Search This Blog

Wednesday, July 4, 2018

देवाचा गाव

देवाचा गाव
(उरण-पेण रस्त्यातील एक दैवी मार्ग)



उरणहून पेणकडे जाताना नेहमीचा रस्ता सोडून वशेणी गावाजवळून उजव्या हाताच्या वळणाकडे पाहीलं की ‘दादर’ असे लिहलेला एक  दिशादर्शक बाणाचा फलक दिसतो. या बाणाची आज्ञा पाळून वाट पकडली की एक पक्का डांबरी रस्ता आपले स्वागत करतो. रस्त्यावर टाकलेला कचरा चुकवत निघायचं. थोडंसच अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला पसरलेली खारजमिन दिसते. नाकाला खारा वारा झोंबू लागतो. मोकळ्या रस्त्यावर वाहनाने थोडा वेग घेताच समोर उरण आणि पेण तालुक्याला जोडणारा खाडीपूल समोर येतो. खारफुटीच्या हिरवाईने वेढलेला, दूरवर पसरलेला जलाशय आपल्याला थोडा वेळ थांबण्यासाठी खुणावतो. सूर्योदय-सूर्यास्त अशा दोन्ही वेळेस इथले सौंदर्य अप्रतिम भासते. या परिसरातील दृश्यश्रीमंतीच्या प्रेमात पडल्याने इथे शाहरूख खानने आपल्या ‘रईस’ चित्रपटातील काही भागाचं चित्रीकरण केले होते. या सौंदर्यांला सावधपणे न्याहाळत एक मोठे वळण घेऊन आपण उतरू लागतो. या मार्गाने उतरल्याबरोबर आधीच्या सभोवतालातील बदल जाणवतो. रस्त्यावर सांडलेली वाळू ही जाणीव अधिक तीव्र करते. चक्क रस्त्याला लागून पार्क केलेली एखादी होडी, वाळूचा(रेती) लहानसा ढीग आणि खारफुटीने वेढलेले रस्ते दिसतात.
फारशा रूंद नसणाऱ्या या रस्त्याच्या कडेला दलदलीच्या भागातील तुरळक वस्ती दिसू लागते. हा संतोषी पाडा. खारफुटीच्या हिरवाईने रंगलेल्या रस्त्यावरचा स्वप्नवत प्रवास संपून आपण जागे होतो, तोपर्यंत आपले वाहन एखाद्या खड्डयात आदळून कसेतरी सावरलेले असतो. खोल खड्डयांतून रस्ता चुकवतच आपल्याला पुढे जावे लागते.(कारण खड्डे चुकवायचा प्रयत्न केला तर रस्त्याच्या खालूनच वाहन चालवावे लागेल.) वाहनचालकाचं कौशल्य आजमवणारा प्रवास असाच चालू असताना, गावाची वस्ती सुरू होते. इथून पुढे आपण जे काही पाहतो, त्याला ‘दैवी दृश्य’च म्हणावे लागेल. तळ्याच्या काठावर असणाऱ्या रस्त्यावर पंधरा ते वीस गणपती कोणाचीतरी वाट पहात असल्यासारखे विराजमान झालेले- काही रंगीत तर काही पांढरे शुभ्र. आजूबाजूला काहीच नाही.
  नवख्या व्यक्तीला संभ्रमात पाडणारे हे दृश्य. पुढे जावं तर लहानशा शेतात एकाच आकाराचे पन्नासहून अधिक गणपती, तसेच पांढरेशुभ्र. हे ‘गणपती’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ‘ब्रँड’ म्हणून लोकप्रिय होत असलेल्या ‘पेणच्या गणेशमूर्ती’. सुमारे शंभर वर्षाची परंपरा असणारा ही कलाकृती. सुरूवातीला केवळ शाडूच्या असणाऱ्या या गणपतींनी काळाप्रमाणे बदलत ‘प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे’ रूप धारण केले आहे. या रस्त्यावरील जोहे- हमरापूर या गावांचा ही परंपरा टिकवण्यामागे आणि ब्रँड तयार होण्यात मोठा वाटा आहे. याच रस्त्याने पुढे जाऊन आपण जोहे गावात प्रवेश करतो. जागोजागी गणेशमूर्ती नेणारे लहान-मोठे ट्रक आपला प्रवास अधिक मंद करतात. या थांबत थांबत केलेल्या प्रवासात गणेशमूर्तींचे कारखाने अधिक जवळून पाहता येतात. साच्यातून मूर्ती काढण्यात मग्न झालेले, मांडी घालून फिरत्या पाटावरील गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवणारे अनेक कलाकार दिसतात.
बाहेरच्या वर्दळीशी देणं घेणं नसलेले, अंगावर प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे शिंतोडे उडालेले हे कलाकार या निर्जीव मूर्तीत प्राण ओतण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे वाटतात. काही ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया आणि घरातील लहान मुलेही कामाला हातभार लावताना दिसतात. इथल्या मूर्तीशाळा घरातच असतात आणि इथली घरे मूर्तीशाळेतच असल्यासारखी भासतात. या घरांच्या आतमध्ये, दरवाजात, ओट्यावर, पडवीत, अंगणात, माळ्यावर, रस्त्यावर  सर्वत्रच गणेशमूर्ती उभ्या असतात. अद्वैतात ‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी इश्वर वसलेला आहे’ असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याचे द्वैत रुप असेच असावे की काय? अशी शंका येते. पावसाळ्याच्या दिवसांत तर या गणेशमूर्तींचे कमी जागेतील व्यापून उरणे अधिकच जाणवते. या परिसरात गोऱ्या गोमट्या गणेशमूर्तींचे प्रमाण अधिक असले तरी अध्ये मध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या कलाकृतीही पहायला मिळतात. एकसारखेच दृश्य डोळ्यांसमोरून सरकत असताना अचानक समोर आलेली पाच-सहा फूटांहून अधिक उंचीची मूर्ती आपले लक्ष वेधते. एखादे शस्त्र धारण केलेली परंतु डोळ्यांत कृपाशिर्वाद देणारे भाव असणारी मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. ‘जय मल्हार’, ‘बाहुबली’, ‘बाजीराव पेशवा’ अशा ट्रेंडमध्ये असणाऱ्या गणेशमूर्तीही रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असतात. देवतांनी व्यापलेल्या या दैवी दृश्याने भारावून जात असतानाच अर्धवट काम झालेल्या, वाहतूक करताना मोडतोड झालेल्या गणेमूर्तीही आढळतात. पार्थिवतेची जाणिव करून देणारी ही दृश्ये पाहून दु:खही होतं, पण पुढे कधितरी हीच मूर्ती नवे साज चढवून तयार झालेली पाहीली की आनंदही होतो.
मातीला देवपण देणारी ही कला पाहीली, की कलेच्या देवतेचा या मूर्तीकरांवर विशेष आशिर्वाद असल्यासारखे वाटते.
गणेशाची विविध रुपे डोळ्यांसमोरून सरकत असताना वाहनांचा आवाज येत राहतो, सुरूवातीला हलका असणारा हा आवाज अधिक गडद होत जातो. मुंबई-गोवा महामार्ग जवळ आल्याचा तो संकेत असतो. सुमारे दहा किमीचा वळसा वाचवणारा, त्याचबरोबर एका वेगळ्या जगातून प्रवास घडवून आणणारा हा मार्ग. या दैवी मार्गाची निवड केल्यानेआपण सुदैवी ठरल्यासारखे वाटते. आपण पुढे जातो, मात्र पुन्हा याच मार्गाने परत यावे असे मनात ठरवूनच!

              - तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(सदर लेख दैनिक सकाळ, मुंबई आवृत्ती 4 जूलै 2018 मध्ये प्रसिद्ध झाला आहे)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...