Search This Blog

Wednesday, March 4, 2020

उत्सव गणरायाच्या विवाहाचा!

     शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय; कैलासावरील हे लहान आणि सुखी कुटुंब! सर्वसामान्यपणे मुले मोठी झाल्यावर त्यांचा विवाह करणे ही मात्यापित्यांची इच्छा असते. भगवान शंकर आणि पार्वतीलाही तशीच इच्छा वाटणे स्वाभाविकच आहे. शिवपुराणातील एका कथेनुसार एकदा गणेश आणि कार्तिकेय हे दोघेही, ‘कोणाचा विवाह आधी होणार?’ असे म्हणून वाद घालू लागले. आपल्या मुलांचा वाद संपावा म्हणून शंकर-पार्वतीने त्यांना संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा जो कोणी प्रथम पूर्ण करेल त्याचा विवाह आधी होईल, असे सांगितले. कार्तिकेय लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेला. चतुर गणपती बाप्पाने मात्र आपल्या आई-वडीलांना एका आसनावर बसवून मनोभावे पूजा केली, प्रदक्षिणा घातली आणि आपल्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शंकर-पार्वतीला हे रुचले नाही. परंतु गणरायाने  वेद आणि शास्त्रांचे दाखले देऊन ‘जो कोणी आपल्या मातापित्यांना प्रदक्षिणा घालेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळेल’ असा युक्तिवाद केला. गणेशाच्या या बोलण्यावर शंकर-पार्वती निरुत्तर झाले. हा सारा प्रसंग ब्रम्हदेवांच्या कानावर गेला. ते गणेशाच्या बुद्धिचातुर्याने अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्या दिव्य रूपाच्या दोन कन्या ‘सिद्धी’ आणि ‘बुद्धी’ यांचा विवाह गणेशासोबत करण्याचा निश्चय केला. पुढे गणपतीला सिद्धीपासून ‘क्षेम’ आणि बुद्धीपासून ‘लाभ’ असे दोन पुत्रही प्राप्त झाले. या सगळ्या घटनाक्रमांत कार्तिकेय कुठेच नव्हता. काही काळाने पृथ्वी प्रदक्षिणा करून कार्तिकेय परत आला, तेव्हा देवर्षी नारदांकडून गणपतीचा विवाह झाल्याची वार्ता कळली. कार्तिकेय रागावला, त्याने आपल्या कुटूंबाचा त्याग करण्याचा निश्चय केला. गणेशाच्या विवाहाच्या कथा सांगणाऱ्या अनेक कथांपैकी ही एक पुराणकथा.         
विवाहाच्या सर्व विधींमध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या गणपती बाप्पाला आपली विवाहाची इच्छा पूर्ण करताना आलेल्या नाना अडचणी या कथेत पहायला मिळतात. पुराणकाळात कठीण ठरलेला हा विवाह आधुनिक काळात मात्र सहजसाध्य ठरलाय. होय! रायगड जिल्ह्यातील एका गावाने गणेशाच्या विवाहाची जबाबदारी उचललीय. तीदेखील नित्यनेमाने!
 रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीलगत असलेल्या उरण तालुक्यातील पिरकोन हे एक ऐतिहासिक ठेवा असलेले गाव. गावातील सुप्रसिद्ध मारूती मंदिरासमोर पश्चिमाभिमुख गणेश मंदिर आहे. साध्या कौलारू छप्पराचे जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेले हे मंदिर. मंदिरात सध्या गणेशाची संगमरवराची सुंदर मूर्ती आहे. इथल्या पाटील कुटूंबियांचे पूर्वज धर्मा पाटील व नागू पाटील यांनी १८८४ साली हे मंदिर बांधल्याची नोंद आहे. शतकांपूर्वीच्या या मंदिरात फाल्गुन शुद्ध दशमी शके १८०६ रोजी सिद्धीविनायक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजतागायत या तिथीला श्रीगणेशाचा उत्सव साजरा होतो. या उत्सवासाठी ‘अर्जुन कमळ्या’ यांनी ८ मण तर ‘बाळा धर्मा’ यांनी ४ मण भाताची जमिन दान केल्याचे सांगण्यात येते. गावातील पाटील कुटूंबिय साल पद्धतीने उत्सव करतात. यावर्षी हा उत्सव तिथीप्रमाणेच ५ व ६ मार्च रोजी साजरा होणार आहे. सर्वत्र ‘माघ शुद्ध चतुर्थीला’ येणारी गणेश जयंती आणि ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थी’ला गणेशोत्सव साजरा होत असतो. पिरकोन गावात या उत्सवांसह ‘फाल्गुन शुद्ध दशमी व एकादशी’ हे आणखी दोन दिवस साजरे होतात.
या दिवशी सकाळी गणेशाचे पूजन होते. दिवसभर भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याच दिवशी गणपती बाप्पाच्या विवाहाची लगबग सुरू होते. या  परिसरात लग्नाच्या आदल्या दिवशीची हळद  प्रसिद्ध आहे. या रिवाजाप्रमाणेच गणेशाच्या मूर्तीलाही हळद लावली जाते. हा संपूर्ण दिवस गणरायाच्या हळदी कार्यक्रमाचा. फाल्गुन शुद्ध एकादशीचा दिवस गणेशाच्या विवाहाचा. मानवी रितीरिवाजाप्रमाणे चालणाऱ्या या विवाहसोहळ्यातील ‘मुहूर्त’ दैवी परंपरेला शोभेल असाच  आहे. एकादशीच्या रात्री बाराच्या मुहूर्तावर  गणेशाचा विवाह संपन्न होतो. एका आचणीमध्ये साडी, हिरव्या बांगड्या, नारळ, गूळ-खोबऱ्याची वाटी, दागिने, हळद कुंकू घेऊन नवरीची जय्यत तयारी होते. यानंतर समोर रिद्धी-सिद्धी कल्पून अंतरपाट धरले जाते. शेवटी मंगलाष्टके गाऊन मंगलमूर्तीचा विवाह पार पडतो. कोणे एके काळी खटपटीने झालेला गणेशाचा  विवाह प्रतिकात्मक रुपात नित्यनेमाने संपन्न होतो. 
या थोड्या वेगळ्या परंपरांप्रमाणेच गणेशाच्या विवाहकथाही वेगवेगळ्या आहेत. आपल्याकडे विवाहित आणि दोन पत्नी असणारा गणेश दक्षिणेत मात्र ब्रह्मचारी आहे. तिथे गणेशासोबत सिद्धी-बुद्धी दाखवल्या आहेत, पण त्यांना गणेशाच्या पत्नी न मानता सकारात्मक शक्ती मानल्या जातात. गणेश मूर्तीसोबत असलेल्या या स्त्रियांचे अंकन लहान स्वरूपात असल्याने काही ठिकाणी त्यांना दासीही समजले जाते. प्रांतानुसार गणेशाच्या पत्नींची नावेही बदलत जातात. उत्तर प्रदेशात त्या रिद्धी आणि सिद्धी आहेत.  शिवपुराणात सिद्धी, बुद्धी आहेत.  तर ब्रह्मवैवर्तपुराणात सिद्धी आहे, पण बुद्धीची जागा ‘पुष्टी’ नावाच्या सुंदर कन्येने घेतली आहे. मत्स्यपुराणात रिद्धी आणि बुद्धी आहेत. कधी कधी त्याचा विवाह सरस्वतीशी, तर कधी शारदेशी झाल्याचे मानले जाते. बंगालमध्ये तर दुर्गापूजेच्या वेळी गणपतीचा विवाह ‘कल बो’ या देवतेशी केला जातो. बंगाल असो वा महाराष्ट्र... आपल्या देवतांना मानवी रुपात कल्पून त्यांचे मानवाप्रमाणे सोहळे साजरे करण्याची परंपरा सर्वत्रच आढळते. या सण, उत्सवांच्या माध्यमातून आपल्या आराध्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न भक्तगण करित असतात. गणेश विवाहाच्या पिरकोनमधील अनोख्या परंपरेतून हेच पहायला मिळते.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...