Search This Blog

Wednesday, November 1, 2023

पिंडीरुपातील स्मृतीचिन्हे

पिंडीरुपातील स्मृतीचिन्हे
    महान कार्य करणाऱ्या विभूतींची स्मारके सर्वत्रच उभारली जातात. आपल्या देशात अगदी प्राचीन काळापासून स्मारकांची परंपरा आहे. विशिष्ट प्रकारच्या स्मृतींना दृश्य रुप देण्याच्या प्रयत्नातून  ही पद्धत सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. प्रदेशानुसार त्याचे स्वरूप जरी बदलत असले तरी आपल्या प्रियजनांची आठवण टिकवून ठेवणे ही भावना सर्वत्र सारखीच आहे. रायगड जिल्ह्यात स्तंभ, देवळी, छत्री, तुळशीवृंदावन, वीरगळ, सतीशिळा अशा स्वरूपातील स्मारके आढळतात. महाराष्ट्रात ज्या छत्री आढळतात, त्यातील बहुसंख्य मराठ्यांच्या काळातील आहेत. स्मारक, समाधींचे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्यासाठी उभारलेली मेघ-डंबरी हा छत्रीचाच प्रकार.
जिल्ह्यातील रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील छत्री, पाचाडला राजमाता जिजाबाईंची छत्री आणि अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांची छत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाच्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणच्या घुमटीवजा देवळीही प्रसिद्ध आहेत. या स्मारकांसह आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार रायगड परिसरात पहायला मिळतो.
       कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे नावाचे स्थानक लागते.  रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बऱ्यापैकी दाट वस्तीचे हे गाव. विन्हेरे येथे रयत शिक्षण संस्थेचे एक हायस्कूल आहे.
या विद्यालयाच्या परिसरात फेरफटका मारताना काही वस्तू आपले लक्ष वेधतात. शाळेच्या बाहेरील रस्त्यावरील एका थांब्याला उभे राहीलो असता, एका वृक्षाखाली एक-दोन लहान आकाराचे दगडी शिवलिंग ठेवलेले आढळतात. या शिवलिंगांचे पूजन होत असल्याच्या कोणत्याही खुणा तिथे नाहीत. स्थानिकांच्या दृष्टीने हे नेहमीचे चित्र, परंतु नव्याने पाहणाऱ्याला मात्र यात थोडे आश्चर्य वाटू शकेल. याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर एक कौलारू छप्पर असेलेले सुंदर असे ‘स्वयंभू नागेश्वर महादेव मंदिर’ आहे.
मंदिरात शिवलिंगासह नंदी व कासवाच्या थोड्या अलिकडच्या प्रतिकृती पहायला मिळतात. मंदिराबाहेर नजर टाकल्यास एका चौथऱ्यावर चार पाच दगडी वस्तू आहेत, यापैकी दोन स्पष्टपणे लिंगरुपात असून उरलेल्या वस्तूंवर शिवलिंग कोरण्यात आले आहे. एका तुळशीवृंदावनाच्या शेजारीही सुंदर शिवलिंग आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाहीले असता तेथील गवतामध्येही काही गोल, चौकोनी आकारांचे दगडी शिवलिंग दिसून येतात. एखाद्या परिसरात इतक्या मोठ्या संख्येने अशा वस्तू आढळणे ही तशी दुर्मिळ बाब.
     असाच काहीसा प्रकार काही वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातील आंबिवली या गावात पहायला मिळाला होता. २०१३ साली आंबिवली गावातील कोंडीराम तानाजी खेडेकर यांनी त्यांच्या घराशेजारी गोठा बांधण्यासाठी पाया खोदायला सुरुवात केली असता तिथे एकामागून एक लहान-मोठय़ा आकाराचे आठ दगडी शिवलिंग आढळून आले. यातले काही शिवलिंग आयताकृती, तर काही गोल अशा रचनेच्या होत्या. या पिंडी साधारण तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या असल्याचे तज्ञांनी सांगीतले.
या दोन्ही ठिकाणांमधील साम्य म्हणजे दोन्ही परिसरांत आढळलेल्या प्राचीनत्वाच्या खुणा. महाडच्या या मंदिराबाहेरील कुंपणाला एक अप्रतिम कलाकुसर असलेली सतीशिळा आहे, तर कर्जतच्या आंबिवली परिसरात शिलाहारकालीन मूर्ती आढळल्या आहेत. अर्थातच या परिसरातील शिवलिंगांचाही जुन्या काळाशी संबंध आहे. इतक्या मोठ्या संख्येने आढळणाऱ्या या शिवलिंगांचे कारण काय असावे?
शिवलिंग अथवा पिंडी म्हणजे एक प्रकारचे स्मारकच...
   प्राचीन काळी मृत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ पिंड तयार करण्याची पद्धत होती. विन्हेरे व आंबिवलीतील पिंडी ही अशाच प्रकारची स्मारके आहेत. या वस्तूंद्वारे येथे राहणाऱ्या तत्कालीन महनीय व्यक्तींच्या स्मृती या पद्धतीने जतन केल्या आहेत.
पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या समाधीस्थळावरही शिवलिंग कोरले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर शिवमंदिराबाहेरही अशा पिंडी ठेवल्या आहेत.

मृत व्यक्तीच्या पुढे ‘कै.’ अर्थात ‘कैलासवासी’ असे संबोधन लिहिण्याची प्रथा आहे. मृत्यूनंतर ती व्यक्ती शिवाशी एकरूप झाली अशा अर्थाने ही स्मृती चिन्हे तयार होत गेली. आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ तयार केलेले शिवलिंग पुढे गावाच्या वेशीजवळ अथवा शिवमंदिराजवळ ठेवले जात असत. हे शिवलिंग स्मृतीचिन्ह असल्याने त्याला पूजेचा मान मिळण्याची शक्यता नसते. त्याचबरोबर त्याचे महत्त्व न जाणल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊन कालांतराने ही चिन्हे झाकली जातात. यातूनच आंबिवली सारखी उत्खननात शिवलिंग सापडण्याच्या घटना घडतात. यापैकी काही घटनांना कधी ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होते, तर कधी धार्मिक. दोन्ही कारणांमुळे त्या वस्तूंवरील वर्षानुवर्षाची साठलेली धूळ झाडली जाऊन त्या सर्वसामान्यांच्या नजरेसमोर येत राहतात. विन्हेरे, आंबिवलीसारखी कित्येक ठिकाणे या जिल्ह्याच्या पोटात दडलेली आहेत. या ठिकाणांवरील वस्तू ‘स्वयंभू’ होऊन प्रकटण्याची वाट पाहण्याऐवजी थोडा ‘स्वयंशोध’ घ्यायला हरकत नसावी.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(फोटो साभार: सिताराम झुराळे, विन्हेरे हायस्कूल)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...