Search This Blog

Sunday, April 7, 2019

प्रवास जलगंगेचा

प्रवास जलगंगेचा

         सर जेम्स लेईंग्! इंग्लंडमधील डरहॅम परगण्याचे शेरीफपद भूषवलेला माणूस. रिव्हर वेअर कमीशनर्स आणि सुएझ कॅनाल कंपनी या लोकप्रिय संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. डेप्टफोर्ड हाऊस, संडरलँड येथील सर जेम्स लेईंग् अँड सन्स (लिमिटेड) या जहाज बांधणी करणाऱ्या कंपनीचे ते संस्थापक. ब्रिटीश सरकारद्वारे नाईटहूड पारितोषकाने सन्मानित असणाऱ्या या अवलियाचे सन 1901 मध्ये निधन झाले.
     दुसरे व्यक्तीमत्त्व वालचंद हिराचंद दोशी! आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार तसेच वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक. भारताच्या किनाऱ्यावरून चालणारी ब्रिटिश जहाजकंपन्यांच्या अखत्यारीतील जहाजवाहतूक भारतीयांच्या हाती येण्याच्या दृष्टीने वालचंदांनी सरकारशी सतत वाटाघाटी केल्या. 
अखेर दादाभाई नौरोजी यांच्या प्रेरणेतून आणि नरोत्तम मोरारजी यांच्या सहकार्याने वालचंदांनी ‘सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ ही भारतीय जहाजकंपनी स्थापन केली. आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचे ते दोन वर्षे उपाध्यक्ष, 'ओरिएंटल' या भारतीय विमा कंपनीचे संचालक, 'बँक ऑफ बडोदा'चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सन 1953 साली त्यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. 
         औद्योगिक व सामाजिक क्षेत्रामध्ये नाव कमावणारी ही दोन भिन्न प्रकृतींची व्यक्तीमत्त्वे. या दोन व्यक्तीमत्त्वांचा आणि मुंबईच्या दक्षिणेकडील ‘पिरकोन’ या लहानशा गावाचा दुरान्वयेही काही संबंध असण्याची शक्यता वाटत नाही. पण “जग खूप लहान आहे” या उक्तीचा परिचय घडवून देणाऱ्या गोष्टी नेहमीच घडत असतात. इथेही असेच काहीसे घडलेय. यापूर्वी पिरकोनमधील काही वास्तूंनी ऐतिहासीकदृष्ट्या प्रसिद्धी मिळवली होती, आता येथील एका ‘वस्तू’ने शब्दश: ‘आपला आवाज’ सातासमुद्रापार पोहोचवलाय.
     आपल्या डोक्यात प्रश्नांचे नादतरंग उमटवणारी ही वस्तू आहे तरी काय?
तिचा या मोठ्या व्यक्तींच्या कार्याशी काय संबंध?

        पिरकोन ग्रामपंचायतीची पश्चिम हद्द जिथे संपते तिथे पाले गावची लोकवस्ती सुरू होते. या वेशीवरच पिरकोनचे ग्रामदैवत वाघेश्वराचे मंदिर आहे. जुनी परंपरा असणाऱ्या या मंदिराचा अलीकडेच जिर्णोद्धार झाला आहे. आसपासच्या इतर गावांतील भाविकही या देवस्थानाला भेट देत असतात. आपल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपल्या श्रद्धास्थानांना विविध स्वरूपातींल वस्तूंचे दान करण्याची प्रथा पुरातन काळापासून चालू आहे. काही दशकांपूर्वी या वाघेश्वर मंदिराला पिरकोन आणि शेजारच्या गोवठणे गावातील ट्रॉलरद्वारे मासेमारी करणाऱ्या एका समूहाकडून दान स्वरूपात एक भेटवस्तू देण्यात आली. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन या सर्व धर्मांमध्ये विशेष महत्त्व असणारी ही वस्तू म्हणजे घंटा. 
सर्वसाधारणपणे देवालयाच्या प्रवेशद्वारांवर, सभामंडपात किंवा गाभाऱ्यात एक किंवा अधिक घंटा टांगलेल्या असतात. देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्ताने देवालयात प्रवेश करताना प्रथम घंटानाद करून देवाला आपल्या आगमनाची सूचना करावयाची असते, असा एक संकेत आहे. वाघेश्वराच्या मंदिरातही अशा एकाहून अधिक घंटा एकत्र टांगलेल्या स्थितीत आहेत. या सर्व घंटांपैकी आकाराने सर्वात मोठी असणारी घंटा या ट्रॉलर-मच्छिमार समूहाकडून मिळाली असल्याची माहीती समजते. नित्यनेमाने मंदिरात जाणारे भक्त ही वस्तू पाहतात, त्याला स्पर्श करतात. दूर अंतरावर जाणारा त्याचा आवाज अनुभवतात. पण, यावरून सर्वसामान्य वाटणाऱ्या या घंटेला विशेष महत्त्व द्यावे असे कोणालाही वाटणार नाही. या घंटेचे निरीक्षण केल्यानंतर त्यावर ठळक इंग्रजीत (रोमन लिपीत) काहीतरी लिहिले असल्याचे दिसते. या घंटेच्या विशेषत्वाचा हा पहिला पुरावा. त्याचे वाचन केल्यास त्यावर ‘JALAGANGA’ (जलगंगा) असे स्पष्टपणे कोरलेले दिसते. पूर्वीच्या काळी मोठ्या जहाजांवर वेळ दर्शवण्यासाठी, धोक्याचा इशारा देण्यासाठी, तसेच तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी धातूच्या घंटेचा वापर होत असे. या घंटेवर त्या जहाजाचे नाव कोरण्याचीही पद्धत आहे. वाघेश्वर मंदिराला ही घंटा भेट स्वरूपात दान दे‌णाऱ्यांकडून मुंबईतून ‘एका मोठ्या जहाजावरील घंटा’ आणल्याचे सांगीतले होते. प्रत्यक्ष दानकर्त्यांकडून मिळालेली माहीती घंटेवरील ‘JALAGANGA’ हे  नाव एखाद्या मोठ्या जहाजाचे असल्याचे संकेत देते. अर्थातच हे नाव भारतीय  धाटणीचे. जहाजबांधणी, जलवाहतूक  क्षेत्रातील जाणकारांकडून अधिक माहीती घेतल्यानंतर जगभरातील अधिकृत नौकांची आंतरराष्ट्रीय मेरिटाईम संघटनेकडून व्यवस्थितपणे नोंद होत असल्याचे समोर आले. नौकांविषयीच्या या नोंदी तपासल्यानंतर वाघेश्वर मंदिरातील घंटेवर ज्या जहाजाचे नाव कोरले आहे, ही घंटा ज्या जहाजावरील असण्याची शक्यता सर्वाधिक होती त्या ‘जलगंगा’ नावाचा शोध लागला. जलगंगा नावाचे आणखी दुसरे जहाज असण्याची शक्यता नाहीसे करणारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या नावातील अक्षरे. सामान्यत: ‘जलगंगा’ या शब्दाचे स्पेलिंग सर्वत्र ‘JALGANGA’ असे पहायला मिळते, परंतु जहाजाच्या नावाचे स्पेलिंग जादा ’A’ असलेले JALAGANGA’ असे थोडे वेगळे आहे. या नावाचा उपयोगही नेमके जहाज ठरवण्यात झाला.

        इंग्लंडमधील संडरलँडच्या सर जेम्स लेईंग् अँड सन्स (लिमिटेड) या कंपनीने 1958च्या सुमारास ही बोट बांधून पूर्ण केली. जहाजबांधणी क्षेत्रात स्वस्त आधुनिक तंत्रज्ञानाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या सर जेम्स लेईंग यांच्या कंपनीद्वारे या जहाजाची लंडनच्या बंदरात प्रथम नोंद करण्यात आली. त्यावेळचे तिचे नाव होते सिल्व्हरलेक (SILVERLAKE). सन 1963 साली ब्रिटनची ही चंदेरी लेक भारताच्या सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन या वालचंद हिराचंद संस्थापित कंपनीने विकत घेतली. सिंदिया स्टीम नेव्हीगेशन कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी महात्मा गांधी, पं.मोतीलाल नेहरू उपस्थित होते यावरून या कंपनीचे महत्त्व लक्षात येईल. मूळ इंग्लंडच्या या कन्येचे सिंदीया कंपनीद्वारे ‘जलगंगा’ असे बारसे झाले. म्हणजे उपरोक्त घंटा जहाज भारतात आल्यानंतर बसवण्यात आली असावी. जवळपास साडेचारशे फूट लांबी आणि साठ फूट रुंद असणारे हे जहाज जनरल कार्गो व्हेसल या प्रकारातील होते. आंतरराष्ट्रीय मेरिटाईम संघटनेद्वारे IMO-5328354 या नोंदणीद्वारे भारताची ही जलगंगा समुद्रामध्ये धावू लागली. सतरा वर्षाच्या  सागरी प्रवासानंतर 1980 साली हे जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जे.एम. इंडस्ट्रीज द्वारे पुढील प्रक्रीया उरकण्यात आली. लंडनच्या किनाऱ्यावरून सुरू झालेला हा प्रवास मुंबईच्या किनारी थांबला. जहाजाच्या काही भागांचा पुनर्वापर झाला तर काही निरूपयोगी भाग समुद्रात विसावले. पण या विघटनाच्या प्रक्रीयेत या जहाजावरील एक वस्तू मुंबईतल्या बाजारातून पिरकोन गावी पोहोचली. ज्या आवाजाने कधी काळी जहाजावरील कर्मचाऱ्यांना इशारा मिळत असे, तो आवाज आता वाघेश्वराच्या मंदिरात घुमतोय. आपल्या अंगावरील नाव मिरवत समुद्राच्या विशाल प्रवाहात मार्गक्रमण करत ज्या घंटेने प्रवास केला ,तीच घंटा आता समुद्राइतक्या विशाल हृदयाच्या मानल्या जाणाऱ्या वाघेश्वर महाराजांच्या सेवेत दाखल झालीय. यापुढे जेव्हा तुम्ही या घंटेला स्पर्श कराल तेव्हा सामान्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी झटलेल्या सर जेम्स आणि वालचंद हिराचंद यांच्या आठवणींनाही स्पर्श करा. या लेखाच्या निमित्ताने औद्योगिक इतिहासात घंटेवरील नावासारखेच ठळकपणे कोरलेले या अवलियांचे नाव घंटेच्या आवाजाप्रमाणे वारंवार घुमावे हीच सदिच्छा.

      -तुषार  म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ : www.vesseltracking.net, www.shipspotting.com,हिंदू मंदिरातील पोर्तुगीज घंटा- महेश तेंडुलकर

(सदर लेख दै.कर्नाळा 7 एप्रिल 2019 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
https://epaper.ekarnala.com/epaper/edition/1070/dainik-karnala/page/4 )

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...