाचाच भाग आहेत. याच खडकांवर खऱ्या अर्थाने आपला देश उभा आहे.
आता हा लेख वाचल्यानंतर कधी पुन्हा एकदा शोले पहाल तेव्हा गब्बरसिंगचा अड्डा आणि तिथला ‘सांभा’ दगड आवर्जून पहा. चित्रपटातील दृश्ये तुम्हाला पन्नास वर्षावरून थेट शेकडो कोटी मागची मनोरंजक कहाणी सांगू लागतील.
- तुषार म्हात्रे
(संदर्भ: इंडिका- प्रणय लाल)
Comments