Search This Blog

Monday, March 2, 2020

बॉम्बे डाक ते बॉम्बे डक


“तू धरती पे चाहे जहा भी रहेगी,
तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा...”
      कुमार सानू-अलका याज्ञिक या द्वयींच्या सुवर्णकाळातील हे सुप्रसिद्ध गीत. डोक्याला पट्टी बांधलेल्या रांगड्या सनी देओलला नाचवण्याचा करिष्मा करणारा हा ‘जीत’पट. आपले डोळे बंद असतानाही आपल्या नायिकेला ओळखण्याचा दावा या गीतातला नायक करतो. या नायकाच्या म्हणण्याप्रमाणे  डोळे बंद केल्यानंतरही एखाद्याचे अस्तित्व खरंच जाणवू शकते का? याचे उत्तर आपण जाणतोच. आपल्या सभोवताली अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यांची ओळख डोळे बंद असतानाही होऊ शकते. काही गोष्टींच्या ओळखीसाठी त्यांचा गंधच पुरेसा असतो.
समुद्री जगतातील असाच एक जीव आहे, जो धरतीवर कुठेही असला तरी त्याच्या ‘खुशबू’(!) वरून लगेच ओळखू येतो. तो जिवंत, बर्फात टिकवलेला किंवा वाळलेला; कसाही असो, लक्ष वेधतोच. या तिन्ही अवस्थांत केवळ वासानेच समोरच्याला आपली दखल घ्यायला लावणारा हा समुद्री जीव म्हणजे ‘बोंबील’.
पक्षी नसूनही बॉम्बे डक (Bombay Duck) या वेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या माशाची नामकरण कथाही थोडी हटकेच आहे. फारूख धोंडी यांच्या 1990 सालच्या ‘बॉम्बे डक’ पुस्तकात या नावाचा उल्लेख आलाय. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरूवातीच्या दिवसांतील ही कथा आहे. त्यावेळेस मुंबईतील मासळी रेल्वे मार्गाने भारताच्या इतर भागात पोहोचवण्यास सुरूवात झाली होती. सुकवलेले बोंबील पेट्यांमध्ये भरून त्यांचे पार्सल वितरणासाठी पाठवले जायचे. या पेट्यांवर रेल्वेची ओळख म्हणून बॉम्बे डाक (Bombay Dak) असे लिहले जायचे. पुढे या पेटीवरच्या नावानेच आतल्या माशाला ओळखले जाऊ लागले, ज्याचे कालांतराने बॉम्बे डक असे नुतनीकरण झाले. या कथेसारख्याच बोंबील माशाच्या नामांतराच्या अनेक सुरस कथा आहेत. चमत्कारिक कथांनी भरलेल्या या माशाचे जीवनही तसेच आहे. नावात डक(Duck) असलेला हा जीव प्रत्यक्षात ‘लिझार्ड’ (Lizard) नाव असलेल्या माशांच्या जातकुळीतला आहे.  त्याचे शास्त्रीय नाव हर्पेडन नेहरीयस (Harpadon nehereus). त्याला काही ठिकाणी बम्मेलो(bummalo) म्हणूनही संबोधले जाते.
    इतर माशांपेक्षा थोडे विचित्र रूप असणाऱ्या बोंबलाला भारतीय समुद्रातील त्याच्या अनियमित वितरणामुळे ‘विचित्र मासा’(Strange Fish) म्हटले जाते. महाराष्ट्रानंतर तो थेट लक्षद्वीप, बंगालच्या उपसागरात आढळतो. चिनच्या दक्षिणेकडील भागातही त्याचा आढळ आहे. सरासरी वीतभर लांबीचे असणारे हे मासे फुटाहून अधिक लांबीचे आढळल्याची नोंद आहे. पाण्यात संचार करताना दोन्ही बाजूने चपटाकार शरीराचा असणारा हा मासा पाण्याबाहेर मात्र दंडगोलाकार भासतो. फिक्कट करड्या रंगाच्या या माशाच्या शरीरात नव्वद टक्क्याहून अधिक पाणी असते. त्यामुळे त्याचा संपूर्ण कारभार (अर्ध)पारदर्शक असतो. अपृष्ठवंशीय वर्गातील काही प्राण्यांसारखे लवचिक शरीर हे बोंबीलाचे वैशिष्ट्य. ‘शेंबडे बोंबील, गडगडे बोंबील’ ही त्याच्या याच वैशिष्ट्याचे वर्णन करणारी काही स्थानिक भाषेतील नावे. कणाहीन भासणारा हा मासा समुद्रात कसा पोहत असेल असेल, असा प्रश्न त्याला पाहून पडू शकतो. परंतु या शरीरावरील परांच्या साह्याने खोल समुद्रातून उथळ भागाकडे त्याचे येणे जाणे नेहमीच चालू असते. अंधाऱ्या समुद्रीतळाकडून पृष्ठभागाकडे येताना या माशाच्या सवयीच्या असणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेत वाढ होत जाते. यावरील उपाय म्हणून त्याच्या लहानशा डोळ्यांवर संरक्षक पातळ पडदाही असतो.
    नेहमी आश्चर्यकारक भाव असणारा त्याच्या जबडा रूंद असून त्याचा खालचा भाग पुढे आलेला असतो. या जबड्यातील लहान लहान दातांच्या साह्याने त्याला आपले भक्ष पकडणे शक्य होते.
हे मासे वर्षातून सहावेळा अंडी देतात. समुद्रतळाशी राहणारे हे जीव काहीवेळेस खोल समुद्रातून किनाऱ्यांकडे येतात. विशेषत: पावसाळी ऋतूत  नद्यांच्या त्रिभूज प्रदेशानजिक हे मासे अन्नाच्या शोधांत समूहाने येत असतात.
     बोंबील हा मासा मांसाहारी लोकांच्या अन्नाचा प्रमुख भाग आहे. ओल्या आणि सुक्या दोन्ही स्वरूपात त्याचा वापर होत असतो. मानवी शरीरातील उतींच्या वाढीसाठी आणि दुरूस्तीसाठी आवश्यक प्रथिने या माशामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्याचबरोबर अतिरिक्त रक्तस्राव थांबवण्यासाठी, हृदयरोगाची शक्यता कमी करणारे ओमेगा-3 हे स्निग्धाम्ल यात असते. तसेच या माशापासून अ जीवनसत्वही बऱ्यापैकी मिळते. इतर माशांच्या तुलनेत बोंबीलामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने अ‍ॅनिमिया असणाऱ्यांना तो उपयुक्त ठरतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, नख, केस, त्वचा यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक बोंबलामध्ये भरपूर प्रमाणात असतात. बोंबील माशाच्या शरीरातून मिळणाऱ्या तेलाचा वापर वेदनाशामक औषंधामंध्ये केला जातो.
या सर्व कारणांमुळेच हा मासा नेहमीच मासेमारांच्या निशाण्यावर राहतो. साधारणत: ‘डोल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या जाळ्याद्वारे या माशाची पकड केली जाते. परंतु अधिक हव्यासापोटी यांत्रिक बोटी, अवेळ मासेमारी, पर्ससीन नेट यांचा मार्ग अवलंबला जातो.एकीकडे ‘हमको तुमसे प्यार हुवा है...” म्हणत खवय्ये त्याचा फडशा पाडत सुटलेत, तर हे जीव मात्र ,“जीना दुश्वार हुवा है...”चा आर्त सूर आळवत आहे. समुद्राचे जल-तल बिघडवणाऱ्या माणसामुळे तर बोंबलांसारख्या कित्येक जीवांची बोंबच झाली आहे. केवळ वासानेच आपले लक्ष वेधणाऱ्या बोंबलांच्या अधि‘वासा’कडेही यानिमित्ताने लक्ष वेधावे हीच अपेक्षा.

-  तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(सदर लेख रयत विज्ञान पत्रिका सप्टेंबर 2020 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...