वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया

 वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया

समुद्रावरून अलिबागच्या थळ जेटीकडून होडी निघते आणि थोड्याच वेळात उंदेरीला वळसा घालून खांदेरीच्या जवळ येऊ लागतो. दूरून दिसणारा दीपगृहाचा मनोरा, भोवती पसरलेले खडक, आणि लाटांवर डोलणारं बेट. किल्ल्यावर पाय ठेवताच जाणवतं, ही जागा फक्त पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची आहे. खाऱ्या वाऱ्यात भूतकाळ मिसळलेला आहे. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारे हे खांदेरी बेट.

    किल्ल्याच्या एका टोकाला, खडकांच्या आडोशाला वेताळदेवाचं मंदिर उभं आहे.  साधं, लहानसं देवस्थान. आत शिरल्यावर गोंगाट मागे राहतो आणि एक शांत थर मनात बसतो.

मंदिरात टांगलेल्या काही घंटा दिसतात. त्यातली एक घंटा मात्र लगेच लक्ष वेधून घेते. आकाराने मोठी, धातूवर काळाचे ठसे. हात लावला की तिचा थंड स्पर्श जाणवतो आणि मग नजरेला तिच्यावरची अक्षरं दिसतात - 

EMPRESS OF INDIA 1891



क्षणभर थांबावं लागतं. ही घंटा इथे कशी आली असेल

ही साधी देवळातील वस्तू नाही. ती एका मोठ्या  जहाजाची घंटा आहे. एम्प्रेस ऑफ इंडिया नावाचं जहाज. १८९१ साली इंग्लंडमध्ये बांधलेलं. कॅनडियन पॅसिफिक स्टीमशिप कंपनीचं हे जहाज त्या काळात पॅसिफिक महासागरावर जपान, चीन आणि कॅनडा यांना जोडणाऱ्या मार्गावर धावत असे. प्रवासी, माल, आणि एका नव्या जगाची चाहूल घेऊन.



जहाजावर अशी घंटा केवळ सजावटीसाठी नसते. वेळ कळवण्यासाठी, कामांची अदलाबदल करण्यासाठी, आणि आपत्कालीन इशाऱ्यासाठी तिचा वापर होत असे. समुद्राच्या प्रचंड आवाजातही तिचा नाद वेगळा ऐकू यायचा.

पण या नावामागे आणखी एक स्तर आहे.

एम्प्रेस ऑफ इंडिया हे फक्त जहाजाचं नाव नाही. तो एक सत्तेचा दाखला होता. १८७६ साली राणी व्हिक्टोरिया यांनी हा किताब स्वीकारला. बेंजामीन दिस्राएली यांनी मांडलेल्या राजकीय किताब कायद्यामुळे हा निर्णय झाला. १८७७ पासून हा किताब अधिकृतपणे वापरला जाऊ लागला. भारतावर ब्रिटिश साम्राज्याची पकड अधिक ठळक करण्यासाठी. त्या काळात यालाच कैसर-इ-हिंद असंही म्हटलं जात होतं. १९४७ पर्यंत ही ओळख टिकून राहिली. म्हणजे या घंटेवर कोरलेलं नाव हे केवळ जहाजाचं नाही, तर एका संपूर्ण साम्राज्याच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे.



.     काळ पुढे गेला. जहाज जुने झाले. एम्प्रेस ऑफ इंडिया चा प्रवासही थांबला. तिचं विघटन झालं. पण काही वस्तू जगत राहतात. वेगवेगळ्या हातातून, वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचत. ही घंटा तशीच इथे आली असावी. कदाचित मुंबईच्या भंगार बाजारातून. कदाचित एखाद्या मच्छिमाराच्या हातून...

आणि शेवटी खांदेरीच्या या मंदिरात स्थिरावली.

कोकणात वेताळ हा रक्षणकर्ता मानला जातो. समुद्रावर जाणाऱ्या कोळ्यांसाठी एक श्रद्धास्थान. भीती, अनिश्चितता आणि आशा यांचं मिश्रण. आणि त्या श्रद्धेच्या जागीच ही घंटा आज वाजते आहे.

एकेकाळी ब्रिटिश जहाजावर आदेश देणारा तिचा नाद, आज देवापुढे नम्रपणे घुमतोय.



या सगळ्यात एक शांत विरोधाभास आहे. शिवाजी महाराजांनी याच समुद्रात इंग्रजांना आव्हान दिलं.  सत्तेची लढाई इथेच लढली गेली. कान्होजी आंग्रे यांनी हीं लढाई आणखी तीव्र केली. आज त्या सत्तेचं प्रतीक असलेली घंटा एका छोट्या मंदिरात आहे.

कोणीही हे जाणीवपूर्वक घडवलं नाही. पण म्हणूनच ते अधिक खरं वाटतं.

मंदिराबाहेर नजर टाकली की किल्ल्याच्या भिंती, पडलेल्या तोफा, आणि बाजूला पडलेला प्लास्टिक कचरा दिसतो. इतिहास आणि वर्तमान एकत्र उभे. एक शांत, दुसरा गोंधळलेला.

परत एकदा घंटेचा नाद घुमतो. साधा, पण खोलवर जाणारा.

तेव्हा जाणवतं, वस्तू फक्त वस्तू नसतात. त्या काळ जपतात.

पुढच्या वेळी तुम्ही खांदेरीवर जाल, ही घंटा वाजवा. आणि थोडा वेळ शांत उभं रहा. कदाचित त्या नादात तुम्हाला समुद्र ऐकू येईल. आणि त्याच्यासोबत इतिहासही.

 - तुषार म्हात्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शोले आणि ‘सांभा’ दगड