Search This Blog

Friday, December 14, 2018

सागरातील अष्टपैलू खेळाडू

 सागरातील अष्टपैलू खेळाडू
 फिफा विश्वचषक 2010 मधील अंतिम सामन्यास थोडाच अवधी बाकी होता. ऑरेंज आर्मी नेदरलँड आणि टिकी-टाका साठी प्रसिद्ध स्पेन आमनेसामने येणार होते. या प्रसंगी दोन्ही संघातील खेळाडू, त्यांचे उत्साही मार्गदर्शक आणि संभाव्य डावपेच यांविषयी फुटबॉल चाहत्यांमध्ये चर्चा होणे स्वाभाविकच होते. परंतु या धामधुमीच्या वातावरणात संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते जर्मनीकडे. नाही, जर्मनीच्या संघाकडे नाही; जर्मनीच्या ‘पॉल’ बाबाकडे. युरो 2008 स्पर्धेत आपल्या अचूक भविष्यवाणीने सर्वांना आश्चर्यचकीत करणाऱ्या ‘पॉल’ने या अंतिम सामन्यातही ‘स्पेन’ विश्वविजेता ठरण्याचे दिलेले संकेत अचूक ठरले. मनुष्यप्राण्याद्वारे दोन पायांनी खेळल्या जाणाऱ्या या खेळाचे भविष्य सांगणारा हा ‘पॉल’बाबा स्वत: मात्र आठ पायांचा(की हातांचा?) होता. हा पॉल बाबा म्हणजे समुद्री अष्टपैलू खेळाडू असणारा पॉल नावाचा ‘ऑक्टोपस’

        माकळी, माकूल या स्थानिक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मोलुस्का (Mollusca) या संघातील या प्राण्याच्या सामान्य प्रजातीचे नाव आहे ऑक्टोपस व्हल्गरीस (Octopus vulgaris). डोक्यापासून निघालेले आठ पाय आणि सहज न दिसणारी पोपटासारखी चोच हे या प्राण्याच्या शरीररचनेची ओळख. ऑक्टोपसच्या मृदू शरीरातील चोच हा एकमेव कठीण भाग. याच मजबूत तोंडाने तो शिंपले, खेकडे, कोळंबी यांसारख्या कवचधारी प्राण्यांचा फडशा पाडतो. या चोचीने शिंपल्याचे कवच फोडण्यात अपयश आल्यास कवचाला छिद्र पाडून आतील भागही तो खाऊ शकतो. या कामी त्याला सोंडेसारख्या आठ हातांचे सहाय्य लाभते. या हातांवरच लहान आणि अत्यंत गुंतागुंतीच्या स्नायूंनी बनलेले शेकडो चूषक(Suckers) असतात. हे चूषक एखाद्या सक्शन कपप्रमाणे काम करतात. आपल्या भक्ष्याचे मांस फाडता येईल इतकी ताकद या या चूषकांमध्ये असते. गरजेवेळी त्यांचा वापर करून माकळीला वजनदार वस्तूही उचलता येते. अन्नाच्या शोधात फिरताना कधी कधी तो स्वत:ही दुसऱ्याचे अन्न बनायची वेळ येते.  अशावेळेस आपल्या शरीरात साठवलेली मेलॅनीनयुक्त शाई उधळून शत्रूला गुंगारा देण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतो. या शाईमुळे परिसराची दृश्यमानता कमी होतेच, पण शत्रूच्या डोळ्यांची जळजळ होऊन स्व:बचावकार्यात मदत होते. त्यातूनही निभावले नाही तर भक्षकाच्या हाती लागलेले आपले हात त्यागून तो पळून जातो. ऑक्टोपसवर हल्ला करणारा प्राणी मात्र ‘देणाऱ्याचे हातही घ्यावे’ हे शब्द खरे करत हात चोळत बसतो. अर्थात आठ-आठ हात असणाऱ्या ऑक्टोपसला हे हस्तदान परवडते आणि काही कालावधीनंतर हा अवयव नव्याने उगवतोदेखिल.

         समुद्राच्या विशाल मैदानातील ऑक्टोपस हा एक मुरलेला खेळाडू मानला जाईल इतके कौशल्य त्याच्या अंगात आहे. बचावपटूंच्या अभेद्य भिंतीला चकवून अत्यंत वेगाने गोलपोस्टकडे धावणाऱ्या मेस्सीला आपण पाहीलेय. पृथ्वीवरील अत्यंत लवचिक असणाऱ्या प्राण्यांपैकी एक असलेला ऑक्टोपसदेखिल या फुटबॉलपटूंप्रमाणेच अत्यंत अरूंद जागेतून सहजपणे मार्ग काढू शकतो. बाह्यआकारावरून मोठा भासणारा हा प्राणी वेळप्रसंगी एखाद्या बाटलीतही मावू शकतो. रोनाल्डो- मेस्सी यांसारखे खेळाडू अनेक चाहत्यांच्या हृदयात विराजमान असतात, तर याऊलट ऑक्टोपसच्या शरीरातच अनेक हृदय विराजमान असतात. या प्राण्याला तीन हृदय असतात. त्यापैकी दोन लहान हृदय कल्ल्यांजवळ असून तेथून मिळालेले ऑक्सिजनयुक्त रक्त मोठ्या हृदयाकडे पाठवण्याचे काम करतात. पुढे मोठ्या हृदयाद्वारे हे रक्त संपूर्ण शरीरभर पसरवले जाते. या ऑक्टोपसने आपल्या प्रेयसीला रक्ताने पत्र वगैरे लिहलेच तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही कारण या प्राण्याच्या रक्ताचा रंगही शाईप्रमाणे निळाच असतो. मानवी रक्तामध्ये असणाऱ्या लोहाऐवजी माकळीमध्ये ताम्रयुक्त रक्त असते, ज्यामुळे त्या रक्ताला निळसर रंग प्राप्त होतो. रक्तातील याच घटकांमुळे थंड आणि अल्प ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या वातावरणातही शरीरात ऑक्सिजनचे वहन योग्य रितीने होण्यास मदत होते.

          हा प्राणी समुद्री जगतातील एक हुशार प्राणी म्हणून ओळखला जातो. एखाद्या पक्ष्याच्या मेंदूइतकाच त्यांचा मेंदू लहान असतो, तरीही त्या मेंदूचा कल्पक वापर त्यांच्याकडून होतो. शिंपले उघडण्यासाठी ते उपलब्ध साधनांचा वापर करू शकतात. एका प्रयोगामध्ये ऑक्टोपस बाटलीचे झाकणही उघडू शकतो, असे दिसून आले. ‘मेंदू गुडघ्यात असणे’ असे एखाद्याची अक्कल काढण्यासाठी बोलले जाते. पण पाण्याखाली खरंतर याऊलट घडते. कारण माकळीच्या शरीरातील दोन तृतीयांश चेतासंस्था त्याच्या पायांमध्ये सामावलेली असते. यामुळेच ‘थ्री इडीयटस्’ मधील ‘प्रोफेसर व्हायरस’प्रमाणे एकाच वेळेस अनेक कामे करता येणे त्याला शक्य होते. पायांतील चेतापेशींमुळे शरीरापासून वेगळे झाल्यानंतरही हे अवयव वेदनांना प्रतिसाद देतात. मानवाला जशी चमचमत्या आभूषणांची आवड असते तशीच आवड माकळीलाही आहे. आपला अधिवास असलेल्या जागी अशा चमकत्या वस्तू आणून तो परिसर सजवण्याचे काम ऑक्टोपस करतो. या परिसराला ‘ऑक्टोपस गार्डन’ म्हटले जाते.
       समुद्रातील या वेगळ्या जीवाचे काही भाईबंद याहूनही नखरेबाज आहेत. बहुरूप्या ऑक्टोपस (Mimic octopus) आपल्या शरीराची रचना आणि रंग बदलून  समुद्री सर्प, पाखट, मासा, जेलीफीश, दगड, वनस्पती यांसारखे रुप घेऊ शकतो. तर  निळ्या कडीवाल्या ऑक्टोपसच्या(Blue-ringed octopus) एका दंशाने मृत्यूही होऊ शकतो.
       समुद्रातील हा खेळाडू आयुष्याच्या मैदानातून मात्र लवकरच निवृत्त होतो. प्रजोत्पादनाचे कार्य संपल्यानंतर या प्राण्याचा मृत्यू होतो. त्यांचे जीवनमान एक ते पाच वर्षांइतकेच असते. त्यामुळेच फुटबॉल सामन्यांचे निकाल सुचवणाऱ्या पॉलचा मृत्यूही लवकरच झाला. बंदिस्त टँकमध्ये राहून इतरांचे भविष्य उघड करणाऱ्या पॉलला त्याच्या मृत्यूचे भविष्य कोणी विचारलेच नाही. पॉल हयात नसला तरी त्याच्यासारखे कित्येक जीव अजूनही या सागरात नांदत आहेत. मानवाच्या हाती असलेले त्यांचे भविष्य सुरक्षित रहावे ही सदिच्छा!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...