स्टीव्ह-टीवचा खेळ

         2001 सालातल्या नोव्हेंबर महिनातला एक नाट्यमय प्रसंग. स्थळ होते दक्षिण आफ्रिकेतील ‘पोर्ट एलिझाबेथ’ मैदान. कसोटीच्या चौथ्या दिवशी सचिन गोलंदाजीला आला. त्याने चार-पाचच षटके टाकली असतील आणि टी.व्ही. कॅमेरा त्याच्या हातावर रोखला गेला. वेगवेगळ्या कोनांतून, झूम करून सचिनच्या हालचाली टिपल्या गेल्या. सामनाधिकारी माईक डेनिस यांनी तातडीने सामन्याचे रेकॉर्डींग तपासणीसाठी मागवले. 
      काहीतरी वाईट घडतंय हे सर्वांना कळत होते. संध्याकाळी माईक डेनिस यांनी कर्णधार गांगुलीसह सर्व खेळाडूंची मिटींग घेऊन सचिन तेंडुलकरने चेंडू कुरतडल्याचे सांगून त्याला एक वर्षाच्या सामनाबंदीची शिक्षा होऊ शकते असे जाहीर केले. यानंतर सचिनला बाजू मांडण्याची संधी मिळाली. चर्चेअंती एक सामन्याची बंदी आणि 75% मानधनात कपात अशी शिक्षा सुनावण्यात आली.
       दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचे मथळे नेहमीप्रमाणे सचिननेच भरलेले होते, पण यावेळेस त्याच्या महानतेवर, नैतिकतेवर शंका घेणारे. बऱ्याचशा उथळ माध्यमांनी त्याला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. हे ‘महाभारत’ घडत असताना सचिनचा एकेकाळच्या साथिदार पण समालोचक झाल्याने ‘दूरदृष्टी’ लाभलेल्या माजी खेळाडूने टीका करण्याची संधी दवडली नाही. भारतीय क्रिकेट बोर्ड मात्र सचिनच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. प्रकरण आय.सी.सी. कडे गेले. भारतीय क्रिकेट बोर्डाने  पाठींबा देताच, खेळ भावनेचा नेहमीच फुटबॉल करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह वॉ म्हणाला,
कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही! सचिनवर कारवाई व्हायला हवी.”
   यानंतरही विविध माध्यमांतून स्टीव्हची टीव-टीव चालूच राहीली.

 प्रत्यक्षात काय घडलं होतं मैदानावर?
           सचिन गोलंदाजी करत असताना मैदान ओलसर होते. चेंडू वारंवार ओला व्हायचा. हा ओला चेंडू सचिन आपल्या रुमालाने पुसायचा. ओल्या मैदानातील चिखल चेंडूच्या शिवणीच्या जागेत लागले होते. गोलंदाज चेंडू फेकण्यापूर्वी तो आपल्या हातात व्यवस्थित धरण्याचा प्रयत्न करतो. चिखल आणि ओलसरपणामुळे चेंडूची पकड योग्य रितीने करता यावी म्हणून सचिनने सर्वांसमक्ष चेंडूच्या शिवणीवर बोट फिरवून ‘चिखल’ बाहेर काढले, त्यात अडकलेल्या दोन गवताच्या काड्या बाहेर टाकल्या आणि आपल्या रुमालाने चेंडू पुसला.
     ज्यांना क्रिकेटमधलं काहीही कळत नाही, थोडंफार कळतं, सर्वकाही कळतं अशा सर्वांनीच पुढे तो प्रसंग स्पष्टपणे पाहीला. यात कुठेही चेंडूचा आकार बदलणे, कुरतडणे किंवा छेडछाड करणे असे काहीही नव्हते. आय.सी.सी. लवादानेही हे मान्य केले. अखेर मैदानावरील पंचांच्या  परवानगीशिवाय ‘चिखल’ काढण्याच्या गुन्ह्याबद्दल(?) सचिनला सामन्याच्या पन्नास टक्के मानधन कपातीची शिक्षा झाली. चेंडू कुरडण्याच्या आरोपातून क्लीन चीट मिळाल्याने सचिनच्या खिलाडूवृत्तीवर ‘चिखल’ उडवणाऱ्यांच्या हाती यावेळेसही चिखल’च लागले.
      हे सर्व आता आठवण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील चेंडू कुरतडण्याची घटना.

बॅनक्राफ्टने अंमलात आणलेली संघाची अनैतिक रणनिती कॅमेऱ्यांसमोर उघडी पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जुनाच अखिलाडू चेहरा नव्याने समोर आला.  या प्रकरणात कर्णधार स्टीव स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या कारवाईत आजीवन बंदीच्या शिक्षेचाही विचार सुरू आहे. एका क्षुल्लक प्रसंगावरून सचिनवर कारवाईची मागणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व स्लेजिंगचा एक सेनापती स्टीव्ह वॉ याने मात्र दोषींना शिक्षा देताना या संपूर्ण प्रकरणाचा “समतोल’ विचार करण्याची मागणी केली आहे. “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणामुळे आपण कमालीचे दुखावलो असल्याची पुस्ती जोडतानाच दोषी खेळाडूंकडे सूडबुद्धीने नव्हे, तर समतोल विचारबुद्धीने पाहण्याची गरज असल्याचे स्टीव्ह वॉने म्हटले आहे. आता कोणीतरी स्टीव्ह वॉला त्याच्याच मागील वाक्याची आठवण करून देणे गरजेचे आहे-
“कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही!”

      केवळ जिंकणे याच इर्षेने खेळणाऱ्या आणि त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणाऱ्या कांगारूंसाठी सध्याचा काळ कठीण जाईल हे नक्की. पण यापेक्षाही मोठ्या घटनांमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मोठी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे स्टीव्ह म्हणतो त्याप्रमाणे या प्रकरणाचा ‘समतोल(!)’ विचार होऊन महत्त्वाच्या खेळाडूंना अभय मिळेल असेच वाटते.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

सचिन_तेंडुलकर
#स्टीव्ह_वॉ
#तुषारकी
#Sachin_Tendulkar
#Steve_waugh
#Balltampering
#Tusharki

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शोले आणि ‘सांभा’ दगड