वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया
वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया समुद्रावरून अलिबागच्या थळ जेटीकडून होडी निघते आणि थोड्याच वेळात उंदेरीला वळसा घालून खांदेरीच्या जवळ येऊ लागतो. दूरून दिसणारा दीपगृहाचा मनोरा, भोवती पसरलेले खडक, आणि लाटांवर डोलणारं बेट. किल्ल्यावर पाय ठेवताच जाणवतं, ही जागा फक्त पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची आहे. खाऱ्या वाऱ्यात भूतकाळ मिसळलेला आहे. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारे हे खांदेरी बेट. किल्ल्याच्या एका टोकाला, खडकांच्या आडोशाला वेताळदेवाचं मंदिर उभं आहे. साधं, लहानसं देवस्थान. आत शिरल्यावर गोंगाट मागे राहतो आणि एक शांत थर मनात बसतो. मंदिरात टांगलेल्या काही घंटा दिसतात. त्यातली एक घंटा मात्र लगेच लक्ष वेधून घेते. आकाराने मोठी, धातूवर काळाचे ठसे. हात लावला की तिचा थंड स्पर्श जाणवतो आणि मग नजरेला तिच्यावरची अक्षरं दिसतात - EMPRESS OF INDIA 1891 क्षणभर थांबावं लागतं. ही घंटा इथे कशी आली असेल ही साधी देवळातील वस्तू नाही. ती एका मोठ्या जहाजाची घंटा आहे. एम्प्रेस ऑफ इंडिया नावाचं जहाज. १८९१ साली इंग्लंडमध...